Home » Blog » मायावती पडल्या, मुलायम जिंकले: धुव्वा उडाला सोनिया-राहुलचा

मायावती पडल्या, मुलायम जिंकले: धुव्वा उडाला सोनिया-राहुलचा

भाऊ तोरसेकर
गेल्या मंगळवार बुधवारी एक चमत्कार घडला. देशातील पाच राज्य विधानसभांचे निकाल लागले होते आणि त्यावर सगळीकडे उहापोह चालू असताना सोनिया गांधी व राहूल गांधी यांनी पत्रकारांसमोर येऊन पराभव स्विकारत असल्याचे जाहिरपणे सांगितले. असे गेल्या बारा तेरा वर्षात कधी झाले नव्हते. म्हणुनच त्याला मी चमत्कार म्हणतो. १९९८ सालात कॉग्रेसचे तात्कालिन निवडून आलेले अध्यक्ष सीताराम केसरी यांना अक्षरश: ढुंगणावर लाथ मारून हाकलल्यावर सोनिया गांधी कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या होत्या. जगाच्या पाठीवर कदाचित याप्रकारे हा एकमेव पक्षाध्यक्ष निवडला गेलेला असावा. पण तेव्हापासून आजवर त्याच अध्यक्षपदी विराजमान आहेत आणि कुठलाही पक्षाध्यक्ष इतका काळ त्या पदावर राहिला नसल्याने तो एक विक्रम मानला जातो. पण तोच त्यांचा एकमेव विक्रम नाही. दुसरा एक जागतिक विक्रम त्यांच्याच खात्यात जमा आहे. पण त्याबद्दल कोणी सहसा बोलत नाही. तो विक्रम आहे पत्रकारांपासून तोंड लपवण्याचा. चौदा वर्षात सोनियांनी कितीदा पत्रकार परिषद घेतली व पत्रकारांच्या सरबत्तीला उत्तरे दिली? जवळपास नाहीच. हा सुद्धा विक्रम म्हटला पाहिजे. कारण पत्रकारांच्या प्रश्नाला घाबरून तोंड लपवणारा दुसरा अध्यक्ष आजवर कॉग्रेसपक्षाला कधी मिळाला नव्हता. अशा सोनिया घांधी बुधवारी अचानक पत्रकारांच्या घोळक्यात शिरल्या व त्यांनी दोनचार प्रश्नांना उत्तरे दिली. हा म्हणूनच चमत्कार मानावा लागतो.

   वास्तविक त्याची काहीही गरज नव्हती. कारण कुठल्याही महत्वाच्या राज्यात कॉग्रेस जिंकली नव्हती, की पराभूत होऊन तिने सत्ता गमावली नव्हती. त्यामुळे सोनिया, राहुल यांनी असे पत्रकारांसमोर येऊन पराभव मान्य करण्याचे काही कारण नव्हते. गोवा या इवल्याशा राज्यात त्यांची सत्ता संपुष्टात आली. बाकी काही महत्वाचे घडले नव्हते. उत्तराखंडात त्यांना बहुमत मिळवता आले नव्हते आणि पंजाबात तर अकाली दलात फ़ुट पडूनही बादल यांनी पुन्हा बहुमत मिळवले आहे. राहिला उत्तरप्रदेश. तिथे कॉग्रेस गेल्या दोन दशकांपासून आपली पाळेमुळे शोधते आहे. चारशेच्या विधानसभेत त्यांचे अवघे २२ आमदार होते. त्यामुळे तिथे त्यांचा पराभव झाला असे म्हणता येणार नाही. मग आजवरची (प्रवक्त्याच्या मागे दडी मारण्याची) प्रथा मोडून या मायलेकरांनी पत्रकारांसमोर का यावे? जो पराभव झालेलाच नाही, त्याचा स्विकार कशाला करावा? आहे ना चमत्कारिक गोष्ट?  

   त्या दिवशी निकाल लागत असतानाही मी विविध वाहिन्यावरील चर्चा ऐकत होतो. तिथेही उत्तरप्रदेशच्या निकालात राहुल व कॉग्रेस पक्षाच्या यशापयशाला अकारण प्राधान्य दिले जात होते. विसर्जित विधानसभेत ज्यांची ताकद नगण्य होती, त्यांच्यावर इतका उहापोह कशाला; तेच मला समजत नव्हते. खरे तर मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचा पराभव होताना दिसत होता. मग त्याबद्दल चर्चा विश्लेषण व्हायला नको काय? त्याऐवजी कॉग्रेस व राहुल यांच्या अपयशाची चर्चा कशाला हवी होती? कारण तिथेच दडले आहे. सामान्य माणूस व मतदाराला त्याची गरज वाटत नव्हती, पण वाहिन्या त्याचीच चर्चा करत होत्या. कारण गेल्या वर्षभरापासून माध्यमांनीच उत्तरप्रदेशात राहुल पुन्हा कॉग्रेसचे पुनरुज्जीवन करतो आहे, असा प्रचार चालविला होता. तो प्रचार तोंडघशी पडल्याने माध्यमे व वाहिन्यांना; त्या न झालेल्या पराभवाची चर्चा करावी लागत होती. मायावती यांची सत्ता जाऊन मुलायम यांचे बहूमत येत असेल, तर राहुल वा कॉग्रेसच्या पराभवाचा प्रश्नच कुठे येतो? ना त्यांची दखल उत्तरप्रदेशाच्या मतदाराने दखल घेतली होती, ना त्याबद्दल तिथल्या नागरिकांना सोयरसुतक होते. कारण सोनिया, राहुल प्रियंका व कॉग्रेस यांचा जनतेशी काहीही संबंध नव्हता व नाही. मग जनतेने त्यांच्या यशापयशाची फ़िकीर करावीच कशाला? पण तसे माध्यमांचे नव्हते. पंधरा वर्षात जे थोतांड माध्यमांनी उभे केले होते; त्याचा मंगळवारी कपाळमोक्ष झाला. त्याकडे लोकांचे अजिबात लक्ष नव्हते. पण माध्यमात बसलेल्यांना मनातली अपराधी भावना शांत बसू देत नव्हती. त्यामुळेच ह्या नसत्या चर्चेला उधाण आले होते. काय होये ते थोतांड?

   १९९८ साली केसरी यांना हाकलून सोनिया कॉग्रेस अध्यक्षा झाल्या, तेव्हापासून माध्यमांनी एक थोतांड नागरिकांच्या डोक्यात घालण्याचा उद्योग सुरू केला होता. सोनिया आल्या आणि कॉग्रेसला कशी संजीवनी मिळाली, त्याच्या रसभरीत कहाण्या आपण गेल्या बारा चौदा वर्षात माध्यमांकडून ऐकल्या आहेत. त्यात किती तथ्य होते? त्यांनी पुढाकार घेऊन जयललितांच्या मदतीने १९९८ अखेर भाजपाचे सरकार अवघ्या एका मताने पाडले. मग झालेल्या निवडणूका सोनियांच्या नेतृत्वाखालच्या पहिल्याच होत्या. त्यात कॉग्रेसने आजवरच्या इतिहासातील सर्वात खालची पातळी गाठली. नरसिंहराव व केसरी पक्षाध्यक्ष असताना कॉग्रेस निदान १४० जागा जिंकू शकली होती. १९९९ सालात सोनिया अध्यक्ष झाल्यावर लोकसभेत तिची संख्या ११२ पर्यंत घसरली होती. त्यानंतर पंचमढी येथे झालेल्या अधिवेशनात पक्ष संघटना नव्याने उभारण्याचा निर्धार सोनियांनी व्यक्त केला. त्याला आता  बारा वर्षे होऊन गेली आहेत. त्यानंतर त्या आज म्हणतात, उत्तरप्रदेशात ’पक्ष संगठन कमजोर था’. मग मागल्या बारा वर्षात त्यांनी काय केले? तर भाजपा विरोधी आघाडी बनवून कॉग्रेसवाल्यांची सत्तालोलुपता पुर्ण करण्याचे काम करून दाखवले. बाकी पक्षाचे काम व संघटना वगैरे काहीही नाही.

   पुढल्या म्हणजे २००३ च्या निवड्णूकात राजस्थान, मध्यप्रदेश ही दोन राज्ये कॉग्रेसने गमावली. त्यापैकी मध्यप्रदेश त्यांना २००८ सालातही जिंकता आले नाही. २००४ च्या लोकसभा निवडणूकीत इतर भाजपा विरोधी पक्षांशी युती आघाडी करुन संसदेत १४६ खासदार निवडून आणले. म्हणजेच राव व केसरी यांच्यापेक्षा फ़क्त चार जागा अधिक. पण भाजपाच्या जागा घटल्या होत्या आणि कॉग्रेस मित्रपक्षांची संख्या वाढली होती. मग अशा लहानसहान पक्षाची मोळी बांधून युपीए सरकार बनवण्याची चलाखी सोनियांनी करुन दाखवली. पुढे २००९ सालात भाजपा समर्थपणे लढला नाही आणि कॉग्रेस २०५ खासदारांपर्यंत मजल मारु शकली. या संपुर्ण वाटचालीत कॉग्रेस पक्षाची नवी उभारणी करणे बाजूला राहिले. भाजपा व हिंदुत्व विरोधी भावनांचा धुर्तपणे वापर करीत सोनिया राजकारण खेळत राहिल्या. त्यांनी पक्ष संघटना बांधण्यापेक्षा माध्यमांचे संघट्न फ़ार चांगल्या प्रकारे उभे केले. त्यामुळेच जनतेमध्ये कसलाही प्रभाव नसताना, त्यांच्या प्रभावाचा आभास माध्यमातुन उभा करण्यात आलेला होता.

   २००४ सालात त्यांनी घराण्याचा वारस म्हणून आपला पुत्र राहूल याला अमेठीतून निवडुन आणले आणि मग माध्यमातून राहुलच्या कर्तृत्वाचे ढोल वाजू लागले. त्याने मंत्रिपद घेण्यापेक्षा पक्ष बांधणीचे नाटक सुरू केले. देशाच्य कुठल्याही गावात शहरात जायचा आणि माध्यमांच्या समोर देखावे निर्माण करण्याचा सपाटा लावला. कधी कुणा दलिताच्या झोपडीत मुक्काम करायचा, कधी आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या घरात जायचे. या सगळ्या गोष्टी मनोरंजक असतात. शाहरुख व आमीर खान यापेक्षा छान अभिनय करतात. पण आपल्या अभिनयाने प्रेक्षक भारावले तरी त्या कलाकारांचे पाय जमिनीवर असतात. देखाव्यातल्या, कथेतल्या पराक्रमावर ते कधीच विश्वासून जगत नाहीत. प्रेक्षकही त्याकडे मनोरंजन म्हणूनच बघत असतात, पण जे भान अभिनेते ठेवतात ते राहूल वा सोनियांना ठेवता आले नाही. भाडोत्री माध्यमांनी निर्माण केलेल्या देखाव्याला जनता फ़सली नाही, पण हेच फ़सले. तेच नव्हे तर या देखाव्याचे निर्माते माध्यमेही फ़सली. जे थोतांड त्यांनी उभे केले, त्यावर त्यांनीच विश्वास ठेवला. त्यातून मग वास्तव आणि आभास यातला फ़रक त्यांना समजेनासा झाला. त्याचेच परिणाम आता समोर आले आहेत.

   थेट प्रक्षेपणातुन घराघरापर्यंत पोहोचता येत असते. पण त्यात जे बोलले जाते, सांगितले जाते, ती आश्वासने घरोघर पोहोचली तरच लोकांचा त्यावर विश्वास बसणार ना? मतदार हा सामान्य माणूस असतो. त्याचा नेहमीच्या वास्तवाशी संबंध असतो. योजना, नियोजन, अर्थसंकल्प असल्या शब्दांशी त्याला  कर्तव्य नसते. घराबाहेर पडले, मग दुकानात बाजारात वस्तुची किंमत मोजावी लागते, त्यावर त्याचा जास्त विश्वास असतो. त्याच आधारावर त्याला आयुष्याचे निर्णय घ्यावे लागत असतात. तिथेच माध्यमांची अतिशयोक्ती त्याला कळु लागत असते. सोनिया किंवा राहुल देशातला भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या गप्पा मारताना पाहून माध्यमातले पत्रकार हुरळून गेले, तरी सामान्य माणसाचे तसे नसते. त्याला सत्य बघायला चष्मा लागत नाही. ज्यांचे सरकार कलमाडी किंवा ए. राजा यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत होते, ते कुठला भ्रष्टाचार संपवणार; असा साधा सवाल लोकांना पडत असतो. मायावतीचा भ्रष्टाचार बोलणार्‍या राहुलला राजा कलमाडीचा भ्रष्टाचार का दिसत नाही का, असा साधा प्रश्न पत्रकार माध्यमांना सुचत नसला, तरी जनतेला पडतो. आणि त्याचे उत्तर राहुल देत नसेल, तर त्याच्या सगळ्या गोष्टी लोकांना थापा वाटतात. ते सामान्य लोक रस्त्यावर येऊन कोणाचा कान वा कॉलर पकडत नसतात, ते मतदानाचा दिवस उजाडण्याची वाट बघत असतात. फ़ेब्रुवारी मार्च महिन्याच्या निवडणुकीत तेच झाले. चार वर्षापासून माध्यमात जे सोनिया-राहुल पुराण चालू होते, त्याचे पितळ लोकांनी उघडे पाडले. ज्यांना भुलवण्यासाठी हे नाटक चाल्ले होते, ते भुलले नाहीत. पण त्यात अभिनय करणारे मात्र त्यातच रममाण होऊन वास्तव विसरून गेले.

   साधी गोष्ट घ्या. मुलायमसिंग यांचा पुत्र अखिलेश दिड वर्षापासून संपुर्ण उत्तरप्रदेशात दौरे करतो आहे. पक्ष संघटना बांधून त्याने मायावतींशी लढायची जय्यत तयारी चालविली होती. मात्र त्याची साधी दखल कुठल्या वाहिनी वृत्तपत्राने घेतली नाही. तो रथयात्रा, खेड्यापाड्याचे दौरे करुन आपल्या कार्यकर्त्यांना धीर व हिंमत देत होता. उलट त्याच कालखंडात राहुल दिल्लीहून धावती भेट उत्तरप्रदेशला देऊन, माध्यमातुन तमाशा करत होता. सनसनाटी माजवण्यापलिकडे राहूलने नेमके काय केले? त्याच्या पक्षाचे राज्यातील नेते जनसमर्थन मिळवायला कोणते कष्ट घेत होते? काय काम करीत होते? लाडक्या राजपुत्राच्या अवतीभवती घोळका करणे, यापेक्षा कॉग्रेस कार्यकर्त्याला काही काम असते काय? सोनिया, प्रियंका, राहुल यांचे गुणगान करणे दिसतील तिथे त्यांच्या आरत्या ओवाळणे, यापेक्षा आज कॉग्रेस पक्षात काही पक्षकार्य उरले आहे काय? अशा आरत्या ओवाळून सत्तापदे मिळवायची. मग त्यांचा लाभ उठ्वून तुंबडी भरायची, जनतेची लूट करायची. मात्र जेव्हा राजघराण्याची मंडळी येतील, तेव्हा त्यांच्या स्वागताला हजर व्हायचे. यालाच कॉग्रेसचे कार्य म्हणतात ना?

   मुंबईत राहुल गांधी युवकांना भेटायला आलेले होते, तेव्हा राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण कामधंदा सोडून त्यांच्या आगमनाची प्रतिक्षा करत घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात तीन तास ताटकळत थांबले होते ना? आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याच्या कुटुंबियांना भेटायला त्यांना कधी सवड मि्ळाली होती काय? त्यांचा बहुमोल वेळ राहुल, सोनिया, प्रियंका यांची प्रतिक्षा करण्यात घालवण्याला पक्षकार्य म्हटले जात असल्यावर दुसरे काय व्हायचे? त्याच प्रसंगी बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी राहुल गेले व परत आले. तेव्हा त्यांची पादत्राणे त्यांच्याच पायात जावीत, म्हणून तेव्हाचे गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केलेले कार्य हा आजच्या कॉग्रेसजनांसाठीचा आदर्श आहे. जे इथे महाराष्ट्रात तेच मग सगळीकडे होत असणार ना? असेच संघटन उभे असेल तर त्याचे व्हायचे तेच परिणाम होणार ना? सोनिया जेव्हा म्हणतात, उत्तरप्रदेशात पक्षाची संघटना कमजोर होती, तेव्हा त्यांना कसली संघटना अपेक्षित आहे? लोकांमध्ये जाऊन काम करणार्‍या कार्यकर्त्यांची संघटना त्यांना हवी आहे काय? कशी संघट्ना करायची झाल्यास त्यांच्या स्वागताला कोण येणार? त्यांचे जोडे कोणी उचलायचे? संघटना बांधायची असती तर राहुल यांनी आपल्या प्रतिक्षेत तीन तास रिकामे बसलेल्या अशोक चव्हाणांची हजामत तिथल्या तिथे करायला हवी होती. जोडे उचलणार्‍या रमेश बागवे यांना सर्वांदेखत कानपिचक्या द्यायला हव्या होत्या. पण त्यातले काही झाले का? होईल का? पक्ष व संघटना बाजारबुणग्यांमधून उभी रहात नसते. पदाची, सत्तेची लालसा न धरणार्‍या, लोकांमध्ये जाऊन काम करताना नेत्यांकडे पाठ फ़िरवणार्‍या कार्यकर्त्यांमधून संघटना उभी रहाते आणि मतदार तिलाच बघून पक्षाला मते देत असतो. कॉग्रेसमध्ये असा कोणी ने्ता आज उरला आहे काय? तोंडपुजे व जोडेपुशे यांची गर्दी म्हणजे पक्षकार्यकर्ता अशी त्याची दुर्दशा दुसर्‍या कोणी केलेली नाही. ती आजच्या गांधी वारसांनीच केली आहे.

   त्यामुळे आज कॉग्रेस म्हणजे उर्मट, आशाळभूत, स्वार्थी, मतलबी, ढोंगी, लाचार, बाजारबुणग्या लोकांची टोळी बनली आहे. अशी टोळी काही काळ लोकांची दिशाभूल करू शकते, त्यांना धाकात ठेवू शकते, आपल्या मर्जीनुसार वागायला भाग पाडू शकते. पण ते फ़ारकाळ खपत नाही. कधी ना कधी त्याचा बुरखा फ़ाटतो. उत्तरप्रदेश निवडणूक निकालांनी तो फ़ाडला आहे. माध्यमातली प्रसिद्धी, निर्माण केलेले आभास, यावर आता आणखी काळ भारतीय जनता फ़सयला तयार नाही, इतकाच या निकालांनी गांधी घराणे व कॉग्रेसला दिलेला संदेश आहे. कारण नुसत्या उत्तरप्रदेशातच त्यांच्या अभिनयाचा बोजवारा उडालेला नाही. तर त्यांच्या पिढीजात रायबरेली व अमेठी लोकसभा मतदारसंघात सुद्धा कॉग्रेस उमेदवार पराभूत झाले आहेत. त्याचे पहिले कारण कॉग्रेस व गांधी घराण्याचा उद्धटपणा व अहंकार हेच आहे. ज्याप्रकारे राहूल या प्रचारात इतर पक्षांवर बेछूट आरोप करत होते, त्यांचे जाहिरनामे फ़ाडून फ़ेकण्याचा तमाशा करत होते, त्यावर मतदाराने दिलेली ही प्रतिक्रिया आहे. तेवढेच नाही. आघाडी म्हणुन सरकार चालवत असताना, कॉग्रेस पक्षाची लोकसभा व अन्यत्र चाललेली अरेरावीसुद्धा याला तेवढीच जबाबदार आहे. चिदंबरम, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, दिग्विजय सिंग अशा तोंडाळ माणसांनी लोकपाल आंदोलनात घेतलेला पवित्राही त्याला कारणीभूत आहे.

   अण्णा हजारे यांनी कॉग्रेसला पाडा अशी भुमिका आधीपासूनच मांडली होती. त्यांनी प्रत्यक्ष तसा प्रचार केला नसेल. पण अण्णांसारख्या माणसाला कॉग्रेसने जसे वागवले त्याचीही प्रतिक्रिया मतदानातून उमटली आहे. ज्या दिवशी हे निकाल लागत होते त्याच दिवशी इथे महाराष्ट्रात कॉग्रेसचे एक नेते कन्हैयालाल गिडवाणी यांना सीबीआयला लाच देण्याच्या आरोपाखाली अटक झाली. अशा आरोपीचा राष्ट्रीय नेता उत्तरप्रदेशातून भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या गप्पा मारतो, तेव्हा तो सामान्य जनतेला मुर्ख समजतो काय? राहुल व त्यांच्या आरत्या ओवाळणार्‍या माध्यमातले मुखंड, तेवढे मुर्ख असतील. पण जनता नसते. म्हणूनच तिने कधी बोलून दाखवले नाही, ती अण्णांच्या उपोषणात एमएमाआरडीएच्या मैदानावर आली नसेल. पण इथे मुंबईत असो, की तिकडे उत्तरप्रदेशात, कॉग्रेसला त्या जनतेने आपला हिसका दाखवला आहे. आणि यातले आपले पाप कळत असल्यानेच माध्यमे मायावती पराभूत होत असताना कॉग्रेस व राहुलच्या अपयशाची जोराजोरात चर्चा करत होती. म्हणूनच राहुल व सोनिया यांना बंदिस्त घराबाहेर पडून, नेहमीची प्रथा मोडून, पत्रकारांसमोर यावे लागले आहे. जो पराभव निवडणूकीत झालाच नाही, तो स्विकारण्यासाठी जगासमोर येणे भाग पडले आहे.

   २२ आमदारांच्या पक्षाने बहुमत मिळवले नाही तर तो त्याचा पराभव नव्हताच. उलट कॉग्रेसचे दोनचार आमदार वाढलेच आहेत. मग पराभबाची जबाबदारी घेतली तो कुठला पराभव होता? गोव्यासारखे छोटे राज्य गमावताना उत्तराखंडासारखे थोडे मोठे राज्य मिळवले, तर पराभव का स्विकारला जातो आहे? कोणी केला तो पराभव? जो आकड्यात दिसत नाही, कागदावर दिसत नाही, तो असा कुठला पराभव आहे? त्यात जिंकला कोण? मुलायमनी मायावतींना हरवले आहे. कॉग्रेसला नाही. मग सोनिया व राहुल कसल्या पराभवाची कबुली देत आहेत? तो निवडणुकीतला पराभव नाही. तो भ्रष्टाचार विरोधी लढाईत झालेला पराभव आहे. ते दोघे सामान्य जनतेची माफ़ी मागत आहेत. पण प्रत्यक्षात ते लोकपाल समर्थकांची माफ़ी मागत आहेत. त्या काळात, मागल्या दहा बारा महिन्यात जो उर्मटपणा, उद्धटपाणा सत्तेच्या मस्तीतुन दाखवला, त्याचेच प्रायश्चित्त जनतेने दिल्याची जाणीव या कबुलीमागे आहे. सोनिया व राहुल यांनी पत्रकारांसमोर एक गोष्ट कबुल केली. हा आमच्यासाठी धडा आहे. कुठला धडा आहे? ही काही त्यांची पहिली निवडणुक नाही. म्हणजेच हा निवडणुकीने दिलेला धडा नाही. तो जनतेने दिलेला धडा आहे. लोकपाल ही अण्णांनी केलेली मागणी असेल, पण प्रत्यक्षात ती जनतेची आकांक्षा होती. ती पायदळी तुडवल्याचे परिणाम भोगल्यावर, हे दोघे मायलेक पराभव स्विकारत आहेत. धडा त्यांनी मान्य केला असेल. पण त्यापासून काही शिकतील का? निदान गांधी कुटुंब वा कॉग्रेसचा तरी इतिहास त्याची साक्ष इतिहास देत नाही.

———-खासबात————
बालेकिल्लाच ढासळला

  निकालानंतर दोन दिवसांनी पत्रकारांसमोर आलेल्या सोनियांनी हा धडा असल्याचे सांगितले. पण हा नुसता धडा नाही. मतदाराने घरी येऊन दिलेला धडा म्हणजे घरात येऊन दिलेली शिकवणी आहे. कारण गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्यातच त्यांचा मतदाराने धुव्वा उडवला आहे. अमेठी व रायबरेली, हे राहुल व सोनियांचे लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यातल्या दहा विधानसभा मतदारसंघात दोनच कॉग्रेस उमेदवार जिंकू शकले. त्यातही रायबरेलीत सगळ्या पाच जागा गेल्या. या परिसरात कॉग्रेसचे चार खासदार लोकसभेत निवडून आले होते. त्यातल्या एकूण २० आमदार निवडून आले. त्यात कॉग्रेसचे फ़क्त तीनच आहेत. जिथे पराभव झाला त्या १७ जागांपैकी १३ जागी कॉग्रेस उमेदवार दुसर्‍या नव्हे तर तिसर्‍या चौथ्या क्रमांकावर होते. राहुल, सोनियांनी इथे प्रचारसभा घेतल्याच. पण गोड हसून बाजी मारणारी प्रियंका, तिथे शेवटचे पंधरा दिवस मुक्काम ठोकून होती. त्याचाही उपयोग झाला नाही. महत्वाचा तपशील म्हणजे मागल्या विधानसभा निवडणूकीत राहुल, प्रियंका राजकारणापासून दुर होते, तरी याच २० पैकी ७ जागा कॉग्रेसने जिंकल्या होत्या. राहुल-प्रियंकाचा करिष्मा यावेळी कॉग्रेसला त्यातल्या चार जागा गमावण्यास उपयोगी ठरला. कॉग्रेसला वाचवताना गांधी कुटुंबाची पुण्याई त्यांच्या बालेकिल्ल्याला सुद्धा गमावून बसली म्हणायची.
http://panchanaama.blogspot.in/

Posted by : | on : 9 Apr 2012
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *