Home » Blog, सडेतोड : अरुण रामतीर्थकर, स्थंभलेखक » अजमल संपला, आता अफझलचे बोला

अजमल संपला, आता अफझलचे बोला

•सडेतोड : अरुण रामतीर्थकर•

कसाबला फाशी देणे यात सरकारच्या देशभक्तीचा लवलेश नाही. यात फक्त राजकारण आहे. कसे ते पहा. २६/११ च्या हल्ल्यात साळस्कर, करकरे, कामटे आणि ओंबाळे यांच्यासह १९ पोलीस शहीद झाले. करकरेंना कसाब नव्हे, तर हिंदुत्वावाद्यांनी मारले असे कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह म्हणाले नव्हते? खटला चालू असताना हे विधान म्हणजे कसाबला वाचवण्याचाच प्रकार नव्हता काय?

अजमल अमीर कसाब या पाकिस्तानी अतिरेक्याला बुधवारी सकाळी येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. फाशीनंतर ही बातमी जगाला सांगण्यात आली. बातमीचा प्रवास ५ नोव्हेंबरला सुरू झाला. त्यादिवशी राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळून शिक्षा कायम केली. ही फाईल गृहमंत्रालयाने ८ नोव्हेंबरला हातावेगळी करून महाराष्ट्र सरकारला पाठवली. महाराष्ट्र सरकारने फाशी अमलात आणण्यासाठी १७ जणांचे पथक नेमले. अजमल कसाबच्या फाशीच्या अंमलबजावणीला ‘ऑपरेशन एक्स’ असे नाव देण्यात आले. १९ नोव्हेंबरला त्याला गुपचुप मुंबईहून पुण्यास हलवले. २१ नोव्हेंबरला सकाळी फाशी देण्याचे ठरले. २० नोव्हेंबरला वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक झाली. येत्या २४ तासात ‘महत्त्वपूर्ण’ घटना होणार आहे, सावधानी बाळगा असे त्यांना सांगण्यात आले. हे १७ अधिकारी आणि येरवडा कारागृहाच्या प्रमुख मीरा बोरवणकर यांच्या व्यतिरिक्त कोणालाही फाशीची कल्पना नव्हती.
मी म्हणतो, कसाबच्या फाशीसाठी एवढी गुप्तता पाळण्याची काय गरज होती? हा फालतुपणा केलाच वर फाशीनंतर ‘बोलल्याप्रमाणे आम्ही करून दाखवले’, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्र्यांनी आणि २६/११ च्या शहिदांना आम्ही खरी श्रद्धांजली वाहिली असे राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितले. जणू काही यांनीच जंगलात जाऊन नरभक्षक वाघ टिपला. ९ जिहाद्यांना यमसदनी पाठवले पोलिसांनी. छातीवर गोळ्या लागत असताना त्या झेलत कसाबला जाऊन घट्ट मिठी मारली आणि जिवंत पकडून दिले ते आमच्या तुकारामभाऊंनी. यांनी काय केले म्हणून फुशारक्या मारत आहेत.
सरकार म्हणून काय करायचे असते याचे एक उदाहरण सांगतो. हिटलरने जगातील ज्यू संपवण्याचा आदेश देऊन ती जबाबदारी आइशमन या अधिकार्‍यावर टाकली. आइशमनने छळ छावण्या उघडून त्यात ज्यू पकडून कोंडले. विषारी वायू सोडून, वीजप्रवाह सोडून, उपाशी ठेवून अशारीतीने किमान २ लाख ज्यूंना त्याने मारले. हिटलरचा पराभव होऊन त्याने आत्महत्या करताच आइशमन पळाला. १९५० नंतर स्थापन झालेल्या इस्त्रायलने त्याचा जगभर शोध घेतला. नव्वदीत असलेल्या आइशमनला आईसलँड या देशात पकडले. इस्त्रायलला आणून खटला भरून मृत्युदंड ठोठावला. अशा वेळी सरकारने फुशारक्या मारल्या तर ठीक आहे. तुकाराम ओंबाळेनी मुंबईत पकडलेल्या कसाबला न्यायालयाने फाशी ठोठावली, त्यात ‘हमने करके दिखाया’ अशी फुशारकी कशासाठी? तुम्ही पुळचट, दाऊद इब्राहिमचा पाकिस्तानातील पत्ता पाकिस्तानला देता. या पत्त्यावर धडकून दाऊदच्या मुसक्या बांधून भारतात आणले आणि खटला भरून फासावर चढवले तर फुशारक्या मारा. दाऊद सोडा, टायगर मेमनला तरी पकडायची हिम्मत आहे का? कॅसेटकिंग गुलशनकुमारचा खून करून संगीतकार नदीम पळून गेला. त्यालाही पकडता येत नाही. कसल्या फुशारक्या मारता?
आरोपीला फासावर चढवण्यात मर्दुमकी आहे असे क्षणभर मानले तर अफझल गुरूच्या फाशीचे काय? तो तर कसाबच्या आधीचा गुन्हा आहे. राष्ट्रपतीकडे दयेचे अर्ज किती आहेत. त्यात अफझलचा क्रमांक कितवा आहे याची माहिती नेभळट गृहमंत्री शिवराज पाटील वारंवार देत होते. अफझलचा ४ वर्षांपूर्वी ५६ वा अर्ज असेल तर कसाबचा अर्ज १०० वा तरी असेल. मग आधी अफझलला फाशी होऊन मग ६-७ वर्षांनी कसाबला फाशी देणे न्यायोचित झाले असते. कसाबचा अर्ज गठ्ठ्याच्या तळाशी असताना तो काढून सर्वात वर ठेवण्याचे पापकृत्य किंवा पुण्यकृत्य कोणी केले? कसाबच्या बाबतीत असे करणे शक्य होते तर अफझलचा अर्ज ५६ क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर ठेवताना हात का थरथरतात, याचे उत्तर आधी द्या. खरे तर आम आदमीला मारणार्‍या कसाबकडे दुर्लक्ष करायला हवे (तुमची नियत) आणि ज्याच्या गोळीबाराने तुम्हाला सभागृहात बाकाखाली लपून बसावे लागले. अफझलचे सहकारी सभागृहात आले असते तर ५०-६० खासदार नक्की मेले असते. किमान १५-२० खासदार जयपाल रेड्डी यांच्याप्रमाणे संसदेत आले असते. तुमच्या जीवावर उठलेल्या अफझलला फासावर चढवण्यात हयगय, दिरंगाई, खोटारडेपणा आणि कसाबच्या बाबतीत तत्परता हा काय विचित्र प्रकार आहेे.
माझ्या मते या मागेही धोरण आहे. कसाबचे कृत्य मुंबईचे तर अफझलचे तिकडे लांब दिल्लीचे. उत्तरेकडे. आसाममध्ये ४० टक्के, बंगालमध्ये ३० टक्के, उत्तर प्रदेशात ३० टक्के मुस्लिम मतदार आहेत. अफझलला फाशी दिल्यावर ही मते जातील. कसाब लांब मुंबईचा, महाराष्ट्रात मुस्लिम १० टक्केही नाहीत. त्यातून ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव-राज एकत्र येण्याची हवा आहे. ठाकरेंच्या निधनाने शिवसेनेतील मरगळ दूर होईल. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे याचा ध्यास शिवसैनिकांना लागेल. ठाकरेंच्या निधनाने हिंदू व्होट बँक भक्कम होईल मग त्यावर उपाय काय? त्यावर उपाय म्हणून कसाबला झटपट फाशी दिली. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मृत्यूपूर्वी कॉंग्रेस रसातळाला गेली होती. त्यांच्या मृत्यूनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेने कॉंगे्रसला जीवदान मिळाले होते. सहानुभूतीच्या लाटेची शक्ती कॉंग्रेसएवढी कोणालाच माहिती नाही. सहानुभूतीची लाट निर्माण करण्याएवढ्या उंचीचे ठाकरे नक्कीच आहेत. जो लाभ १९८४ व १९९० साली मिळाला तो २०१४ साली युतीला मिळेल. तो मिळू नये, हिंदु मतापैकी आपला हिस्सा आपल्याकडेच राहून जादा हिस्सा मिळवता यावा यासाठी गुपचुप नव्हे, तर ठाकरेंच्या निधनानंतर झटपट कसाबला फासावर चढवण्यात आले. फाशीबाबत देशात एकच न्याय असताना कसाबला एक न्याय अफझलला दुसरा न्याय या मागे हेच कारण आहे.
कसाबला फाशी देणे यात सरकारच्या देशभक्तीचा लवलेश नाही. यात फक्त राजकारण आहे. कसे ते पहा. २६/११ च्या हल्ल्यात कामटे, साळस्कर, करकरे आणि ओंबाळे यांच्यासह १९ पोलीस शहीद झाले. करकरेंना कसाब नव्हे, तर हिंदुत्वावाद्यांनी मारले असे कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह म्हणाले नव्हते? खटला चालू असताना हे विधान म्हणजे कसाबला वाचवण्याचाच प्रकार नव्हता काय? ओसामा बिन लादेनला ओसामाजी असे आदरार्थी संबोधणार्‍या दिग्विजयच्या मनात कसाबबद्दलही आपुलकी  असणारच. या शहीद पोलिसांचे एक स्मारक उभारले गेले. ११ ऑगस्टला मुस्लिम झुंडीने आले. लाथा मारून शहिदांचे स्मारक तोडले. काय केले सरकारने? ईद झाल्यावर सावकाशीने ५८ जणांना पकडलेे. निरपराधांना पकडले म्हणून याच सरकारमधील काही मंत्र्यांनी च्याव-च्याव केली. मुस्लिमांच्याच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्येक अटकेचा फेरविचार करू म्हटले. घटनेला ९० दिवस उलटून गेले. अद्याप ११ ऑगस्टचे आरोपपत्र नाही. शहिदांच्या स्मारकाच्या अवहेलनेबाबत सरकार एवढे उदासीन दिसत असताना कसाबबद्दल गुपचुप किंवा झटपट निर्णयामागे निव्वळ राजकारण आणि राजकारणच आहे. या उप्पर या सरकारच्या देशभक्तीवर ज्यांचा विश्‍वास असेल त्यांनी तो खुशाल ठेवावा.
शेवटी एक शंका, कसाबला फाशी दिली की तो डेंग्युने मेला? कसाबला डेंग्यु झाला ही बातमी काही आठवड्यापूर्वी आलीच होती. भले त्याला कडक सुरक्षा व्यवस्था असेल, पण डासांना काय. ते चावले. उपचाराचे म्हणाल तर यश चोप्रांना काय कमी होते. पैसा होता, उपचार चालू होते तरी ते गेले. कसाबही  तसाच गेला म्हणून फाशीचे नाटक करण्यात आले. फेसबुकवर प्रगट झालेली ही शंका. मला त्यात तथ्य दिसले म्हणून तुम्हालाही कळवली.
कसाबची सुरक्षा व्यवस्था आणि त्याचे बिर्याणीचे चोचले यावर कोट्यवधी रु. चा खर्च होत होता. फाशी देऊन वा डेंग्यूने कसाब मेला. आता तो खर्च वाचला एवढेच समाधान!
रविवार, दि. २५ नोव्हेंबर २०१२

Posted by : | on : 25 December 2012
Filed under : Blog, सडेतोड : अरुण रामतीर्थकर, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *