Home » Blog, उद्योग भरारी, उद्योग भरारी :अमर पुराणिक, औद्योगिक, स्थंभलेखक » बँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक

बँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक

•उद्योग भरारी : अमर पुराणिक•

‘‘आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा बँकेला आणि ग्राहकांना खूप फायदा झाला आहे. सोलापुरात जवळ जवळ १ हजार लोक इंटरनेट बँकिंगचा वापर करू लागले आहेत. ई-ट्रँझॅक्शनचे खूप फायदे असून, याचा वापर आणखी मोठ्या प्रमाणात वाढणे गरजेचे असल्याचे मत बावस्कर यांनी व्यक्त केले. आयकर ई-रिर्टन, इतर कर भरण्यासाठी अजूनही सोलापुरात मोठ्या प्रमाणात ई-ट्रँझॅक्शन होताना दिसत नाहीत, तुलनेत या प्रणालीचा वापर वाढणे आवश्यक आहे. सध्या बँकिंग क्षेत्रात खूप वेगाने बदल होत आहेत. येती दोन वर्षे खूप महत्त्वाची आणि मोठ्या बदलाची आहेत. आर्थिक योजनांचे नियोजन हे येत्या काळात मोठे आव्हान असेल. अजूनही भारतातील ४८ टक्के लोकांपर्यंत बँका पोहोचलेल्या नाहीत. ग्रामीण भाग, वाड्या-वस्त्यांवर मोबाईल बँकिंग सुरू करून शेवटच्या माणसापर्यंत महाराष्ट्र बँकेच्या सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. येत्या दोन वर्षांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मानस बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्र.रा. बावस्कर यांनी व्यक्त केला.

Bank-Of-Maharashtraसुरुवातीपासूनच बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे सर्वसामान्य माणसाची बँक म्हणून ओळखली जाते. अशा महाराष्ट्र बँकेने प्रारंभी छोट्या उद्योगांना केलेल्या मदतीमुळे आजच्या बर्‍याच मोठमोठ्या औद्योगिक घराण्यांचे जन्म झाले आहेत. अशा उद्योजकांबरोबरच देशभरात अनेक सक्षम कुटुंबं निर्माण करण्यात बँकेचा मोलाचा वाटा आहे. १६ सप्टेंबर १९३५ रोजी १० लाख रुपयांच्या अधिकृत भांडवलानिशी नोंदणी करून १९३६ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रने आपली बँकिंगक्षेत्राच्या व्यवसायात मुहूर्तमेढ रोवली. बँकेचे पहिले अध्यक्ष अर्थतज्ज्ञ व्ही.जी. काळे हे होते. १९३६ साली महाराष्ट्र बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाला. १९४५ मध्ये बँकेने १ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडला. १९६९ मध्ये राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर बँकेचा वेगाने विस्तार झाला. ३० सप्टेंबर २००५ पर्यंत बँकेच्या १२९२ शाखा भारतभर आहेत. महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रात असलेल्या कोणत्याही बँकांच्या तुलनेत महाराष्ट्र बँकेकडे सर्वात मोठे शाखांचे जाळे असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक प्र. रा. बावस्कर यांनी अतिशय गौरवाने सांगितले. ‘एक कुटुंब एक बँक’ हे ब्रीद बाळगणार्‍या महाराष्ट्र बँकेने सर्वसामान्य व्यक्तीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आपल्या सेवा सतत अद्ययावत ठेवल्या आहेत आणि बँकिंगमध्ये वैविध्यपूर्ण सेवा देत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले आहे.
बँकेच्या इतिहासाचा मागोवा घेताना असे लक्षात येते की,  प्रा. व्ही.जी. काळे, डी.के. साठे, आर.सी. सोहोनी, बी.एम. गुप्ते आणि एस.जी. मराठे अशी काही दूरदर्शी मंडळी एकत्र आली आणि सर्वसामान्य व्यक्तींसाठी एक बँक सुरू करण्याचा संकल्प करून बँकेची मुहूर्तमेढ रोवली. १६ सप्टेंबर १९३५ रोजी लावलेल्या रोपट्याचे आता भल्यामोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. गेल्या ७३ वर्षांच्या कालावधीत या वटवृक्षाची पाळेमुळे २२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांत रुजली असून, देशभर १३७७ संगणकीकृत शाखांच्या रूपाने बहरून आला आहे. अशा या बँक ऑफ महाराष्ट्रची समृद्ध धुरा सध्या समर्थपणे वाहत आहेत बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ए.एस. भट्टाचार्य.
बँकेची व्यापकता राष्ट्रीय पातळीवर असल्याने कृषी, औद्योगिक, लघु-मध्यम उद्योग, व्यक्ती आणि संस्था अशा समाजाच्या सर्वच घटकांच्या गरजांची पूर्तता आम्ही करतो, असे महाराष्ट्र बँक अभिमानाने सांगते. साडेबारा दशलक्ष ग्राहकांचे मौलिक पाठबळ आणि आधारामुळेच हे यश लाभले असल्याचे कृतज्ञपणे ती नमूद करते.
बँकिंग उद्योग क्षेत्रात झपाट्याने बदल होत असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानचा पुरेपूर वापर करीत बँक ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यास कटिबद्ध आहे. ३१ मार्च २००८ पर्यंत एकूण व्यवसाय रु.७१,४०० कोटींपेक्षाही जास्त असून, त्यापैकी एकूण ठेवी रु.४१,७०० कोटींपेक्षाही जास्त आहेत आणि एकूण कर्जे रु.२९,७०० कोटींपेक्षा जास्त आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्रचे इंडिया कार्ड मास्टर कार्ड इंटरनॅशनलशी संलग्न आहे. बँकेचा व्हिसा संधान असलेल्या ३४५ एटीएम केंद्रांचा विस्तार आहे. ३० बँका सदस्य असलेल्या नॅशनल फायनान्शिअल स्विव (एनएफएस) आणि ६ बँका सदस्य असलेल्या एमआयटीआर या संस्थांशी बँकेने सामंजस्याचा करार केला आहे. या सदस्य बँकांच्या एटीएमशी संधान जोडणे बँकेच्या कार्डधारकांना शक्य व्हावे हा त्यामागचा हेतू आहे. कोअर बँकिंग सोल्युशनद्वारे बँकेने ६९४ शाखा कार्यान्वित केल्या आहेत. अशा शाखांमुळे होत असलेल्या व्यवसायाचे प्रमाण ८६ टक्के एवढे आहे. इंटरनेट बँकिंग, फोन बँकिंग आणि मोबाईल बँकिंग अशी बहुविध माध्यमे बँकेने सुरू केली आहेत. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) योजना ६०४ शाखांमध्ये राबवली जात आहे. या ६०४ शाखांमध्ये आरटीजीएस मंचावर इन्स्टा रेमिट फॅसिलिटी उपलब्ध असते. या ६०४ शाखांमध्ये नॅशनल इलेक्ट्रॉनिक फन्डस ट्रान्सफर ही (एनइएफटी) सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. बँकेने प्रायोगिक तत्त्वावर सौरऊर्जेचा वापर करून शाखेची पूर्ण यंत्रणा सौरऊर्जेच्या यूपीएसवर चालवली जाते. सौरऊर्जा खूपच फायदेशीर असल्याने येत्या वर्षात २० ते ३० शाखांत सौरऊर्जा यंत्रणा बसवली जाणार आहे.
सर्वसाधारण विम्याकरिता युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि आयुर्विम्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ या संस्थांशी बँकेने सामंजस्य करार केला आहे. निर्यात पत विमा योजनेच्या विक्रीसाठी बँकेने भारतीय निर्यात पत आणि हमी महामंडळाबरोबर औद्योगिक माध्यम संस्था म्हणून काम करण्यासाठी करार केला आहे. मुच्युअल फंडाच्या विविध योजनांच्या वितरणासाठी १५ आघाडीच्या मुच्युअल फंडाबरोबर बँकेने करार केला आहे. बँकेने परदेशातील अंतर्गत रकमा पाठवण्यासाठी वेस्टर्न युनियन मनी ट्रान्स्फरबरोबर करार केला आहे.
केवळ फायद्याकडे लक्ष न देता सामाजिक बँकिंगमध्येही बँकेने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. बँकेच्या शाखांपैकी ४६ टक्के शाखा ग्रामीण भागात असल्याने ग्रामीण भागाशी बँकेची नाळ पक्की जोडली गेली आहे. बँकेचा या क्षेत्रातील कर्जाचा वाटाही चांगलाच आहे. बँक राज्यपातळीवरील बँकर्स समितीची निमंत्रक आहे. बँकेने प्रकल्प निर्यातीला अर्थपुरवठा एक्सिम बँकेच्या सहकार्याने करण्यासाठी एक्सिम बँकेबरोबर सामंजस्याचा करार केला आहे. बँक मुंबईत ठेव सेवा आणि डीमॅट सुविधा देते. सर्वात महत्त्वाचा आणि अधोरेखित करण्यासारखा मुद्दा हा आहे की, बँकेने आपल्या एकूण व्यवसायापैकी ९७.६८ टक्के व्यवसाय हा संगणकीकरणाद्वारे मिळवला आहे.

 पत सुविधा
ग्राहक अर्थसहाय्य योजना, गृह अर्थसहाय्य योजना, व्यक्तींसाठी, व्यावसायिकांसाठी, उद्योजकांसाठी, औद्योगिक क्षेत्रासाठी, व्यक्तिगत कर्जे, शैक्षणिक कर्जे, कृषितज्ज्ञांसाठी, महाबँक किसान क्रेडिट कार्ड, शेतकर्‍यांसाठी शेती यांत्रिकीकरण, पशुपालन, बागायती शेतकर्‍यांकरिता दुचाकीसाठी, अर्थसहाय्य योजना, उच्च तंत्रज्ञान प्रकल्प, वाहनकर्ज योजना.  
अनिवासी भारतीयांसाठी सेवा – अनिवासी सामान्य खाते, अनिवासी बाह्य खाते, परकीय चलन अनिवासी खाते, निवासी परकीय चलन खाते, अंतर्गत रकमा पाठवणे, – स्विफ्टद्वारे अंतर्गत रकमा पाठवणे, – परकीय चलन शाखा/केंद्र.  
बँकिंग सेवा – टेलिबँकिंग, क्रेडिट कार्ड, एटीएम, लॉकर्स.  
ठेव योजना – मासिक व्याज ठेव योजना, निश्चित ठेव योजना (फिक्स्ड डिपॉझिट स्कीम), वर्धिष्णु ठेव योजना, पुनरावर्ती ठेवयोजना, शीतल ठेव योजना, सुलभ जमा योजना, महासरस्वती योजना, महाबँक लोकबचत योजना, त्रैमासिक ठेव योजना, मिक्सी ठेव योजना, चलनदर ठेव योजना, महाबँक घटक ठेव योजन, परिवर्तनीय पुनरावर्ती ठेव योजना.
भकिष्यकालीन उपक्रम : महाबँक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था म्हणजेच स्वयंरोजगाराची दिशा दाखणारा मार्ग होय. – उद्योजकतेला प्रोत्साहन देणे.  – आर्थिक प्रगतीत बेरोजगार तरुणांनी योग्य तो वाटा उचलावा म्हणून त्यांना सक्षम करणे. – नियमित पाठपुरावा, आकलन मेळावे.- उद्योजकांचे गटवार मेळावे घेणे.
ग्रामीण विकास योजना : महाबॅँक कृषिसंशोधन व ग्रामीण विकासाची उद्दिष्टे : कृषी, पशुपालन व प्राणीज उत्पादने इत्यादी क्षेत्रांतील संशोधनाची जबाबदारी स्वीकारून ते सुरू करणे व अशा संशोधनास चालना देणे.
वैयक्तिक स्पर्श असलेले तंत्रज्ञान असे तत्त्वज्ञान बाळगणार्‍या महाराष्ट्र बँकेचे बोधचिन्ह आहे मोठ्या उंचीपर्यंत आपल्या अनंत दिव्यांसह झेपावणारी दीपमाला. हे सतत प्रगतीचे प्रतीक आहे. आजच्या युगात सामर्थ्य हे आर्थिक क्षमतेवर मोजले जाते. त्यामुळे महाराष्ट्र बँक म्हणजे देशाचे आणि ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. संपूर्ण देशात संपूर्ण परिवारांच्या सर्वप्रकारच्या गरजांची पूर्तता करणे, असाच बँकेचा मानस आहे. हेच आमचे उद्दिष्ट आहे. ‘एक परिवार, एक बँक, महाराष्ट्र बँक’ हे बँकेचे स्वप्न आहे.

आर्थिक नियोजन हे मोठे आव्हान : प्र. रा. बावस्कर
p r bavaskar - maha bank
प्र. रा. बावस्कर
क्षेत्रीय महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र.

कृषी उत्पादन, खत उत्पादन, बी-बियाणे आणि टेक्स्टाईल उद्योगांत सोलापूर अग्रेसर असून, या क्षेत्रांतील सोलापूरची प्रगती समाधानकारक आहे. हे उद्योग सोलापूरच्या औद्यागिक प्रगतीचा कणा आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही! असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक प्र.रा. बावस्कर यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.

सोलापूरमध्ये या उद्योगांबरोबरच काही मोजक्या मेकॅनिकल इंडस्ट्रीज आहेत, यात वाढ झाली पाहिजे. आयटी, बीपीओ हे उद्योग मेट्रो शहरातच आहेत. अद्याप सोलापूरसारख्या शहरात हे उद्योग यायला अवकाश आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सोलापूरकडे येण्याचा कल कमीच आहे. सोलापूरच्या औद्योगिक प्रगतीसाठी उद्योजकांना कमीत कमी सुविधा पुरवल्याशिवाय हे उद्योजक येथे येणार नाहीत. सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी मूलभूत सुविधा, विमानसेवा, रेल्वे, सहापदरी रस्ते होणे अत्यावश्यक आहे. कमीतकमी सोलापूर-हैदराबाद किंवा सोलापूर-बंगळुरू विमानसेवा व्हाया सोलापूर सुरू करावी.
सोलापूरचा औद्योगिक कणा या उद्योगांमुळे मजबूत असला तरीही बदलत्या काळाबरोबर सोलापूरच्या उद्योजक, शेतकरी व सोलापूरकरांनी आपली मानसिकता बदलणे नितांत गरजेचे आहे. आजच्या संगणकीय युगात या उद्योगांचे आधुनिकीकरण होणे महत्त्वाचे आहे. येथील उद्योजक व शेतकरी मंडळीही या उद्योगांत परंपरागत असल्यामुळे ते अतिशय तज्ज्ञ आहेत. त्यांना त्यांच्या उद्योगातील बारकाव्यांचा अभ्यास खूप चांगला आहे. बदलत्या काळाबरोबर पारंपरिक पद्धतीला आधुनिकीकरणाची जोड देत भांडवल आणि गुंतवणूक वाढवून आपला उद्योग किंवा शेती ही अधिक व्यापक केल्यास सोलापूरची प्रगती अधिक वेगाने होईल, असा विश्‍वास बावस्कर यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, पारंपरिक पद्धतीने शेती करीत असताना त्यात बदल करून नवे प्रयोग करणे आवश्यक आहे. आज सोलापुरातील अनेक प्रगतीशील शेतकर्‍यांनी असे प्रयोग केलेले आहेत आणि ते त्यात यशस्वी झालेले असून, त्यांना त्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे. द्राक्ष, डाळिंब आदी सोलापूरच्या पारंपरिक उत्पादनांबरोबरच कलिंगड, फुलशेती, भाजीपाला उत्पादन घेणे जास्त फायदेशीर असल्याचे दिसून येते. याशिवाय मनुका, बेदाणे उत्पादन देखील फायदेशीर आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र शेतीकर्ज व पीक कर्जांना विशेष प्राधान्य देत असल्याचे बावस्कर यांनी सांगून, शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने सोलापूर विभागातील ५२ शाखांमधून शेतीच्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेलेेेेेेे १४ फील्ड ऑफिसर नेमलेले असून, ते शेतकर्‍यांना याबाबत मार्गदर्शन करीत असतात.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा बँकेला आणि ग्राहकांना खूप फायदा झाला आहे. सोलापुरात जवळ जवळ १ हजार लोक इंटरनेट बँकिंगचा वापर करू लागले आहेत. ई-ट्रँझॅक्शनचे खूप फायदे असून, याचा वापर आणखी मोठ्या प्रमाणात वाढणे गरजेचे असल्याचे मत बावस्कर यांनी व्यक्त केले. आयकर ई-रिर्टन, इतर कर भरण्यासाठी अजूनही सोलापुरात मोठ्या प्रमाणात ई-ट्रँझॅक्शनचा वापर होताना, करताना दिसत नाहीत. तुलनेत या प्रणालीचा वापर वाढणे आवश्यक आहे. सध्या बँकिंग क्षेत्रात खूप वेगाने बदल होत आहेत. येती दोन वर्षे खूप महत्त्वाची आणि मोठ्या बदलाची आहेत. आर्थिक योजनांचे नियोजन हे मोठे आव्हान असेल. युनिक आयडेंटिटी कोड सिस्टिम संकल्पना राबविण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने सहकार्य करार केला असून, हा महत्त्वाकंाक्षी प्रयोग आहे. अजूनही भारतातील ४८ टक्के लोकांपर्यंत बँका पोहोचलेल्या नाहीत. ग्रामीण भाग, वाड्या-वस्त्यांवर मोबाईल बँकिंग सुरू करून शेवटच्या माणसापर्यंत महाराष्ट्र बँकेच्या सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. येत्या दोन वर्षांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचा मानस बावस्कर यांनी व्यक्त केला.

दैनिक तरुण  भारत, रविवार, दि. १४ नोव्हेंबर २०१०

Posted by : | on : 16 May 2012
Filed under : Blog, उद्योग भरारी, उद्योग भरारी :अमर पुराणिक, औद्योगिक, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *