Home » Blog, सडेतोड : अरुण रामतीर्थकर, स्थंभलेखक » एका विश्‍वविद्यालयाची स्थापना

एका विश्‍वविद्यालयाची स्थापना

•सडेतोड : अरुण रामतीर्थकर•
जुन-जुलै मधील वृत्तपत्रे काढली तर शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेली अनधिकृत शाळांची यादी दिसेल. एकीकडे शिक्षण हा मूलभूत अधिकार असे म्हणताना मुलांना शिक्षण देणार्‍या शाळा अनधिकृत ठरतातच कशा? अडाणी नागरिकांपेक्षा अनधिकृत शाळेत शिकून साक्षर झालेले नागरिक देशाला लांच्छानास्पद आहेत काय? काही महिन्यांपूर्वी पंढरपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची मान्यताच परीक्षेपूर्वी सोलापूर विद्यापीठाने रद्द केली. खुद्द सोलापूर विद्यापीठालाच अजून यु.जी.सी.ची मान्यता नाही. ही उदाहरणे एवढ्यासाठीच की, ‘शहाणे करून सोडावे सकळजन’ ही उक्ती आचरणात आणायची झाल्यास किती सव्यापसव्य करावे लागते ते कळावे. मात्र काही ठिकाणचे दृश्य या अगदी उलट आहे. शाळा, कॉलेज नव्हे, तर एका विश्‍वविद्यालयाची स्थापना सारे नियम डावलून अत्यंत संकुचित दृष्टिकोन ठेवून आणि राजकारणातील सोय म्हणून होते. शतकानुशतके शाळेत होत असलेल्या सरस्वती वंदनेच्या नावाने बोंब ठोकणारे तथाकथित सेक्युलर शिक्षणतज्ज्ञ आता मात्र गप्प आहेत.
हे वादग्रस्त विश्‍वविद्यालय आहे उत्तर प्रदेशात. सध्या तेथे मौलाना मुलायम यांची सत्ता असल्याने त्या राज्यात काही म्हणजे काहीही होऊ शकते. आझमखान नावाचे एक पुढारी मुलायम यांचे निकटवर्ती होते. असणारच. चध  मुस्लिम यादव हा पाया आहे. रामपूरमधून अभिनेत्री जयप्रदास लोकसभेची उमेदवारी दिल्याने आझमखान नाराज झाले होते. मुलायम यांच्यापासून दूर गेले. जयप्रदा विजयी झाल्याने थोडे नरम पडले. मुलायम-आझमखान या दोघांना एकमेकांची गरज होती. ते पुन्हा एक झाले. सत्ताही मिळाली. हे पुनर्मिलन होताना आझमखान यांची एक इच्छा मुलायमनी मान्य केली आणि झटपट अमलातही आणली. ती म्हणजे रामपूर येथील मौलाना मोहंमद अली जौहर विश्‍वविद्यालय. १८ सप्टेंबर २०१२ ला मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सत्तेवर येऊन वर्ष पूर्ण होण्याच्या आत ही वचनपूर्ती केली. आझमखान हे अखिलेश मंत्रिमंडळात मंत्री आहेत तसेच मौलाना विद्यापीठाचे तहहयात कुलपतीही आहेत. कुलपती राज्यपाल असतात. काश्मीरला भारतीय राज्यघटना लागू नाही तसा हा नियम रामपूरला लागू नाही. मुळात कुलगुरू अथवा कुलपती कधीही तहहयात असत नाहीत, पण ‘ये मुलायम का इलाखा है,’ काहीही होईल.
आता प्रश्‍न असा येईल, सोलापूर विद्यापीठाच्या मान्यतेबाबत ८ वर्षे चालढकल करणार्‍या यु.जी.सी.ने या तहहयात प्रकरणाला विरोध का केला नाही. जे.एन.यु.मधील भोंदू शिक्षणतज्ज्ञ कुठे भूमिगत झाले. सेक्युलॅरिझम म्हणजे मुस्लिम लांगुलचालन ही कॉंग्रेस आणि डावे विचारवंत यांची धारणा. त्यामुळे सारे गप्प. त्यातून मागचा अणुकरार असो, राष्ट्रपती निवडणूक असो वा आत्ताचे एफ.डी.आय. प्रकरण असो. कॉंग्रेसचे संकटविमोचक म्हणजे मौलाना मुलायम. सरकार वाचवण्याची बिदागी ते मागणारच. हे मोहंमद अली विश्‍वविद्यालय म्हणजे अनेक बिदाग्यापैकी एक बिदागी आहे. आमचे सरकार संकटात आले की, दिल्लीत आम्हाला मदत करा. मग लखनौत काहीही करा. सी.बी.आय.लाही बांधून ठेवू, असा कॉंग्रेस-समाजवादी समझोता आहे. सत्तेसाठी हा कॉंग्रेस पक्ष देशाला किती खड्ड्यात घालणार आहे हे त्या गांधी-नेहरूंनाच माहीत. कारण त्यांनी आखून दिलेल्या मार्गानेच (लांगुलचालन) आजची कॉंग्रेस चालली आहे.
आता मधेच गांधी कोठून आले असे तुम्ही विचाराल. सर्व विनाशकारी गोष्टींचे मूळ तेच आहे. ज्या गांधींना १९३६ साली निवडून आलेले नेताजी सुभाषचंद्र बोस हे कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून चालले नाहीत. ६ महिन्यांत राजीनामा देण्यास भाग पाडले त्या गांधींना वंदे मातरम्ला विरोध करणारा मोहम्मद अली १९२३ साली कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून आनंदाने चालला. एक थोर देशभक्त आणि स्वातंत्र्य सेनानी म्हणून मोहंमद अली यांचे नाव विश्‍वविद्यालयास दिले. असे आझमखान यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले. या मोहंमद अलींच्या देशभक्तीचा नमुना पाहा. १० डिसेंबर १८५८ ला रामपूर  येथे जन्मलेले मोहंमद अली एवढे देशभक्त की, तीनदा आय.सी.एस.परीक्षेला बसले आणि नापास झाले. आय.सी.एस. होऊन ब्रिटिशांची चाकरी केल्याशिवाय देश स्वतंत्र कसा होणार. चूक मोहंमद अलींची नाही. त्यांचे सर्व आचरण आणि वक्तव्य त्यांच्या धर्माला अनुसरून आहे. चूक गांधींची आहे. बोस, सावरकर, आंबेडकर यांचा तिरस्कार करणार्‍या गांधींना १९०६ साली मुस्लिम लीग स्थापनेत पुढाकार घेऊन १९१८ साली लीगचे अध्यक्ष झालेले मोहंमद अली १९२३ साली कॉंग्रेसचेे अध्यक्ष म्हणून चालले. धन्य त्या गांधींची, अली सेक्युलर झाले म्हणून त्याना कॉंग्रेसमध्ये घेतले म्हणावे तर काल परवा पक्षात आलेला लगेच पक्षाध्यक्ष कसा झाला. सोनिया गांधी यांच्याप्रमाणे मोहनदास गांधी हेही सत्ताभिलाषी नव्हते. मात्र सर्वेसर्वा होते. मनाविरुद्ध निवडून आलेल्या सुभाषचंद्र बोस यांना, ६ महिन्यांत हाकलले तर पक्षकार्य शून्य असताना अली यांना पक्षाध्यक्ष केले. निस्वार्थीपणाचा मुखवटा घालून सर्वसत्ताधीश कसे व्हायचे हे सोनिया गांधी त्या गांधींपासूनच शिकल्या असाव्यात.
अली अध्यक्ष असलेल्या कॉंग्रेसचे १९२३ साली काकीनाडा येथे अधिवेशन झाले. पंडित विष्णू दिंगबर  पलुसकर हे प्रथेप्रमाणे वंदे मातरम् म्हणत होते. मुस्लिम लीगमधून कॉंग्रेसमध्ये आलेल्या अलींना ते रुचले नाही. त्यांनी पंडितजींना थांबायला सांगितले. त्यावर पंडितजींनी (नेहरू नव्हे, खरे खुरे पंडित पलुसकर) ‘हे मुस्लिम लीगचे व्यासपीठ नाही’, असे उत्तर देऊन वंदे मातरम् पूर्ण म्हटले. त्यानंतर अलींनी १९११ साली रद्द झालेला वंगभंग किंवा बंगालची फाळणी. याबद्दल इंग्रजांना दोष दिला. वंगभंग रद्द करून इंग्रजांनी मुस्लिमांचा विश्‍वासघात केला असे विचार मांडले. वंगभंग विरोधात कॉंग्रेसनेच आंदोलन केले होते. तरीही मोहनदास गांधींंना हे चालले. कारण मुस्लिमांना खुष करण्यासाठी गरज नसताना १९२१ साली त्यांनीही खिलाफत चळवळ सुरू केली होती. याच अधिवेशनात अलींनी ७ कोटी दलितांनी इस्लाम स्वीकारावा असा ठराव मांडला. मोहनदास यांच्या दुर्दैवाने तो फेटाळला गेला. एवढे लांगुलचालन करून मोहनदासना काय मिळाले? अली पुन्हा लीगमध्ये गेले. १९२४ साली लीगच्या अधिवेशनात अली जाहीरपणे म्हणाले, ‘व्यभिचारी मुसलमानही मी गांधीपेक्षा श्रेष्ठ मानतोे.’ गोळी लागल्यावर गांधींचे शेवटचे शब्द काय हे फक्त नथुराम गोडसेना ज्ञात. पण ‘हे राम’ म्हणाले असे प्रसिद्ध झाल्याने मोहमंद अली जीना यांनी त्यांना हिंदू पक्षपाती ठरवले होते. या मोहमंद अली यांच्या राष्ट्रभक्तीचा सर्वात मोठा पुरावा त्यांच्या मृत्युने दिला. १९३१ साली गोलमेज परिषदेसाठी लीगचे प्रतिनिधी म्हणून ते लंडनला गेले. तेथेच त्यांना मृत्यू आला. रामपूर ही त्यांची जन्मभूमी, पण हिंदुस्थान म्हणजे दार-उल-हरब. गैरमुस्लिमांचा देश. त्या देशात माझे दफन करू नका. दार-उल-इस्लाममध्ये म्हणजे मक्केत दफन करण्याची इच्छा व्यक्त केली. काय पण जाज्वल्य देशभक्ती. कॉंग्रेस आणि समाजवाद्यांना हवी डिक्टो तशीच. आता अशा माणसाच्या नावाने सुरू झालेल्या विश्‍वविद्यालयात काय शिकवले जाणार याचा अंदाज करायला नको. ते उघड आहे. १९२० साली दिल्लीत स्थापन झालेल्या जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाचे मोहंमद अली सहसंस्थापक आहेत. याच विद्यापीठाचे काही विद्यार्थी बाटला हाऊस येथे १९ सप्टेंबर २००८ ला झालेल्या चकमकीत अतिरेकी म्हणून लढले. इन्स्पेक्टर मोहनचंद शर्मा यांना ठार मारले. या विद्यार्थ्यांवरील खटल्यात त्यांची खर्चासह पूर्ण बाजू विद्यापीठ घेईल असे जामिया मिलीयाच्या कुलगुरूंनी जाहीर केले. मौलाना मोहंमद अली जौहर विश्‍वविद्यालयाकडून आपण वेगळे काय अपेक्षिणार.
रविवार, दि. ०९ डिसेंबर २०१२
Posted by : | on : 25 December 2012
Filed under : Blog, सडेतोड : अरुण रामतीर्थकर, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *