Home » Blog » काश्मीर : एक सद्यस्थिती!

काश्मीर : एक सद्यस्थिती!

अरुण करमरकर

सरकारी- प्रचारी गवगवा आणि सामान्य जनभावना यांच्यातील तफावत काश्मीरमध्ये दिसून येते. काश्मीर समस्येचे आजचे स्वरूप नेमके हेच आहे. समस्येची मुळे खोलवर रुजलेली आहेत हे खरे पण काश्मिरी जनमानस मात्र, अशांतता, अस्थिरता याला ते कंटाळलेय. राजकीय कूटनीतीपासून खूपसे अलिप्त आहे. पण या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हे नागरिक अज्ञानातून सरसकटपणे मारल्या जाणाऱ्या देशविरोधाच्या शिक्क्य़ामुळे व्यथित आहेत.

९८० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून पाकिस्तानी दहशतवादाचा धुमाकूळ काश्मीर खोऱ्यात सुरू झाला आणि त्याने भारताचेच नव्हे तर पृथ्वीवरील नंदनवन म्हणवणाऱ्या काश्मीरची जणू ओळखच बदलून टाकली. ‘काश्मीर खोरे म्हणजे दहशत-हिंसाचार-जिहादचे माहेरघर, हिंदूंची हकालपट्टी आणि सामान्य-स्वस्थ-शांत जनजीवनाचा संपूर्ण अभाव’ असे समीकरणच जनमानसात रुजले. जवळजवळ अठरा-वीस वर्षे या प्रतिमेत सत्याचाही बऱ्यापैकी अंश होता. दरम्यान, झेलम-चिनाबच्या प्रवाहातून बरेच पाणी वाहून गेले. त्यामुळे आजही तीच-तशीच प्रतिमा मनात बाळगणे हे काश्मीरच्या सामान्यजनांवर आणि तेथील वातावरणावर काहीसे अन्याय करणारे ठरेल. याचा प्रत्यय येतो तो तिथे- विशेषत: काश्मीर खोऱ्यात उघडय़ा डोळ्यांनी जमिनीवरील वास्तवाचा अनुभव घेत वावरतो तेव्हा. असे वास्तव-दर्शन घडविण्याच्या हेतूनेच ‘सेवा-सहयोग’ या संस्थेद्वारे दि. २ ते १० एप्रिल या दिवसांत एक ‘जम्मू-काश्मीर सेवादर्शन’ सहल आयोजित केली होती. विविध प्रकारचे सेवांचे उपक्रम चालविणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा संस्था आणि अशा कामाला मदत करू इच्छिणाऱ्या संस्था-व्यक्ती यांच्यातील दुवा साधण्याचे काम सेवा सहयोग गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. काश्मीर पर्यटनाच्या रूढ नकाशावरील (गुलमर्ग-सोनमर्ग-पहलगाम..) स्थळांबरोबरच त्या पलीकडील काही स्थानांचा समावेश या प्रवासाच्या कार्यक्रमात केला गेला होता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकूण नऊ दिवसांच्या कार्यक्रमात सहा दिवसांहून अधिक काळ काश्मीर खोऱ्याच्या क्षेत्रातील प्रवासाचा आणि स्थळदर्शनाचा होता. अगदी छोटय़ा-दीड दोन हजार वस्तीच्या गावांमधील बांधवांशी संवाद साधण्यावर या सहलीचा भर होता.

काळवंडलेले नंदनवन
सूर्याच्या किरणांखाली चांदीसारखे चमचमणारे हिमाच्छादित डोंगर, शुभ्र फुलांनी डवरलेली नाशपतीची झाडे, हिरव्यागार रोपटय़ांवर बिछायत पसरणाऱ्या पिवळ्या जर्द फुलांनी बहरलेली राई (सरसो)ची शेती, केशराचे मळे, झेलम-चिनाबचे नयनरम्य प्रवाह.. काश्मीरच्या या देखण्या स्वर्गीय सौंदर्यलक्षणांवर धर्माध दहशतवादाचा जो बटबटीत डाग उमटला त्याने काश्मीरची प्रतिमा धगधगत्या नंदनवनात परिवर्तित करून टाकली. काश्मीर खोऱ्यातून हिंदूंची हकालपट्टी सुरू झाली आणि पर्यटकांचा ओघ रोडावत जाऊन ठप्प झाला. प्रामुख्याने पर्यटनावरच अवलंबून असलेले अर्थकारण विकलांग बनले. शिक्षणसंस्थांचा कारभारही दोलायमान झाला आणि जवळजवळ एक संपूर्ण पिढी शिक्षण व्यवहाराच्या कक्षेबाहेर फेकली गेली. सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन बंदुकीच्या धाकाखाली (एकतर दहशतवाद्यांच्या किंवा अपरिहार्यपणे तेथे पावलापावलावर उभ्या ठाकलेल्या लष्करी जवानांच्या) वावरू लागले. १९८७-८८ पासून एकविसावे शतक सुरू होईपर्यंत- झाल्यानंतरही चार-पाच वर्षे हीच स्थिती राहिली. लाखभर लोकांचे (त्यातले ऐंशी टक्क्य़ांहून अधिक सामान्य नागरिक) बळी गेले. हजारो कुटुंबे विस्थापित झाली. त्यांच्या पिढीजात रहिवासापासून उखडली गेली.
गेल्या चार-पाच वर्षांपासून ही परिस्थिती हळूहळू बदलत आली आहे. लष्कराचे नियंत्रण प्रभावी होत गेले- आतंकी हल्ल्यांचा वेग-आवेग मंदावत गेला आणि निवडणूक प्रक्रिया घडून येऊन प्रातिनिधिक सरकारांचा कारभारही स्थिरावत चालला. दहशतवाद हाच दिनक्रम बनला होता तो काही प्रमाणात सुप्तावस्थेत वा तुरळक प्रमाणाकडे पावले टाकू लागला. गिलानींसारख्या उपद्रवी नेत्यांची चिथावणीखोर विधाने, लष्कर-पोलिसांवर दगडफेकीच्या घटना यांनी वातावरण काहीसे गढूळते, पण त्यांचा परिणाम तुलनेने तात्कालिक आणि मर्यादित राहतो. पर्यटन जवळजवळ पूर्वपदावर आले आणि सामाजिक स्तरावरील प्रयत्नही हळूहळू वेग घेऊ लागले. खुद्द लष्करानेही या बाबतीत पुढाकार घ्यायला सुरुवात केली, तसेच तबस्सुम-ए-बसेरा (अधिक कदम), असीम फौंडेशन इ. संस्थांनी दहशतग्रस्त परिसरातील तरुण-तरुणी आणि बालके यांच्यासाठी शिक्षण-संगोपनाचे प्रयत्न सुरू केले. ‘सेवा-भारती’ने खुद्द काश्मीर खोऱ्यातल्या गावागावांत एकल विद्यालयांचे (एक शिक्षकी शाळांचे) जाळे विणून उगवती पिढी शिक्षित-संस्कारित करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. याच बाबीचा वेध घ्यावा, तेथील आजच्या जनजीवन-जनमानसाचा परिचय करून घ्यावा आणि काश्मीरबाबतच्या आपल्या मनातल्या धारणा स्पष्ट, स्वच्छ करून घ्याव्यात या हेतूने सेवा सहयोगने ही सेवादर्शन यात्रा आयोजित केली होती.
वैशिष्टय़पूर्ण स्थलदर्शन
या यात्रेच्या स्थलदर्शन कार्यक्रमात उरी क्षेत्रातील लगामा गावालगतचे प्राचीन पांडव मंदिर, बारामुल्ला येथील शैलपुत्री मंदिर, कुंजर (बारामुल्ला) जवळच्या मलपुरा, त्रेरन इ. गावांतील एकल विद्यालये, बारामुल्लाजवळच्या बनिहार येथील ब्रिगेडियर राजेंद्रसिंग (महावीर चक्राचे स्वतंत्र भारतातील पहिले मानकरी) यांचे स्मारक, अच्छाबल या गावातील विवेकानंद केंद्राचा नागदंडी आश्रम, श्रीनगर येथील शंकराचार्य मंदिर या स्थानांचा आवर्जून समावेश करण्यात आला होता. एकूण मुक्कामापैकी पाच रात्री आणि सहा दिवस काश्मीर खोऱ्यात व्यतित करण्यात आला. त्यामुळे वीस-बावीस वर्षे अशांत, अस्थिर आणि अस्वस्थ असलेल्या भागातील सामान्य बांधवांशी संवाद साधण्याची पुरेशी संधी आम्हा सर्वाना मिळाली आणि ते ठळकपणे नमूद करायलाही हवे की काश्मीरची आजची स्थिती त्याच्याविषयीच्या रूढ झालेल्या प्रतिमेपेक्षा वेगळी, आश्वासक आहे. आपल्या नियमित दैनंदिन व्यवहारात लोक मग्न आहेत, दरम्यानच्या काळात झालेल्या हानीबाबतची खंत मनात बाळगून आहेत, ते (आर्थिकच नव्हे तर मानसिकही) नुकसान भरून काढण्याच्या प्रयत्नांबाबत स्वागतशील आहेत आणि मुख्य म्हणजे उपद्रवी फुटीरतावादी प्रवृत्तींशी फटकून आहेत.
लगामा (उरी) या अगदी नियंत्रणरेषेलगत असलेल्या गावात आजही सुमारे तीस हिंदू परिवार टिकून आहेत. एका टेकडीवरील प्राचीन मंदिराभोवती हा सारा समूह एकवटला आहे. अज्ञातवासाच्या काळातली एक रात्र पांडवांनी येथे मुक्काम केला होता अशी त्यांची श्रद्धा आहे. जणू कठीण काळ धीराने सहन करीत मार्गक्रमण चालू ठेवण्याचे बळ ही श्रद्धा त्यांना देत आलीय. या मंदिरापासून काही अंतरावरच ब्रिगेडियर राजेंद्रसिंग यांचे स्मारक आहे. आशा आणि उमेद जिवंत ठेवून चिवट संघर्ष करण्याची प्रेरणा येथील बांधवांना या स्मारकापासून मिळत असावी. १९४७ च्या ऑक्टोबर महिन्यात २१ ते २६ असे पाच-सहा दिवस अतिशय तुटपुंज्या (जेमतेम १५० जवानांच्या) लष्करी तुकडीने साडेपाच हजार टोळीवाल्यांचे आक्रमण ब्रिगेडियर राजेंद्रसिंग यांच्या नेतृत्वाखाली शर्थीने रोखून धरले. त्यामुळेच श्रीनगर आक्रमणापासून वाचले आणि काश्मीर आक्रमकांच्या घशात जाण्यापासून बचावला. या संघर्षांत आघाडीवरून नेतृत्व करणारे ब्रिगेडियर आपल्या सर्व जवानांसह हुतात्मा झाले. डिसेंबर १९४९ मध्ये ब्रिगेडियर राजेंद्रसिंग यांना पहिला महावीरचक्र पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. एका विस्तीर्ण उद्यानात असलेल्या स्मारकातील ब्रिगेडियर राजेंद्रसिंग यांच्या पार्थिव प्रतिमेसमोर नतमस्तक होताना स्वाभाविकच एका आगळ्या, रोमांचक अनुभवाची उत्कट प्रचीती येते.
उगवत्या पिढीचे परिष्करण
एक उत्कट भाव मनाला भिडतो तो मलपुरा, गेटन या अगदी छोटय़ा गावातल्या एकल विद्यालयाचा चिमुकल्या बालकांचा समूह भेटतो तेव्हा! श्रीनगर-बारामुल्ला परिसरातल्या पाच जिल्ह्य़ांच्या १७० गावांमध्ये एकूण १८० एकल विद्यालये चालतात. सेना भारती जम्मू काश्मीरचा संयोजक फैय्याझ, विभाग- जिल्हा स्तरावरील संयोजन करणारे जावेद अहमद धर, जावेद ऋषी, शिक्षिका म्हणून काम करणारी फिर्दोस ही एम.एस.डब्लू. झालेली तरुणी यांच्यासारख्या सुमारे तीनशे कार्यकर्त्यांचा तरुण समूह मोठय़ा उमेदीने हा एकल विद्यालयांचा डोलारा सांभाळत आहेत. सुदूर ग्रामीण क्षेत्रातली सुमारे तीन हजार मुले-मुली या विद्यालयांमधून शिक्षण, संस्कार आणि गुण्या-गोविंदाच्या सहअस्तित्वाचे धडे गिरवीत आहेत. याकूब, युसूफ, अश्फाक, जहांगीर आणि आठ-दहा वर्षांची चुणचुणीत अस्मा यांच्यासारखी पाच ते १२ वयोगटातली ही बालके जणू स्वच्छ, सुंदर, निरामय काश्मीरच्या भविष्याला आकार देत आहेत.
‘इतनी शक्ती हमें देना दाता,
मनका विश्वास कमजोर हो ना..
बैर हो ना किसी का किसी से,
भावना मन में बदले की हो ना..!’
अशी प्रार्थना रोज आळवणारी ही बालके काश्मिरी जनजीवनाची गाडी देशप्रेमाच्या रुळावर चालणारच, असा विश्वास जागा करताहेत.
कारगिल स्मारक
जम्मू शहरात जम्मू विद्यापीठ परिसराजवळच अगदी अलीकडेच भारतीय लष्करातर्फे उभारलेले ‘कारगिल स्मारक’ त्याच्या नुसत्या दर्शनानेच एका आगळ्या थरारक अनुभवाची प्रचीती देते. १९४७च्या पठाणी आक्रमणापासून १९९९च्या कारगिल युद्धापर्यंतच्या पाचही युद्धांमध्ये हौतात्म्य पत्करलेल्या एकूण सुमारे अकराशे जवानांच्या नावाचे स्तंभ येथील विस्तीर्ण आवारात उभे आहेत. एका अर्धगोलाकार भिंतीवर पाचही युद्धांच्या घटनाक्रमाचे वर्णन कोरण्यात आले आहे. प्रवेशद्वारापाशीच दर्शनी भागात जवळजवळ दीडशे फूट उंचीचा, बंदुकीच्या आकाराचा स्तंभ जवानांच्या शौर्याची ठळक साक्ष देत उभा आहे. या गगनचुंबी बंदुकीच्या संगिनीचे दर्शन सबंध जम्मू शहरातून घेता येते. दुर्दैवाची बाब अशी की, यात्रा कंपन्यांच्या स्थलदर्शनाच्या यादीत (अजून तरी) या स्मारकाचा समावेश नाही.
या सहलीतील एका हृदयस्पर्शी पैलूचा उल्लेख केल्याशिवाय हे वर्णन पूर्ण होऊ शकणार नाही. आमच्या समूहात एक महिला काश्मिरी पंडित होत्या. श्रीनगर शहरातच माहेर आणि तेथून सुमारे २०-२५ किलोमीटर अंतरावरील एका गावात सासर. या दोन्ही घरांना त्यांचा परिवार अर्थातच पारखा झाला आहे. काश्मीरमध्ये आल्यानंतर स्वाभाविकच या दोन्ही जागांना भेट द्यावी, आज तेथे काय स्थिती आहे, कोण राहते त्यांना भेटावे अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. जेथून आपले परिवार विस्थापित झाले त्या मूळ भूमीच्या दर्शनाची उत्सुकता, जेथे बालपण गेले त्या परिसराला डोळ्याखालून घालण्याची उत्कट इच्छा, तिथल्या आजच्या स्थितीबाबतची साशंकता आणि काहीशी धाकधूक अशा संमिश्र भावना मनात घेऊनच त्या दोन्ही जागी गेल्या. दोन्ही ठिकाणी त्यांना आलेला अनुभव मात्र- निदान मानसिक पातळीवर तरी हृद्य आणि समाधान देणारा होता. दोन्ही वास्तू आज अस्तित्वात नाहीत. सासरच्या वास्तूचे अवशेष दिसतात. त्यांच्यालगत एक मशीद उभी आहे, पण ‘मूळ मालकाच्या अनुमतीशिवाय बांधलेली मशीद म्हणून तेथे फारसे कोणी नमाज पढायला जात नाही’ अशी माहिती तेथील रहिवाशांनी दिली. त्यांच्या दृष्टीने ती आश्चर्याची आणि सुप्तपणे आनंद देणारी होती. दरम्यान, घडून गेलेल्या घटनांना साक्षी असणाऱ्या एका वृद्धाने आस्थेने त्यांचे स्वागत केले. जे झाले ते अत्यंत दुर्दैवी, अन्यायाचे होते अशी खंत मनापासून व्यक्त केली. ‘पुन्हा कधी आलात तर येथेच, आमच्याकडेच येऊन राहा..’ असे अगत्याचे निमंत्रणही दिले. एवढेच नव्हे तर ही दोन-तीन गुंठय़ांची जागा अजूनही तुमच्याच नावावर नोंदलेली आहे, अशी माहितीही दिली. ‘..असे असेल तर, माझ्या मुलासाठी इथे पुन्हा घर बांधेन’ असे सहजपणे सांगून अत्यंत भारावल्या मनाने त्या तेथून परतल्या!
..थोडक्यात, सरकारी- प्रचारी गवगवा आणि सामान्य जनभावना यांच्यातील तफावत येथेही दिसून येते. काश्मीर समस्येचे आजचे स्वरूप नेमके हेच आहे. समस्येची मुळे खोलवर रुजलेली आहेत हे खरे. स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि स्वातंत्र्य देतानाची ब्रिटिशांची कुटिलता, त्याच्यासमोर पराभूत मानसिकतेने झुकलेले तत्कालीन नेतृत्व, कलम ३७०, पाकिस्तानपोषित फुटीरता आणि दहशतवाद, धर्माधता, केंद्रातील आणि राज्यातील वेळोवेळच्या सत्ताधाऱ्यांचे कूटनीतीतील अपयश इ. घटकांनी समस्येची मुळे अधिक खोलवर नेण्यात आपापला वाटा उचलला हेही दुर्दैवी वास्तव आहे. या साऱ्यांची उत्तरे खंबीर इच्छाशक्ती आणि दीर्घगामी राजकीय प्रक्रिया यातूनच मिळतील हेही खरे. पण सामान्य काश्मिरी जनमानस मात्र या साऱ्यांपासून अलिप्त आहे. अशांतता, अस्थिरता याला ते कंटाळलेय. त्याहीपेक्षा अज्ञानातून सरसकटपणे मारल्या जाणाऱ्या देशविरोधाच्या शिक्क्य़ामुळे व्यथित आहे. अझीझ कुरेशी नावाच्या एका दुकानदाराने म्हटले, ‘‘आतंकवाद तो अन्य राज्यों में भी है, फिर भी प्रसारमाध्यमों में हमें ही बदनाम किया जाता है..।’’ जम्मू काश्मिरात दीर्घकाळ सेवा बजावलेल्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या शब्दात सांगायचे तर ‘‘समस्या दिल्लीने निर्माण केलीय, तिचे उत्तरही दिल्लीनेच शोधले पाहिजे..’’ दिल्ली हे उत्तर शोधायचे काम करायचे तेव्हा करेल, पण सामान्य नागरिकांच्या पातळीवर, पर्यटन आणि परस्पर संवादाच्या, समजुतीच्या बाबतीत मात्र एकात्मतेची भावना जोपासण्याचा जाणता दृष्टिकोन जपणे नितांत गरजेचे आहे.
सौजन्य : लोकप्रभा 
Posted by : | on : 25 June 2012
Filed under : Blog.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *