Home » Blog » लावा पैशाची झाडे

लावा पैशाची झाडे

मुक्त भांडवली आणि उदार-मतवादी अर्थव्यवस्थेच्या धडाकेबाज अंमलबजावणीनंतर, देशात चंगळ-वादी संस्कृती रुजली आणि फोफावली. खाओ, पिओ, मजा करो, हा नव्या पिढीचा तथाकथित सुखाचा मूलमंत्र झाला. भौतिक साधने आणि भरपूर-हवे तसे, हवे तेव्हा खाणे पिणे म्हणजेच सुख-असे युवा पिढीलाही वाटते. पूर्वी 1 रुपया मिळत असताना आठ आणे खर्च करा, आठ आणे शिल्लक ठेवा, असे पालक सांगत. ते तसे वागत. शक्यतो कर्ज काढूच नका आणि काढले तर ते अत्यावश्यक असेल तरच काढा, असा सल्ला समाजातील ज्येष्ठ मंडळी देत असत. त्याचे पालनही होत असे. आता मात्र खिशात पैसे नसले तरी, कर्ज काढा, मोटारसायकली, मोटारी, टी. व्ही., सी. डी. प्लेअर घ्या आणि हप्ते फेडत रहा, असा नवाच प्रवाह निर्माण झाला. मुंबई-पुण्यात पगार कमी असतानाही लाखो रुपये किंमतीची सदनिका विकत घ्यायची आणि जन्मभर त्या कर्जाचे हप्ते फेडत रहायचे, यात वावगे काही आहे, असे मध्यमवर्गीयांनाही वाटत नाही. पार्ट्या आणि अन्य उधळपट्टीही करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढतेच आहे. परिणामी पन्नास टक्क्यांच्यावर लोक कर्जबाजारी झाले आहेत.
छोट्याशा घरात प्रचंड फर्निचर, डायनिंग टेबल, मोटारसायकल, असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण झाले. मोबाईल तर कुटुंबातल्या सर्वांच्याकडेच आहेच. मोबाईलवर किती बोलावे याला काही ताळतंत्र राहिलेला नाही. गरज नसताना वस्तू विकत घेणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. या पार्श्वभूमीवर वाढती महागाई आणि भाववाढीचा वेग लक्षात घेता ती यापुढेही वाढतच राहणार, याचे भान सामान्य आणि मध्यमवर्गीयांनी ठेवायला हवे. काटकसर, आवश्यक तेवढीच खरेदी, उधळपट्टीला आळा घालून आपल्या मिळकतीतील किमान वीस टक्के रक्कम दरमहा बचत, अल्पबचतीत गुंतवायला हवी. मुलाच्या जन्माबरोबरच काही रक्कम त्याच्यासाठी नियमितपणे भरत राहिल्यास त्याच्या शिक्षणाच्या खर्चाची तरतूद होवू शकते. अल्प बचतीची झाडे लावायच्या अनेक योजना सध्या बॅंका आणि पोस्टात उपलब्ध आहेत. विमा, कंपन्यांच्याही अशा दीर्घ काळच्या पॉलिसिही उपलब्ध आहेत. आता छोटीशी गुंतवलेली रक्कम वीस वर्षांनी चौपट, पाचपट होेते. गरजेच्या वेळी ही रक्कम उपयोगाला येते.
सध्याचे शिक्षण महागडे झाले, हे लक्षात घेवून आणखी पंधरा/वीस वर्षांनी उच्च तांत्रिक, अन्य अभ्यासक्रमांची फी ही लक्षावधी रुपयांच्या आसपास असेल. ती देताना कर्ज काढायची वेळ येवू नये, यासाठी आतापासूनच बचत हवी. मुलीच्या विवाहासाठीही तिच्या प्रत्येक वाढदिवसादिवशी नियमित-पणे काही रक्कम गुंतवत गेल्यास, ती ही रक्कम मोठी झालेली असेल. तिचा उपयोग तिच्या विवाहासाठी करता येईल. दोनच दिवसांपूर्वी पोस्ट खात्याने सेव्हिंग आणि अन्य विविध योजनांवरच्या बचतीचे व्याजदर वाढवल्यामुळे, ग्रामीण भागातल्या जनतेलाही अशी पैशाची झाडे लावणे सहज शक्य झाले आहे. आताच पैशाची झाडे लावा म्हणजे पंधरा वीस वर्षांनी ती मोठी होतील आणि त्याची गोड फळेही मिळतील.
http://amarpuranik.in/?p=502
Posted by : | on : 16 November 2011
Filed under : Blog.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *