Home » Blog » अफझलचे थडगे राष्ट्रीय स्मारक करा

अफझलचे थडगे राष्ट्रीय स्मारक करा

सडेतोड : अरुण रामतीर्थकर

बस्स.आता तेवढीच मागणी करायची राहिली आहे. ताळतंत्र नसलेल्या संघटनेने उद्या तशी मागणी केली, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार तसेही करून टाकेल. काही नेम नाही. या दोन भ्रष्ट रक्ताच्या पक्षाचे गल्लीतले कार्यकर्ते आणि नेते आपल्या अक्कडबाज मिशीवर पीळ देत शिवछत्रपतींचा बाणा कितीही सांगोत. त्यांचे मुंबईतील बाप, महाराजांनी कोथळा बाहेर काढलेल्या अफझल्याचे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले थडगे हे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी जीवापाड प्रयत्न करीत आहे. एरवी हेच पाखंडी आम्हाला न्यायालयाचा निर्णय शिरसावंद्य मानायची शिकवण देतात, पण थडग्याच्यावर आणि भोवताली झालेले बेकायदा बांधकाम पाडून टाकण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश येऊन आता ३ वर्षे होतील. अजून ते बांधकाम पाडलेले नाही. ज्या अफझलखान मेमोरियल ट्रस्टने हे बेकायदा बांधकाम केले त्या ट्रस्टला दंड केला नाही की ते पाडायचा आदशे दिला नाही. यालाच न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखणे असे म्हणतात का?
अफझलखान कोण होता हे मराठी माणसाला सांगण्याची गरज नाही, पण कृष्णप्रकाश, भगवंतराव मोरे यांच्यासारख्या पोलीस अधिकार्‍यांना महाराज कोण आणि अफझलखान कोण हेच माहिती नाही. अफझल्याचा कोथळा महाराज बाहेर काढतात या चित्राला कृष्णप्रकाशनी हरकत घेऊन मिरजेतील दंगलीस खाद्य पुरवले. मोरे सोलापुरात आयुक्त असताना एका कॉलेजच्या गणेशोत्सवात पूजेसाठी आले. मूर्तीच्या मागे महाराज-अफझल्याचे चित्र पाहताच काही तरी राष्ट्रद्रोही प्रकार असल्यासारखा वाटून झटकन मागे फिरले. प्राचार्यांनी खूप विनवल्यावर ते चित्र काढा मग मी येतो, असे मोरे म्हणाले. प्राचार्य तयार, पण विद्यार्थी हटून बसले. शेवटी प्राचार्यांनी रस्टीकेटचे हत्यार काढल्यावर विद्यार्थी गप्प झाले. महाराज अफझल्याचा कोथळा बाहेर काढत आहेत हे चित्र काढून गुंडाळून ठेवले तेव्हा मोरे महाशयानंी पूजा केली.
कृष्णप्रकाश सध्या नगरचे एस.पी. आहेत, तर मोरे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अशा मोठ्या पदावर आहेत. महाजनो येन गतस्य पंथः मोठी माणसे जशी वागतात तसेच इतरांनी वागावे. मोरे सोलापुरात जसे वागले तोच आदर्श या परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी ठेवणार. कोथळा चित्रावर महाराष्ट्र सरकारने अजून तरी बंदी घातलेली नाही, पण मनकवड्याप्रमाणे मोरे, कृष्णप्रकाश यांनी राज्यकर्त्यांचे मन आणि मत ओळखून स्यू मोटो बंदी घातली.
असे पोलीस अधिकारी आणि असे राज्यकर्ते यांच्यासाठी म्हणून अफझल्या कोण हे पुन्हा ठासून सांगावे लागते. तो क्रूर, धर्मांध, नरराक्षस होता. विजापूर सोडताना त्याने आपल्या ६४ पैकी ६३  बायका मारल्या. एक पळाली. येताना तुळजापूर, पंढरपूर येथील देवालये उद्ध्वस्त केली. कत्तली करत, शेते जाळत तो प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. महाराजांनी त्याचा कोथळा काढून संपवला. महाराज मोठ्या मनाचे. औरंगजेबाने गुरू तेगबहाद्दूर किंवा संभाजी महाराज यांच्या पार्थिवाची जशी अवहेलना केली तशी अफझल्याच्या प्रेताची अवहेलना न करता त्याचे दफन केले. वर एक झोपडही बांधले.
तूर्त तरी इतिहास असा आहे. शाळेत तो शिकवला जातो की नाही हे माहीत नाही. मोगल इतिहास ४० पानी आणि शिवाजी महाराज ६ ओळीत अशी सध्या इतिहास पुस्तकाची रचना आहे. हा इतिहास सरकारने अजून बदलला नसला तरी अफझलखान मेमोरियल ट्रस्टने पूर्वीच बदलला. अफझलखान हा एक सुफी संत होता, अशी तेथे पाटी आहे. ही पाटी महाराजांची बदनामी करते. कारण महाराजांनी एका संताला ठार मारले असा परप्रांतीयांचा समज होतो. महाराजांचा हा अपमान सरकारला चालला. काही स्थानिक लोक अफझलच्या थडग्याला नवस बोलतात. थडग्याचा पुजारी हिंदू आहे. इतिहास बदलेल. लवकरच बदलेल. आपण निवडून दिलेले सरकारच त्यासाठी उतावीळ आहे.
ही जमीन पुरातत्त्व खाते आणि वनविभागाची आहे. पुरातत्त्व खाते म्हणजे रायगडावरील महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीला विरोध कर, सोलापुरातील भुईकोट किल्ल्याच्या परिसरातील घरे पाडायचा आदेश काढ, असा आचरटपणा करणारे खाते. वेगवेगळ्या गडावर आणि वेळापूरच्या अर्धनारीनटेश्‍वरसारख्या प्राचीन मंदिरात गेल्यावर जी दुर्दशा दिसते, ती पाहिल्यावर पुरातत्त्व खात्याची कर्तबगारी दिसते. त्यांनी फक्त ताजमहलची काळजी घ्यावी. वनविभाग असाच.  चूल पेटवण्यासाठी काटक्या गोळा करणार्‍या वनवासी बायकांवर खटले ही या खात्याची मर्दुमकी. झोपडीवजा वास्तूचे विस्तीर्ण तीन मजली उंचीचे बांधकाम होत होते तेव्हा या अधिकार्‍यांनी गांजा ओढला होता का? या थडग्याशेजारी ऑडिटोरियममध्ये असतात तशा १०० खुर्च्या अँगलसह बसवल्या आहेत. तेथे बसून संपूर्ण थडगे ‘डोळे भरून’ पाहता येते. धुपाचा घमघमाट तर विचारायलाच नको.
सावळ्या कुंभाराच्या गाढवाने एका रात्रीत तांब्या पितळेची सात मजली माडी बांधली. अफझल्याचे थडगे असे एका रात्रीत मोठे झाले, असे पुरातत्त्व आणि वनखात्याचे म्हणणे आहे का? ट्रस्टची नोंदणी बेकायदा, बांधकाम बेकायदा, त्यावर कारवाई करण्याचेे नावच नाही. तशी मागणी करणार्‍यांवर पोलिसांनी लाठ्या चालवल्या. कायदेशीर, होय कायदेशीर मागणी करणार्‍यांना या देशात लाठ्या खाव्या लागतात. राजबालांना श्रद्धांजली. विदेशातील काळा पैसा देशात आणा म्हणाल्या म्हणून दिल्ली पोलिसांनी त्यांचे लाठी मारून डोके फोडले. त्या २६ सप्टेंबरला रुग्णालयात मरण पावल्या.
अफझल्याचे थडगे पाडा ही मागणी हिंदूप्रेमींची म्हणून जातीयवादी असे म्हणवणारे लबाड आहेत. कारण हीच मागणी काही जणांनी २००७ मध्ये मंुंबई उच्च न्यायालयात केली. २००८ न्या. बिलाल नाझकी यांनी त्यावर निर्णय देताना सर्व बेकायदा बांधकाम पाडा असा आदेश दिला. सरकारने  हा आदेश शिरोधार्य मानून थडग्यावरील व आजूबाजूचे बेकायदा बांधकाम उद्ध्वस्त करायला हवे किंवा अफझलखान प्रेमातून सर्वोच्च न्यायालयात अपील करायला हवे होते. आज ३ वर्षे झाली. सरकार काहीच करत नाही. थडग्याची भव्यता छगन भुजबळ आणि नारायण राणे यांना आहे. तुम्ही तिघेही मातब्बर मंत्री आहात शिवसेनेशी तुमचे पटले नाही. मान्य. मात्र शिवसेना सोडताच शिवप्रेम आटून का जावे? मंत्रिमंडळात राहून तुम्ही तिघे काय करता? अफझलखानाचे थडगे आज आहे त्याच स्वरूपात राहावे असे तुम्हा तिघांचे मत आहे का? राजकारण वेगळे आणि श्रद्धा वेगळ्या हे आपण तिघांनी तरी लक्षात ठेवावे. कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीचे दूध पिऊन मोठे झालेले किंवा मंत्री झालेल्यांना धर्मप्रेमाची, राष्ट्रप्रेमाची गुटी कोणी चाटवलीच नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कसलीच अपेक्षा नाही. काही तरी करा ही तुम्हा तिघांना हात जोडून विनंती.
माझा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एक सल्ला आहे. या अपीलाच्या भानगडीत तुम्ही पडूच नका. एक तर त्यात काहीच दम नसल्याने तडकाफडकी (समरिली डिसमिस्ड) फेटाळले जाऊन वर दंडही होईल. सुनावणी झाली तरी बेकायदा बांधकाम कायदेशीर करा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालय देणारच नाही. कारण त्या न्यायालयाचे निर्णय प्रिसीडंट किंवा सायटेशन म्हणून खालच्या न्यायालयात वापरले जातात. दिल्लीत तुमची अब्रू आज ना उद्या जाईलच. दंड भरण्याचा अनुभव आहेत तो तुम्ही भराल. अब्रू कशी भरून काढणार? त्या पेक्षा सोनिया गांधींना भेटा. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाचे थडगे आणि त्या भोवतीचे सर्व बांधकाम हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करायला सांगा. सोनिया गांधी हे मनमोहनसिंग आणि प्रतिभा पाटील यांना सांगतील. एका झटक्यात तो राष्ट्रीय स्मारक होईल. राष्ट्रीय स्मारक तोडा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयही देऊ शकणार नाही. असे झाले तरच तुम्ही, वनखाते, पुरातत्त्व खाते या सार्‍यांची कातडी बचावेल. मात्र अपीलाच्या भानगडीत पडला तर मुंबईसह ११ महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर तुमच्या  शिवप्रेमातील बेगडीपणा उघड होईल. मग शिवसेना-भाजपा जातीयवादी राजकारण करतात असे त्या वेळी म्हणू नका. 
रविवार, दि. ०२ ऑक्टोबर २०११

Posted by : | on : 8 Feb 2012
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *