Home » Blog, उद्योग भरारी, उद्योग भरारी :अमर पुराणिक, औद्योगिक, स्थंभलेखक » लोकमंगल बायोटेक : कृषकांचा सखा, वसुंधरेचा दास

लोकमंगल बायोटेक : कृषकांचा सखा, वसुंधरेचा दास

 • उद्योग भरारी : अमर पुराणिक•

सोलापूरच्या प्रगतीसाठी ज्यांनी प्रचंड प्रयत्न केले, त्यात माजी खासदार सुभाषबापू देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी १ हजार उद्योजक निर्माण करण्याचे सुभाषबापूंचे स्वप्न आहे. सोलापूर शहराच्या प्रगतीला प्रचंड वाव असताना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे सोलापूर खूप मागे पडले असल्याची खंत सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. यासाठी सोलापुरात सर्वप्रथम एमआयडीसीचे विभागीय कार्यालय सुरू होणे अत्यावश्यक आहे. कारण सोलापुरात येऊ पाहणार्‍या उद्योजकाला राजकीय नेतेमंडळी आपापल्या गावाकडे नेतात किंवा न्यायला प्रवृत्त करतात; त्यामुळे सोलापुरात येणारे उद्योजक अन्य शहरांकडे जातात. ‘‘जकातीमुळे उद्योजकांची गळचेपी होत असल्याने जकात तत्काळ हटवून एकच करप्रणाली स्वीकारणे आवश्यक आहे. करेरा उद्योग सोलापुरात आलाच नाही, पण १० वर्षे त्यामुळे एमआयडीसीची जागा अडवून ठेवली गेली. आता ही जागा मोकळी झाली आहे. त्या जागा गरजूंना तत्काळ द्याव्यात. शहराचा विकास खूप अगोदर होणे आवश्यक होते, पण सर्वांचे पोट भरल्यानंतर उरले तर सोलापूरला देऊ, अशी दुजाभावाची वागणूक शासनाने सोलापूरला दिली. त्यामुळे सोलापूरकर नाईलाजाने सोलापूर सोडून जातोय आणि हे सर्व हे थांबले पाहिजे !‘‘

लोकमंगल बायोटेक प्रा. लि.ला पाहता पाहता आता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या चार वर्षांत लोकमंगल बायोटेकने मारलेली ही उद्योग भरारी केवळ स्पृहणीयच नव्हे तर स्तिमित करणारीच म्हणावी लागेल! सोलापूरच्या औद्योगिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे माजी खासदार सुभाषबापू देशमुख यांच्या उद्योगकुशलतेचे हे आणखी एक उदाहरण. लोकमंगल उद्योग समूहाचे सर्वच प्रकल्प सुभाषबापूंच्या ब्रीदाप्रमाणे ‘अखंड गतीतून सार्थकता’ याची मूर्तिमंत रूपं आहेत, पण या ब्रीदाला काहींसा फाटा देत केवळ चारच वर्षांत मारलेली ही उत्तुंग भरारी म्हणजे लोकमंगलच्या कासवाने घेतलेली उल्लेखनीय गरुडझेपच होय!लोकमंगल बायोटेकच्या या प्रगतीत सुभाष बापूंच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करणारे लोकमंगल बायोटेक प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख म्हणजे कामसू वृत्तीचे जिवंत उदाहरण आहेत. 
अखंड कामात गुंतलेले आणि लोकमंगल म्हणजे सर्वस्व मानणार्‍या गणेश देशमुखांच्या कौशल्याचा लोकमंगलच्या या देदीप्यमान प्रगतीत सिंहाचा वाटा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लोकमंगल बायोटेकला योग्य दिशा देणार्‍या कार्यकुशल व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी ‘तरुण भारत’शी मनमोकळा संवाद साधला.लोकमंगल बायोटेकचा २००६ साली सेंद्रीय खतउत्पादनाने उद्योगाचा श्रीगणेशा केला. लोकमंगल बायोटेकने ८५ उत्पादने विकसित केली आहेत. सोलापूर, अकोला, जळगाव, वडोदरा, उदयपूर आदी ठिकाणी उत्पादन होत असून, लोकमंगल बायोटेकच्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या ७ राज्यांत शाखा आहेत. विदर्भ, मराठवाड्यात लोकमंगलच्या उत्पादनांची विक्रमी विक्री होत असल्याचे गणेश देशमुख म्हणाले.
सुभाषबापूंची दूरदृष्टी, दमदार उत्पादने, नेटके वितरण, विनम्र व तत्पर सेवेच्या बळावरच लोकमंगलने ही भरारी घेतली आहे.नावाप्रमाणेच ‘मॅग्नेट’ असलेल्या दुय्यम अन्नघटकांचा समावेश असणार्‍या खतांची निर्मिती केली. या उत्पादनांवर कृषकवर्ग संतुष्ट असून, त्यांना ‘मॅग्नेट’ने आपल्याकडे खेचून घेतले आहे. भरघोस व दर्जेदार उत्पादनांसाठी मॅग्नेट, सरदार, स्पार्क, फास्टर, परफेक्ट आणि लान्सर ही शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरलेली उत्पादने आहेत. या खतांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. पाण्यात विरघळणारी खते, फवारणीद्वारे दिली जाणारी खते, मुख्य अन्नघटक खते आदी सर्वच वर्गवार्‍यांची उत्पादने लोकमंगलने विकसित केली आहेत. जोमदार पिकांसाठी सशक्त बियाणांची गरज लक्षात घेऊन लोकमंगल बायोटेकने हीरो नं. १ ही तांदळाची नवी जात संशोधित केली. मका – विराट ५५५, सूर्यफूल – भास्कर ९९, बाजरी – विश्‍वास, सोयाबीन – जेएस ३३५, संकरित ज्वारी – भागिरथी याशिवाय बसंती ११, देवा ८१, भीमा १०८, विपुल गोल्ड, शिव, श्रुती, आर्या, कामिनी, मेघदूत, विशाखा, द्रोण, नेत्र, रॅम्बो, हर्षदा, नंदिनी, इंद्रायणी, लोकमंगल आणि शंभू आदींसह विविध फळभाज्यांची बियाणे देिीखल संशोधित केली आहेत. शेतकर्‍यांना मिळणारी बियाणे १०० टक्के उगवणूक असणारी, सशक्त, निरोगी, किटाणू व रोगमुक्त पीक मिळावे म्हणूनलोकमंगल बायोटेक नेहमीच प्रयत्नशील असल्याचे आवर्जून गणेश देशुमख यांनी सांगितले. बियाणांबरोबरच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, शेतातील काडीकचरा व शेण यांचा विनियोग करून त्यापासून सेंद्रीय खत बनवण्यासाठी कुजवणारे रसायन तयार केले आहे.पिकांचे विविध रोगांपासून व किडीपासून संरक्षण करून रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी लोकमंगल बायेटेकने अनेक औषधेतयार केली आहेत. निसर्गाला कोणतीही हानी न पोचविता किडींचा व रोगांचा नायनाट करण्यासाठी प्रभावी जैविक कीड व बुरशीनाशकेही निर्माण केली आहेत. तसेच यावर्षी लोकमंगल बायोटेकने नवीन जैविक कीटकनाशके संशोधित केली असल्याचे सांगून देशमुख म्हणाले की, सर्व प्रकारच्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी ‘ऍक्शन’ हे जैविक कीटकनाशक तर मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांसारख्या रस शोषणार्‍या किडींच्या नायनाटासाठी ‘बेन – १०’ ही दोन प्रभावी जैविक कीटकनाशके विकसित केली असून, ती शेतकर्‍यांच्या विश्‍वासास पात्र ठरत असल्याचे समाधान गणेश देशमुख यांनी व्यक्त केले. लोकमंगलने या संशोधन कार्यासाठी अद्यावत प्रयोगशाळा उभी केली आहे. नव्या तंत्रज्ञानाची कास धरीत नवनवी उत्पादने विकसित करण्यासाठी तज्ज्ञ अभ्यासक लोकमंगलकडे उपलब्ध आहेत.बाजाराची स्थिती कशीही असली तरीही लोकमंगल बायोटेकचे भाव स्थिरच असतात व कोणाकडूनही, कोणत्याही उत्पादनांची काळ्या बाजारात विक्री होणार नाही, याची विशेष काळजी घेत असल्याचे गणेश देशमुख यांनी सांगितले. स्वत:चा फायदा किती, यापेक्षा शेतकर्‍याला किती फायदा झाला? याकडे सुभाष देशमुख यांचा कटाक्ष असतो.
पहिल्याच वर्षी म्हणजे सन २००६ साली लोकमंगलने २ कोटी रुपयांची उलाढाल केली. तर मागील वर्ष सन २००९-१० ला लोकमंगल बायोटेकने उद्योगविकासाची मोठी गरुड भरारी घेत ही उलाढाल २२ कोटींवर पोहोचवली आहे. या वर्षात ४५ ते ५० कोटींचे उद्दिष्ट असून, २०१५ पर्यंत आम्ही ५०० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करू असा आत्मविश्‍वास गणेश देशमुख यांनी व्यक्त केला. लोकमंगल बायोटेकमध्ये ४०० लोक काम करतात. शिवाय लोकमंगल बायोटेकमुळे निर्माण होणारा अप्रत्यक्ष रोजगार देखील मोठाच आहे. लवकरच कीटकनाशके आणि ठिबक सिंचनातून दिली जाणारी खते विकसित करीत असून, ही उत्पादने लवकरच ती शेतकर्‍यांच्या सेवेत आणली जात आहेत.लोकमंगल बायोटेक आता शेअर बाजारात आयपीओ रजिस्ट्रेशन करणार आहे. तसेच ऍक्शन व बेन १० ही उत्पादने निर्यात करण्याचा मानस असून, तो लवकरच पूर्ण हाईल, अशी आशा देशमुख यांनी व्यक्त केली. जागतिक स्तरावर लोकमंगलचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, आमची उत्पादने आता जागतिक कृषिप्रदर्शनात दाखल झालेली आहेत. फ्रान्स, चीन, सॅनफ्रान्सिस्को आदी ठिकाणी झालेल्या कृषिप्रदर्शनात आम्ही सहभाग नोंदवला आहे. तेथील तज्ञांनी आमच्या उत्पादनांची वाखाणणी केल्यामुळे आता जागतिक स्तरावर लोकमंगल नक्कीच आपले स्थान निर्माण करेल. शेतकर्‍यांना प्रेरित करून या वसुंधरेची कृतज्ञता व्यक्त करीत तिला सृष्टीसौंदर्याने नटवण्यासाठी, हिरवळ वाढवण्यासाठी लोकमंगल परिवार प्रयत्नशील आहे. सृष्टिदेवतेच्या ऋणातून आपण मुक्त होणे शक्य नाही, पण या प्रदूषित झालेल्या सृष्टीवर थोडा जरी बहर आणण्यात आम्ही यशस्वी झालो तरी धन्य होऊ! असा आशावादही देशमुख यांनी व्यक्त केला.

  •सोलापूरचा औद्योगिक विकास  – माजी खासदार सुभाष देशमुख

माजी खासदार सुभाष देशमुख,
संस्थापक – अध्यक्ष, लोकमंगल समूह, सोलापूर

सोलापूरच्या प्रगतीसाठी ज्यांनी प्रचंड प्रयत्न केले, त्यात माजी खासदार सुभाषबापू देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी १ हजार उद्योजक निर्माण करण्याचे सुभाषबापूंचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने ते सतत प्रयत्न करीत आहेत. अशा उद्यमशील माजी खासदार व लोकमंगल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुभाषबापू देशमुख यांनी दै. तरुण भारतशी संवाद साधला. सोलापूरच्या विकासाबद्दल पोटतिडकीने बोलताना सुभाषबापू म्हणतात, ‘‘जर माझ्या स्वप्नाप्रमाणे सोलापुरात तयार होणारे १ हजार सोलापूरकर उद्योजक आणि त्याबरोबरच बाहेरील उद्योजक आले आणि स्थिरावले तर मुंबई-पुण्याकडे जाणारे तरुणांचे लोंढे थांबतील. कारण ही तरुण पिढी सोलापूरचे भविष्य आहे आणि हीच तरुण पिढी जर सोलापूर सोडू लागली तर या शहराचे भवितव्य काय राहील, याचा सर्वच सोलापूरकरांनी विशेषत: राजकीय नेत्यांनी गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. यासाठी सोलापूर विद्यापीठाचा दर्जा सुधारणे, जे विषय इतरत्र नाहीत असे अभ्यासक्रम सुरू होणे आवश्यक आहे. विद्यापीठे शहराचे भविष्य घडवतात. हा मंत्र लक्षात घेऊन विषयातील वेगळेपण, दर्जा सुधारण्याला प्राधान्य देण्याशिवाय पर्याय नाही. सोलापूरच्या प्रगतीला प्रचंड वाव असताना राजकीय इच्छाशक्तीच्या आभावामुळे सोलापूर खूप मागे पडले असल्याची खंत सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. उद्योजकांना मूलभूत सुविधा जसे की, बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरू करणे, मुंबई-चेन्नई, मुंबई-बंगळूर, मुंबई-हैदराबाद आदी रेल्वेमार्गांची डबल लाईन आणि विद्युतीकरण करणे, पाणी, वीज, अंतर्गत रस्ते या सुविधा उद्योजकांना अग्रक्रमाने देणे क्रमप्राप्त आहे. सोलापुरात येऊ इच्छिणार्‍या उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी सोलापुरात सर्वप्रथम एमआयडीसीचे विभागीय कार्यालय सुरू होणे अत्यावश्यक आहे. कारण सोलापुरात येऊ पाहणार्‍या उद्योजकांना राजकीय नेतेमंडळी आपापल्या गावाकडे नेतात किंवा न्यायला प्रवृत्त करतात; त्यामुळे सोलापुरात येणारे उद्योजक अन्य शहरांकडे जातात. करेरा उद्योग तर सोलापुरात आलाच नाही, पण गेली १० वर्षे त्यामुळे एमआयडीसीची जागा अडवून ठेवली गेली, आता ही जागा मोकळी झाली आहे, पण त्या जागेचे वितरण गरजू उद्योजकांना तात्काळ होणे आवश्यक आहे. सोलापूर व जवळच्या परिसरात श्री सिद्धेश्‍वर, अक्कलकोट स्वामी समर्थ, संत दामाजी, संत सावता माळी, वडवळचे नागनाथ मंदिर, करमाळ्याची कमलादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अशी ९ तीर्थक्षेत्रे आहेत. ज्यावर अनेक पूरक उद्योग चालतात. इतर उद्योजकांना चालना मिळते, त्यामुळे पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही तीर्थक्षेत्रे विकसिक करणे अत्यावश्यक आहे. चारपदरी रस्ते व इतर अनेक विकासकामे खूप अगोदर होणे आवश्यक होते, पण सर्वांचे पोट भरल्यानंतर उरले सुरले तर सोलापूरला देऊ, तेही मिळेल तेव्हा मिळेल, अशी दुजाभावाची वागणूक शासनकर्त्यांनी सोलापूरला दिली आहे. सकारात्मक भूमिका घेत सोलापूरचा अपप्रचार थांबवून शहराचा व सोलापूरकरांचा विधायक प्रचार करणे अत्यंत आवश्यक आहे. सोलापूरकर असुविधांमुळे इच्छा नसतानाही नाईलाजाने सोलापूर सोडून पुण्या, मुंबईला जात आहेत, हे थांबले पाहिजे. चांगली चाललेली असतानाही शताब्दी एक्स्प्रेस का बंद केली? तर डीआरएम म्हणतात की, जागा नाही. तर मग जेव्हा चालू होती तेव्हा जागा होती का? असा प्रश्‍न उपस्थित होतो. तर यावर रेल्वे प्रशासनाने तात्काळ तोडगा काढून शताब्दी पुन्हा सुरू करावी. सोलापूर हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. बहुधा भ्रष्टाचारात सोलापूर अग्रक्रमावर असावे. अशी शासनाची वाईट स्थिती असताना भ्रष्ट वातावरणात सोलापूरची प्रगती कशी होणार? उद्योगाबाबत सोलापुरात सर्वात जास्त पूरकता आहे ती कृषी क्षेत्राला. कृषीच नव्हे तर सर्वच बाबतीत सोलापूर पूरक आहे. प्रगतीला प्रचंड वाव आहे, पण हे सर्व होईल फक्त कृतीतूनच. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरच सोलापूरला सोन्याचे दिवस येतील, असा आशावाद सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.

……………………………………………………………………………..
दै. तरुण भारत, सोलापूर. सोलापूरची उद्योग भरारी, दि.०३ ऑक्टोबर २०१०

Posted by : | on : 15 January 2011
Filed under : Blog, उद्योग भरारी, उद्योग भरारी :अमर पुराणिक, औद्योगिक, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *