Home » Blog » भावना योग्य, मार्ग अयोग्य!

भावना योग्य, मार्ग अयोग्य!

    टीम अण्णामधील एक सदस्य आणि प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांना भर कोर्टाच्या आवारात काही लोकांनी मारहाण केली. भारतीय समाजमन हिंसेचा सतत विरोध करत असल्यानं, एका वकिलाला भर कोर्टात मारहाण करणं, हे कुणालाही निषेधार्हच वाटेल. त्यात पुन्हा प्रशांत भूषण हे टीम अण्णाचे सदस्य असल्याने अण्णांच्या आंदोलनाबाबत लक्षावधी सर्वसामान्यांना सहानुभूती असल्याने, या बातमीने त्यांच्या मनात तीव्र नापसंतीची एक भावना चमकून जाणे स्वाभाविक आहे. मात्र, ही मारहाण का झाली? या प्रश्‍नाचे उत्तर जेव्हा शोधू लागतो, तेव्हा मारहाण करणार्‍यांचा मार्ग आणि जागा चुकली असली, तरी त्यांची भावना मात्र योग्य होती, असेच म्हणावे लागेल. प्रशांत भूषण महाशयांनी गेल्या महिन्यात एक विधान केले. त्या विधानानुसार त्यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये सार्वमत घ्यावे आणि बहुसंख्य लोकांचे मत जर पाकिस्तानात जाण्याचे असेल, तर काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकावा. हे विधान ऐकल्यावर कुणाही देशभक्त व्यक्तीच्या तळपायाची आग मस्तकाला जाणे अगदी स्वाभाविक आहे. मुळात प्रशांत भूषण यांना काश्मीर हे काही खाजगी संस्थान वाटले की काय? या विषयात त्यांचा सल्ला कुणी विचारला आहे? एखाद्या क्षेत्रात थोडी मान्यता मिळाली की, आपल्या देशातील तथाकथित बुद्धिवाद्यांना लगेच काश्मीरबाबत आपले पांडित्य पाजळावे, अशी तीव्र उबळ का येते तेच समजत नाही. भारतातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे जे फाजील लाड आपण नेहमी करतो त्याचा कदाचित हा परिणाम असावा. प्रशांत भूषण महाशयांना काश्मीरवर अशा पद्धतीने बरळण्याची काहीच गरज नव्हती. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या विषयात तुम्हाला मान्यता मिळाली. कारण भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात असलेली चीड, भावना अण्णांच्या शब्दातून, कृतीतून व्यक्त होत होती. अण्णा निष्कलंक चारित्र्याचे आणि निरपेक्ष भावनेने समाजकार्य करणारे व्यक्तिमत्त्व असल्याने, त्यांच्या शब्दाला मंत्राचे सामर्थ्य आले आहे. अण्णांच्या मोठ्या सावलीत बसलेल्या केजरीवाल, प्रशांत भूषण, बेदी अशा लोकांनाही त्यामुळे महत्त्व प्राप्त झाले. पालखीची मिरवणूक निघाल्यावर लक्षावधी लोक पालखीचे दर्शन घेतात. पालखीचा दांडा खांद्यावर घेऊन भक्तिभावाने पुढे जातात. पालखीत ठेवलेल्या पादुका, ज्ञानेश्‍वरीसारखा पवित्र ग्रंथ, संतांच्या-देवतांच्या प्रतिमा यांची ती मिरवणूक असते. त्यांचे दर्शन लोक घेत असतात. पण, पालखीच्या कमानीने किंवा पालखीच्या दांड्याने, लोक आपलेच दर्शन घेत असल्याचा भास करून घ्यायचा नसतो. प्रशांत भूषण या व्यक्तीला अण्णांच्या आंदोलनाशिवाय वकील म्हणूनही थोडी मान्यता आहे. शांती भूषण यांचा मुलगा म्हणूनही थोडी मान्यता आहे. या मान्यतेचे धिंडवडे अर्थातच अमरसिंह यांच्या त्या संभाषणाच्या सीडीने काढले आहेतच. हे सगळे असले, तरी प्रशांत भूषण यांनी काश्मीरबाबत बोलताना भ्रष्टाचार निर्मूलनाच्या चळवळीत भाग घेणार्‍या कोट्यवधी भारतीयांच्या मनात काश्मीरबाबत काय भावना आहेत, याचा थोडा विचार करायला हवा होता. ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ असे करण्याआधी जरा सार्वमत घेण्याचा विषय आणि काश्मीरचा प्रश्‍न यांचे नाते काय होते? याबाबतचा इतिहास काय सांगतो? याचा केस लॉ काय आहे? याचा थोडा विचार करायला हवा होता. काश्मीरमधील लक्षावधी पंडितांना तेथून हुसकावून लावून आता उरलेल्या देशद्रोही मानसिकतेतील राक्षसी लोकांचे सार्वमत घेण्याला काही अर्थ आहे काय? याचा विचारही भूषण यांनी करायला हवा होता. बरे, याचा विवेक करायला प्रशांत भूषण यांच्याइतका विद्वानही लागत नाही. त्यासाठी सर्वसामान्य बुद्धीचा माणूसही विवेकाच्या आधारे मत व्यक्त करू शकतो. काश्मीरच्या प्रश्‍नात सार्वमत घेऊन निर्णय करता येणार नाही, असे भारताने यापूर्वीच तर्काच्या, वास्तवाच्या आधारे ठणकावून सांगितलेले आहे. जगाने ते मान्य केलेले आहे. आता भारताच्या दृष्टीने अडचणीचा ठरणारा सार्वमताचा मुद्दा, या विषयाशी काडीचाही संबंध नसलेल्या व्यक्तीने उकरून काढून त्यावर आपले फाजील पांडित्य पाजळणे चूकच! ज्या काश्मीरशी संपूर्ण भारतवर्षाची भावनिक नाळ प्राचीन काळापासून- कल्हणच्या रंगरंगिणीपासून ते आज अमरनाथच्या शिवलिंगापर्यंत अनेक कारणाने जोडले गेले आहे ते काश्मीर, ज्या काश्मीरसाठी कन्याकुमारीपासून हिमाचलप्रदेशापर्यंत हजारो निधड्या छातीच्या तरुणांनी सीमेवर बलिदान दिले आहे, ज्या काश्मीरच्या विकासाकरिता देशाच्या कानाकोपर्‍यातून जमा झालेल्या महसुलातील मोठा भाग दरवर्षी खर्च केला जातो, ज्या काश्मीरसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी काय किंवा पं. लालबहादूर शास्त्री काय अशा महापुरुषांनी आपले सर्वस्व समर्पित करत बलिदान दिले, ते काश्मीर मूठभर लोकांच्या मताने भारतापासून तोडण्याचा विचारही कुणाला रुचणारा नाही. या हिंदुस्थानातील काही विचारवंतांना देशद्रोहाची फॅशन करण्याचा घाणेरडा रोग जडलेला आहे. या देशाच्या हिताच्या विरोधात बोलले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मान्यता आणि योग्यता आहे त्यापेक्षा वाढते, अशी यांची समजूत आहे. मग त्यासाठी हे लोक सर्रास भारतमातेशी बेईमानी करत बरळू लागतात. अमर्त्य सेन यांना नोबेल मिळाले आणि त्यांनी काश्मीरबाबत असेच उलटे विधान केले होते. अरुंधती रॉय काश्मीरबाबत तर देशात धडधडीतपणे- ‘अब आजादीही रास्ता’ अशा विषयावर उघडपणे भाषणे देत हिंडत होत्या. अशा लोकांना खरोखरच तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ‘मोजूनी माराव्या पैजारा’ अशा पद्धतीनेच वठणीवर आणले पाहिजे, असा भाव कुणाही देशभक्त माणसाच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. मात्र, आपल्या देशात जसे अभिव्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व आहे तसे लोकशाही मूल्यांना आणि लोकशाही मार्गालाही महत्त्व आहे. प्रशांत भूषण यांनी काश्मीरबाबत जे मत व्यक्त केले आहे त्याचा सर्व बाजूंनी तीव्र निषेध केला पाहिजे. मात्र, निषेध व्यक्त करताना आपणच तयार केलेल्या लोकशाही मूल्यांच्या लक्ष्मणरेषा ओलांडता कामा नये. कारण, त्या ओलांडून प्रशांत भूषण यांना जी मारहाण झाली त्या घटनेनंतर काश्मीरबाबत अनावश्यक आणि देशद्रोही बडबड करण्याच्या, प्रशांत भूषण यांच्या गुन्ह्याची तीव्रता कमी होऊन हल्ल्याचाच निषेध करण्याकडे लोकांची गर्दी लगेच सुरू होते. काश्मीरबाबत कुणी अशा प्रकारचे विधान करू लागला, तर सरकारने त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. लोकांनी त्या व्यक्तीला वाळीत टाकून, त्याचा मूक निषेध करून, सत्याग्रह करून, गांधीगिरी करून लोकशाही मार्गाने निषेधाची न संपणारी मालिका तयार करून या लोकांना ‘सळो की पळो’ करून सोडले पाहिजे. अशा प्रकारे अनाठायी पांडित्य पाजळले, तर आपल्याला मान्यता तर मिळत नाहीच, पण असलेली मान्यताही निघून जाते आणि जळी स्थळी सर्वत्र आपण निर्भर्त्सनेचा विषय ठरतो, असे या लोकांच्या अनुभवाला आले पाहिजे. पुन्हा कोणत्याही मंचावर या लोकांना स्वीकारता कामा नये. अशी कायमची अद्दल एकदोघांना जरी घडली, तरी पुन्हा या देशद्रोही मार्गाला जाऊन डोक्याला मान्यतेची चार शिंगे लावण्याची कुणाचीही इच्छा होणार नाही! प्रशांत भूषण यांच्यावरील हल्ला करणारे श्रीरामसेनेचे कार्यकर्ते होते किंवा ते भगतसिंग क्रांती दलाचे कार्यकर्ते होते, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. ते कोणत्या संघटनेचे आहेत, हे कसून चौकशी करून पुढे आले पाहिजे. कुणाला बदनाम करण्यासाठी कुणीही कुणाचे नाव घेऊन सवंग डावपेच खेळू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रशांत भूषण यांच्यावर या लोकांनी खरोखरच हल्ला केला काय, हाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे. कारण, या कार्यकर्त्यांनी, प्रशांत भूषण यांना फक्त जाब विचारण्यासाठी गेलो असता काही जणांनी या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याने त्यांनी फक्त स्वसंरक्षणार्थ प्रतिकार केला, असे त्यांचे म्हणणे आहे. या विषयाचीही कसून चौकशी करून सत्य सर्वांसमोर मांडले गेले पाहिजे. अण्णा हजारे यांनीही आपल्या टीममधील सभासदांना भ्रष्टाचार निर्मूलनात मिळालेल्या मान्यतेने काही शिंगे फुटली नाहीत, याची जाणीव करून दिली पाहिजे. कोणत्याही विषयात देशाचे नुकसान होईल अशा पद्धतीने तर्कविसंगत विधाने करण्याचा अधिकार त्यांना कुणीही दिलेला नाही, हे जरा त्यांना सांगावे लागेल. देशाच्या हिताच्या आड येणार असेल तर कुणी कितीही मोठा असला, तरी त्यांचा मोठेपणा काही कामाचा नाही, हे सत्य जरा ठणकावून सांगण्याची गरज आहे, एवढे खरे!
स्रोत: तरुण भारत : 10/13/2011
Posted by : | on : 16 Oct 2011
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *