Home » Blog, भाष्य : मा. गो. वैद्य, स्थंभलेखक » पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित

पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित

• भाष्य : मा. गो. वैद्य•
माझे फार पूर्वीपासूनचे मत आहे की, आपण भारताच्या हिताच्या संदर्भातच पाकिस्तानचा विचार केला पाहिजे. अमेरिकेचे हित कशात आहे, याचा अमेरिका विचार करील; आणि आजतागायत अमेरिका तसाच विचार करीत आली आहे. अमेरिकेने ना भारताचे हित कधी बघितले ना पाकिस्तानचे.

म्हणे फाळणी लादली!
आपण आपल्या मातृभूमीची फाळणी मान्य करून, म्हणजेच पाकिस्तानच्या निर्मितीला मान्यता देऊन आज ६३ वर्षे पूर्ण झाली. का आपण फाळणीला मान्यता दिली? आपले त्यावेळचे राज्यकर्ते असलेल्या इंग्लंडने फाळणी आपल्यावर लादली, असे म्हणून आपली सुटका नाही. कारण, प्रश्‍न असा उभा राहील की, भलेही इंग्लंडने फाळणी लादली असेल, आपण का ती मानली? १८५७ पासूनचा आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा आपण मागोवा घेतला तर असेच दिसून येईल की, आपणा सर्वांचे लक्ष्य, संपूर्ण भारताचे स्वातंत्र्य हेच राहिलेले आहे. स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे सैन्य असो की, क्रांतिकारक असोत अथवा सनदशीर मार्गाने आंदोलन करणारे असोत, सर्वांच्या समोर अखंड भारताचेच चित्र होते. अगदी १९४६ पर्यंत, म्हणजे फाळणी मान्य करण्याच्या केवळ दीड वर्षापर्यंत, आपले लक्ष्य अखंड भारताचे स्वातंत्र्य हेच होते. १९०५ साली, व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीचा बेत रचला, तर सारा देश फाळणीच्या विरोधात उभा झाला. अखेर इंग्रज राज्यकर्त्यांना बंगालची फाळणी रद्द करावी लागली. नंतर १९४६ साली, झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची घोषणा अखंड भारताचीच होती. मुस्लिम लीगला मात्र फाळणी हवी होती. या निवडणुकीत, ज्या प्रदेशांचे पाकिस्तान हे राज्य व्हावे, अशी मुस्लिम लीगची मागणी होती, त्या प्रदेशांपैकी बंगालचा एक अपवाद वगळला, तर इतरत्र मुस्लिम लीगचा पराभव झाला होता. वायव्य सरहद्द प्रांतात, जेथे ९० टक्के मुसलमान आहेत, अखंड भारतवादी कॉंग्रेस पक्ष विजयी झाला होता. पंजाबात मुस्लिम लीगची धूळधाण झाली होती. युनियँनिस्ट पक्षाला बहुमत मिळाले होते आणि तो पक्ष फाळणीच्या विरोधात होता. सिंधमध्ये मुस्लिम लीगला बर्‍यापैकी यश मिळाले असले, तरी बहुमत प्राप्त झाले नव्हते. ही १९४६ सालची गोष्ट आहे. कॉंग्रेस थोडा धीर व कणखरपणा धरती तर फाळणी टळली असती.
कटकट मिटविण्यासाठी!
मग कॉंग्रेसने फाळणी का मान्य केली? महात्मा गांधी तर म्हणाले होते की, माझ्या शरीराचे तुकडे झाल्यानंतरच देशाचे तुकडे होतील. तेच महात्माजी एक वर्षाच्या आत फाळणीच्या बाजूने उभे राहिले! कारण, एकच की, मुसलमान बहुसंख्य असलेल्या भागाची कटकट एकदाची मिटवावी, असे त्यांना वाटले. वस्तुत: कटकट भारताच्या त्या भागात होती, जेथे मुसलमान अल्पसंख्य होते. पण देऊन टाका ना त्यांचे मागणे आणि मिटवा कटकट, बाकीचा भाग तर स्वतंत्र होईल, तेथे आपण नंदनवन उभारू, असेच कॉंग्रेसच्या श्रेष्ठ पुढार्‍यांना वाटले आणि त्यांनी फाळणी स्वीकारली. झाली का कटकट समाप्त? नाव नको. पाकिस्तानने, फाळणीनंतरच्या केवळ दोन महिन्यांच्या आत काश्मीरवर आक्रमण केले, पण पूर्णांशाने त्याला यश मिळाले नाही. मग १९६५ साली, नंतर १९७१ साली, त्याचे आक्रमण झाले. पण तीही आक्रमणे सपशेल फसली. पाकिस्तानच्या लक्षात आले की, समोरासमोर लढाईत आपण भारताचा पराभव करू शकत नाही. म्हणून, छुप्या आतंकवादी हल्ल्याचे तंत्र त्याने स्वीकारले. एव्हाना, त्याला कळून चुकले असावे की, या हल्ल्यांनी, भारताला आपण फक्त लहानमोठ्या जखमा करू शकतो. रक्तबंबाळही करू शकत नाही. पराभूत करण्याची तर गोष्टच दूर!
जागतिक परिस्थितीत बदल
आता अँग्लो-अमेरिकनांच्याही धोरणात बदल झाला आहे. १९४५ पासून सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या कालखंडात, रशियावर टेहेळणी करण्याकरिता त्याला पाकिस्तानच्या भूमीची आवश्यकता होती. म्हणून ते पाकिस्तानला खुष ठेवीत असत. अमेरिकेची टेहेळणी-विमाने, पाकिस्तानच्या भूमीवरून उडत असत. पेशावरचा विमानतळ, म्हणायला पाकिस्तानात होता, पण त्यावर ताबा अमेरिकेचा होता. पुढे रशियालाही, या भागातील अमेरिकन वर्चस्वाला शह देण्याची उर्मी आली. त्याने अफगाणिस्थानात आपले पाय रोवले. आपल्याला अनुकूल सत्तांतर घडवून आणले. तेव्हा अमेरिकेने मुसलमानांच्या अभिजात धर्मांधतेला पुष्ट केले. तालिबान अमेरिकेची निर्मिती आहे. तालिबानने रशिया पुरस्कृत डाव उधळवून लावला आणि अफगाणिस्थानात आपली सत्ता स्थापन केली. मग हा धर्मांधतेचा भस्मासुर अमेरिकेवरच उलटला. या धर्मांध अतिरेकी मुसलमानांनी अमेरिकेवरच हल्ला केला. त्याच्या प्रतिष्ठेच्या ठिकाणांवर हल्ले करून, अमेरिकेचे नाक कापण्याचे धाडस केले. नंतर अमेरिकेने त्याचा सूड घेतला. अफगाणिस्थान भाजून काढला. तालिबानला सत्तेवरून हाकलले आणि आपले कळसूत्री बाहुले तेथे सत्तेवर बसविले, पण अफगाणिस्थानात शांतता नाही. करजाईंचे शासन नि:शंक नाही. त्याचा खरा अंमल संपूर्ण अफगाणिस्थानावरही नाही. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली, युरोपियन राष्ट्रांचे सैन्य -नाटो सैन्य- तेथे आहे म्हणून करजाई सत्तेवर आहेत. ते हटले की, तालिबान्यांनी रशियानुकूल नजीबुल्लाची जी गत केली, तीच करजाईंच्याही वाट्याला आल्याशिवाय राहावयाची नाही.
इस्लामची प्रेरणा
पण, आपला विषय पाकिस्तान आहे. पाकिस्तान निर्माण तर झाले, पण ते टिकावयाचे नाही. पाकिस्तानच्या घटक राज्यांना म्हणा, प्रांतांना म्हणा, जोडणारा डिंक केवळ इस्लाम होता, पण इस्लाम जोडण्याचे काम करू शकत नाही. तो पराक्रमाला प्रेरणा देऊ शकतो, पण जोडण्याला नाही. पराक्रम शत्रूच्या विरोधातच उपयुक्त असतो. पाकिस्तानच्या संदर्भात, भारत, खरे म्हणजे हिंदू त्याचा खरा दुष्मन होता, पण आता तो दुष्मन त्या देशाच्या सीमांच्या आत उरलेला नाही. सीमेच्या बाहेर तो होता व आजही आहे. त्या दुष्मनाला हरविण्याचेच प्रयत्न झाले, पण ते फसले, हे वर सांगितलेच आहे. आतंकी हल्ल्याचा मार्ग, पाकिस्तानने स्वीकारलेला होता, पण तोही यश मिळवून देऊ शकला नाही. हे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या ध्यानात आले आहे. आतंकवादाचा भस्मासुर पाकिस्तानने जन्माला घातला, पण आता तो आपल्याच जन्मदात्याच्या डोक्यावर हात ठेवायला लागला आहे. पाकिस्तान सुस्थिर, शांत राहूच शकत नाही. जे पेरले, ते उगविणारच आहे. वर म्हटले आहे की, इस्लाम जोडीत नाही. जोडण्याची त्याच्यात क्षमता असती तर इराण व इराक यांच्यात युद्ध झाले नसते; इराकने कुवैतवर आक्रमण केले नसते; इराक -सौदी अरेबिया यांची युती होऊ शकली असती. अगदी आपल्या जवळचे उदाहरण घेतले, तर बांगला देश निर्माणच होऊ शकला नसता. इस्लामचा नारा लावून बनलेले पाकिस्तान २४ वर्षांच्या आत तुटले. एक कारण, त्याला मिळाले, हे खरे आहे. उर्दू विरुद्ध बंगाली असा वाद झाला. पण इस्लाममध्ये एवढेही सामर्थ्य नसावे काय की त्याला आपल्याच लोकांमधील भाषिक वाद मिटवता येऊ नये?
एकराष्ट्रीयत्वासाठी
एकराष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यात इस्लाम उपयुक्त नाही. एकराष्ट्रीयत्वासाठी, भूमीच्या अखंडतेचा, तिच्या पवित्रतेचा, तिच्या मातृत्वाचा किंवा पितृत्वाचा (मदरलँड अथवा फादरलँड) असा ठसा बिंबवावा लागतो. सिंध, पंजाब, सरहद् प्रांत, बलुचिस्थान, पूर्व बंगाल यातील लोकांना कधी तरी वाटले काय की, पाकिस्तान ही आपली पवित्र मातृभूमी आहे? राष्ट्रीयत्वाच्या दृढतेसाठी समान इतिहास हवा असतो, त्या भूमीसाठी बलिदान केल्याचा इतिहास! अर्नेस्ट रेनॉं म्हणतो, “A heroic past, great men and glory- I mean real glory- these should be the capital of our company when we come to found a national idea. To share the glories of the past, and a common will in the present; to have done great deeds together, and the disire to do more- these are the essential conditions of a people’s being. Love is in proportion to the sacrifices one has made, and the evils one has borne” भावार्थ- ‘‘एक पराक्रमपूर्ण इतिहास, अनेक महापुरुष, आणि गत वैभव- ही ‘राष्ट्र’ संकल्पनेची पूंजी असते. भूतकाळातील वैभवाच्या स्मृती आणि वर्तमानातील समान अभिलाषा तसेच एकत्रितपणे केलेले महान पराक्रम आणि त्याहूनही अधिक करण्याची आकांक्षा- या राष्ट्रनिर्मितीच्या मुख्य अटी आहेत. ज्या प्रमाणात आपण बलिदान करतो आणि संकटे झेलतो, त्या प्रमाणात प्रेम उत्पन्न होत असते.’’ पाकिस्तानात हे घडलेच नाही. कोण आहेत पाकिस्तानचे राष्ट्रपुरुष? ज्यांचा आदर्श समोर ठेवावा असे कोणते महात्मे पाकिस्तानात निपजले? इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी किती बलिदान करण्यात आले? संपूर्ण पाकिस्तान ही आपली मातृभूमी आहे, असा ठसा बिंबविण्याचा कोणत्या सामाजिक व सांस्कृतिक गतिविधींनी प्रयत्न केला. तेथे असे काहीही घडले नाही. सर्व पाकिस्तानला जोडणारा एकच दुवा होता आणि तो होता हिंदुद्वेष! म्हणजे एक नकारात्मक आधार. नकारात्मक आधारावर राष्ट्र बनत नाही आणि टिकतही नाही. पाकिस्तान ‘राष्ट्र’ म्हणून जन्मलेच नाही. एक ‘राज्य’ म्हणून जन्मले. पण राज्याला राष्ट्रत्वाचा आधार नसेल, तर राज्यही टिकत नाही. बळाने कुणी एक ‘राज्य’ निर्माण करू शकतो. रशियाने तसे केले, पण ते ७० वर्षेच चालले. केंद्रीय बळ क्षीण होताच रशियाचे १०-१२ स्वतंत्र राष्ट्रांत आणि तेवढ्याच राज्यांत विभाजन झाले. त्या सर्वांची नावे देण्याचे येथे प्रयोजनही नाही.
विघटन अटळ
तात्पर्य असे की, पाकिस्तान टिकावयाचे नाही. त्याचे विघटन अटळ आहे. भारताने विघटनाला प्रोत्साहित करणे भारताच्या हिताचे आहे.भारतातील अनेक बुद्धिजीवींना, जे राजकीय घडामोडींचा वेध घेत असतात, वाटते की, पाकिस्तानची स्थिरता, आपल्या हिताची आहे. पण हा भ्रम आहे. सुरवातीच्या काळात, पाकिस्तान स्थिरच होते ना. मग बॅ. जिनांनी काश्मीरवर आक्रमण का केले? अयूबखानांच्या कारकीर्दीत पाकिस्तान तर खूपच सुस्थिर होते, मग त्यांनी कुरापत कां काढली? सुस्थिर पाकिस्तान भारताच्या हिताचे नाही. उलट सुस्थिर व सुदृढ पाकिस्तानकडून भारताला निरंतर धोका राहील. आणि मुख्य म्हणजे पाकिस्तान, त्याच्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे स्थिर राहूच शकत नाही. सिंधमध्ये ‘जिये सिंध’चे जोरदार आंदोलन झाले. सिंधची एक वैशिष्ट्यपूर्ण अस्मिता आहे. तेथील लोकांना ती जपायची आहे. त्यांना आपले वेगळे राज्य हवे आहे. सरहद्द प्रांतातील पठाणांची वेगळी अस्मिता आहे. त्यांना पाकिस्तानात रहावयाचे नाही. ‘पख्तुनीस्तान’ हे त्यांचे ध्येय आहे. बलुची लोकांचीही हीच स्थिती आहे. काश्मीरचा जो भाग पाकिस्तानच्या अवैध कब्जात आहे, त्या भागातील लोकांना पाकिस्तानात रहावयाचे नाही. २००१ साली, या भागातील लोकनेत्यांनी ‘ऑल पार्टीज् नॅशनल अलायन्स’ (सर्व पक्षीय राष्ट्रीय आघाडी) ही संघटना स्थापन केली. या संघटनेने राष्ट्रसंघाकडे निवेदन पाठवून अशी तक्रार केली आहे की, पाकिस्तान आम्हाला निवडणूक लढायला मनाई करीत आहे. या तक्रारीत असे म्हटले आहे की, ‘‘पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या प्रदेशातील लोक जोपर्यंत हा प्रदेश पाकिस्तानचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिज्ञापत्र लिहून देत नाहीत, तोपर्यंत त्यांची नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जात नाहीत. आणि आम्ही असे लिहून द्यावयाला तयार नाही.’’ या आघाडीत तेरा संघटनांचा अंतर्भाव आहे. आघाडीचे नेते सरदार शौकत अली काश्मिरी यांनी म्हटले आहे की, ‘‘लोकशाही मार्गावर आमचा विश्‍वास आहे. परंतु, पाकिस्तानातील लष्करी प्रशासन, लोकशाहीच्या बहाण्याखाली आमच्यावर नको असलेले शासन थोपवीत आहे.’’ या आघाडीचे काही नेते लंडनमध्ये आश्रय घेऊन राहात आहेत. त्यातले एक अमानुल्लाखान आहेत. त्यांनीही निवडणूक लढण्यासाठी पाकिस्तानात आमचे संपूर्ण विलयन झाले आहे, असे प्रतिज्ञापत्र लिहून देण्याच्या अटीचा निषेध केला आहे. १ डिसेंबर २००० च्या ‘इंडिया टुडे’च्या अंकात कराचीवरून दिलेली एक बातमी प्रकाशित झाली होती. तीत म्हटले होते की, ‘‘अनेक वर्षांपासून पाकिस्तानचा १४ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन, गिलगीत व बाल्टीस्थानात (पाकव्याप्त काश्मीरचा भाग)‘डिप्रायव्हेशन डे’ (म्हणजे वंचना दिवस) म्हणून पाळला जातो. हरताळांचे सत्र सुरू असते. अनेक ठिकाणी पाकिस्तानचा राज्यध्वज जाळण्यात आला आहे. आता तर येथील पुढारी सशस्त्र संघर्षाची भाषा बोलत आहेत.’’ अगदी अलीकडे म्हणजे २००९ च्या मे महिन्यात, या स्वातंत्र्येच्छू लोकांची एक परिषद चक्क दिल्लीत भरली होती. या परिषदेला भारत सरकारच्या परराष्ट्र खात्यातील एक अधिकारीही उपस्थित होता. परिषदेचा सूर भारताने आम्हाला मदत करावी, असा होता.
भविष्याची दृष्टी
या भागाचे थोड्या विस्ताराने वर्णन करण्याचे कारण, हा भाग अगदी थोड्या प्रयत्नांनी भारताशी संलग्न होऊ शकतो हे आहे. तेथील लोकांची इच्छा काश्मीरसारखी थोडी स्वायत्तता हवी एवढीच आहे. याच दृष्टीने, काश्मीर प्रश्‍नाच्या संदर्भात मी, जम्मूचे व लडाखचे वेगळे राज्य करून काश्मीर खोर्‍याला अधिक स्वायत्तता द्यावी, असा विचार मांडला होता. परंतु, ज्यांना भविष्याकडे बघण्याची दूरदृष्टी नाही, त्या आमच्या काही मित्रांना तो विचार पसंत पडला नाही. त्यांनी माझ्या त्या प्रतिपादनावर टीकाही केली. संरक्षण, परराष्ट्रसंबंध, दळणवळण व चलन ही कळीची खाती केंद्राकडे ठेवून, खोर्‍यातील जनतेला थोडी स्वायत्तता देण्याचे आपण मान्य केले, तर काश्मीरचाच मूळचा गिलगीत व बाल्टीस्थानचा भाग फार लवकर भारताशी संलग्न होईल. त्याला आपले समर्थन व थोडी मदत तेवढी हवी आहे. याचे परिणाम दूरगामीही होऊ शकतात. सिंध, सरहद्द प्रांत व बलुचिस्थान हेही प्रदेश भारताशी संलग्नता चाहतील. मला इंग्रजांच्या मुत्सद्देगिरीचे नेहमीच कौतुक वाटत आले आहे. त्यांनी सहाशेहून अधिक संस्थाने तशीच राहू दिली. पण आपला एक रेसिडेंट तेथे ठेवून व सर्वांना आपले सार्वभौमत्व स्वीकारायला लावून, त्यांना मांडलिक बनविले. सर्व संस्थानिकांना अंतर्गत स्वातंत्र्य होते. पण बाहेरच्यांशी मात्र कसेलही संधान बांधू दिले नाही. पाकिस्तानातील असंतुष्ट गटांना आपल्याकडे ओढण्यासाठी स्वायत्ततेचा प्रस्ताव उपकारक ठरू शकतो, असे मला वाटते. भारताशी संलग्न होण्यात, भारताशी जवळीक साधण्यात, आपले हित आहे, असे त्यांना वाटू शकते. गिलगीत व बाल्टीस्थानच्या लोकांनी त्याची स्पष्ट चिन्हे दाखविली आहेत. ‘जिये सिंध’वाल्यांचीही तीच भूमिका होती. पख्तुनीस्थानवाल्या पठाणांनी तर अखंड भारताच्या बाजूनेच कौल दिला होता. या सर्वांच्या स्वातंत्र्येच्छेला आपले समर्थन असले पाहिजे. त्यांना लोकशाही मान्य आहे. लष्करशाहीच्या ते विरोधात आहेत आणि मुख्य म्हणजे जिहादी आतंकवादाला ते कंटाळलेले आहेत. अन्य आघातलक्ष्य समोर नसल्यामुळे, हे आतंकवादी मुसलमानांनाच ठार करीत आहेत. पंजाबच्या गव्हर्नरला ठार करणारा मुसलमानच होता. कट्टर व धर्मांध मुसलमान! कोणताही संवेदनशील समाज हे अधिक काळ सहन करू शकत नाही. त्यांना, भारतातील मुसलमानांना कोणती स्वातंत्र्ये बहाल आहेत, ते कसे शांततामय जीवन जगत आहेत, हे नक्कीच दिसत असणार, जाणवतही असणार. या दृष्टीने आपल्या देशाच्या राजनीतीची पावले पडावयास हवीत. या प्रदेशांच्या भारताशी संलग्नतेत, जसे भारताचे हित आहे, तसेच तेथील लोकांना शांततेची आणि लोकशाही व्यवस्थेची हमीही आहे. जरदारींचे लोकशाही शासन किती ठिसूळ पायावर उभे आहे आणि अमेरिकेने पाऊल मागे घेताच, या लोकशाहीची काय गत होईल, हे समजण्याइतके शहाणपण तेथील बहुसंख्य लोकांना असेलच. पुन: कुणी अयूबखान, कोणी याह्याखान, कोणी झिया-उल-हक, कोणी मुशर्रफ सत्तेवर येऊन त्याने लोकांची मुस्कटदाबी करण्याच्या दुष्टचक्रातून कायमचे मुक्त होण्याची लालसा नक्कीच त्यांच्यात निर्माण झाली असणार. त्यांच्याही नजरेपुढे इजिप्तचा संघर्ष असणारच. या दिशेने भारताच्या भावी राजनीतीची पावले पडावीत. लोकशाहीवादी अमेरिकेलाही ही राजनीती भावावी, असे मला वाटते.
दै. तरुण भारत, सोलापूर, रविवार, दि. १३ फेब्रुवारी २०११
Posted by : | on : 11 July 2011
Filed under : Blog, भाष्य : मा. गो. वैद्य, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

One Response to पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित

  1. Anonymous Reply

    20 August 2011 at 4:13 am

    NICE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *