Home » Blog, भाष्य : मा. गो. वैद्य, स्थंभलेखक » चर्च आणि माओवादी

चर्च आणि माओवादी

• भाष्य : मा. गो. वैद्य•

ख्रिस्ती चर्च आणि माओवादी यांना एका वाक्यांशात जोडणे म्हणजे महान् वदतोव्याघात वाटू शकतो. ‘वदतोव्याघात’ हा खास संस्कृत वाक्प्रचार आहे. दोन अत्यंत असंभाव्य गोष्टींना एकत्र करणे म्हणजे ‘वदतोव्याघात.’ जसे सशाचे शिंग, वांझेचा मुलगा. ख्रिस्ती धर्म म्हणजे शांततेचा धर्म अशी त्याची ओळख ख्रिस्ती प्रचारक करून देत असतात. येशू ख्रिस्तानेही पवित्र बायबलमधील ‘सर्मन ऑन द माऊंट’ या नितान्त सुंदर प्रकरणात ‘कोणी एका गालावर मारले, तर त्याच्याकडे दुसरा गाल समोर करा’ असा अहिंसेने परिपूर्ण असलेला उपदेश दिला आहे. या अहिंसेच्या पुजार्‍याच्या भक्तांचे वर्तन मात्र हिंसेला प्रोत्साहन देणारे आहे. मी रानटी मध्ययुगातील गोष्ट सांगत नाही. या २१व्या शतकातील ही कथा आहे.छत्तीसगडातील न्यायालयाने डॉ. विनायक सेन या गृहस्थाला हिंसाचारी माओवाद्यांशी घनिष्ठ संबंध असल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेमुळे भारतातील अनेक तथाकथित बुद्धिवंत, विचारवंत आणि प्रसारमाध्यमेही बरीच तळमळली. विनायक सेन यांना न्यायालयाच्या या निकालाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयाकडे जाण्याला मोकळीक आहे व त्यांनी तसे अपीलही केले आहे. मध्यंतरी त्यांनी जामिनावर मोकळे होण्यासाठीही अर्ज केला होता, पण न्यायालयाने तोही फेटाळला. याचा अर्थ न्यायालयाकडे सेन यांच्या विरोधात भक्कम पुरावा असला पाहिजे.गेल्या महिन्यात म्हणजे ४ जानेवारी २०११ ला या विनायक सेन यांच्या मुक्ततेसाठी दिल्लीत एक मेणबत्त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. सुमारे दोनशे लोक या मिरवणुकीत सामील होते. कोणी काढली होती ही मिरवणूक? तर रोमन कॅथॉलिक चर्च, चर्च ऑफ नार्दर्न इंडिया, नॅशनल कौन्सिल ऑफ चर्चेस इन इंडिया इत्यादी ख्रिस्ती सांप्रदायिक संस्थांनी! माओवाद्यांच्या हिंसक कारवायांशी संबद्ध असण्याच्या आरोपावरून शिक्षा झालेल्या या व्यक्तीच्या सुटकेसाठी ख्रिस्ती धर्मसंस्थांनी का पुढाकार घ्यावा? ख्रिस्ती चर्च आणि माओवादी यांचे काही साटेलोटे आहे काय? – असे प्रश्‍न निर्माण होणे स्वाभाविक आहेत; आणि त्यांचे उत्तर ‘होय, साटेलोटे आहे’ असेच आता द्यावे लागेल.ओरिसातील स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येचे प्रकरण आठवा. ख्रिस्ती झालेल्या, खरे म्हणजे अनैतिक मार्गांनी ख्रिस्ती बनविलेल्या, जनजातीच्या लोकांना परत स्वधर्मात आणण्याचे कार्य लक्ष्मणानंद करीत होते. त्यांच्यावर ख्रिस्ती मिशनर्‍यांचा रोष असणे स्वाभाविकच समजले पाहिजे. त्यांनी लक्ष्मणानंदांची हत्या करून आपल्या मार्गातील काटा दूर करणेही ओघानेच आले. या हत्येची प्रतिक्रिया म्हणून, लक्ष्मणानंदांचा आश्रम असलेला कंधमालचा परिसर पेटून उठला आणि त्यांनी ओलेसुके हा विचार न करता, ख्रिस्ती लोकांवर हल्ले केले. अनेक ख्रिस्ती मारले गेले. हजारो निर्वासित झाले. त्यावेळी, माओवाद्यांनी असे वक्तव्य केले होते की, ‘लक्ष्मणानंदांची हत्या आम्ही केली, ख्रिस्ती मिशनर्‍यांनी नाही.’ तेव्हा अनेकांना आश्‍चर्य वाटले. माओवाद्यांचा लक्ष्मणानंदांवर क्रोध असण्याचे कारण काय? ते त्यांना राग आणणारे कोणते कृत्य करीत होते? माओवाद्यांनी ख्रिस्ती लोकांची बाजू घेण्याचे कारण काय? चर्च आणि माओवादी यांचे साटेलोटे आहे काय?- असे अनेक प्रश्‍न तेव्हा विचारले गेले होते. आता खात्री पटली की, चर्च आणि माओवादी यांचे निकट संबंध आहेत. चर्च श्रीमंत आहेत. कॅथॉलिक चर्च तर धनाढ्यच आहे. माओवाद्यांना चर्चकडून नक्कीच धनाचा पुरवठा होत असला पाहिजे. विद्यमान राज्यव्यवस्था उलथवून, आपली हुकूमशाही व्यवस्था, दहशतीने प्रस्थापित करण्याच्या माओवाद्यांच्या उद्दिष्टाबद्दल कुणालाच शंका नाही, पण ख्रिस्ती चर्चचे त्यांना साहाय्य आहे, हा प्रकार नवलाचा वाटतो, पण आता नवल करण्याचे कारण नाही. चर्चची माओवाद्यांच्या हिंसक कारवायात सहभागिता आहे. सर्व ठिकाणच्या राष्ट्रनिष्ठ लोकांनी चर्चच्या राष्ट्रविरोधी कारवायांपासून सावध राहिले पाहिजे.दिल्लीतील या मोर्चाने आणखी एक अजब गोष्ट उघड केली. ही मिरवणूक जे फलक घेऊन मिरवत गेली, त्यावर जे लिहिले होते, त्याचा आशय होता, ‘विनायक सेन आणि तीस्ता सेटलवाड यांचा छळ बंद करा.’ या मिरवणुकीचे नेतृत्व करणार्‍या लोकांपैकी दोघांची भाषणे शेवटी झाली. एक होते दिल्लीच्या कॅथॉलिक आर्च डायसीचे प्रवक्ते फादर डोमिनिक इम्यानुअल आणि दुसरे होते रोमन कॅथॉलिक पंथाचे कट्टर पुरस्कर्ते बडबोले जॉन दयाल. या दोन्ही वक्त्यांनी, आपल्या भाषणात, तीस्ता सेटलवाड यांचा गुजरात सरकार छळ करीत आहे, असा आरोप तर केलाच, पण गुजरात सरकारने श्रीमती तीस्तावरील सर्व खटले मागे घ्यावेत, अशी मागणीही केली. आतापर्यंत मानवाधिकाराविरुद्ध लढणार्‍या शूर महिला, अशीच तीस्ताबाईंची प्रतिमा लोकांसमोर आहे, पण त्यांच्या पाठीशी चर्च उभे आहे, हे या मोर्चाने उघड केले हे बरे झाले. डांगमधील परावर्तनाच्या वेगामुळे चर्च दुखावले होतेच. तीस्ताबाईही वेळी-अवेळी गुजरात सरकारविरुद्ध अकांडतांडव करीत असतातच. बरे झाले, त्यांचा बोलविता धनी चर्च आहे, हे आता स्पष्ट झाले. विनायक सेन यांच्या समर्थनार्थ काढलेल्या ख्रिस्ती मिरवणुकीने ही गुप्त गोष्ट प्रकट केली.हे चांगलेच झाले म्हणावयाचे!
इंद्रेश आणि मुसलमान
रा. स्व. संघाचे प्रचारक आणि संघाच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य इंद्रेशकुमार यांचे नाव सध्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजत आहे. तसे ते वर्षभरापासूनच गाजत आहे, पण स्वामी असीमानंदांच्या आरोपित कबुलीजबाबामुळे ते अलीकडे विशेष गाजू लागले आहे. मालेगाव, अजमीरचा दर्गा आणि हैदराबादची मक्का मशीद येथे घडलेल्या बॉम्बस्फोटांच्या कटात इंद्रेशकुमारांचा हात आहे, असे त्यांच्या संबंधातील बातम्यांचे सार आहे. त्यांची सरकारी चौकशी यंत्रणेने एकदा चौकशीही केली आहे. मात्र अजून त्यांच्यावर आरोप दाखल करण्यात आले नाहीत किंवा त्यांना अटकही करण्यात आली नाही. प्रचार मात्र खूप चालू आहे. त्यामागे अर्थात् सत्तारूढ पक्षाचे म्हणजे कॉंग्रेसचे राजकारण आहे, याविषयी शंका नको. संघ मुस्लिमविरोधी तर आहेच, पण तो हिंसाचारीही आहे, हे सरकारला प्रचारित करावयाचे आहे.पण मजेची गोष्ट अशी की, मुसलमान लोकच इंद्रेशकुमारांच्या ‘सलामतीसाठी’ प्रार्थना करीत आहेत. लोकांना हे आता माहीत झाले आहे की, ‘राष्ट्रवादी मुस्लिम मंचाच्या’ प्रवर्तकांपैकी इंद्रेशकुमार एक आहेत. जो गृहस्थ मुस्लिम मंचाचे संघटन बांधण्यात गुंतला आहे, तो मुसलमानांच्या धर्मस्थळांवर आघात कसा करील, हा एक साधा प्रश्‍न आहे. पण आमच्यातील बुद्धिवंतांना तो पडत नाही. मुसलमानांना अर्थात् काही मुसलमानांना -सर्वांना नव्हे- इंद्रेश आपले हितचिंतक वाटतात. ज्या अजमीरच्या दर्ग्याच्या ठिकाणी बॉम्बस्फोट केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, त्याच ख्वाजासाहिबांच्या दर्ग्यावर इंद्रेशच्या समर्थकांनी, इंद्रेशच्या कल्याणाकरिता, मुस्लिम परंपरेप्रमाणे मखमलीची व फुलांची चादर चढविली. ९ जानेवारीची ही घटना आहे. कोण कोण होते यात सामील? एक होते छत्तीसगडच्या हज कमेटीचे अध्यक्ष सलीम राज, दुसरे होते कॉंग्रेसच्या अल्पसंख्य प्रकोष्ठाचे महामंत्री नईम खान आणि तिसरे होते राजस्थान वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष सलाबत खान. अर्थात् त्यांच्याबरोबर आणखीही बरीच मंडळी होती. त्या सर्वांनी इंद्रेशच्या सलामतीसाठी दुआ मागितली.
अमेरिका हिंदू होत आहे?
अमेरिकेतील ‘न्यूज वीक’ या प्रसिद्ध साप्ताहिकात लिजा मिलर या नावाची एक संपादिका आहे. धर्माच्या क्षेत्रातील घडामोडींचा मागोवा घेणे, हे तिचे दायित्व आहे. तिने एका सर्वेक्षणाच्या आधारावर असे म्हटले आहे की, अमेरिकेतील असंख्य लोक, फक्त ख्रिस्ती धर्म हाच एकमेव खरा धर्म आहे, यावर आता विश्‍वास ठेवीत नाहीत. सुज्ञ वाचकांना हे माहीत असेल की, ख्रिस्ती व इस्लाम हे दोन धर्मपंथ, आपलाच धर्मपंथ खरा आहे, तोच मानवाला स्वर्ग प्राप्त करून देऊ शकतो, इतर सर्व श्रद्धा, विश्‍वास, धर्ममते, संप्रदाय खोटे आहेत, ते नरकाला घेऊन जाणारे आहेत, असे मानतात. त्याच कारणासाठी म्हणजे मानवांना नरकाच्या वाटेवरून दूर करण्यासाठी, त्यांना बळाचा, छळाचा, कपटाचा आणि लालचीचा स्वीकार करण्याचा संकोच नसतो, परंतु आता अमेरिकेतील ६५ टक्के लोकांना हे मत ग्राह्य वाटत नाही. त्यांना वाटते की, अन्य धर्मही ईश्‍वराप्रती मानवाला पोचवू शकतात. हे मानणे म्हणजे चक्क हिंदू बनणेच झाले की! कारण हिंदूच असे मानतात की, परमेश्‍वर एक असला तरी त्याच्याकडे जाण्याचे मार्ग अनेक असू शकतात. ‘सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति’ (कोणत्याही देवाला नमस्कार करा तो केशवालाच पोचतो) ‘एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति’ (सत्य एकच आहे पण शहाणे लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याचे वर्णन करतात.) ‘रुचीनां वैचित्र्याद् ऋजुकुटिलनानापथजुषां नृणामेको गम्यस्वमसि पयसामर्णव इव’ (कुठलेही पाणी ज्याप्रमाणे शेवटी सागरालाच जाऊन मिळते, त्याचप्रमाणे आपापल्या आवडीप्रमाणे मार्ग सरळ निवडा की जरा वाकडा निवडा सर्व माणसे त्याच परमेश्‍वराप्रत जात असतात) ही फक्त हिंदूंचीच धारणा आहे.लिजा मिलर लिहिते की, २४ टक्के अमेरिकन आता पुनर्जन्मावर विश्‍वास ठेवू लागले आहेत. सुमारे एक तृतीयांश अमेरिकन प्रेताचे दहन करणे पसंत करतात. १९७५ पर्यंत केवळ ६ टक्के लोक दहनविधी करीत असत. लिजा मिलरप्रमाणेच स्टीफन प्रोथैरो हे विद्वान लिहितात की, ‘अमेरिकन लोक देखील हिंदूंप्रमाणे विचार करू लागले आहेत की, अध्यात्मासाठी अनेक वाटा आहेत. आपण कोणत्याही मार्गाची निवड करू शकता. कारण सर्व मार्ग खरे आहेत.’ अमेरिका श्रीमंत आहे, पण लोक भौतिक समृद्धीला विटलेले आहेत. त्यांना अध्यात्माची गरज वाटू लागली आहे आणि ती गरज हिंदू धर्म पूर्ण करीत आहे.
के. जी. बालकृष्णन्
के. जी. बालकृष्णन् हे सध्या भारत सरकारच्या मानव-अधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत. अगदी अलीकडेपर्यंत ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. अलीकडेच त्यांचे नाव बातम्यांमध्ये झळकले आहे. कारण, त्यांनी, जाहीर रीत्या सांगितले की, न्यायाधीशांच्या संपत्तीचे प्रकटीकरण करणे, हे माहितीच्या अधिकारक्षेत्रात येऊ नये. बालकृष्णन् यांचे म्हणणे असे की, ही खाजगी बाब आहे, हिचा सार्वजनिक हिताशी संबंध नाही. बालकृष्णन्‌साहेब, कर नाही त्याला डर कशाला हवा? खरे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदावर विराजमान झालेल्या व्यक्तीने तर स्वत: पुढे येऊन व आपल्या संपत्तीचा तपशील देऊन, आपले चारित्र्य निष्कलंक असल्याचे दाखविले पाहिजे. दुर्दैवाने, तसे घडले नाही.यापूर्वी, त्यांचे बंधू ऍड. भास्करन् जे सरकारी वकील होते, त्यांनाही भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पदत्याग करावा लागला होता. त्यांच्या जावयावरही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. बालकृष्णन्‌साहेब दलित समाजातले आहेत, असे वर्तमानपत्रातील बातम्यांवरून कळले होते. ते सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी चढले, याचे सर्वांनाच, केवळ दलितांनाच नव्हे, मोठे कौतुक वाटत होते, पण आता नवीनच माहिती समोर आली आहे आणि तीही केरळच्या एस.सी.-एस.टी. फेडरेशनने जाहीर केली आहे. ती धक्कादायक आहे. या फेडरेशनचे ऍडव्होकेट के.व्ही. कुमारन् सांगतात की, बालकृष्णन् दलित नाहीतच. ते ख्रिस्ती आहेत. धर्मांतर केलेल्या दलितांना, अनुसूचित जातीसाठी (एस.सी.) असलेल्या सवलती मिळत नाहीत, म्हणून बालकृष्णन् यांच्या वडिलांनी प्रथम आपले नाव बदलविले. त्यांचे ख्रिस्ती नाव ‘लूकोस’ असे होते. ते त्यांनी, एससींना मिळणारे लाभ उपटण्यासाठी ‘गोपीनाथन्’ केले; आणि तीच परंपरा आपल्या वंशात रूढ केली. वडिलांप्रमाणे बालकृष्णन्‌साहेबही ख्रिस्ती आहेत. कुमारन् यांचा आरोप असा आहे की, रोमच्या व्हॅटिकनचे म्हणजे पोपच्या राज्याचे ते हस्तक आहेत.बालकृष्णन् यांच्या कुटुंबीयांवर चर्चची कशी मर्जी आहे, हे कुमारन् यांनी आपल्या पत्रपरिषदेत सांगितले आहे. ते म्हणाले, बालकृष्णन् यांची कन्या व जावई यांना लंडनमध्ये जाऊन विधिशाखेत उच्च शिक्षण घेता यावे म्हणून वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेसने पुरस्कृत केले होते. बालकृष्णन्‌साहेबांचे हे जावई विधानसभेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या तिकिटावर उभेही होते. ती जागा अनुसूचित जातीसाठी राखीव होती. ते ख्रिश्‍चन आहेत. एवढेच नव्हे, तर ख्रिस्ती उपासनाही करणारे आहेत, पण त्यांनी ही वस्तुस्थिती लपविली होती. ते त्या निवडणुकीत पराभूत झाले हा भाग वेगळा.अपेक्षा अशी आहे की, बालकृष्णन् यांनी खरे काय आहे, हे स्वच्छपणे सांगावे.
संस्कृत भारती
‘संस्कृत भारती’चे नाव आता सर्वपरिचित झाले आहे. च. मू. कृष्णशास्त्री यांनी आपल्या अथक परिश्रमांनी कार्यकर्त्यांची एक निष्ठावंत चमू उभी केली आणि भारतात तसेच अन्य देशांतही संस्कृत भाषेचा झेंडा फडकविला.‘संस्कृत भारती’चा प्रारंभ १९८१ च्या जून महिन्यात झाला. येत्या जून महिन्यात तिला ३० वर्षे पूर्ण होतील. या काळात, ‘संस्कृत भारतीने’ काय साध्य केले, हे ‘संभाषण-संदेश’च्या जानेवारी २०११ च्या अंकात विस्ताराने आले आहे. त्याचा हा सारांश. ‘सम्भाषण संदेश:’ हे संस्कृत भारतीचे अधिकृत मासिक आहे.
१) भयनिवारण
संस्कृत तशी कठिण नाही, पण लोकांना तिचे भय वाटते. कारण, संस्कृत बोलताना एक जरी अशुद्ध प्रयोग झाला तरी त्यावर टीका होते. आपण आपल्या मातृभाषेत जेव्हा बोलतो, तेव्हा ती काय व्याकरणशुद्ध भाषा बोलत असतो? मग संस्कृतच्या बाबतीतच आग्रह का? संस्कृत भारतीने लोकांच्या मनात ठसविले की, ‘‘सदोष असो की निर्दोष असो; संस्कृत भाषेत बोलत जा.’’ संस्कृत भारतीच्या प्रयत्नांनी हे भय आता पुष्कळसे दूर झाले आहे.
२) संभाषण शिबिरे
या दृष्टीने असंख्य संभाषण शिबिरे भरविण्यात आली आणि लोक धडाकून संस्कृत बोलू लागले. संस्कृत भाषेचा रथ जो एका बाजूला पडला होता, तो या शिबिरांमुळे परत मार्गावर आला.
३) सरल संस्कृत
संस्कृत म्हणजे संधि-समासांनी जटिल बनलेली भाषा, अशी समजूत होती. ‘संस्कृत भारतीने’ संस्कृत सोपे केले. सध्या उत्तराखंड राज्याच्या सरकारने संस्कृतला द्वितीय भाषेचा दर्जा दिला आहे. कारण असे घडले की, त्या सरकारातील प्रमुखांनी सरल संस्कृतातील संभाषणे ऐकली आणि त्यांचे गैरसमज दूर झाले व सरकारने प्रशंसनीय निर्णय घेतला.
४) विविध कार्यक्रम
‘संस्कृत भारतीने’ संभाषण शिबिरांबरोबरच, संस्कृत संध्या, पथनाट्य, क्रीडोत्सव, स्नेहसंमेलने, छात्रशिल्पशाला अशा प्रकारचे जवळजवळ शंभर कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यातून लोकांना पटले की, आपणही संस्कृत बोलू शकतो.
५) प्रदर्शनी
संस्कृत भाषेचा परिचय करून देण्यासाठी, संस्कृत विज्ञान प्रदर्शनी, शैक्षणिक सामग्री प्रदर्शनी, अशा प्रदर्शनांचे आयोजनही ‘संस्कृत भारतीने’ केले. हजारो लोकांनी ही प्रदर्शने बघितली व ते प्रभावित झाले.
६) अनौपचारिक शिक्षण केंद्रे
‘राष्ट्रीय संस्कृत संस्थान’ या सरकारी संस्थेने संस्कृत सम्भाषण शिकविण्याचे अनेक कार्यक्रम केले. सरकारची योजना असल्यामुळे, तिला लोकांचा उत्साहवर्धक प्रतिसादही मिळाला. या शिक्षण केंद्रांच्या संचालनासाठी ‘संस्कृत भारतीने’ आपल्या संपूर्ण शक्तिनिशी सहकार्य दिले.
७) संस्कृत भाषेत पुस्तके
गोरखपूरच्या गीता प्रेसने प्रकाशित केलेल्या संस्कृत पुस्तकांची कोटींच्या संख्येत विक्री झाली. ‘संस्कृत भारती’ने प्रकाशित केलेली ‘वदतु संस्कृतम्’ आणि ‘संस्कृत व्यवहारसाहस्री’ या पुस्तकांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या बंगलोर येथील संस्कृत संमेलनाच्या वेळी, एक कोटीपेक्षा अधिक रुपयांची संस्कृत पुस्तकांची विक्री झाली. या संमेलनासाठी कर्नाटकाच्या राज्यपालांचा पुढाकार होता, हे सर्व जण जाणतातच. संस्कृत पुस्तकांच्या विक्रीचा व्यापार घाट्याचा नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.याच प्रमाणे संस्कृतमध्ये लहान मुलांसाठी ‘चंदामामा’चे प्रकाशन होत असते. संसदेचे सदस्य तसेच विधानसभांचे सदस्य यांच्यासाठीही संस्कृत संभाषण वर्ग संपन्न झाले. या सर्व क्रियाकलापांचा परिणाम म्हणून अनेक घरांमध्ये लोक संस्कृतमध्येच भाषण करू लागले आहेत. नरसिंगपूर जिल्ह्यातील मोहद या ८-१० हजार वस्तीच्या गावात तर शाळकरी मुलेही संस्कृत बोलतात; आणि गावातील सर्वांना संस्कृत समजते.
एक मजेदार खटला
‘इस्कॉन’ ही संस्था बहुधा सर्वांना ज्ञात असावी. ‘इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्ण कान्शसनेस’ असे संस्थेचे पूर्ण नाव आहे. अनेक गोरे युरोपियन, धोतर नेसून, शेंडी ठेवून, कृष्णभक्तीची गीते गात सडकेवरून जाताना आपण बघितले असतील. हा सारा ‘इस्कॉनचा’ पराक्रम आहे. सारे कृष्णभक्त झालेले आहेत.या इस्कॉनविरुद्ध युरोपच्या पोलंड देशातील एका ख्रिस्ती भिक्षुणीने (नन) खटला भरला. तिचे म्हणणे असे की, ही संस्था ‘कृष्ण’ नावाच्या व्यक्तीचा उदोउदो करते व त्याद्वारे नीतिभ्रष्टतेचा प्रचार करते. या कृष्णाने १६ हजार बायकांशी लग्न केले होते.प्रकरण न्यायालयात गेले. तेव्हा इस्कॉनच्या वकिलाने, न्यायाधीशाला म्हटले, या भिक्षुणीने, भिक्षुणीचे व्रत स्वीकारताना जी शपथ घेतली. ती तिने येथे म्हणून दाखवावी. न्यायाधीशाने तिला शपथेचा उच्चार करायला सांगितले. पण तिने ती शपथ उच्चारण्यास नकार दिला. मग इस्कॉनच्या वकिलानेच ती शपथ वाचून दाखविली. त्या शपथेचा मुख्य अर्थ असा की, ‘‘तिने आता येशूशी विवाह केला आहे.’’ वकील म्हणाले, कृष्णाने फक्त १६ हजार स्त्रियांशीच विवाह केला होता आणि ज्यांनी ‘मी येशूशी लग्न केले आहे, अशी भिक्षुणींची संख्या तर लक्षावधी आहे. आता आपणच सांगा की, येशू आणि कृष्ण यात कोण अधिक नीतिभ्रष्ट आहे?’ न्यायाधीशाने अर्थात् खटला खारीज केला.
दै. तरुण भारत, सोलापूर,  रविवार, दि.२७ फेब्रुवारी २०११

Posted by : | on : 25 August 2011
Filed under : Blog, भाष्य : मा. गो. वैद्य, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *