Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, सांस्कृतिक, स्थंभलेखक » आशाताई : एक सृष्टिगांधर्वी

आशाताई : एक सृष्टिगांधर्वी

अमर पुराणिक, सोलापूर

आशाताईंनी ८ सप्टेंबरला शहात्तरी पार केली, या गोष्टीवर कोणाचा तरी विश्‍वास बसेल काय? पण याचं रहस्य त्या जादुई आवाजात, चमत्कारात आहे. पाळण्यात असल्यापासून आजपर्यंत आपण आशाताईंचा मखमली आवाज ऐकतो आहोत, हिंदीतही आणि मराठीतही. गेली सदुसष्ठ वर्षं सर्वांनाच आशाताईंच्या आवाजाने वेडं करून टाकलंय. आज आशाताई फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण विश्‍वात ख्यातकीर्त आहेत. जेथे जेथे त्यांचा आवाज पोहोचलाय, तेथे तेथे त्यांच्या भावूक आवाजातून भारतीय संस्कृती पोहोचली आहे. धृपदापासून ते ख्यालापर्यंत, ठुमरी-दादर्‍यापासून गझलांपर्यंत, नाट्यसंगीतापासून ते ठसकेबाज लावणीपर्यंत आणि बालगीतापासून ते पॉप संगीतापर्यंत सर्वच गायनप्रकार त्यांनी लीलया पेलले आहेत. आशाताईंचे गाणे ऐकताना संगीताचे सप्तरंगी इंद्रधनुष्यच त्यांच्या आवाजातून क्षितिजावर फाकल्याची सुखद जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. सृष्टीशी नातं सांगणारा आशाताईंचा सर्वरसयुक्त आवाज सृष्टिदेवतेशी नातं सांगतो. आशाताईंच्या स्वराला शास्त्रीय संगीताच्या पक्क्या रियाजामुळे येणारी गोलाई, वजन, जवारी आणि गाज आहे. ही जशी परमेश्‍वरी कृपा आहे, तसंच ते त्यांच्या कड्या मेहनतीचंही फळ आहे. त्यांचं गाणं ओजस्वी आहे. आशाताईंचं प्रत्येक गाणं उमलत्या फुलाप्रमाणे टवटवीत वाटते. काही वर्षांपूर्वी आशाताईं व उस्ताद अली अकबर खॉं (आशाताई व पंचमदा त्यांना आपले गुरू मानत) यांनी काढलेली ‘लेगसी’ ही ध्वनिफीत ऐकताना याची प्रचिती येते. या ध्वनिफितीत आशाताईंनी ‘ककुभ बिलावल’ रागात ‘होरी’ गायिली आहे, तर ‘अडाणा’, ‘भीमपलास’ व ‘भूप’ रागात तराना गायिला आहे, हा तराना बिदार पद्धतीचा असून, अतिद्रूत लयीत आहे. या तराण्यातून आशाताईंच्या गायकीतील लयीची पक्की बैठक स्पष्ट दिसून येते. ‘गौड सारंग’ रागात होरी मध्यलयीत आहे. या ध्वनिफितीचे वैशिष्ट्य म्हणजे ‘शंकरा भरण’ रागातील धृपद आणि ‘शंकरा करण’ रागातील सादरा. हे दोन्ही राग अतिशय अप्रचलित आहेत आणि आशाताईंसारख्यांनी केलेल्या ‘धृपद-धमारा’चे वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण हे अवर्णनीय आहे. यातील सर्व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील वैशिष्ट्यांची आशाताईंनी विलोभनीय मांडणी केली आहे आणि हे करताना या सर्व गायनशैलींचं वेगळेपण काटेकोरपणे जपले आहे. बहुसंख्य रसिक श्रोत्यांना आशाताईंच्या या पैलूंचा विशेष परिचय नाही. आशा, पंचम (आर.डी. बर्मन), किशोरकुमार आणि गीतकार/ कवी गुलजार या चौकडीने दिलेली जवळपास सर्वच गाणी सर्वस्पर्शी, वैविध्यपूर्ण व भावपूर्ण अशीच आहेत. पंचमदा, आशा, किशोरकुमार व गुलजार ही चौकडी म्हणजे हिंदी सिनेसृष्टीला मिळालेले वरदानच होय! पंचमदाने आशाताईंनकडून प्रचंड ताकतीची गाणी गाऊन घेतली. ही गाणी इतरांनी गाण्याचा प्रयत्न करणेही केवळ अशक्य आहे. आशाताईंनी गायिलेली गाणी आपण ऐकलेलीच आहेत. आशाताईं व किशोरकुमारांचा मखमली स्वर, पंचमदांची दमदार संगीतरचना आणि गुलजारसारख्या संवेदनशील कवीचे अर्थपूर्ण काव्य अशा शब्दस्वरांच्या संगमातून निर्माण झालेली कलाकृती म्हणजे अतुलनीयच! अशी सकस व प्रभावी गाणी निर्माण करणे काही येर्‍यागबाळ्याचे काम नाही! ‘इजाजत, उमराव जान, खुशबू, नमकीन…’ अशी एकापेक्षा एक सरस चित्रपटांची यादी द्यायची म्हटले तर जागा पुरणार नाही. गाणं कुठल्याही प्रकाराचं असूद्यात, त्यानुसार आशाताईंच्या आवाजातला लगाव, बाज आणि सूर प्रकट होतो. मला जाणवलेले विशेष म्हणजे त्या गाण्यातलं नाट्य त्या नेमकं शोधून काढतात आणि त्या जेव्हा गातात तेव्हा ते गाणं त्यांच्या अवघ्या देहातून बोलू लागतं. त्यात भावनांचे इतके पैलू असतात की, ते गाणं पडद्यावर साकारणार्‍या अभिनेत्रीही ते पैलू प्रकट करायला कमी पडतात, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही.आशाताई या सर्वसामान्यांच्या घरातील आई किंवा गृहिणीसारख्याच आहेत. त्यांचं वैयक्तिक आयुष्य अतिशय साधे व सर्वसामान्य महिलांसारखेच आहे. संपूर्ण जीवनातलं सुख-दु:ख त्यांनी मोकळेपणानं भोगलंय अगदी विनातक्रार. त्या भोगलेल्या दु:खाच्या छटा त्यांच्या प्रत्येक गाण्यात दिसून येतात. ‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले’ या गीतात त्याची प्रचिती येते.आशाताईंना जसा सप्तस्वराला कधीही न ढळणारा ‘पंचम’ भेटतो तसाच, या दु:खात आधार द्यायला त्यांना भेटला ‘पंचमदा’ (आरडी). आशाताई व आर. डी. बर्मन यांचे स्वर संवादाप्रमाणेच हदयाचा संवादही खूप सुंदर जुळल्याचे बर्‍याच लेखकांच्या लिखाणातून यापूर्वी वाचायला मिळाले आहेत. हे जोडपं अगदी तंतोतंत एकमेकांसाठीच बनलं होतं. या संवादामुळेच कदाचित पंचमदाची संगीतबद्ध केलेली व आशाताईंनी गायिलेली गाणी आत्म्याशी एकरूप झालेली दिसून येतात. भावभावनांच्या विविध छटांच्या माध्यमातून आशाताई प्रत्येकाच्या हदयाशी हितगुज साधतात. आशाताईंचा आवाज आणि गाणे हे इतके एकजीव झालेले असते की, त्यांच्या आवाजाला त्या गाण्यापासून वेगळं काढताच येत नाही. अंगाई, बालगीत, भक्तिगीत, भावगीत, लावण्या, असं कुठलंही गाणं असो, त्यातला भाव त्यांच्या स्वरातून नेमका व्यक्त होतो. आशाताईंनी जवळजवळ १८ ते २० भाषांमध्ये गाणी गायिली आहेत आणि त्या भाषेतल्या गुणवंत व तज्ञ लोकांना ती अतिशय आवडली आहेत. नवख्या भाषेतील गाण्यांचा भावार्थ इतक्या प्रभावीपणे गाण्यातून प्रकट करतात; त्यामुळे त्यांची गायकी हा जगातला मोठा चमत्कार वाटतो! आशाताईंनी आजपर्यंत जवळजवळ हजारो गाणी गायिली आहेत. मला वाटते त्यांनाही हे मोजमाप ठेवता आले नसेल. आशाजींनी ‘चला चला नव बाला’ हे पहिलं मराठी गाणं १९४१ मध्ये गायिलं आणि पहिलं हिंदी गाणं हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘भैया मुझे ना दे’ हे गीत गायिलं आणि तेथूनच आशाताईंचा चित्रपट संगीताचा प्रवास सुरू झाला. त्यांनी सचिनदेव बर्मन, ओ.पी.नय्यर, आर.डी.बर्मन, सलील चौधरी, जयदेव, खय्यामपासून ए.आर. रेहमानपर्यंत सर्वच संगीतकारांबरोबर काम केले आहे. सिने संगीताबरोबरच त्यांच्या बर्‍याच ध्वनिमुद्रिकाही प्रकाशित केल्या व त्या प्रचंड लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यात आरडी, आशा, गुलजारचा ‘दिल पडोसी है’, हरिहरन बरोबर ‘आबशार-ए-गझल’, कशीश, खय्यामबरोबरचा ‘आशा और खय्याम’ गुलामअलीचा ‘मिराझ-ए-गजल’ असे अगणित अल्बम लोकप्रिय ठरले आहेत. मराठी संगीतात सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकरांपासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत ज्येष्ठ, श्रेष्ठ व नवख्या संगीतकारांसाठी आशाताई तितक्याच तन्मयतेने गायिल्या.मराठीतील संगीतकारांनी व कवींनी आपल्या संवेदनशील काव्यांनी मराठी संगीताला एक श्रेष्ठ दर्जा दिला असल्याचे आशाताई म्हणतात. देशात किंवा परदेशात दौर्‍यावर गेल्या असता एकांतात त्यांनी केलेले कवींच्या काव्यांचे चिंतन त्यांच्या काव्यसमरसतेची प्रचिती देते. आशाताई कविवर्य सुरेश भटांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, आपली कविता मला साक्षात भेटली. अगदी रूबरू. निसर्गसौदर्य पाहून हरखून जाणार्‍या आशाताई, ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’, ‘लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी’,‘केव्हा तरी पहाटे, चांदण्या रात्री दाखवतात कळ लावणारे दिवे, पुनवेचा पूर पार करून पारिजातकाचा स्पर्श देतात, आकाशात गुणगुणतात मालकंस’, या काव्यांचे भाव जाणून आशाताई म्हणतात की, भटांनी केलेल्या या कविता मानवी स्त्रीच्या नसून सृष्टिदेवतेच्या आहेत. ‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले’ या गीताच्या रेकॉर्डिंगच्या वेळी माझी जीवन कहाणी समोरून जात होती, असा आशाताईंनी या गीताबद्दल उल्लेख केला आहे.आशाताई इतरांसाठी खूप करतात, असंही वाचायला मिळालं आहे. खरे तर इतके करण्याची गरज नसतेही, पण दुसर्‍यासाठी करणे त्यांना प्रचंड आवडते आणि दुसर्‍यांना खाऊ घालणे तर त्यांना अतिशय प्रिय आहे. अमितकुमार, ऋषी कपूर, डॅनी, मिथुन चक्रवर्ती, गौतम राजाध्यक्ष आदी प्रसिद्ध व्यक्तींनी आशाताईंचा हा पाहुणचार घेऊन त्यांच्यातील सुग्रण पाहिली आहे. ते म्हणतात की, आशाजी गाणे अधिक चांगले गातात की स्वयंपाक जास्त चांगला करतात, हे ठरवणे कठीण आहे! आर.डी. बर्मन यांनी मागे एका दूरचित्रवाणीच्या मुलाखतीत म्हटले होते की, ही आशा सर्वात प्रथम आई आहे आणि नंतर सुग्रण आहे, त्यानंतर पत्नी आहे आणि शेवटी गायिका आहे. आशाताई गेली ६८ वर्षे गातेय. चार पिढ्या त्यांच्या गाण्यावर पोसल्या आहेत. याला केवळ ‘अद्भूत’ हेच विशेषण लावता येऊ शकते. जगातील सर्वोत्कृष्ट १०० अल्बममध्ये ३७ व्या क्रमांकावर विराजमान होण्याचा मान पटकावणार्‍या आशाताई म्हणजे सृष्टिगांधर्वीच! ऋतूंच्या आवर्तनांची साक्ष असलेला हा स्वर आजही तितकाच ताजा, टवटवीत!
दै. तरुण भारत, सोलापूर. आसमंत रविवार दि. १३ सप्टेंबर २००९
Posted by : | on : 7 January 2011
Filed under : Blog, चौफेर : अमर पुराणिक, सांस्कृतिक, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *