Home » Blog » वकिली पेशाचे उच्च स्वरूप

वकिली पेशाचे उच्च स्वरूप

वकिली पेशाचे उच्च स्वरूप
•कै. नानासाहेब तथा गुरुराव वळसंगकर
वकील हा शब्द संस्कृतोभ्दव नाही, असे दिसते. तथापि, स्वतःहून भिन्न (अन्य) व्यक्तीची बाजू, अन्य जबाबदार नि अधिकारी व्यक्तीपुढे मांडण्याचे कृत्य हे वकिली करण्याचे कृत्य हे समीकरण व हा अर्थ फार प्राचीन काळापासून रुढ व सर्वमान्य आहे. फार पूर्वी, जी ती व्यक्ती स्वतःच्या बर्‍यावाईट कृत्याचे समर्थन करण्यात संपन्न असे किंवा तिच्यावर संकट आल्यास, स्वतःच युक्तिवाद करून स्वत:चा बचाव करीत असे व समर्थपणे ती व्यक्ती, ती जबाबदारी पूर्ण करीत असे. महाभारतात, पांडवांच्या पत्नीस द्रौपदीस-दुष्ट दुःशासनाने ती रजस्वला व अपुर्‍या कपड्यात असताना, कौरवांच्या राजसभेत ओढीत आणीत ‘तू आमची-आम्हा कौरवांची दासी आहेस, आम्ही तुझे वस्त्र भरसभेत फेडू लागलो तर त्याविरुध्द चकार शब्द काढण्याचा, तू दासी असल्यामुळे तुला अधिकार नाही.’ असे तिला तिच्या दुःखावर डागण्या देत व अपमान करीत दुःशासन बोलताच, त्या तेजस्वी स्त्रीने अत्यंत प्रज्ञावान बुध्दीने ‘मी दासी नाही, माझे पती स्वतः दास झाल्यानंतर त्यांचा माझेवर माझे पती माझे स्वामी म्हणून काही हक्क राहिला नाही व मग ते अधिकारविरहीत असताना त्यांना मला पणास लावण्याचा काय अधिकार? त्यांनी ते तसे अधिकाराबाहेरचे कृत्य केले तर त्यांचे ते कृत्य मी जरी त्यांची एकेवेळेची पत्नी होते तरी, माझेवर कसे बंधनकारक राहणार? त्याव्यतिरिक्त द्युतवेडाच्या आहारी जाऊन माझ्या पतींनी केलेले कृत्य खुद्द त्यांचेवरच बंधनकारक राहणार नाही तर मग माझ्यासारख्या त्यांच्या व्यक्तीत्त्वाहून भिन्न अशा माझ्या भिन्न देहावर त्यांचे ते मला पणास लावण्याचे कृत्य कसे बंधनकारक राहणार?’ असा युक्तिवाद व यासारखे अनेक युक्तिवाद त्या कौरवांच्या राज्यसभेत-त्यावेळच्या न्यायसभेत-तिने करून तिची स्वतःचीच नव्हे तर तिच्या प्राणप्रिय पतीची मुक्तता त्यांना प्राप्त झालेल्या दास्यत्वातून करून घेतल्याचा दाखला सर्वांना ज्ञात आहेच.
दुसर्‍या सुयोग्य व्यक्तीस न्याय मिळवून देण्यासाठी स्वार्थरहित वकिली अत्यंत प्रभावीपणे केल्याचा महत्त्वाचा दाखला महाभारतात, त्याच काळातील असलेला, सर्व आबालवृध्द – तरुणांस माहीत आहे. पांडवांनी स्वपराक्रमाने स्थापलेले इंद्रप्रस्थाचे राज्य त्यांच्याकडून कपटी नि मायावी द्युतात त्यांना हरवून हरण केल्यानंतर ते त्यांचे राज्य त्यांना परत करण्यासाठी त्यांनी १२ वर्षे वनवासात व त्यानंतर १ वर्ष अज्ञातवासात घालविल्यानंतरच त्यांना परत मिळेल, अशी अत्यंत जाचक व अशक्य अट घालून त्या अटींचे त्यांनी पालन करावे म्हणून त्यांना हस्तिनापुरातून हाकलल्यानंतर पांडव, हे  ती अट प्रामाणिकपणे पुरी करीत असताना त्यांचा मृत्यू या काळात घडवून आणण्याचा आटोकाट प्रयत्न कौरवांनी केला असतानाही ती अट पूर्णतः पाळून पांडव त्या मुदतीअखेर स्वतःचे राज्य परत मागण्यास आले असता, ‘राज्याची भीक मागणारे पांडव क्षत्रियही नाहीत व अशांना ‘भिक्षा’ कौरव घालू इच्छित नाहीत, वाटल्यास पांडवांनी रणांगणावर क्षत्रियत्व सिध्द करून त्यांचे राज्य घ्यावे’ असे उर्मट व अन्यायी उत्तर कौरवांनी दिल्यानंतर ‘युध्द अथवा अन्यायास ‘शरणागती’ एवढाच पर्याय पांडवांपुढे उभा राहिल्यावर त्या काळातील श्रेष्ठ नि अत्यंत समर्थ ‘वकील’ भगवान श्रीकृष्ण हे पांडवांसाठी नि न्यायतत्त्वाच्या पुरस्कारासाठी स्वतःचा काहीही स्वार्थ नसताना किंबहुना कौरवांकडून श्रीकृष्णाच्या सर्वसामान्य महत्पदाचा अवमान होण्याचा संभव असताना व अपयशाचीच खात्री त्या कार्यात असताना कौरवांच्या राजसभेत पांडवांची सत्याची वकिली करण्यासाठी स्वतः होऊन पुढे सरसावले. श्रीकृष्णाचा, कौरवांकडून त्यांच्या उदात्त प्रयत्नात अपमानच होणार व फलनिष्पत्ती ही होणार नाही, हे जाणून त्यांच्या अशिलानी म्हणजे पांडवांनी-भगवान श्रीकृष्णाला, त्यांच्यातर्फे ‘वकिली’ करण्यास जाऊ नये, असेच विनविले. परंतु भगवान श्रीकृष्ण हे सच्चे ‘वकील.’ त्यांनी स्वतःच्या मानापमानाचा प्रश्‍न बाजूस ठेवला. त्यांनी पांडवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. त्यांनी स्वतः त्यानंतर थोड्या काळातच प्रस्फुरलेल्या ‘कर्मंण्ये वा धिकारस्ते माफलेषु कदाचन’ या तत्त्वास अनुसरुन अत्यंत प्रभावीपणे पांडवांसाठी उत्तमरितीने ‘वकिली’ केली. खरा वकील आपल्या पक्षकाराची न्याय बाजूच मांडतो असे नव्हे तर प्रसंगी न्याय मागण्यात प्रसंगी स्वेच्छेने काटछाट करून समेटाचा देकार करतो. त्या भूमिकेतून, भगवान श्रीकृष्णाने ‘अर्धे राज्य नाही, तर निदान कोणतीही पांच ग्रामे पांडवास द्या व समेट करा,’ असा, अत्यंत माफक देकार, समेटासाठी-तडजोडीसाठी-कौरवांना दिला. तोही स्वीकारला गेला नाही, असे पाहून त्या भरसभेतून निघतेवेळी ‘राजा दुर्योधना, स्वकृत्याने, भीषण संहार युध्दाला, तू, पाचारण केले आहेस त्याच्या परिणामास सिध्द रहा,’ असे अत्यंत धैर्याने, ते एकटेच त्या सभेत असताना, बजावून ते जे निघाले, ते पांडवांना, प्रत्यक्ष युध्दभूमीवर स्वतःचे बुध्दिकौशल्य ओतून यशस्वी करते झाले. वकील या नात्याने त्यांनी अर्जुनास ‘भगवत्‌गीतारुप’ उपदेश करून, स्वतःची बाजू यशस्वीपणे, रणांगणावर मांडण्यास त्यास बौध्दिकदृष्ट्या उत्तेजित केले व युध्दातील डावपेच वेळोवेळी शिकवून व आचरण्यास लावून पांडवास यश मिळवून दिले.
माझ्या अल्पमतीने, भगवान श्रीकृष्ण, हे, त्या, ५००० वर्षांपूर्वींच्या काळातील आदर्शभूत असलेले ‘वकील’ होते. स्वार्थरहित बुध्दीने व न्याय्यतत्त्वाच्या विजयासाठी, दुसर्‍याच्या न्याय पक्षाची बाजू घेऊन, ती यशस्वी करण्यासाठी प्राणपणे झगडणे, हे ‘वकिली’ करण्यामागे असलेली उदात्त भावना त्याही काळी भारतात रुढ होती.
या घटनेचा मी विस्ताराने उल्लेख केला, याचे कारण, मी माझ्या श्रमाचे मूल्य जरी मी केलेल्या वकिली व्यवसायात घेत होतो, तरी ‘वकिली’ करण्यामध्ये, अंतर्भूत असलेली, वर नमूद केलेली भावना, मी सदोदित जागृत ठेवली होती. त्या तत्त्वाचा विसर मी कधीही पडू दिला नाही.
याच व्यवसायातील आणखी एक उदात्त घटना मी कथन करून, माझा लेखांक पूर्ण करतो. माझ्यासारख्या अनेकांच्या हृदयात, ज्या एका महान व्यक्तीबद्दल अतीव आदर व प्रेम व निष्ठा होती, अशा त्या ‘हिंदुहृदयसम्राट’ नि थोर, त्यागी, नि श्रेष्ठतम स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘गांधीवधा’ सारख्या घृणास्पद आरोपाखाली अटक झाल्याचे वृत्त कळाले तेव्हा त्यांच्याच तोडीची असीम देशभक्ती नि असामान्य धैर्य असलेल्या श्री अण्णासाहेब भोपटकरांनी-त्यांचे घर आदल्याच रात्री, ‘गांधीचे खुनी’ असे बिनबुडाचा आरोप करीत गुंडांनी पेटवून दिले असताना, त्या सावरकरांच्या अटकेचे वृत्त, रेडिओवरून ऐकताच स्वयंस्फूर्तीने जाहीर केले की, मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वकीलपत्र, त्या अभियोगात दाखल करून तो खटला चालविणार. न्याय्यतत्त्वाच्या पुरस्कारासाठी अनाहुतपणे त्यांनी अप्रतिम धैर्याने पुढे टाकलेले पाऊल, या वकिली व्यवसायाची उत्तुंग सीमा दर्शविते. तो अभियोग सुरु होण्यापुर्वी कित्येक दिवस आधीपासून श्री अण्णासाहेब व त्यांच्या कुटुंबीयांसही, स्वतःचा पैसा खर्च करून तो अभियोग यशस्वीपणे हातावेगळा करीपावेतो दिल्लीमध्ये जवळजवळ नऊ महिने ठाण मांडून राहिले होते. पुण्याच्या व महाराष्ट्रातील त्यांच्या स्वतःच्या ऐश्‍वर्यसंपन्न वकिली पेशास, त्यांनी या काळात तिलांजली दिली होती. स्वतःजवळ तो अभियोग अखेरपावेतो (युक्तिवाद धरुन अखेरपावेतो) करण्यास भरपूर बुध्दिसामर्थ्य व तयार असतानाही परमपूज्य सावरकरांची निर्दोष मुक्तता, त्या अभियोगातून करण्यासाठी, स्वतःकडे लघुत्व स्वीकारुन पाटण्याचे ८० वर्षाचे सुप्रसिध्द अधिवक्ता (व एके काळचे, पाटण्याचे हायकोर्ट मुख्य न्यायाधीश) श्री.दास यांना या अभियोगात, स्वातंत्र्यवीर सावरकरांतर्फे युक्तिवाद करण्यासाठी पाचारले. त्यांनीही अत्यंत उदात्त अंतःकरणाने, कोणतेही शुल्क न आकारता व फक्त ‘खर्ची’ घेऊन तो युक्तिवाद केला व स्वातंत्र्यवीर सावरकर ‘निर्दोष’ असल्याचे न्यायालयाने ठरविले. या धंद्यात श्रमाचे मूल्य व शुल्क घेऊन धंदा करीत राहूनही अनुकरण करण्याजोगी योग्य प्रसंगी विनामूल्य वकिली करण्याची ही तत्परता नि सेवावृत्ती, माझ्या समोर आदर्शभूत होती.  येथेच मी नमूद करतो की, या अभियोगात माझे श्रेष्ठ नि आदरणीय असलेले गुरु श्री.अण्णासाहेब भोपटकर यांना ते पुण्यात आले असताना समक्ष भेटून, माझी अल्प-स्वल्प सेवा देऊ केली व मी स्वखर्चाने दिल्लीत राहून त्या अभियोगात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, ते सांगतील ते काम करण्याची तयारी दर्शविली होती. त्यांनी मला पाठीवर अभिमानाने थाप मारुन असे सांगितले की त्यापूर्वीच अनेकांनी स्वतःहून त्यांची सेवा अर्पण केली आहे व ते सर्वजण कामासही लागले आहेत व म्हणून दिल्लीस मी येण्याची जरुरी नाही. परंतु जरुरच पडली तर तुला बोलावून घेईन. त्या नंतर, केव्हाही त्या अभियोगात मला बोलावण्याचे कारण पडले नाही. अनेकजणांनी ते कार्य पार पाडले. स्वा. वीर सावरकरांवर तो घृणास्पद आरोप ठेवून त्यांच्या प्रखर देशनिष्ठेची नि असीम त्यागाची बोळवण स्वदेशी सरकारने, अशा हीनतेने  करावी याची चीड माझ्यासारख्या अनेकांना होती व त्यामुळेच आमच्यातील ‘वकील’ स्वेच्छेने जागा झाला होता. कोणत्याही मूल्याची अपेक्षा न करता, व ‘स्वार्था’ला तिलांजली देऊन व त्यावेळी उफाळलेल्या लोकक्षोभाची तमा न बाळगता, आमच्यातील ‘वकील’ स्वातंत्र्यवीर सावरकरांना व अमूर्त स्वरुपातील देशभक्तीच्या भावनेला न्याय मिळवून देण्यासाठी, निर्वेतन समाजसेवा धैंर्याने करण्यास पुढे झाला होता. वकिली व्यवसाय करताना स्वतःच्या मनापुढे या उच्च ध्येयाचा ध्रुवतारा, माझ्यासमोरुन कधीही ढळला नव्हता.
वकिली धंद्यात पदार्पण करताना, ही उच्च भूमिका माझ्या मनात होतीच परंतु त्याशिवाय या वकिली धंद्याबद्दल जे तुच्छतेने बोलले जाते त्याचे निराकरण, आपल्या वर्तणुकीने आपण करावे हाही विचार माझ्यापुढे या धंद्यात पदार्पण होताना माझ्या ठायी होता.
तरुण भारत, सोलापूर, रविवार, दि. ०४ डिसेंबर २०११
Posted by : | on : 5 Dec 2011
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *