Home » Blog, प्रहार : दिलीप धारुरकर, स्थंभलेखक » कॉंग्रेसच्या राज्यात फक्त मरणच स्वस्त!

कॉंग्रेसच्या राज्यात फक्त मरणच स्वस्त!

• प्रहार : दिलीप धारुरकर •
हुरियत उल जिहादी, जैश ए मोहम्मद, इंडियन मुजाहिद्दीन अशी विविध नावे धारण करून ही दहशतवाद्यांची राक्षसी पिलावळ हिंदुस्थानात काळ बनून धुमाकूळ घालते आहे. हिंदुस्थानातील राज्यकर्ते, कॉंग्रेसी विचारांचे राजकारणी, ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी विचारवंत, मानवी हक्कांच्या नावाने गळे काढणारे ढोंगी विचारवंत, जगात नाटकी मानवतेची चोपडी लिहून पुरस्कारांच्या लालसेने हिंदुस्थानचे अहित चिंतणारी राय जगजाहीर करणारे अरुंधती रॉय यांच्यासारखे बुद्धिवादी या लोकांनी वरचेवर हा काळ सोकावून ठेवण्याचे पाप केले आहे. काळ सोकावला आहे. मरण स्वस्त झाले आहे. सर्वसामान्य माणसाला जणू फक्त मरण्याचाच जन्मसिद्ध हक्क मिळाला आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपर्‌यात कुठेही स्फोट होतो, कुठेही कुणीही गोळीबार करून लोकांना मारतो
होय. कॉंग्रेसच्या मनमोहन राज्यात फक्त मरण तेवढे स्वस्त आणि अन्य सर्व गोष्टी महाग आहेत, असे दिसते आहे. अतिरेक्यांचे हे अभयारण्य होऊ लागले आहे. या अतिरेक्यांनो, इथे खुशाल राहा. बॉम्बस्फोट करा आणि पाकिस्तानात, दुबईत, बांगला देशात पळून जा. फारतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये बिनधास्त राहा! तिथेही असुरक्षित वाटत असेल तर कुठेच जाऊ नका. भारतात पोलिसांच्या स्वाधीन व्हा. इथे अनेक वर्षे तुमच्यावर वेगवेगळ्या न्यायालयात खटले चालतील. दीर्घकाळ खटले चालल्यानंतर लोक जेव्हा घटना विसरून जातील तेव्हा खटल्यांचा अंतिम निकाल लागेल. तुम्हाला जन्मठेपेसारखी शिक्षा झाली, तर त्यातून सोडवण्यासाठी बाहेर असलेल्या अतिरेक्यांना एखादे विमान अपहरण करण्याची संधी आहे. नाही तर फाशी झाली तरी घाबरण्याचे काहीच कारण नाही. कॉंग्रेसचे मायबाप सरकार हे जनतेपेक्षा तुरुंगातील अतिरेक्यांची जास्त काळजी करते. क्रूर न्यायालयांनी फाशी दिली तरी त्या फाशीची अंमलबजावणी करण्याचे कसे टाळायचे, हे या सरकारने पाठ केलेले आहे. लोकशाहीचे फायदे तुम्हाला अजून माहीत नाहीत अतिरेक्यांनो! भुट्टोसारख्या आधीच्या विरोधी राजकीय नेत्याला फाशी देण्याची किमया पाकिस्तानात घडू शकते. भारतात अतिरेक्यांनाही फाशी न देता छान संरक्षणात कोट्यवधी रुपये खर्चून जगविण्याची उदार लोकशाही आहे. या लोकशाहीत एखाद्या राज्यातील मुख्यमंत्री अशी धमकी देऊ शकतो की, आमच्या विधिमंडळात अतिरेक्यांची फाशी रद्द करण्याचा ठराव आम्ही घेऊन दाखवू काय? गुन्हे करणार्‌या, माणसांचे सर्रास मुडदे पाडणार्‌या, संसदेवर हल्ला करणार्‌या, राष्ट्रध्वज जाळणार्‌या, बॉम्बस्फोट घडविणार्‌या बदमाशांनाच नेमके आमच्या देशातील कॉंग्रेसी राज्यकर्त्यांचे, सेक्युलॅरिस्ट विचारवंतांचे अभय आहे.
हुरियत उल जिहादी, जैश ए मोहम्मद, इंडियन मुजाहिद्दीन अशी विविध नावे धारण करून ही दहशतवाद्यांची राक्षसी पिलावळ हिंदुस्थानात काळ बनून धुमाकूळ घालते आहे. हिंदुस्थानातील राज्यकर्ते, कॉंग्रेसी विचारांचे राजकारणी, ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी विचारवंत, मानवी हक्कांच्या नावाने गळे काढणारे ढोंगी विचारवंत, जगात नाटकी मानवतेची चोपडी लिहून पुरस्कारांच्या लालसेने हिंदुस्थानचे अहित चिंतणारी राय जगजाहीर करणारे अरुंधती रॉय यांच्यासारखे बुद्धिवादी या लोकांनी वरचेवर हा काळ सोकावून ठेवण्याचे पाप केले आहे. काळ सोकावला आहे. मरण स्वस्त झाले आहे. सर्वसामान्य माणसाला जणू फक्त मरण्याचाच जन्मसिद्ध हक्क मिळाला आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपर्‌यात कुठेही स्फोट होतो, कुठेही, कुणीही गोळीबार करून लोकांना मारतो.
एक स्फोट होतो. कमीतकमी डझनभर लोक मरतात. पाच डझनापेक्षा जास्त जखमी होतात. न्यूज चॅनेलना चघळायला विषय मिळतो. ब्रेकिंग न्यूज झळकू लागतात. घटनास्थळावरून जखमींना रुग्णालयात नेण्याची लगबग, मृतांच्या नातेवाईकांचा विलाप, मंत्र्यांची घटनास्थळाला भेट देऊन विचारपूस करण्याची नाटकं, त्यात कोणत्यातरी अतिरेकी संघटनेने घटनेची जबाबदारी घेतल्याची बातमी, सरकारचा अधिक तपास फक्त चालूच असतो, धागेदोरे हाती लागत नसतात. लोकांना शांत करण्यासाठी कुणीतरी संशयित सापडल्याची घोषणा होते. हा घटनाक्रम आता लोकांना, पत्रकारांना पाठ झाला आहे. एक स्फोट किंवा एक हल्ला झाला की त्यापाठोपाठ इतके घडणार, हे आता सामान्य माणसालाही कळू लागले आहे.
आता पी. चिदम्बरम्‌सारखे कॉंग्रेसचे नेते या स्फोटाबाबत सरकारने काय केले, हे न सांगता विरोधी पक्ष कसे दुतोंडी आहेत, हे सांगण्यात कौशल्य पणाला लावत आहेत. संसदेवर हल्ला झाला तेव्हा कॉंग्रेसने अशी टीका केली नव्हती. त्यामुळे आता विरोधी पक्षांनीही ते उपकार लक्षात घेऊन गप्प बसावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. सर्वसामान्य लोकांचे जीव गेले, अनेक जण जखमी होऊन विव्हळत पडले आहेत, त्यांची या माणसाला काही चाड दिसत नाही. संसदेवर हल्ला झाला तेव्हाही हे गप्प बसले आणि त्या हल्ल्‌यातील आरोपीला फाशीची शिक्षा होऊन, आता अनेक वर्षे लोटली तरी तो आरोपी अजून जिवंत आहे, ती शिक्षा रद्द करण्याच्या मागणीकरिता स्फोट घडतच आहेत. तरीही या गृहमंत्र्याच्या डोक्यातून राजकीय चातुर्य काही जात नाही. पी. चिदम्बरम्, दिग्विजयसिंग, कपिल सिब्बल, राहुल गांधी यांच्यासारख्या कॉंग्रेसच्या लोकांनी विरोधकांची बदनामी आणि बुद्धिभेद करण्यासाठी जे चातुर्य आजवर खर्च केले आहे, ते जर त्यांनी अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्यात खर्च केले असते, तर आजपर्यंत या देशातील दहशतवादाचे समूळ उच्चाटन झाले असते.
दिल्लीत न्यायालयासमोर काही महिन्यांपूर्वीच स्फोट झाला होता. काही लोक मेेले होते. नंतर मुंबईत तीन स्फोट झाले. त्यात काही लोक मरण पावले. आता पुन्हा दिल्लीत न्यायालयासमोर स्फोट झाले. तेरा निरपराध लोक मारले गेले. याच न्यायालयासमोर स्फोट झाले, तेव्हा न्यायालयाच्या आवारातील लोकांच्या सुरक्षेबाबत काही उपाय सरकारने करावेत अशी सूचना, मागणी झाली होती. झालेल्या स्फोटांचा हे सरकार तपास लावू शकत नाही, या तपासात अनेक राजकीय हितसंबंध गुंतलेले असतात. मात्र, हे स्फोट पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेताना तरी यांचे राजकीय स्वार्थ धोक्यात येण्याची शक्यता नसते ना? तरीही एवढे करण्याची तसदी ही मंडळी का घेत नाहीत? वास्तविक, कामे काढली, खरेदी केली की त्यात या लोकांना काही मेवा मिळतो असे म्हणतात. भ्रष्टाचाराचा तो नियमच आहे. दाम नसेल तर काम काढा! मग न्यायालयासमोर क्लोज सर्किट कॅमेरे लावण्याचे काम या लोकांनी का केले नाही? चिदम्बरम् यांनी या प्रश्‍नाचे उत्तर देशाला दिले पाहिजे. अनेक स्फोटांचा तपास का लागलेला नाही? गुप्तचर खात्याला कुंभकर्णासारखी झोप लागली आहे की काय? स्फोट होणार, हल्ले होणार अशी सूचना मिळूनही सरकारची यंत्रणा का हलत नाही? या प्रश्‍नांची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत.
दिल्लीच्या स्फोटानंतर अतिरेक्यांनी नवा खेळ सुरू केला आहे. एका स्फोटाची जबाबदारी मुद्दाम एकापेक्षा जास्त संघटना घेऊ लागल्या आहेत. दुसर्‌याच दिवशी मॉल्समध्ये स्फोट घडविण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. तिसर्‌या दिवशी अहमदाबाद आणि कोलकाता शहरात स्फोट करण्याचे मनसुबे कळविले जात आहेत. सरकार आणि सरकारच्या तपास यंत्रणा काय करत आहेत?
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि गृहमंत्री चिदम्बरम् यांचे देशाला सुविचार सांगण्याचे काम चालूच आहे. मनमोहनसिंग, दहशतवादाचा सर्वांनीच विरोध केला पाहिजे, असे सांगतात, तर चिदम्बरम् लोकांना सावध राहण्याचे आवाहन करतात. होय, बरोबरच आहे. जिथे सरकार झोपलेले आहे, तपास यंत्रणा ढिल्या पडल्या आहेत, तिथे आता लोकांनाच सावध राहण्याची वेळ आली आहे. सरळ सरळ गृहमंत्री सांगत आहेत की, या स्फोटाचे धागेदोरे मिळेनासे झाले आहेत. म्हणे, लोकांनीच आता सतर्क राहावे. सर्व नियंत्रण सरकारच्या हातात, विमान चालवायला चिदम्बरम् बसले आहेत, इंजीनची आणि विमानाची सर्व बटने, नियंत्रणे त्यांच्या हातात आहेत आणि तेच विमानात बसलेल्या लोकांना ओरडून सांगत आहेत की, लोकहो, सावध राहा. मग असला पायलट काय कामाचा? सगळी सत्ता हातात असून, लोकांनाच सावध राहा, असे सांगणारे सरकार काय कामाचे? यांना क्षणभरही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही!
राज्यशास्त्रात सांगितले जाते की, सरकार, कायदा हा एक सामाजिक करार आहे. लोकांनी सरकारचे नियम पाळायचे आणि सरकारने लोकांचे रक्षण करायचे. इथे तर एकतर्फीच करार चालला आहे. लोकांचे जिणे वरचेवर अवघड व्हावे, अशीच रचना जणू सरकार नावाची गोष्ट करू लागली आहे. वरचेवर भाववाढ थोपविली जात आहे. लोकांना हवे असलेले धान्य गोदामांमध्ये सडविले जात आहे, पण लोकांना दिले जात नाही. भ्रष्टाचाराच्या जळवा शासन, प्रशासन, राजकारण यात मिळेल त्या मार्गाने लोकांचे रक्त शोषून घेत आहेत. दहशतवादाला मोकळे रान ठेवले जात आहे. या राज्यात मरण स्वस्त होते आहे. आता देशातील सामान्य जनतेनेच जागे होण्याची वेळ आली आहे.
देशरक्षणार्थ सज्ज पाहिजे समाज हो
जागतो सदैव तोच वैभवास पात्र हो |
असे एक गीत आहे. देशाला वैभवाला न्यायचे असेल, तर आता समाजाला जागे होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दुहेरी जागलेपण आले पाहिजे. देशाबाहेरून या देशात घुसून येथे अराजक माजविण्याच्या हेतूने काम करणार्‌या दहशतवाद्यांना हेरून मुसक्या आवळल्या पाहिजेत. देशात राहून येथे लोकांना गुमराह करत सत्तेच्या उबदार खुर्च्यांवर बसून मलिदा खाण्याचा आणि देशाला वार्‌यावर सोडण्याचा जो धंदा चालला आहे तोही ओळखला पाहिजे. जर या देशातील जनतेच्या हिताशी बेईमानी केली, जर या देशाच्या हिताशी प्रतारणा केली, तर या देशातील जनता पुढच्या निवडणुकीत सत्तेच्या सिंहासनावरून खेचून काढते, असा अनुभव सत्तेतील कोडग्या लोकांना आल्याशिवाय हे सुधारणार नाहीत. मरण स्वस्त करणार्‌यांना सत्ता महाग झाली पाहिजे. तर पाहा, जादूची कांडी फिरल्यासारखे चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही!
तरुण भारत, सोलापूर,   रविवार, दि. १९ सप्टेंबर २०११
Posted by : | on : 22 September 2011
Filed under : Blog, प्रहार : दिलीप धारुरकर, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *