Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राष्ट्रीय, स्थंभलेखक » राज्यसभेतील बदलते चित्र

राज्यसभेतील बदलते चित्र

•चौफेर : अमर पुराणिक•

विरोधक आणि विशेषत: कॉंगे्रस उन्हाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्रात बॅकफूटवर गेली आहे. संसदेत, न्यायालयात आणि जनतेसमोर त्यांची पळता भूई थोडी व्हायला सुरुवात झाली आहे. डॉ. सुब्रमण्यम स्वामी, मनोहर पर्रिकर यांच्या भेदक मार्‍याला कॉंग्रेस तोंड देऊ शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणं कॉंग्रेस आणि गांधी घराण्याला घेऊन बुडणार अशी गंभीर परिस्थिती आहे.

DR SWAMY, PARRIKAR IN RAJYASABHAमोदी सरकार सत्तेत आल्यापासून संसदेचे कामकाज विरोधकांनी नीट चालू दिलेले नाही. सतत गोंधळ घालून कामकाज बंद पाडण्याचा प्रयोग मागील पानावरुन पुढे असाच सुरु आहे. लोकसभेत भाजपाचे संख्याबळ असल्याने थोडेतरी कामकाज पुढे रेटले गेले. पण राज्यसभेत मात्र आजपर्यंत अतिशय वाईट स्थिती होती. भाजपाकडे राज्यसभेत संख्याबळ नसल्याने राज्यसभेत जास्त गोंधळ घातला गेला अजूनही स्थिती तशीच आहे. भाजपा राज्यसभेत कमकुवत ठरत आहे. पण संसदेच्या उन्हाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्राला सुरुवात झाली आणि राज्यसभेतील चित्र बदलत गेले. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे राज्यसभेत आगमन होताच कॉंग्रेसच्या पाचावर धारण बसली आहे. डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे आपल्या बेधडक स्वभावसाठी आणि सत्याची साथ देणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना सोशल मिडियावर ‘वन मॅन आर्मी’ म्हंटले जाते. उत्तम कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि राजनीतिज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ. स्वामी यांनी आजपर्यंत कॉंग्रेसची पळता भूई थोडी केली आहे. राज्यसभेत येऊन अजून आठ दिवसही झाले नाहीत पण ते सदनात आल्यापासून कॉंगे्रसजन हैराण झाले आहेत.
तर दुसर्‍या बाजूला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी ऑगस्ट वेस्टलँड प्रकरणावर जोरदार भूमिका मांडत बिरबल आणि बादशहाची मजेदार पण सूचक गोष्ट सांगून विरोधकांची बोलती बंद केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्र्यांच्या भाषणाचे कौतूक केले. पंतप्रधानांनी पर्रिकर यांच्या भाषणाचेे कौतूक करताना, पर्रिकरांचे भाषण हे उत्तम संसदीय परंपरांचा दाखला देणारे भाषण असल्याचे आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी पर्रिकरांच्या भाषणाची व्हिडीओ लिंक टाकून राजकारणातून वर उठून संरक्षण मंत्र्यांनी तथ्यं समोर आणली असल्याचे नमुद केले आहे. ऑगस्टा वेस्टलँड व्हिव्हिआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन पर्रिकरांनी कॉंग्रेसची फोल खोलली तर डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनीही हेलिकॉप्टर घोटाळ्यावरुन कॉंग्रेसची पिसं काढली.
हेलिकॉप्टर घोटाळ्यातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बुधवारी कॉंग्रेस आणि भाजपा सदस्यांत जोरदार खडाजंगी झाली. सदनातील चर्चेदरम्यान विरोधकांच्या  प्रश्‍नांना उत्तर देताना पर्रिकर यांनी हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात घोटाळा झाला होता आणि हा घोटाळा झाल्याचे इटलीच्या न्यायालयानेही मान्य केले आहे. शिवाय तेव्हाचे संपुआ सरकारचे संरक्षण मंत्री ए.के. एँटनी यांनीही घोटाळा झाल्याचे मान्य केले होते. आता देश जाणू ईच्छितो की या भ्रष्टाचारात कोण कोण सामिल आहेत, कोणा कोणाचे याला समर्थन मिळाले आणि कोणी कोणी लाच खाल्ली. सरकार या भ्रष्टाचाराचा तपास करेल की, कोणी कोणी लाच घेतली, आम्ही ही बाब अशीच सोडून देणार नसल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेस सदस्य अभिषेक मनु सिंघवी यांची फिरकी घेत पर्रिकर म्हणाले की, सिंघवी यांचे आज खूप नुकसान झाले, ते चांगले वकील आहेत, त्यांनी हेलिकॉप्टर प्रकरणावर खूप चांगला युक्तीवाद केला. पण जर केसच कमकुवत असेल तर चांगला वकीलही केस जिंकु शकत नाही. कॉंग्रेसवर पलटवार करताना पर्रिकरांनी अकबर-बिरबलाची गोष्ट सांगितली. एकदा बादशहा अकबराने बिरबलाला बोलावले आणि म्हणाला की सोन्याचा चमचा चोरीला गेला आहे. बिरबलाने सार्‍या सेवकांना बोलावले आणि सर्व सेवकांच्या हातात बांबू दिले आणि म्हणाला की हे जादूचे बांबू आहेत. ज्याने चोरी केली असेल त्याचा बांबू रात्रीत चार इंच लांब होईल. हे ऐकून ज्याने चोरी केली होती तो घाबरला. त्याने एक शक्कल लढवली आणि आपला बांबू चार इंच कापला. दुसर्‍या दिवशी चोर पकडला गेला. या गोष्टीप्रमाणे आपण सर्व कॉंग्रेस नेत्यांनी आपले बांबू चार इंच कापले आहेत. संरक्षण मंत्री पर्रिकरांच्या या खुमासदार गोष्टीमुळे कॉंग्रेस सदस्य संतापले आणि गोंधळ घालायला सुरुवात केली. अतिशय तिखट प्रतिक्रिया देत कॉंग्रेसनेते गुलाम नबी आझाद यांनी लिहून आणलेले भाषण संरक्षण मंत्री सदनात वाचू शकत नाहीत असे म्हणून लिखित भाषण वाचून त्यांनी सदनाचा अपमान केला असल्याचे म्हणताच कॉंग्रेस सदस्यांनी गोंधळ सुरु केला. त्यानंतर पर्रिकरांनी लिखित प्रत खाली ठेऊन प्रत न पाहता बोलू लागले तरीही गोंधळ चालूच ठेवला. त्या आधी कॉगे्रस नेते अहमद पटेल आणि आनंद शर्मा यांनी भ्रष्टाचार झाला नसल्याचे सांगत दस्तावेज खरे असल्याचे सिद्ध करा असे म्हणत गोंधळ घातला.
एका बाजूने संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांनी किल्ला लढवला तर दुसर्‍याबाजुने डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी विरोधकांच्या भ्रष्टाचाराची लख्तरं वेशीवर टंागली. डॉ. सुब्रमण्यम स्वामी राज्यसभेत आल्यानंतर पहिल्याच दिवशी पहिले दोन शब्द बोलताच संपुर्ण सदनात गदारोळ माजला होता. डॉ. स्वामी यांनी सोनिया गांधींचे नाव घेतल्याबरोबर कॉंग्रेस सदस्यांनी गोंधळ घालून डॉ. स्वामी यांना बोलूच दिले नाही. कॉंग्रेस सदस्यांनी डॉ. सुब्रमण्यम स्वामींबाबत अभद्र टिप्पणी करत आक्रमक इशारे केले. दुसर्‍या दिवशी डॉ. स्वामी यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठाशी संबंधित मुद्दा उपस्थित करताच सर्व सेक्यूलर विरोधकांनी इतका गोंधळ घातला की कामकाज थांबवावे लागले.
राज्यसभेत स्वामी यांनी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात ज्यांची नावे आहेत त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असे म्हणाले. ऑगस्टा डील मधील घोटाळाच्या चौकशीचा तेव्हाचे संरक्षण मंत्री ए.के. एँटनी यांचा सल्ला कोणाच्या सांगण्यावरुन मान्य केला नव्हता? हे आदेश मनमोहन सिंग यांनी दिले होते का? पहिल्यांदी ऑगस्टा डील ७९३ कोटी रुपयांत झाली होती नंतर हीच डील ४८०० कोटीत कशी फायनल केली गेली? असा सवाल करत डॉ. स्वामी यांनी या व्यवहारातील मध्यस्थ क्रिश्‍चियन मिशेलचे पत्र वाचायला सुरुवात केली. या पत्रात सोनिया गांधीचे नाव आहे आणि पत्रात सोनिया गांधी यांना ड्रायव्हिंग फोर्स अर्थात कर्ता-करवीता/सुत्रधार असे संबोधले गेले आहे. हे पत्रा वाचताच पुन्हा सदना गोंधळ सुरु झाला. उपसभापतींनी या पत्राचे प्रमाण सिद्ध करा असे सांगितले त्यानंतर विरोधकांनी आणखी गोंधळ घातला तेव्हा स्वामी यांनी आपल्या सदस्यांना थांबवा असा सल्ला दिला व मनमोहन सिंग यांच्या आधी सोनिया गांधी यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.
या शिवाय डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी गेल्या काही महिन्यांपासून डेक्कन हेराल्ड प्रकरण, चिदंबरम पिता पुत्रांचे नोटा छापण्याच्या मशिन खरेदीचे प्रकरण आदींचा जोरदार पाठपुरावा सुुरु ठेवला आहे. एकंदर विरोधक आणि विशेषत: कॉंग्रेस उन्हाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्रात बॅकफूटवर गेली आहे. संसदेत, न्यायालयात आणि जनतेसमोर कॉंग्रेसची पळता भूई थोडी व्हायला सुरुवात झाली आहे. डॉ. सुब्रमण्यम स्वामी, मनोहर पर्रिकर यांच्या भेदक मार्‍याला कॉंग्रेस तोंड देऊ शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणं कॉंग्रेस आणि गांधी घराण्याला घेऊन बुडणार अशी परिस्थिती आहे. भाजपा खासदार मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हंटल्याप्रमाणे सध्या ‘घुस देनेवाले जेल मे, और घुस लेनेवाले वेल मे’ अशी स्थिती असली तरी लवकरच घुस लेनेवाले देखील जेलमध्ये जाणार हे निश्‍चित!

Posted by : | on : 8 May 2016
Filed under : Blog, चौफेर : अमर पुराणिक, राष्ट्रीय, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *