Home » Blog, पंचनामा: भाऊ तोरसेकर, स्थंभलेखक » आपल्या धडावर आपलेच डोके असावे

आपल्या धडावर आपलेच डोके असावे

पंचनामा : भाऊ तोरसेकर
गेल्या दोन आठवड्यात दिल्लीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर एकूणच राजकीय नेत्यांपासून संघटनांचे नेते व साधू महाराजांच्या विरोधात जे काहूर माजवण्यात माध्यमांनी भूमिका बजावली; ती किंचित तरी वेगळी आहे काय? प्रत्येक बाबतीत कोणाचे तरी अवतरण (म्हणजे आधी व नंतर तो माणूस नेमके काय बोलला आहे ते लपवून) घेऊन त्याच्यावर काहूर माजवण्यात आले. यातले दोन मोठे साक्षिदार म्हणजे मान्यवर महिलाच आहेत. दिल्लीच्या माजी पोलीस आयुक्त म्हणून काम केलेल्या व सध्या अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात आघाडीवर दिसलेल्या किरण बेदी  व प्रसिद्ध पत्रकार व कार्यकर्त्या मधू किश्वर अशी त्या दोघींची नावे आहेत. त्या दोघी नित्यनेमाने टिव्ही वाहिन्यांच्या चर्चेत आपल्याला दिसतात. मोहन भागवत यांच्या भाषणासंबंधी काहुर माजवाले जात असताना अनेक वाहिन्यांनी या दोघींशी संपर्क साधला. असे लोक वाहिन्यांना लागतच असतात. आपण जो धुमाकुळ चालविला आहे, त्यात तथ्य असल्याचे भासवण्यासाठी व मान्यवरांचे तसेच मत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी; मग अशा मान्यवरांच्या साक्षी काढल्या जातच असतात. त्यांना तेवढेच अवतरण म्हणजे एखादे वाक्य दाखवले जाते. आणि बाकी आपल्या मनचे सांगून प्रतिक्रिया व्यक्त करायला सांगायचे. वाहिनीचा वार्ताहर सत्य सांगतो, या गृहितावर अनेकजण प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. म्हणून त्यांना सत्य काय घडले, त्याचा थांगपत्ता नसतो. अनवधानाने अशी बरीच मान्यवर मंडळी त्या खोटारडेपणात सहभागी करून घेतली जातात. आणि मग बघा, लोकमत संतप्त झाले आहे, असा डंका पिटला जातो. वाहिन्यांवर आलेल्या प्रतिक्रिया, मग अन्य वृत्तपत्रातून बेधडक छापल्या जातात. पण राईचा पर्वत करताना मुळात राई तरी आहे काय; याचा शोध कोणी घ्यायचा प्रयत्न केला तर त्यालाही धक्का बसायची वेळ येते आणि इथे तेच झाले.
मधू किश्वर यांना वाहिनीकडून भागवत यांचे वादग्रस्त विधान सांगण्यात आले आणि त्यावर मतप्रदर्शन करायचा आग्रह धरण्यात आला. पण आधीच्या अनुभवामुळे सावध असलेल्या मधू किश्वर यांनी संपर्क साधणार्‍या प्रत्येक वाहिनीकडे भागवतांचे संपुर्ण भाषण ऐकायचा आग्रह धरला. ते शक्यच नव्हते. खरे भाषण संपुर्ण ऐकवले; तर माध्यमांचा खोटारडेपणा उघडा पडणार होता. म्हणून किश्वर यांचा नाद सोडून वाहिन्या इतर मान्यवरांकडे वळल्या व त्यांनी धुमाकुळ घालून घेतला. पण हे सुद्धा असेच काहीतरी खोटे असणार याची किश्वर यांना खात्री होती. म्हणुनच त्यांनी आपल्या मार्गाने भागवतांचे संपुर्ण भाषण मिळवले. मुळात त्यांना वाहिन्यांच्या आशा काहूर माजवण्याविषयी शंका व संशय का यावा? त्याचे कारण दोन महिने आधी घडले होते. त्यावर त्यांनी एक लेखही इंग्रजीमध्ये लिहिला होता. तेव्हा गुजरात व हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका चालू होत्या. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हिमाचलमध्ये प्रचाराला गेलेले होते. त्यांनी पाऊण तास केलेल्या भाषणावर असेच काहूर माजवण्यात आलेले होते. त्यात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी व आधीचे मंत्रीपद जाण्यास कारणीभूत झालेल्या मैत्रीण, सुनंदा यांच्यावर मोदींनी टिप्पणी केली होती. तो एकूणच महिलांचा अवमान आहे असे काहूर माजवले जात होते. पण पाऊण तास कोणी केवळ ‘काही कोटी रुपयांची मैत्रीण’ असे एकच वाक्य बोलणार नाही. तो आणखी काही बरेच बोलला असणार. मग ते कां सांगत नाहीत वाहिन्या? त्या भाषणातले एकच वाक्य घेऊन काहूर माजवले जात होते. पण त्याच कालखंडात हिमाचलच्या थंड प्रदेशात घरसंसार संभाळणार्‍या महिलांचे गॅस अनुदान रद्द झाल्याने किती हाल होत आहेत; त्यावर मोदी विस्ताराने बोलले होते. त्यातून सर्वसामान्य महिलांच्या हालअपेष्टांविषयी त्यांना असलेली नेमकी जाणिव स्पष्ट होऊ शकत होती. पण त्याबद्दल अवाक्षर वाहिन्या बोलत नव्हत्या किंवा दाखवले जात नव्हते. पाऊण तासाच्या भाषणातील एकच वाक्य निवडून त्यावर गोंधळ घातला जात होता. त्यापेक्षा तात्कालीन परिस्थितीमध्ये गॅसमुळे हैराण झालेल्या महिलेच्या वेदना व समस्याविषयी वाहिन्या कशा बधीर व संवेदनाशून्य आहेत; याचा किश्वर यांना संताप आला होता. कारण त्या स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. महिलांचा अवमान म्हणून बोंबा मारणारे प्रत्यक्षात लोकांची दिशाभूल करत होते. कारण देशातील करोडो महिलांसाठी त्यावेळी कोट्यवधीची उलाढाल करणार्‍या श्रीमंत मनमौजी सुनंदाच्या सन्मानापेक्षा गॅस हा जिव्हाळ्याचा विषय होता. पण वाहिन्या मात्र नको त्या शब्दावर दळण दळून विपर्यास करीत होत्या. म्हणून भागवतांच्या भाषणावर प्रतिक्रिया वाहिन्यांनी मागितली, तेव्हा मधू किश्वर सावध होत्या. आधी सगळे भाषण ऐकवा असा हट्ट त्यांनी धरला.
मात्र भागवत यांचे मूळ भाषण ऐकून किश्वर गप्प बसल्या नाहीत. त्यांनी आपल्या ट्विटर वरून वाहिन्यांचा खोटारडेपणा जगासमोर मांडला. त्याच दरम्यान किरण बेदी यांनीही इंटरनेटच्या माध्यमातून भागवत यांचे संपुर्ण भाषण ऐकले, तेव्हा त्यात महिलांचा किंवा भारतिय विवाहाचे वि्डंबन कुठेही केलेले नव्हते, असे बेदी यांना आढळून आले. उलट वाहिन्या जे दाखवत व ऐकवत होत्या, त्यात सरळसरळ लबाडी चालू असल्याचे त्यांना दिसून आले. भागवत यांनी आपल्या भाषणामध्ये भारतीय विवाह, त्यातील महिला व कुटुंब यांच्या परस्पर संबंधांवर टिप्पणी केलेली होती. त्यात भारतीय महिला वा विवाह संबंध याचा सन्मानजनक उल्लेख होता. बेदी यांनाही हा खोटेपणा असह्य झाला. त्यांनी देखील वाहिन्यांच्या खोटेपणाचे पितळ लगेच ट्विटरच्या माध्यमातून जगासमोर मांडले, त्याचा बोलबाला झाल्यावर वाहिन्यांचा धीर सुटला. आता मोबाईल वा इंटरनेट वापरणार्‍यांसमोर उघडे पडल्यावर विनाविलंब भागवत पुराण तमाम वाहिन्यांनी गुंडाळले आणि ओवायसीच्या शिळ्या कढीला ऊत आणायचे काम हाती घेतले. इथे एक भयंकर बदमाशी लक्षात घेतली पाहिजे. भागवत यांच्या मुळ भाषणाची मोडतोड करून त्यातले नसलेले पाप दाखवण्यासाठी जीवाचा आटापिटा करणार्‍या वाहिन्यांनी सहा दिवस आधी होऊन गेलेल्या ओवायसीच्या अत्यंत स्फ़ोटक व वादग्रस्त भाषणावर अवाक्षर बोलायचे टाळले होते. पण भागवत पुराण उलटल्यावर त्याच ओवायसीवर किर्तन सुरू झाले. ते भयंकर एवढ्यासाठी म्हणायचे, की इंतरनेट व सोशल मीडियावर ओवायसीचे वादग्रस्त भाषण तीन चार दिवस फ़िरत असताना व त्यावर संतप्त प्रतिक्रियांचे वादळ उठले असताना; वाहिन्या व वृत्तपत्रे त्याबद्दल मूग गिळून गप्प बसलेली होती. जणू ओवायसीला वाचवण्यासाठी किंवा झाकण्यासाठीच भागवतांचे वादग्रस्त नसलेले भाषण संगनमताने वादग्रस्त बनवण्यात आलेले होते. थोडक्यात चोर सोडुन संन्याशी म्हणावा, तसाच वाहिन्यांचा कल्लोळ चालू होता. त्यावर मधू किश्वर व बेदी यांनी झोड उठवली नसती, तर ओवायसी वाहिन्यांनी लपवलाच असता. म्हणजे वाहिन्या किती दिशाभूल करतात ते लक्षात येईल.
एकदा अशा अफ़वा पसरवून झाल्यावर वाहिन्यांनी त्याबद्दल बोलायचेच सोडुन दिले. कारण मग इंटरनेटवर कोणी तरी भागवत यांचे संपुर्ण भाषणच टाकले. त्याचा त्याच सोशल मीडियातून प्रसार करण्यात आला. पण जित्याची खोड म्हणतात ना? खोटेपणाचीस संवय लागली; मग रोज काही खोटेपणा केल्याशिवाय अन्न पचणार कसे? त्यामुळेच मग वाहिन्यांनी नासलेले म्हणून बाजूला केलेल्या खरखट्या ताटातले असत्य, वृत्तपत्रातील सेक्युलर पत्रकारांनी पक्वान्न म्हणून उचलून धरले. आता त्यातूनच नवे प्रकरण उदभवले आहे. मान्यवर दैनिक सकाळच्या गेल्या आठवड्याच्या ‘सप्तरंग’ पुरवणीमध्ये हेमंत देसाई यांनी भागवत यांच्यावर टिप्पणी केली. म्हणजे खोटे आहे, याची खात्री असतांनाही पुन्हा तोच विषय उकरून काढला. थोडक्यात ठरवून विपर्यास करायचा, हीच भूमिका नाही काय? कोणी इतका बेशरमपणा करीत असेल, तर मग त्यामुळे दुखावणार्‍यांनी काय करावे? आता त्या खोटेपणाबद्दल आपल्याला धमक्या दिल्याचे फ़ोन आले; अशी तक्रार देसाईंनी पोलिसात केली आहे. पण तशी वेळ तुमच्यावर यावीच का? माझ्या माहितीप्रमाणे सकाळच्या संपादक व कार्यालयाला भागवत यांच्या भाषणाबद्दल पुर्ण माहिती देण्यात आलेली होती. तरीही असा लेख लिहिला व छापला जात असेल; तर त्यामागे बदनामी आणि दिशाभूल करण्याचा हेतू स्पष्टपणे समोर येतो ना? मग अशा लोकांबद्दल काय बोलायचे? ही कुठली प्रवृत्ती म्हणायची? असे वागणारे कुठल्या जातीचे वा धर्माचे आहेत त्याला अर्थ नाही. कारण शाहू महाराज धर्म वा जात मानत नव्हते; तर अन्याय व खोटेपणाच्या विरोधात कंबर कसून उभे होते आणि त्यांनी विपर्यास करणार्‍या ब्राह्मणांच्या विरोधात रणशिंग फ़ुंकले होते. दुर्दैव इतकेच, की जी माणसे असा विपर्यास आजकाल सर्रास करीत असतात, तीच माणसे नित्यनेमाने ‘फ़ुले शाहू आंबेडकर’ अशी जपमाळ ओढत असतात. शाहू महाराजांच्या विचारांनी प्रेरीत झालेला कोणी अशी बदमाशी वा विपर्यास करू शकतो का? नसेल तर असे का होते आहे आणि तसे करणारे शाहू महाराजांचे नाव तरी कशाला घेतात? महाराजांच्याच कोल्हापुरचे साम्यवादी विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी अशा बनावट सेक्युलर माध्यमे व विचारवंतांकडे नेमके बोट दाखवले आहे. ‘परिवर्तनाच्या दिशा’ पुस्तकात कॉम्रेड लिहितात,
‘शोषक चलाख असतात, आहेत. ते ज्या अनेक चलाख्या करतात, त्यातील एक चलाखी अशी असते, की, ते स्वत:च शोषितांच्या हिताचा विचार मांडतात. शोषितांना बनवायचा तो प्रकार असतो. शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो. काही वेळा शोषितांमधून आलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना शोषक जवळ करतात, सत्तेत थोडाबहूत वाटा देतात. हा सुद्धा शोषितांना फ़सवण्याचा डाव असतो. म्हणूनच आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’
आज वाहिन्यांची रेलचेल झाली आहे. माध्यमांचा पसारा वाढला आहे. त्यातली गुंतवणूक अफ़ाट झाली आहे आणि एकूणच सगळा व्यवहार आतबट्ट्याचा होऊन गेला आहे. तरी भांडवलदार लोक इतके पैसे बुडवून माध्यमे का चालवित आहेत? तर हे असे त्यांना लोकांची दिशाभूल करायची असते म्हणून. खर्‍या समस्या, लढे व लोकचळवळीतून लोकांचे मन उडवायचे आणि न्यायाच्या लढ्य़ांना सुरुंग लावायचा असतो. त्यासाठी मग भागवत, अण्णा किंवा आणखी कोणाचा बिनधास्त विपर्यास करून बळी घेतला जात असतो. त्यामागची भूमिका व योजना सोपी असते. खोटे बोला पण रेटून बोला.
http://panchanaama.blogspot.in/
Posted by : | on : 23 January 2013
Filed under : Blog, पंचनामा: भाऊ तोरसेकर, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *