Home » Blog » जात्युच्छेदक निबंध : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार

जात्युच्छेदक निबंध : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार

 जात्युच्छेदक निबंध : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार

प्रस्तुतच्या जातीभेदाचें इष्टानिष्टत्व 

   ‘मला वाटते की, देशाच्या राजकीय, सामाजिकप्रभृती परिस्थितीचें आणि ती सुधारण्यासाठी ठरलेल्या सिद्धान्तप्राय उपायांचें ज्ञान मुलांना लहानपणापासूनच करून देणें अत्यंत आवश्यक झाले आहे. राजकीय सिद्धान्तांचें नि सामाजिक प्रेम यांचें विद्यार्थ्यास लहानपणापासूनच बाळकडू देणें (जसें अवश्य) तद्वतच जातीभेद, जातीद्वेष नि जातीमत्सर यांचे योगाने आमचा देश कसा विभागला जात आहे, कसा भाजून निघत आहे, कसा करपून जात आहे याचेंही ज्ञान राष्ट्रीय शाळेतील मुलांना मिळालें पाहिजे; जातीभेद सोडण्याची आवश्यकता किती आहे हें आमच्या विद्यार्थ्यांना समजलें पाहिजे.’    

– लोकमान्य टिळक (बेळगावचें व्याख्यान, १९०७)

आपल्या हिंदू राष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाशी प्रथम चातुर्वर्ण्य आणि नंतर त्याचेंच विकृत स्वरूप असलेली जातीभेद संस्था ही इतकी निगडित झालेली आहे की, आपल्या हिंदू वा आर्य राष्ट्राच्या वैशिष्ट्याची व्याख्या काही काही स्मृतीकारांनी ‘चातुर्वर्ण्यव्यवस्थानं यस्मिन्देशे न विद्यते । तं म्लेच्छदेशं जानीयात् आर्यावर्तं तत: परम् ।।’ अशीच दिलेली आहे. अर्थात्आपल्या हिंदू राष्ट्राच्या उत्कर्षाचें श्रेय जसे या आपल्या जीवनाच्या तंतूतंतूंशी गुंफून राहिलेल्या जातीभेदास असण्याचा उत्कट संभव आहे; तसाच आपल्या राष्ट्राच्या अपकर्षाचेंही तीच संस्था एक बलवत्तर कारण असण्याचाही तितकाच उत्कट संभव आहे. त्यातही मूळचें चातुर्वर्ण्य जे ‘गुणकर्म विभागश: सृष्टम्’ ते लोपत जाऊन आजच्या जन्मनिष्ठ जातीभेदाचा फैलाव होऊ लागला, त्याच वेळी आणि तसाच आपल्या हिंदूस्थानाचा अध:पातही होत आला; आणि ज्या वेळी बेटीबंद आणि रोटीबंद जातीभेदाने अत्यंत उग्र स्वरूप धारणे केले तोच काळ आपल्या अध:पाताचाही परमावधि करणारा ठरला.

जातीभेद नि अध:पात यांचें समकालीनत्व

या समकालीनतेमुळे तर त्या जातीभेदाचा आणि त्या अध:पाताचा संबंध केवळ काकतालीय योगाचा आहे कीं कार्यकारण भावाचा आहे याची शंका अत्यंत उत्कटतेने न येणें केवळ अशक्य आहे. यामुळे आपल्या राष्ट्राच्या अपकर्षाचीं कारणे  शोधताना इतर महत्त्वाच्या गोष्टींप्रमाणेच या जातीभेदाच्या प्रस्तुतच्या स्वरूपाच्या इष्टानिष्टतेची छाननी करणे हें भारतीय राष्ट्रधुरीणांचे आजचें एक अत्यंत त्वर्य (Urgent) आणि अपरिहार्य कर्तव्य झालेलें आहे. एखादें उद्यान खळांपुलांनी डवरलेलें, निकोप वृक्षांच्या विस्तीर्ण प्रौढीने नि निरोगी लतावेलींच्या सलील शोभेने उल्हासित असलेलें पाहून तेथील प्रकाश, पाणी आणि खत हीं बहुधा निर्दोष असावीं असे अनुमान जसें सहज निघते; तसेच ते वृक्ष खुरटलेले फळें किडलेलीं, फुलें शिथिललेलीं दिसताच त्या र्‍हासास आधारभूत असलेल्या प्रकाश, पाणी, खतप्रभृती घटकांपैकी कोणते तरी एक वा अनेक वा सर्वच दोषी झालेली असलीं पाहिजेत हेंही अनुमान तसेच सहज निष्पादित होते. आणि त्या प्रत्येकाची छाननी करून दोष कशात आणि किती प्रमाणात सापडतो याचें निदान करणे आणि तदनुसार ते ते दोष निर्मूल करणे हेंच त्या बागवानाचें आद्य कर्तव्य ठरते.
परंतु या दृष्टीने पाहता हिंदू राष्ट्राच्या अपकर्षास ही आमची जातीभेद संस्था किती प्रमाणात आणि कशी कारणीभूत झाली आहे किंवा झालीच नाही, याचें विवेचन आवश्यक असूनही आम्हांस व्यक्तीश: ते सांगोपांग करणे आज शक्य नाही. कारण जातीभेदाच्या आजच्या स्वरूपाचे परिणाम विशद करू जाताच आमच्या राजकीय परिस्थितीचा विचार क्रमप्राप्तच होणार आणि प्रचलित राजकारण संन्यासाच्या शृंखलेने जखडलेली आमची लेखणी त्यास तर शिवूही शकत नाही. यासाठी तो भाग तसाच सोडून या जातीभेदाने आमच्या राष्ट्राच्या सुस्थितीवर आणि प्रगतीवर सामान्यत: काय परिणाम झालेले आहेत याचें केवळ दिग्दर्शन करूनच आम्हांस या प्रास्ताविक भागास आटोपते घ्यावे लागले.

कोणाचें मत प्रमाण मानावें?

आणि हें दिग्दर्शन करताना या विषयासंबंधी लो.टिळकांवाचून दुसरें कोणाचें मत अधिक अधिकारयुक्त असणार आहे? गेल्या शंभर वर्षांत हिंदुस्थानात आपल्या हिंदू राष्ट्राच्या हिताहिताविषयी उत्कट ममत्वाने, सूक्ष्म विवेकाने आणि स्वार्थनिरेपक्ष साहसाने सर्व बाजूंनी समन्वित विचार केलेला जर कोणी पुरुष असेल तर ते लोकमान्य टिळकच होत. यास्तव आमच्या हिंदू राष्ट्राच्या अपकर्षाच्या कारणपरंपरेविषयीची त्यांचीं मते अगदी सिद्धान्तभूत नसलीं, तरी इतर कोणत्याही मतापेक्षा अधिक आदरणीय, विचारणीय आणि विश्वसनीय असणारच. त्यातही जातीभेदासारख्या धार्मिक संस्था म्हणून, सनातन संस्था म्हणून, साधारण लोक ज्या प्रश्नास समजतात त्या विषयांवर राजकारणात आणि धर्मकारणात सनातनी समजल्या जाणार्‍या कोटी कोटी लोकांचा विश्वास आणि नेतृत्व ज्यानें संपादिलें, त्या लोकमान्यांच्या मताचें महत्त्व विशेषच असलें पाहिजे. वास्तविक पाहता आजकाल कोण सनातन हे ठरविणें दुर्घटच आहे. जो ज्या वेळी एखाद्या सुधारणेस विरोध करतो आणि एखाद्या रूढीस उचलून धरतो तो त्या वेळेपुरता निदान त्या प्रकरणीं तरी सनातनी म्हणविला जातो, इतकेंच काय ते सनातनीपणाचें सध्याचें लक्षण आहे. यास्तव स्वत: लोकमान्यांवरही जरी बहिष्कार पडलेले होते, अनेक धर्ममार्तंडांनी त्यांनाही जरी प्रच्छन्न सुधारक म्हणून हिणविलें होते; तरीही हिंदू संस्कृतीच्या रक्षणार्थ त्यांनी उभ्या आयुष्यभर जी नेटाची झुंज घेतली आणि अगदी निरूपाय होईतो प्रचलित समाज घटनेला कोणाचाही अनावश्य धक्का लागू नये आणि अंतर्गत यादवी वाढू नये म्हणून सुधारणा विरोधाचा तीव्र आरोप सहन करूनही जी सतत काळजी घेतली; त्यामुळे कोट्यवधी हिदूंचा सनातन धर्म संरक्षक म्हणून लोकमान्यांवरच विश्वास बसलेला होता; या सर्व कारणांसाठी जातीभेदाच्या स्वरूपाविषयी लोकमान्यांसारखा अग्रगण्य सनातनी राजकीय पुढारी देखील काय म्हणतो हें पाहिलें असता तो जातीभेद आपल्या हिंदू समाजाच्या अपकर्षाला कसा कारणीभूत होत आहे हें त्यांच्या या लेखावर उद्धृत केलेल्या शब्दावतरणाने दिसून येते. ‘जातीद्वेष आणि जातीमत्सर यांनी आमचा देश कसा करपून जात आहे, कसा भाजून निघत आहे (आणि म्हणूनच तो जातीभेद मोडण्याची किती आवश्यकता आहे)’ याविषयी त्यांचे वरील जळजळीत उद्गार एकिले असता आजचा जातीभेद आपल्या राजकीय जीवनासही किती घातक आहे ते निराळें सिद्ध करीत बसण्याची आवश्यकता उरत नाही.

आजचें विकृत स्वरूप

हा लोकमान्यांसारख्यांचा आप्तवाक्याचा आधार क्षणभर बाजूस ठेवला तरीही, आज आहे या स्वरूपात तरी जातीभेद देशहितास अत्यंत विघातक होत आहे, हें सिद्ध करण्यास एक सर्वसामान्य सबळ पुरावा असा आहे की, चार वर्षांच्या बेटीबंदी रोटीबंदीच्या सहस्रश: हबक्यंात ह्या आपल्या हिंदू जातींच्या जीवनाचा गंगौघ खडंविखंड करून कुजवून टाकणारा हा आजचा जातीभेद तरी घातक आहेच आहे, यात काहीतरी सुधारणा झालीच पाहिजे; याविषयी तरी सनातन्यांतल्या सनातन्यांचाही मतभेद दिसून येत नाही. अगदी पंडित राजेश्वरशास्त्रीदेखील जातीभेदांच्या आजच्या अत्यंत विकृत स्वरूपाचें सर्वस्वी समर्थन करण्याचें साहस करू शकणार नाहीत. मग दुसर्‍याची काय गोष्टी? कारण त्यांच्या सनातन महासभेनेही इग्लंडमध्ये आपला प्रतिनिधी बोलावला असता आपण जाऊ म्हणून ठराव केलाच की नाही? दरभंग्याचे महाराजही बोटीवर चढताच परदेशगमन निषिद्धतेस समुद्रात ढकलून देते झालेच की नाही? त्या प्रकरणात जातीनिर्बंधाच्या बेड्या त्यांनी तोंडल्याच की नाहीत?

परदेशगमनाचा निषेध

जातीभेदाचें प्रस्तुतचें विकृत स्वरूप आपणांस हानीकारक होत असून त्यात काहीतरी सुधारणा केलीच पाहिजे याविषयी प्रस्तुतच्या बहुतेक विचारी पुढार्‍यांचें जसें ऐकमत्य आहे, तद्वतच आपल्या मागच्या वैभवास जे आपण मुकलो, त्यासही ह्या जातीभेदाच्या आणि तदुत्पन्न विटाळ-वेडाच्या भ्रांत समजुतीच पुष्कळ अंशी कारण झाल्या आहेत हेंही कोणी विचारवंत मनुष्यास सहसा नाकारता येणे शक्य नाही. बाकी सर्व भाराभर गोष्टी सोडल्या तरी ह्या एका परदेशगमन निषेधाचाच प्रताप आपणांस केवढा भोवला पाहा! परदेशगमन निषिद्ध कां! तर माझी ‘जात’ जाईल म्हणून… आणि जात जाईल म्हणजे काय? तर जातीबाहेरच्या मनुष्याशी अन्नोदक संबंध घडेल, जातीभेदाच्या प्रवृत्तीमुळे बोकाळलेला, अन्नाचा विटाळ, चिंधीचा विटाळ, अशा विक्षिप्त विटाळ-वेडाने परदेशगमन निषिद्ध होताच परदेशचा व्यापार आणि व्याप ठार बुडाला. इतकेंच नव्हे तर पृथ्वीवरील दूरदूरच्या खंडोखंडी या विटाळ-वेडाच्या रोगाने प्रादुभावापूर्वी हिंदू व्यापार्‍यांनी आणि सैनिकांनी संपादिलेलीं आणि वसविलेली नगरेंची नगरें, बंदरेचीं बंदरे, राज्येची राज्यें मातृभूमीपासून अकस्मात्विलग झाल्याने आणि स्वदेशातून भारतीय स्वजनांचा जो सतत पाठपुरावा त्यांस होत होता, तो नाहीसा झाल्याने तिकडच्या तिकडे गडप झालीं, अक्षरश: ‘नामशेष’ झालीं. कारण आता त्यांची स्मृती केवळ खंडोखंडी अजून विकृतरूपाने का होईना पण प्रचलित असलेल्या नावावरूनच काय ती अवशिष्ट आहे.

परधार्जिणें विटाळवेड

इंडो-चायना (हिंदू-चीन), झांझीबार (हिंदू-बाजार), बाली, ग्वाटेमाला (गौतमालय) अशा नावारूनच काय तो हिंदू वैभवाचा आणि संस्कृतीचा आणि प्रभुत्वाचा त्या त्या खंडी विस्तारलेला व्याप आज अनुमित करता येईल! हिंदुत्व आणि दिग्विजय या शब्दांचा इतका आत्यंतिक विरोधी भाव आला की, जेव्हा अटकेपार होऊन इस्तंबूलवर चढाई करण्याची, अंधुक आकांक्षा मराठी मनात उत्पन्न झाली,  तेव्हा तिची संपन्नता हिंदुत्व राखून करता येणें शक्य आहे ही कल्पनासुद्धा मल्हररावासारख्या हिंदूपादशाहीच्या  खंद्या वीरालाही न शिवता तो वीर गर्जून उठला – ‘हिंदूचे मुसलमान होऊ पण पुढील वर्षी काबुलवर चाल करून जाऊच जाऊ.’ हिंदूचे मुसलमान होण्यावाचून मुसलमानांच्या देशावर सत्ता स्थापण्याचा अन्य मार्गच उरला नव्हता काय? हिंदूही राहू आणि काबूल तर काय पण इस्तंबूलवरही मराठी झेंडा आणि मराठी घोडा नाचवू ही गोष्ट तपनतमोवत्अत्यंत विसंवादी जी वाटली ती ह्या विटाळवेडाच्या, या ‘माझी जात जाईल,’ च्या भीतीमुळेच होय. हिंदू म्लेंच्छदेशी गेल्याने त्याची जात जाईल, पण केवढें आश्चर्य की, म्लेंच्छ स्वदेशी म्हणजे हिंदूदेशी आल्याने मात्र हिंदूंची ती ‘जात’ जात नसे, तो विटाळ होत नसे. वास्तविक पाहता त्यातल्या त्यात विटाळवेडच हवें होते तर ते असे काही सुचलें असते तरी याहून पुष्कळ बरें होते. ज्या हिंदू गावी वा प्रांती तो म्लेंच्छ व्यापारी शिरला, त्याला त्याला त्या म्लेंच्छाचा विटाळ होऊन त्या त्या हिंदू गावाची जात गेली अशी रूढी पडती तर ती आपत्ती खरीच, पण पुष्कळ अंशी ती इष्टापत्ती तरी होती. पण एखादा कासम किंवा क्लाइव्ह हिंद प्रातांत आला, आणि त्याने त्याचा उभा व्यापार किंवा उभें राज्य घशात घातलें तर त्याचा विटाळ आम्हां हिंदूंना होत नसे. त्याने आमची जात जात नसे. तर ती केव्हा जाईल तर एखादा हिंदुजन म्लेंच्छ देशात जाऊन तिकडचें धन वा सत्ता संपादून त्यायोगे आपली मातृभूमी सधनतर आणि सबलतर करण्यासाठी तो परत स्वदेशी आला म्हणजे!

जात राहिली पण धर्म गेला

म्लेंच्छ व्यापार्‍यास त्याच्या वस्तू स्वदेशी आणण्यासाठी, एखाद्या जावयाला मिळणार नाहीत अशा, कित्येक सवलती हिंदूंनी दिल्या. पण स्वदेशीचे हिंदू व्यापारी परदेशात हिंदवी वस्तू विकावयास आणि हिंदू वाणिज्य प्रसारावयास जाऊ लागले तर, शत्रूसही घालू नयेत अशा विशेष अडचणी, त्यांच्या मार्गात घातल्या. असल्या या आत्मघातक अंधळेपणाची शेवटी इतकी पराकाष्ठा झाली की, मलबारच्या राजास आपले काही विश्वासाचे लोक अरबांच्या सामुद्रिक वाणिज्य व्यवसायात प्रवीण व्हावें असे जेव्हा मनात आलें, तेव्हा त्या जातीच्या हिंदूंनी अशी पोक्त युक्ती काढली की, दरवर्षी हिंदूच्या प्रत्येक कुटुंबामागे एकेकाने मुसलमानी धर्म स्वीकारावा, आणि नौवाणिज्य शिकावें! कारण तो हिंदू आहे तोवर त्यास समुद्रवाणिज्य शिकणें निषिद्धच असणार. समुद्र ओलांडताच त्याची जात जाणार! म्हणून जात राहावी यास्तव धर्मच सोडून दिला! सर्पण हवें म्हणून हातपाय कापून चुलीत घातले! बायकोला दागिने हवे म्हणून बायकोलाच विकून टाकली! जात राखण्यासाठी बेजात केलेले तेच हे ‘मोपले’ आज त्याच जातीवाल्या हिंदूंचा निर्वंश करण्यास त्यांवर लांड्यासारखे तुटून पडत आहेत! फार काय सांगावें, क्वचित् एखाद्या अद्भुत देवीप्रसादाने दिल्लीचें सिंहासन चूर्ण करणार्‍या सदाशिवराव भाऊच्या त्या घरास सकाळी लंडनचे सिंहासन चूर्ण करण्याची शक्ती आली असती आणि त्याने दिल्लीच्या प्रमाणे इग्लंडला जाऊन लंडनच्या सिंहासनावर विश्वासरावास चढवून राज्यभिषेक करवून घेतला असता तर इंग्लंडमध्ये हिंदुपद-पादशाही स्थापन होती; पण ते दोघे हिंदू मात्र विदेशगमनाने त्यांची जात जाऊन, अहिंदू होते!!!

पराक्रमाचा संकोच

अगदी इसवीसनाच्या अकराव्या बाराव्या शतकापर्यंत जातीभेदाच्या क्षयाने आमच्या नाड्या आखडत आल्या असताही विदेशगमननिषिद्धतेच्या परमावधीला तो रोग पोचला नव्हता, तोवर मद्राच्या पांड्य वीरांच्या सेना विदेशातही हिंदू राज्यें चालवीत होत्या. शेवटच्या दिग्विजयी पांड्य राजाने त्याच वेळी ब्रह्मदेशाकडे पेगूवर स्वारी केली. नुसते ‘प्रतस्थे स्थलवर्त्मना’ नव्हे तर अगदी मोठें प्रबळ नौसाधन (आरमार) घेऊन ‘जलवर्त्मना’ प्रस्थान केले आणि ब्रह्मदेशाकडे पेगूचा विजय करून येता येता अंदमानादिक त्या समुद्रामधील सारीं बेटें हिंदू साम्राज्यात समाविष्ट करून तो परत आला. पण पुढे जेव्हा तो महासागरसंचारी हिंदू पराक्रम घरच्या विहिरीतला बेडूक होऊन बसला तेव्हा पराक्रम (पर + आक्रम), बाहेरच्या परशत्रूंच्या देशावरच चढाई करणे, हा शब्दच हिंदूंच्या कोशातून लुप्त झाला. शक्यतेचा मूळ उगम आकांक्षेतच असणार. पराक्रमाची, खर्‍या दिग्विजयाची, नवीं राज्यें संपादिण्याची आपली संस्कृती आणि प्रभाव सप्तद्विपा वसुंधरेवर दिग्विजयी करण्याची, आकांक्षाच जेव्हा ‘जातीच्या’ हिंदूस पाप झाली तेव्हा त्यास दिग्विजय करण्याची शक्यताही दिवसेंदिवस नष्ट होत गेली. आकाशात उडण्याची साहसी सवय पिढ्यानुपिढ्या नष्ट झाल्याने ज्यांचे पंख पंगू झाले आहेत असे हें हिंदू पराक्रमाचें कोंबडे आपल्याच ‘जातीच्या’ अंगणास जग मानून त्यातच डौलाडौलाने आरवत बसलें आणि ते केव्हा? तर आततायी पराक्रमासही पुण्य मानणार्‍या मुसलमानी गिधाडांनी आणि युरोपियन गुंडांनी सर्व जगाचें आकाश नुसते झाकून टाकलें तेव्हा! अशा स्थितीत त्यांच्या झेपेसरशी ते अंगणातलें कोंबडें ठिकाणच्या ठिकाणी फडफडून गतप्राण झाले यात काय आश्चर्य?

मराठी साम्राजाच्या क्षय

केवळ अगदी शेवटच्या हिंदू साम्राज्याचा, आपल्या महाराष्ट्रीय हिंदूपदपादशाहीचा, पतनकाल घ्या. आपली पूर्वीचीं साम्राज्यें आणि स्वातंत्र्य जाण्यास केवळ जातीभेदच कारण झाला हें विधान जसें अतिशयोक्तीचें होईल तसेच मराठी राज्य केवळ जातीभेदानेच बुडालें हें विधानही अतिशयोक्तीचें होईल. परंतु हें विधानही तितकेंच विपर्यस्त न्यूनोक्तीचें होणारें आहे की, आपली जी हिंदूपदपादशाही मूठभर इंग्रजी पलटणीच्या पायाखाली तुडविली गेली, ती इतकी निर्बल होण्यास जातीभेदाचा क्षय मुळीच कारणीभूत झालेला नाही! समुद्रगमननिषेध हें या भयंकर क्षयाचें एक उपांगदेखील विचारात घेतलें असता मराठी साम्राज्यकाळीसुद्धा आपलें सामाजिक नव्हे तर राजकीय बलदेखील या भयंकर व्याधीने किती निर्जीव करून सोडलें हें तत्काल ध्यानात येणारें आहे. ज्या वेळी इंग्रजांनी देशातील उभा आयातनिर्‍यात व्यापार हस्तगत केला होता, त्या वेळी त्यांच्या देशात आपल्या व्यापाराची एकही हिंदू पेढी नव्हती. शेवटच्या रावबाजीच्या अंत:पुरात दासी किती, त्यात बोलकी कोण, विश्वासघातक होण्यासारख्या कोण, येथपर्यंत आपल्या देशाची खडान्खडा माहिती त्यांच्या पुण्याजवळील ‘बेटा’मधल्या लेखनालयात टिपलेली असता इग्लंड देश आहे कोठे, इंग्रजांचें राज्य आहे किती, त्यांचे शत्रू कोण, त्यांचें बल किती अशी घाउक माहितीदेखील आम्हांस प्रत्यक्ष पाहून सांगेल असा एकही हिंदू त्यांच्या देशात गेलेला नव्हता! फ्रेंचांची माहिती इंग्रज सांगेल ती आणि इंग्रजांची फ्रेंच सांगेल ती. त्या स्वार्थप्रेरित विपर्यस्त माहितीवर सारी भिस्त!

मुकट्यापायी मुकुट दवडले!

एक हिंदू राघोबादादांचा वकील कोठे एकदाचा विलायतेस जाऊन आला तो त्याच्या त्या भयंकर जात गेल्याच्या पापाचें प्रायश्चित्त त्याला ‘योनिप्रवेश’ करवून आणि पर्वतावरील पाहाडांच्या कडेलाटशेलगतच्या योनीसारख्या आकृतीतून बाहेर येताच तो पुनीत झालासें मानून परत घेण्यात आलें. पाप एकपट मूर्ख आणि त्याचें प्रायश्चित्त शतपटीने मूर्खतर! जसे हजारो इंग्रज हिंदुस्थानात आले, तसे लाखो हिंदू व्यापारी, सैनिक, कारस्थानी युरोपभर जात-येत राहते तर काय त्यांच्या कला, त्यांचा व्यापार, त्यांची शिस्त, त्यांचे शोध आम्हांस आत्मसात्करता आले नसते? काळे, बर्वे, हिंगणे असले पट्टीचे हिंदू राजदूत जर लंडन, पॅरिस, लिस्बनला राहते तर काय आमच्या यादवीचा जसा त्यांनी लाभ घेतला तसा त्यांच्या यादवीचा आम्हांस घेता आला नसता? पण आडवी आली ही ‘जात’ हें ‘सोवळें’ – हा मुकटा’! ह्या मुकट्यापायी मुकुट दवडले पण त्यायोगे त्याची जात गेली नाही पण जर का तो वर उल्लेखिलेल्या पांड्य राजासारखा लंडनवर चालून जाता तर मात्र त्याची जात नि:संशय गेली असती.

समाजाचा देह पोखरणारें जातवेड

भारताचें स्थलबल असे निर्बल झाले. भारताचें जलबल त्या रणतरी-तीं नौसाधनें, जीं अगदी दहाव्या शतकापर्यंत सागरासागरावर हिंदूध्वज डोलवीत संचार करीत होतीं, तीं तर ठारच बुडालीं; त्या महासागरावर पाण्यात नव्हे, अहिंदू पक्षीयांच्या खड्गाचे पाण्यात नव्हे, तर या हिंदू जातवेडाच्या संध्येच्या पळीतील पाण्यात! आजही हे सात कोटी अस्पृश्य, मुसलमानांच्या संख्याबलाइतकेंच हें संख्याबल, एखाद्या तुटलेल्या हाताप्रमाणे निर्जीव होऊन पडलें आहे या जातवेडाने! कोट्यवधी हिंदू बाटले जात आहेत या जातवेडाने! हे ब्राह्मणेतर, हे सत्यशोधक फुटून निघाले या जातवेडाने! ब्राह्मणाच्या जात्यहंकाराचा केव्हा अगदी ठीक समाचार घेताना जो ब्राह्मणेतर सत्यशोधकपंथ समतेच्या एखाद्या आचार्‍यासही लाजवील अशा उदात्त तत्त्वांचा पुरस्कार करतो, त्यातील काही लोक तेच समतेचें अधिष्ठान महार-मांग मागू लागताच अगदी मंबाजीबुवासारखे पिसाळून त्यांच्यावर लाठी घेऊन धावतात, या जातवेडामुळे! ब्राह्मण मराठ्यांचे ब्राह्मण बनू पाहतात! हें जातवेड एका ब्राह्मणाच्याच अंगी मुरलेलें नसून अब्राह्मण चांडालापर्यंत उभ्या हिंदूसमाजाच्याच हाडीमासी रुजलें आहे! उभा समाजदेह या जात्यहंकाराच्या, या जातीमत्सराच्या, जातीकलहाच्या, क्षयाचे भावनेने जीर्णशीर्ष झालेला आहे.

उपेक्षा केली तर?

हिंदू राष्ट्राच्या आजच्या आत्यंतिक अपकर्षाचें हें आजचें जातीभेदाचें विकृत स्वरूप जरी एकमात्र कारण नसलें तरी एक अनुपेक्षणीय कारण आहेच हें वरील अत्यंत त्रोटक दिग्दशनावरूनही स्पष्ट दिसून येईल आणि म्हणून अशा स्थितीत आपल्या अपकर्षाच्या त्या बाह्य कारणांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करणे हें आपणां सर्वांचे एक अगदी अवश्य कर्तव्य होऊन बसलें आहे. जे हिंदूराष्ट्राचें स्वातंत्र्य आपणांस मिळवावयाचें आहें ते जातीभेदाने जर्जर झालेल्या या आपल्या राष्ट्रपुरुषास जरी एक वेळी मिळविता आलें तरी या रोगाचें जोवर निर्मूलन झालें नाही तोवर एका बाजूस ते मिळविताच पुन्हा गमावण्याचाही पाया भरत जाणार आहे.
परंतु जातीभेदाच्या आजच्या विकृत आणि घातक स्वरूपाचे निर्मूलन करण्याचा हा यत्न करीत असता या संस्थेत जे काही गुणावह असेल तेंही नष्ट न होईल अशाविषयी मात्र आपण अर्थातच शक्यतो सावधान असले पाहिजे. आज पाच हजार वर्षें जी संस्था आपल्या राष्ट्राच्या जीवनाच्या तंतूतंतूंशी निगडित झाली आहे, तिच्यात आजही काहीएक गुणावह नाही आणि पूर्वीही काहीएक गुणावह नव्हते असे वैतागासरशी धरून चालणें अगदी चुकीचें होईल. यास्तव या लेखमालेत आम्ही जातीभेदाच्या मुळाशी कोणतीं तत्त्वें होतीं, त्यातला गुणावह भाग कोणता, त्याची प्रकृती कोणती आणि विकृती कोणती आणि कोणच्या योजनेने त्यातील हितावह ते ते न सोडता अनिष्ट ते ते शक्य तो टाळता येईल ह्याचें यथावकाश विवेचन योजिलें आहे.

–    (केसरी, दि. २९-११-१९३०)

Posted by : | on : 28 December 2011
Filed under : Blog.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *