Home » Blog, सडेतोड : अरुण रामतीर्थकर, स्थंभलेखक » ऐतिहासिक निवडणूक

ऐतिहासिक निवडणूक

सडेतोड : अरुण रामतीर्थकर
केशुभाईंचा गुजरात परिवर्तन पक्ष भाजपाची मते खाईल यात तथ्य आहे, पण त्याच वेळी कॉंग्रेसची मोदीविरोधी आणि सेक्युलर मते आहेत त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनला दल संयुक्त आणि बसपा असे तिघेजण कुरतडत आहेत. त्यामुळे पुन्हा मोदी हे निर्विवाद सत्य १००-१२५ की १५० एवढीच उत्कंठा.

गेले वर्षभर गाजत असलेली गुजरात, विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आता अगदी अखेरच्या टप्प्यात आहे. आणखी १०० तासांनी जेव्हा चित्र स्पष्ट होईल ते इतिहास घडवणारे असेल. मग निकाल कसा का लागेना. गुजरातबरोबर हिमाचल प्रदेशचीही निवडणूक झाली. त्याची नाममात्र दखल प्रसिद्धी माध्यमांनी घेतली. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीएवढे महत्त्व या निवडणुकीला आले. नरेंद्र मोदी यांनी २००२ आणि २००७ ची निवडणूक स्पष्ट बहुमतासह जिंकली. आता ते हॅट्‌ट्रिक करणार काय हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरला आहे. १९८५ साली बंगाल विधानसभेची निवडणूक झाली. त्या आधीची ७७ आणि ८० ची निवडणूक ज्योती बसू यांनी जिंकलीच होती. १९८५ साली त्यांच्या हॅट्‌ट्रिकची जराही चर्चा झाली नाही. त्यांनी डबल हॅट्‌ट्रिक केली तेव्हा कोठे त्याची चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांच्या भोवती आता एक आंतरराष्ट्रीय वलय निर्माण झाले आहे. अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांनी त्यांच्यावर घातलेली बंदी आपणहून उठवल्याने मोदीचे महत्त्व आणखी वाढले आहे. २००२ च्या निवडणुकीत त्यांनी १८२ पैकी १२७, तर २००७ ला ११७ जागा जिंकल्या. मागच्या पेक्षा १० जागा कमी झाल्या म्हणून मोदी विरोधक आनंदित झाले. मात्र बहुमताच्या ९२ या आकड्यापेक्षा २५ जागा जास्त, घसघशीत बहुमत ही गोष्ट ते विसरले. मोदींना मौतका सौदागर म्हणूनही हे चित्र दिसले. आता मोदींनी १८२ पैकी  १५० जागांचे लक्ष्य ठेवले असून, ते कितपत साध्य होते ते पाहायचे. ढोबळ मानाने पाहिले तर असंतुष्ट केशुभाई पटेल हा मोदींच्या प्रतिकूल असलेला एकमेव मुद्दा आहे. बाकीचे मुद्दे दोनदा वापरून निष्प्रभ ठरले आहेत. अल्पसंख्यकांचा मुद्दा काढावा तर सुन्नी मुस्लिम धर्मगुरू इरफान पठाण, शाहीन धाडा यांना मोदीच विश्‍वसनीय वाटतात. औद्योगिक प्रगती नाही म्हणावे तर नॅनो प्रकल्प बंगालमधून महाराष्ट्र किंवा आंध्र या कॉंग्रेसी राज्यात न नेता टाटांनी मोदींच्या गुजरातेत नेला. मनमोहनसिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या सभा झाल्या. मनमोहनसिंग कधीच वक्ते नव्हते. सोनिया गांधींनी ९ सिलेंडर कॉंग्रेसी राज्यात मिळतात गुजरातेत का नाही, असा सवाल केला. कोणत्या कॉंग्रेसी राज्याने ९ सिलेंडर पूर्वीच्या किमतीत दिले ते त्यांनी सांगितले नाही, हा मुद्दा परत काढला नाही.
केशुभाई पटेल समाजाचे असून, त्यांचा त्या मतांवर प्रभाव आहे असे मानले जाते. अर्थात बलराज मधोक आणि अण्णा जोशी एकेकाळी किती प्रभावी होते. पक्षधारेपासून दूर गेल्यावर ते संपले. केशुभाईंचे काय होते ते पाहायचे. नरहरी अमीन हेही पटेल असून, त्यांची नव्याने कुमक मोदींना लाभली. त्याचा थोडा तरी लाभ होईल, केशुभाईंच्या गुजरात परिवर्तन पक्षाने १७० जागी उमेदवार उभे केले आहेत. जेथे निकराची चुरशीची लढत आहे. तेथे परिवर्तनाचे उमेदवार ३-४ हजार मते घेऊन पडले तरी भाजप उमेदवाराला सोबत घेऊन पडतील. मोदींना हा एकमेव धोका आहे. मात्र मोदीविरोधकांची अवस्था अधिक केविलवाणी आहे.  मोदींची मते एक केशुभाई खातील, पण मोदीविरोधक म्हणजे सेक्युलर मतात कॉंग्रेसच्या बरोबरीने जनता दल संयुक्त हा पक्ष आहे. एन.डी.ए.मधील हा भाजपचा मित्रपक्ष असल्याने तो भाजपची मते खाईल असे काही जणांना वाटते. तो भ्रम आहे. या जेडीयुने मोदींना बिहारमध्ये प्रचारास बंदी केली होती. मोदीविरोधक म्हणून त्याची ओळख आहे. सेक्युलर ही त्याची प्रतिभा आहे. मग सेक्युलर मते भाजप/ मोदी यांना पडतील की जेडीयुला? यात तोटा कॉंग्रेसचाच आहे.  जेडीयुप्रमाणे बहुजन समाज पक्ष हाही पक्ष भाजपची मते खाईल की कॉंग्रेसची? राष्ट्रवादी कॉंग्रेस मते खाईल ती भाजपची थोडीच असतील? केशुभाई एकटे भाजपचे नुकसान करणार असतील तर जेडीयु, बसपा व एन.सी.पी. हे तिघे कॉंग्रेसचे नुकसान करणार आहेत. मोदी विरोधी म्हणून जी मते आहेत ती या चौघात विभागली जाणार आहेत. मोदी१५० चा आकडा गाठतात की नाही हा पुढचा मुद्दा, कॉंग्रेस ५० चा आकडा गाठणार की सोनिया राहुल यांच्या प्रचारामुळे उत्तर, प्रदेशसारखी दैना उडणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल. या निवडणुकीत शिवसेनेने भाग घेतला असता तर हिंदुत्ववादी मतांचे जसे विभजन झाले असते तसे आता सेक्युलर मतांचे होणार आहे.
निवडणुकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट आहे. चमत्कार झाला आणि मंत्रिमंडळ बनवण्याची कॉंग्रेसला संधी मिळाली, तर मुख्यमंत्री कोण याचे उत्तर कॉंग्रेसकडे नाही. कारण कॉंग्रेसला हा काल्पनिक प्रश्‍न वाटतो. बहुमताची सुतराम शक्यता कॉंग्रेसलाच वाटत नाही. गेल्या काही दिवसांतील जनमत चाचपण्यांची एकवाक्यता आहे की पुन्हा भाजपचे सरकार येणार. कॉंगे्रसचे येईल असे कोणी म्हणत नाही. फक्त जागा  १०० की १२५ की १५० यात मतभेद आहेत. कॉंग्रेसने गेल्या २ निवडणुकीत जातीय कार्ड वापरले. २००२ च्या दंगलीचा मुद्दा नको एवढा उगाळला. परिणाम शून्य झाला. या वेळी विकासाचा मुद्दा खोटा पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र विकास कसा व्हायला पाहिजे याचे कॉंग्रेसी राज्याचे एकही उदाहरण कॉंग्रेसकडे नव्हते. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कॉंग्रेस बोलूच शकत नाही.
प्रचारातील सर्वच मुद्दे गांभीर्याने घ्यायचे नसतात. घेतले तर ४० वर्षांपूर्वीच्या गरिबी हटावचे काय असा मुद्दा येईल. २०१४ साली मोदी बडाप्रधान (पंतप्रधान) होणार आहेत त्यासाठी त्यांचे हात बळकट करा, असा प्रचार झाला. त्यात तथ्य किती हा वेगळा मुद्दा, पण प्रचारात तो भारी नक्कीच ठरला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान ६८ टक्के म्हणजे चांगले आहे. सौराष्ट्र व द. गुजरातमध्ये हे मतदान झाले. सध्या ८७ पैकी ५९ जागा भाजपला २८ जागा कॉंग्रेसला आहेत. त्यामागे केशुभाईचे बंड कारण आहे. त्यांच्यासाठी मतदान झाले तर त्यांना जागा मिळतील. कॉंग्रेसला फायदा नाही. केशुभाईंमुळे धोका ओळखून भाजपने ताकद पणाला लावली असे असल्यास भाजपला ५९ ऐवजी ६३-६४ जागा मिळतील. कॉंग्रेस फायद्यात कोठेच दिसत नाही. मोदींचे सरकार आले तरी १०० ते १०५ जागावर थांबले, तर कॉंग्रेसला हेच प्रोत्साहनपर बक्षीस असणार आहे.
आता शहरी भागात जे मतदान होईल त्यात –
१) देशाचा विकासदर ५ टक्के घटला असताना गुजरातचा ८.८ वरून ८.६८ टक्के इतका वाढला.
२) २००२ ला २३ हजार कि.मी.रस्ते होते तेे ७६.१७७ कि.मी. झाले.
३) देशाचे दरडोई उत्पन्न २७५३ रु., पण गुजरातचे ३२९० रु. आहे.
४) वीज ४८२३ मेगावॅटवरून ८३४३ मेगावॅट एवढी वाढली.
५) औद्योगिक प्रगतीत आठवा क्रमांक होता तो तिसरा झाला. हे मुद्दे मांडले जात आहेत. ही आकडेवारी केंद्रीय श्रममंत्रालय ऊर्जा मंत्रालय अशा केंद्रीय खात्यांची आहे. तरीही मनमोहनसिंग, सोनिया गांधी विकास झाला नाही म्हणतात. २० डिसेंबरला मतमोजणी आहे. दिवाळी अशोक रोडवर की अकबर रोडवर ते तेव्हा कळेल. हिंदुत्वाच्या मुद्द्याचा चमत्कार दिसला आता विकासाचा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा असतो की नाही हेही दिसेल.
रविवार, दि. १६ डिसेंबर २०१२

Posted by : | on : 25 December 2012
Filed under : Blog, सडेतोड : अरुण रामतीर्थकर, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *