Home » Blog » मोदींच्या नेतृत्वाचे दशक

मोदींच्या नेतृत्वाचे दशक

 गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या सलग कार्यकाळाला दहा वर्षे नुकतीच पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आपल्या प्रभावी नेतृत्वाने गुजरातला प्रगतीची एक नवी दिशा देत, सर्वधर्मसमभावाचे धोरण अंगीकारीत, आपल्या राज्याला त्यांनी विकासाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन विराजमान केल्याची ही पावती म्हणावी लागेल. शेती असो, शेतकरी असो, उद्योग असो, रस्ते असोत, पिण्याचे पाणी असो, सामाजिक सुधारणांच्या योजना असोत… मोदींचा गुजरात नेहमी क्रमांक एकवर राहिला आहे. सर्वांना समान न्याय या तत्त्वाचे त्यांनी खर्‍या अर्थाने पालन केले. त्यामुळेच आज गुजरातचा शेतकरी मोटारीतून फिरतो आणि नरेंद्रभाईंच्या राज्यात आम्हाला कोणतीही भीती वाटत नाही, असे अभिमानाने गुजरातमधील अल्पसंख्यक समाज उघडपणे सांगत आहे. मोदींच्या या कार्यप्रणालीची दखल अमेरिकेलाही घेणे भाग पडले आहे. या दहा वर्षांच्या कार्यकाळात गुजरातमध्ये मोदींनी विकास कामांचा असा काही झपाटा लावला की, सारे मोठे उद्योग अन्य राज्यांतून गुजरातमध्ये स्थानांतरित झाले, होत आहेत. आज गुजरात संपूर्ण जगभरात विकास आणि प्रगतीच्या शिखरावर पोहोचण्याचे संपूर्ण श्रेय नरेंद्रभाईंनाच जाते, असे उद्गार अनिल अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतीने काढणे, यातच सर्वकाही आले. सिंगूरमध्ये टाटांच्या नॅनो कारच्या प्रकल्पाचा वाद विकोपास जाऊन तेथील प्रकल्प बंद होण्याची वेळ आली, तेव्हा रतन टाटा यांना एक एसएमएस आला. ‘वेल कम’ एवढेच त्या संदेशात म्हटले होते. रतन टाटा यांना अडचणीतून सोडविण्याचे मोठे काम मोदींनी केले आणि गुजरातमध्ये नॅनो प्रकल्प आला. या प्रकल्पातूनच पहिली नॅनो बाहेर पडली हा इतिहास फारसा जुना नाही. गुजरातमध्ये कोणताही उद्योग असो, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि सुविधांसाठी मोदींनी एक खिडकी योजना सुरू केली. अन्य राज्यांमध्ये एखादा प्रकल्प टाकायचा म्हटले की, आधी नेत्यांचे खिसे गरम करावे लागतात. पण, गुजरातमध्ये स्थिती अगदी विपरीत आहे. ‘‘मैं पैसे लेता नही और किसीको लेने देता नही,’’ हे मोदींचे शब्द आज देशातील सर्व उद्योगपतींच्या ओठावर त्यासाठीच आहेत. कोणताही प्रकल्प असो, थेट मोदींसोबत चर्चा करण्यासाठी मंत्रालयाची दालने नेहमी खुली असतात. आपल्या महाराष्ट्रात तर एखादा आदेश काढायचा असेल, तर किमान दहा लोकांचे खिसे गरम करावे लागतात. त्यामुळेच महाराष्ट्रातीलही अनेक उद्योग गुजरातमध्ये गेले, ही वस्तुस्थिती आहे. उद्योगांच्या या मालिकेमुळेच आज गुजरातमधील लक्षावधी लोकांना रोजगार मिळाला आहे. बेकारीची समस्या संपूर्ण देशात भेडसावीत असताना उद्योगांच्या माध्यमातून मोदींनी बेरोजगारीचा मोठा प्रश्‍न सोडविला आहे. आपल्या कल्पक बुद्धीचा वापर करून मोदींनी अशा अनेक योजना राज्यात पूर्ण ताकदीने राबविल्या आणि त्याचा लाभ आज लक्षावधी गोरगरिबांना होत आहे. मधल्या काळात राज्यात काही अप्रिय घटना घडल्या. या अप्रिय घटनांसाठी मोदी मुळीच जबाबदार नव्हते. तो एक जनप्रक्षोभ होता. त्या प्रक्षोभामुळे अनेक दु:खद घटना घडल्या. पण, कारसेवकांना जिवंत जाळण्याच्या घटनेचा कॉंग्रेसने साधा निषेधदेखील केला नाही. ती घटनाच खोटी आहे, असे भासविण्याचा कॉंग्रेसने आणि लालूप्रसाद यादव यांनी प्रयत्न केला. त्यासाठी आपल्या सत्तेचा दुरूपयोग केला. शेवटी न्यायालयाने, हे एक कटकारस्थान होते, असा निर्वाळा देत अनेकांना जन्मठेप ठोठावली, तेव्हा कॉंग्रेससकट सर्वांचीच तोंडे बंद झाली. तरीही कॉंग्रेसने तिस्ता सेटलवाड यांच्यासारख्या काही दलालांना हाताशी धरून त्यांच्या खांद्यावरून बंदूक चालविण्याचा अश्‍लाघ्य आणि नीच प्रयत्न केला. मोदींवर अनेक खोटे आरोप केले. शेवटी सर्वोच्च न्यायालयानेही मोदींना दिलासा दिला. पण, नरेंद्रभाईंनी या सर्व आरोपांचा शांतपणे आणि कोणताही तोल ढळू न देता सामना केला आणि आपले निर्दोषत्व सिद्ध केले. मोदींनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात विधानसभेच्या दोन निवडणुका झाल्या. पहिल्या निवडणुकीवर तर दंगलींचे सावट होते. प्रसिद्धिमाध्यमे देव पाण्यात बुडवून बसली होती. गुजरातमधून भाजपाचा सफाया होणार, दंगल मोदींना भोवणार, कॉंग्रेसला दोन तृतीयांश बहुमत मिळणार अशाच एकतर्फी बातम्या त्या वेळी प्रसिद्धिमाध्यमांनी दिल्या. पण, निकाल लागल्याबरोबर या माध्यमांच्या विश्‍वसनीयतेचाच सफाया झाला आणि मग सर्वच जणांनी तोंड लपविले. गुजरातच्या जनतेने मोदींनाच कौल दिला आणि सर्वांच्या नाकावर टिच्चून नरेंद्रभाई पुन्हा मुख्यमंत्री झाले. या निकालांनी तर कॉंग्रेसच्या नेत्यांची कित्येक दिवसपर्यंत झोपच उडून गेली होती, असे कॉंग्रेसजनच सांगतात. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्येही मतदारांनी भाजपालाच कौल दिला. या धक्क्यातून कॉंग्रेसचे नेते कित्येक दिवसपर्यंत सावरलेच नाही. असे झालेच कसे? या एकाच प्रश्‍नाने कॉंग्रेसला पछाडले. मोदींनी मात्र आपल्या कार्यकाळात जनसामान्यांच्या प्रश्‍नांना प्राधान्य दिले आणि अनेक कल्याणकारी योजनांचा धडाका लावला. अल्पसंख्य समाज कोणत्याही प्रकारे दुखावला जाणार नाही, याची जातीने काळजी घेतली. दुसर्‍या विधानसभा निवडणुकीत मात्र कॉंग्रेसने पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनाच प्रचारात उतरविले. कॉंग्रेसला वाटले, सोनियाजी करिश्मा करणार! सोनियांनी नक्कीच करिश्मा केला. मोदींबाबत ‘मौत के सौदागर’ असा विखारी शब्दप्रयोग करून त्यांनी कॉंग्रेसजनांची वाहवा मिळविली. प्रसिद्धिमाध्यमांनीही हे वाक्य निकालापर्यंत हाडासारखे चघळले. आता कॉंग्रेसचीच सरशी होणार, असेच ही माध्यमे सांगत राहिली. मोदींनी सोनियाजींच्या वाक्यावर प्रतिक्रिया नोंेदविताना म्हटले, ‘‘ये गुजरातकी जनता का अपमान है.’’ निकाल लागले आणि पुन्हा एकदा कॉंग्रेसला धक्का बसला. हा धक्का पहिल्या निवडणुकीपेक्षाही जबरदस्त होता. कारण, पराभव कॉंग्रेसचा नव्हे, सोनिया गांधी यांचा झाला होता! हा पराभव कॉंग्रेसजनांच्या खूपच जिव्हारी लागला. एवढा सगळा आटापिटा करूनही गुजरातची जनता मोदींनाच आपला कौल का देत आहे, हे कोडे कॉंग्रेसजनांकडून अजूनही सुटलेले नाही. अजूनही त्यांना अक्कल आलेली नाही, असेच म्हणावे लागेल. या सर्व अग्निदिव्यांतून नरेंद्रभाई अगदी तावून सुलाखून बाहेर पडले. मोदींची लोकप्रियता गुजरातमध्ये किती अफाट आहे, हे यावरून सहज लक्षात येते. आज मोदी सर्वसामान्य जनतेसोबत अल्पसंख्यकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. नरेंद्रभाईंच्या या कुशल नेतृत्वाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. एवढ्या प्रदीर्घ काळापर्यंत मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचे भाग्य आतापर्यंत कुणालाही लाभले नाही. आपल्या दहा वर्षांच्या या यशस्वी कारकीर्दीबद्दल नरेंद्रभाईंनी गुजरातमधील ४ लाख ५३ हजार शासकीय कर्मचार्‍यांना आणि ३ लाख ४७ हजार निवृत्तिधारकांना भरीव अशा भेटी दिल्या आहेत. आता या भेटीची मालिका पाहा- सहाव्या वेतन आयोगाच्या तिसर्‍या हप्त्याची रक्कम कर्मचारी आणि निवृत्तिधारकांना रोखीने, एक जुलैपासून ७ टक्के महागाई भत्ता रोखीने देण्यात येणार आहे. या दोन्ही लाभापोटी कर्मचार्‍यांना १७१९ कोटी आणि निवृत्तिधारकांना ५११ कोटी रुपये रोखीने मिळणार आहेत. राज्यातील शिक्षणसेवक, लोकरक्षक (पोलिस), प्रशासकीय सहायक, वनपाल सहायक आणि सर्व अंशकालीन कर्मचार्‍यांचे पगार साडेतीन हजार ते सहा हजार याऐवजी साडेचार ते दहा हजार रुपये करण्यात येणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी या सर्व कर्मचार्‍यांचा ‘कर्मयोगी’ म्हणून सन्मान केला आहे. तसेच येत्या एका वर्षात ५० हजार युवकांना सरकारी नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे. सर्वांत मोठा निर्णय म्हणजे, गेल्या दहा वर्षांपासून ज्यांनी रोजगार मार्गदर्शन केंद्रात नावे नोंदविली आहेत, अशा १४ लाख २५ हजार युवकांना खाजगी उद्योगांमध्ये नोकर्‍या देण्यात येणार आहेत. म्हणजे येत्या एक-दोन वर्षात सुमारे १५ लाख युवकांना रोजगार मिळणार आहे. यावरून नरेंद्रभाईंच्या प्रयत्नांमुळे राज्यात उद्योगांचे किती विशाल जाळे तयार झाले आहे, याची कल्पना यावी. कॉंग्रेसने केवळ मोदींच्या नावाने जळफळाट करण्याऐवजी त्यांच्याकडून काही गुण घेतले, तर ते त्यांच्या राज्यांच्या विकासासाठी आणि पर्यायाने देशासाठीही उपकारक ठरणार आहेत. मोदींचे पुनश्‍च एकदा अभिनंदन!
स्रोत: तरुण भारत : 10/10/2011
http://amarpuranik.in/?p=513
Posted by : | on : 16 October 2011
Filed under : Blog.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *