Home » Blog » चिनी धमक्या हे नेहरूंचेच पाप

चिनी धमक्या हे नेहरूंचेच पाप

सडेतोड : अरुण रामतीर्थकर
इंग्रजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिल्यावर या विशाल आणि ४० कोटी लोकसंख्येच्या देशाला दूरदर्शी नेतृत्व हवे होते. कारण स्वातंत्र्यासोबत फाळणीच्या खोल जखमा डाव्या उजव्या अंगास झाल्या होत्या. इंग्रजांनीच मनोनीत केलेले जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’तून या देशाबद्दलचे त्यांचे अज्ञान जसे प्रगट झाले तसेच कारभारातून नेहरूंनी देशाच्या प्रश्‍नांचा कधी विचारच केला नाही. त्यांना ते कळलेही नव्हते. लोकसंख्येचेच घ्या, कुटुंब नियोजनास त्यांचा विरोध होता. सोव्हिएट युनियन भारतापेक्षा पाचपट मोठा, पण लोकसंख्या १६ कोटी होती. त्यामुळे जेवढे जास्त हात तेवढी देशाची प्रगती अधिक हे रशियाचे धोरण होते. रशियाचा आंधळा अनुनय करताना नेहरू हेच म्हणाले. त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत. या पापाचे धनी नेहरू.काश्मिर प्रश्‍न चिघळला तोही नेहरूंमुळे. राजा हरिसिंगने त्यांना अटक केली होती. त्या रागापोटी पाकिस्तानने निम्मा काश्मिर बळक़ावला तरी नेहरू गप्प. वल्लभभाई पटेल यांच्यामुळे निम्मा तरी काश्मिर वाचला. काश्मिर प्रश्‍न राष्ट्रसंघात नेण्याचा मूर्खपणा नेहरूंचाच. काश्मिरला भारतीय राज्यघटना लागू नाही. तेथे आकाशवाणी नाही, रेडिओ काश्मिर आहे. एकेकाळी मुख्यमंत्री हा पंतप्रधान होता. एका देशात दोन घटना, दोन पंतप्रधान याला तुम्ही काय म्हणाल?
आता मूळ मुद्दा चीनचा. चीन आणि भारत यांच्यामध्ये तिबेट हा देश होता. चीनने तो जिंकून भारताच्या सीमेशी आपली सीमा भिडवली. तेंव्हा सारा देश चिंताक्रात होता. दोनच माणसांना चिंता नव्हती. एक नेहरू व दुसरा संरक्षणमंत्री कृष्णमेनन. खडकीच्या दारूगोळा फॅक्टरीत  कॉफीचे डबे तयार  होत होते. ६२ साली चीन बरोबर आपले युद्ध झाले असे म्हणायचे.ते खरे नाही. चीन वेगाने पुढे सरकत होता. चीनचे १०० सैनिक तेथे आपले ५. सैनिक जवळ डबलबार बंदुका, त्यात गोळया नाहीत. होत्या त्या सरदलेल्या. कृष्णमेनने घेतलेल्या जीप बंद पडत होत्या. सैनिकांना अन्न नाही, पाणी नाही. जीव वाचवत ते पळत आले. १२ दिवसात चीनने ३६ हजार चौरस मैल प्रदेश जिंकला.
या वेगाने चीन, पुढे आला तर कन्याकुमारी पर्यंत जाईल मग हिंदी महासागर चीनच्या ताब्यात जाईल या भीतीपोटी अमेरिकेने चीनला थांबण्यास फर्मावले. न थांबल्यास अमेरिका या युद्धात पडेल या इशार्‍यामुळे चीन थांबला. त्यावेळी जॉन एफ. केनेडी मध्ये पडले नसते, तर आज जी नेहरू-इंदिरा- राजीव यांची पोस्टाची तिकिटे दिसतात. त्याऐवजी चौ.एन. लाय, माओ तसे तुंग, डेंग शियाओ पिंग यांची पोस्ट तिकिटे आपल्याला डकवावी लागली असती. १९६२ ते ७२ या दशकात आणि त्यानंतरही अनेक वर्षे मी अनेकांच्या घरी भिंतीवर केनेडींचे फोटो पाहिले आहेत.
नेहरू अत्यंत नाटकी होते. युद्धानंतर दिल्लीत लता मंगेशकर ‘ ए मेरे वतन के लोगो’  हे गीत म्हणत होत्या. स्टेजवर नेहरू होते. ते म्हणे ढसाढसा रडले. हाच माणूस लोकसभेत म्हणाला ‘‘ती जमीन गेली, तर जाऊ दे. तेथे गवताचे पातेही उगवत नाही.’’ चीनने हजारो सैनिक मारून ३६ हजार चौरस मैल प्रदेश जिंकला, तर जाऊ दे म्हणणारा पंतप्रधान आणि गाण्यावर रडणारा पंतप्रधान ही नेहरूंची दोन रूपे, दोन चेहरे आहेत.
या गवतही न उगवणार्‍या प्रदेशावर चीनने आक्रमण कां केले? कारणही नेहरूच. देशापुढील प्रश्‍न सोडवण्याऐवजी ते जगभर हिंडत होते. बाडुंग परिषद, कांगो कटांगात भारतीय सैन्य पाठवणे आणि मार्शल टिटो(युगोस्लाव्हिया) अब्दुल गमाल नास्सेर (इजिप्त) यांच्यासह त्यांनी अलिप्त राष्ट्र गट काढला. त्यावेळी अनेक  छोटेछोटे देश स्वतंत्र होत होते. त्यांना भारत हा एक बलाढ्य देश आणि नेहरू म्हणजे बलाढ्य नेते असा भ्रम झाला होता. चीनला हे सहन होण्यासारखे नव्हते. हा भ्रम दूर करून आशियाचा नेता भारत नव्हे तर चीन आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी चीनने हा हल्ला केला. हत्याचा हेतू सफल झाला. आग्नेय आशियातील सिंगापर,  थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया इ. देशांनी ‘एसिआन’ हा स्वतंत्र गट काढला. अरबी देशांनी ‘अरब लीग’ तर आफ्रिकी देशांनी ओ.ए. यू,(ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकी युनिटी) हा गट काढला. थोडक्यात, चीनने भारताचे महत्त्व संपवले.
त्यानंतर चीन सतत खोड्या काढत आहे. पाकिस्तानशी सलगी वाढवून काश्मिर हा पाकचा प्रदेश असे नकाशात दाखवणे, अरुणाचल प्रदेश स्वत:चा प्रदेश म्हणून हक्क सांगणे असे प्रक़ार चालू असताना आता मोठी खोडी काढली आहे. आपल्या तेल व नैसर्गिक वायू महामंडळाने व्हिएतनाम तेल व वायुचा शोध ओ.एन. सी. घेणार आहे. त्यासाठी आपल्या नौका तेथील समुद्रात जातील. चीनने त्याला हरकत घेतली असून, वाईट परिणामांचा इशारा दोनदा दिला आहे. देशांतर्गत प्रश्‍नात हे सरकार नालायक ठरलेच आहे. आता परराष्ट्र धोरणात ते नेभळट आहे की दणकट आहे ते पहायचे.
दणकट व्हायला हरकत नाही, पण  ते करताना नेहरू कन्येने केलेली चूक लक्षात घ्यायला हवी. मॉरिशिस जवळ दिएगो  गार्शिया या नावाचे एक बेट आहे. मॉरिशसने ते ब्रिटनला भाडेतत्त्वावर दिले आहे. ब्रिटन आणि अमेरिकेचे मैत्री संबंध असल्यामुळे अमेरिकेची एक गस्तीनौका तेथे आली. हा आंतरराष्ट्रीय समुद्र होता. मॉरिशस किंवा ब्रिटनची कसलीही  हरकत नसताना इंदिरा गांधींनी दिएगो  गार्शियावरून बरेच आकांडतांडव केले. प्रत्यक्षात केले कांहीच नाही. नुसती बडबड. त्यामुळे अमेरिका मात्र दुखावली गेली. रशियाच्या प्रेमापोटी इंदिरा गांधींनी ही घोडचूक करून ठेवली.भारताची कुरापत नेहमीच काढण्याचे चीनचे तंत्र आहे.व्हिएटनामची हरकत नसताना व्हिएटनाम जवळच्या समुद्रात त्या देशाच्या संमतीने आपण काय करतो याच्याशी चीनचा संबंध नाही. तरीही चीन चोंबडेपणा करत असेल, तर आता त्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. ‘हिम्मत असेल तर आमची नौका अडवून दाखवा’ असे चीनला प्रत्युत्तर द्यायला हवे. वेळ पडली तर युद्ध करण्याची तयारी ठेवली पाहिजे. नाही तरी गेल्या ४० वर्षात आपल्या सैन्याला युद्ध माहीतच नाही. या युद्धाने अरुणाचलचा प्रश्‍नही आपोआप सुटेल. मात्र आता नेभळटपणा दाखवला तर व्हिएटनामचे कंत्राट हातचे जाईलच पण इतर छोटे देश भारताबरोबर करार करण्यास घाबरतील. कंत्राट रद्द होण्यात भारताची नाचक्की आहे तसेच चीनचा दबदबा  वाढणार आहे. आशिया खंडाचा नेता चीन की भारत या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याची वेळ ५० वर्षांनंतर पुन्हा आली आहे. भारताने आता ही संधी सोडू नये. 
-रविवार, दि. २५ सप्टेंबर २०११
http://amarpuranik.in/?p=132
Posted by : | on : 8 February 2012
Filed under : Blog.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *