Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, व्यक्तीविशेष, सामाजिक, स्थंभलेखक » भारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’

भारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’

•अमर पुराणिक, सोलापूर•

सिद्धयोग संवर्धक प.पू. नारायणकाका महाराज ढेकणे यांचे महत्कार्य

भारताच्या अभ्युदयासाठी विज्ञानवादाबरोबरच योगशास्त्राला महत्व देणे अपरिहार्य आहे. भारतातील प्राचीन योगी, ऋषी मुनींनी योगशास्त्रात असाधारण संशोधन व प्रगती केलेली होती. साधकांनी या मार्गाचा अवलंब करून राष्ट्रसाधनरूप आणि अमोघ अशा योगविद्येच्या माध्यमातून भारताच्या आणि विश्‍वाच्याही अभ्युदयासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. संपूर्ण समाजाची सर्वांगीण प्रगती जेवढी साधता येईल तेवढी साधने आवश्यक आहे. अंत:शुद्धी हीच खरी राष्ट्रसंरक्षक व संवर्धक शक्ती आहे. राष्टोद्धारसाठी शिवशक्ती शिवाय पर्याय नाही, म्हणून शक्तीचे संवर्धन करणे महत्वाचे ठरते आणि राष्ट्रधुरीणांचे हे आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक साधकाने अगदी तळापासून म्हणजे आपण आपले शेजारी, मित्र व गावात सिध्दयोग शक्तीपाताचा प्रचार व साधना वाढविणे आवश्यक आहे. हा प्रयत्न आपल्या सोलापूरात चांगल्या प्रकारे सुरू आहे. शरदशास्त्री जोशी(बार्शी), डॉ. रा.ल. जोशी, राजाभाऊ कुलकर्णी, प्रा. मनोहर कुबडे या ज्येष्ठ साधकांबरोबरच ऍड. योगेश कुलकर्णी, सुधीर देशपांडे, मोहन लगदिवे, संतोष गहेरवार आदी अनेक तरुण साधक या कार्यासाठी चांगले प्रयत्न करीत आहेत. श्री शिवयोगी सिद्धेश्‍वरांच्या या पावन नगरीतील सोलापूरकर बांधवानी प.पू. नारायणकाका ढेकणे महाराजांच्या सिद्धयोग साधनेत मोठ्या संख्येने सहभागी होणे आवश्यक आहे. या हिंदुस्थानात योगशास्त्र संपन्न असे अनेक ऋषी मुनी व संत होऊन गेले, आपल्या महाराष्ट्रातील संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्‍वर, सोपानानंतर गजानन महाराज, अक्कलकोट स्वामी समर्थ, स्वामी शिवानंद (वरुड) आणि अनेक किती संताची नावे घ्यावीत?श्रीपाद श्रीवल्लभ गुरुदेव दत्त यांच्या संप्रदायात सिद्धयोगाचे विशेष महत्व आहे. आज आपल्या देशात या सिद्धयोगाचे संवर्धक, प्रचारक व ऋषीतुल्य असे व्यक्तीमत्व आपल्याला प.पू.सिद्धयोगतपस्वी नारायणकाका ढेकणे महाराजांच्या स्वरूपात लाभले आहे. सिद्धयोगात सद्गुरुंच्या संकल्पाच्या प्रभावाने साधकाची मनोवृत्ती अंतर्मुख होऊन आपल्या मणक्याच्या इडा व पिंगला या डाव्या व उजव्या नाडीतून विद्युतशक्ती वाहु लागते आणि या विद्यूतशक्तीच्या प्रभावने मुलाधारात सुप्त असलेली भगवती कुंडलिनी देवी जागृत होते आणि ती उर्ध्वरेत होऊन मणक्यामधील सुषुम्ना नाडीतुन सहस्त्रसाराकडे वाहु लागते. सर्वसामान्य संसारी माणसाला ही कुंडलिनी योगशास्त्राभ्यासाशिवाय जागृत करणे अशक्य आहे, पण सिद्धयोग हा सर्वसामान्यासाठी कामधेनूसारखा आहे. सिद्धयोगात आपल्याला काहीही करावे लागत नाही, सर्वकाही सद्‌गुरुच करवून घेतात. आपल्या सदगुरुंच्या संकल्पानेच साधकात शक्तीचा प्रवेश साधण्यात येतो. गुरुकृपाशक्तीने साधकाला दिव्य अनुभुती येते. या योगविद्येचे मुळ संवर्धक नाथ संप्रदाय असुन, ही योगविद्या मछिंद्रनाथांनी सर्वांना शिकविली. योगविद्येत मानवाच्या व त्याच्या आत्म्याच्या कल्याणाचा विचार आहे. योग म्हणजे जिवात्मा व परमात्मा यांचा संयोग आहे.प.पू. नारायण काकामहाराज ढेकणे यांना शक्तीपाताची अर्थात सिद्धयोगाची समृद्ध गुरुपरंपरा लाभली आहे. या परंपरेत प.पू. गंगाधरतीर्थ स्वामी महाराज( जगन्नाथपूरी, ओरिसा), यांच्यानंतर श्री नारायणतीर्थ देव महाराज( मदारीपूर, पू.बंगाल), यांच्यानंतर प.पू. श्री. पुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराज( वाराणसी) तत्पश्‍चात, ज्यांनी महायोगपीठाची परंपरा बंगालमधून महाराष्ट्रात आणली, असे योगर्षी प.पू. लोकनाथतीर्थ स्वामी महाराज(ढाक्का) हे होत. लोकनाथतीर्थ स्वामीजींनी महाराष्ट्रातील प.पू. गुळवणी महाराजांना अनुग्रह दिला. गुळवणी महाराजांनी ब्रम्हर्षी दत्तमहाराज कवीश्‍वर यांना दीक्षा दिली आणि दत्तमहाराजांनी योगतपस्वी प.पू. नारायणकाका ढेकणे महाराजांना सिद्धयोगाचे उत्तराधिकारी नेमले. ही पंरपरा नारायणकाकांनी प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर संपूर्ण भारतभर फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही सिद्धयोगाचा प्रसार केला. या सिद्ध योगात समाजातील सर्व जाती, स्थर, लिंग, धर्म, वय यांना मुक्त प्रवेश आहे. शक्तीपात दीक्षा ही विज्ञानयुक्त अध्यात्माचा साधनमार्ग आहे. ही दीक्षा सद्गुरुंच्या कृपादृष्टीने, स्पर्शाने, मंत्राने होते. स्वामी विवेकानंदांना त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी स्पर्श दीक्षा दिली होती. फक्त गुरुच्या स्पर्शानेच स्वामी विवेकानंदांना योगसाक्षात्कार झाला होता. मोक्षमार्गाला पोहोचण्याचे बरेच प्रकार आहेत. हठयोग अतिशय अवघड असून, भक्ती मार्गात नामस्मरण सोपे असले तरी मन विकारहीन निर्मळ करणे, तसे अवघडच आहे. रामकृष्ण परमहंसासारखे श्रेष्ठ व अधिकारी गुरु भेटणेही अवघडच आहे, पण आपल्याला प.पू. सद्गुरु नारायणकाका ढेकणे महाराजांच्या रुपाने सिद्धयोग अर्थात कुंडलीनी जागरण सहज साध्य झालेले आहे. नारायणकाकांच्या साधक शिष्यांनी सिद्धयोगाचा रोकडा अनुभव घेतला आहे. सिद्धयोगाची गंगा संपूर्ण भारतात नारायण काकांच्या दिव्य स्वरूपात वाहतेय. प.पू. नारायणकाकांचा ज्याला अनुग्रह किंवा दिव्य सत्संग घडेल ती व्यक्ती पुण्यवान म्हणावी लागेल.
दै. तरुण भारत, सोलापूर. २९ सप्टेंबर २००९

Posted by : | on : 8 January 2011
Filed under : Blog, चौफेर : अमर पुराणिक, व्यक्तीविशेष, सामाजिक, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *