Home » Blog » वाल्मिकी कोणाला हवाय? वाल्याच हवा

वाल्मिकी कोणाला हवाय? वाल्याच हवा

पंचनामा : भाऊ तोरसेकर

ठरा वर्षापुर्वीची गोष्ट आहे. तेव्हा अण्णा हजारे फ़ारसे प्रकाशात नव्हते. आज जेवढा त्यांच्या नावाचा गवगवा चालू आहे, तेवढा प्रकाशझोत तेव्हा मुंबई महापालिकेचे उपायुक्त गो. रा. खैरनार यांच्यावर होता. जणू या देशातला वा समाजातला संपुर्ण भ्रष्टाचार एकटे खैरनार घण घालून जमीनदोस्त करणार, अशीच माध्यमांची समजूत होती. अर्थात तेव्हा उपग्रह वाहिन्यांचा जमाना आलेला नव्हता. त्यामुळे लोकांना बातम्यांसाठी छापील वृत्तपत्रांवर अवलंबूण रहावे लागत होते. आणि तेव्हाचे पत्रकार छापून येणार्‍या वृत्तपत्रातूनच ब्रेकींग न्यूज देत असत. सहाजिकच दिवसात दोनदाच म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी ब्रेकींग न्यूज लोकांना मिळू शकत असे. आजच्यासारखा दिवसभर ब्रेकींग न्यूजचा पाऊस पडत नसे. अशा कालखंडात खैरनार यांनी मोठीच धमाल उडवली होती. जगातले तमाम सत्य त्यांनाच गवसले आहे किंवा भ्रष्टाचार निपटून काढण्याची ताकद त्यांच्यात मनगटात सामावलेली आहे, अशी निदान पत्रकारांची समजूत होती. त्यामुळेच खैरनार बोलतील ते ब्रह्मवाक्य, म्हणून बिनधास्त छापून टाकले जात होते. त्यांचे जनक अर्थात नवाकाळचे बादशहा संपादक निळूभाऊ खाडीलकर होते. त्यांनीच हाती घण घेतलेले विविध कोनातले खैरनारांचे फ़ोटो छापून, त्यांना नव्या युगाचे प्रेषित बनवले होते. बाकीच्या वृत्तपत्रांनी व पत्रकारांनी उशीरा खैरनारांमध्ये रस घेतला. वास्तविक एक सार्वजनिक सेवेतला अधिकारी म्हणून खैरनार यांनी आपल्या बोलण्याला लगाम आवणे भाग होते. पण ते कुठल्याही विषयावर बेधडक बोलायचे. बेछूट बोलायचे. त्यातूनच एके दिवशी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करून टाकले. तेवढेच नाही तर पवारांना वाल्याचा वाल्मिकी व्हावे असाही सल्ला देऊन टाकला.

   मग त्यातले सत्य व तथ्य तपासायला कोणाला वेळ होता? धडाधड ते आरोप व खैरनारांचा सल्ला छापला गेला आणि गाजू लागला. अशा आरोपांकडे पाठ फ़िरवणे पवारांना शक्य नव्हते. कारण ते स्वत: राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि दुसरे कारण आरोप कुणा विरोधी पक्ष वा नेत्याने केलेला नव्हता, तर राज्यातल्या एका जबाबदार अधिकारी व्यक्तीने केलेला आरोप होता. त्यामुळेच पवारांना खैरनार यांच्यावर कारवाई करणे भाग होते. त्यांनी खैरानारांचा सल्ला स्विकारून वाल्मिकी होण्याऐवजी खैरनारांनाच “रामराम” म्हणायची पाळी आणली. मग खैरनारनाही वाल्याप्रमाणेच रामराम ऐवजी “मरा मरा” असे म्हणायची वेळ कित्येक वर्षे आली होती. ही वाल्या कोळ्याची गोष्ट अनेक पिढ्या आपण ऐकत आलो आहोत. हजारो चुका करून, गुन्हे करूनही पश्चात्ताप झाल्यास मोक्ष मिळू शकतो, असा त्यातला बोध आहे. माणूस चुकतो. पण चुक सुधारण्याची त्याची प्रामाणिक इच्छा असेल तर त्याला संधी दिली पाहिजे आणि संधी मिळते असेच त्यातून सुचवायचे आहे. आजही अनेकजण भ्रष्टाचार करणार्‍यांना तोच सल्ला देत असतात. पण खरेच किती लोकांना वाल्या नको आहे? किती लोकांना आपल्या भोवतालच्या वाल्यांनी वाल्मिकी व्हावे असे वाटते? की त्यांना सर्वांना वाल्याच हवा आहे? अगदी तुम्हाला आम्हाला वाल्याचा वाल्मिकी व्हायला हवा आहे, की आपण मिळेल तिथे वाल्याच्या शोधात असतो?  
   विचित्र प्रश्न आहे ना? काहीतरी गफ़लत आहे, असेच वाटते ना? पण माझ्या प्रश्नात कुठेही गफ़लत नाही. अगदी साधासरळ स्पष्ट असा हा प्रश्न आहे? आपल्याला खरोखरच कोणी वाल्मिकी नको आहे आणि मिळालाच तर प्रत्येक जागी वाल्याच हवा आहे काय? मला तरी तसेच वाटते. आपण हल्ली सतत सगळीकडे वाल्यांचा शोध घेत असतो. चुकून आपल्या वाट्याला कोणी वाल्मिकी आलाच, तर त्याला बगल देऊन आपण निसटतो. कधी हिंमत झालीच तर त्याला स्पष्ट बोलून पळवून सुद्धा लावतो. मला वाटते, अधिक लिहिण्यापुर्वी आधी पुन्हा ती वाल्याची गोष्ट जरा आठवून पहावी. काय आहे ती गोष्ट?
   वाल्या कोळी नावाचा एक वाटमारी करणारा डाकू होता. रस्त्यात दबा धरून बसायचा आणि एखादा वाटसरू भेटला, मग त्याला लूटायचा वा मारून टाकायचा. त्यातून मिळणार्‍या पैशावर, संपत्तीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. तोच त्याचा धंदा होता, पेशा होता. एकदा त्याच्या तावडीत नारदमुनी सापडतो. तो वाल्याला एक शंका विचारतो. जे पाप तो करतो आहे, त्याचे लाभ त्याच्या कुटुंबियांना मिळतात. पण त्यामुळे जो पापाचा बोजा त्याच्या डोक्यावर चढतो आहे, त्यातही हे त्याचे कुटुंबिय सारखेच भागिदार आहेत काय? वाल्या त्या प्रश्नाने चक्रावून जातो. नारदाला तो होकारार्थी उत्तर देतो. पण नारद त्याला खात्री करून घ्यायला सांगतो. मग वाल्या नारदाच्या शब्दावर विश्व्वास ठेवून घरी येतो आणि तेच आपल्या नातेवाईकांना विचारतो. तेव्हा सगळे कानावर हात ठेवतात. त्याच्या पापात भागीदार व्हायला कोणीही तयार नसतो. पण त्याने पापातून मिळवलेल्या  कमाईत मात्र सर्वांना भागी हवी असते. ते ऐकून मग वाल्याचा भ्रमनिरास होतो. त्याला पश्चात्तप होतो. तो माघारी येऊन नारदाचे पाय धरतो आणि त्याच्या मार्गदर्शनानूसार तपश्चर्येला बसतो. पुढे त्याचा वाल्मिकी होतो आणि तो रामायण नावाचे महान काव्य रचतो. हे असेच घडले का याचा कुठला पुरावा नाही. मुद्दा तो नाहीच.
   ही गोष्ट रामायणकार वाल्मिकीची थोरवी सांगण्यासाठी तयार झाली हे उघड आहे. पण ती थोरवी सांगताना त्यातच सामान्य माणसाच्या स्वभावधर्माचेही विश्लेषण आलेले आहे. पण वाल्मिकीच्या थोरवीने ते दुर्लक्षित राहिले आहे. त्याकडे कोणी गंभीरपणे बघत नाही. सवाल एकट्या वाल्याच्या पापाचा होता काय? साक्षीपुरावे तपासले तर त्याच्याच विरुद्ध पुरावे आहेत. त्याने गुन्हे केले हे तो नाकारत नाही. म्हणून तो शिक्षा भोगतो, तपश्चर्या करतो. पण त्याच्या पापाचे लाभ घेतलेल्यांचे काय? त्यांनी वाल्याचे कष्ट विभागून घेण्याचा विचार तरी केला काय? त्यांना कधी कुठला नारद भेटला नाही, की त्यांना कधी आपल्या पापातील भागिदारीची साधी जाणीवसुद्धा झालेली नाही. त्यामुळेच वाल्याचे कुटुंबिय कधी पापमुक्त झाले नाहीत, की तशा कुटुंबियांचा उद्धार कधी होऊच शकला नाही. उलट घराघरात गावा वस्तीत तशा स्वभावाचे लाखो करोडो लोक मात्र वाढत गेले. तेवढ्यावर ही अधोगती थांबली नाही. जो वाल्या सुधारणार नाही आणि गुन्हे करतच रहातो, त्याच्या बचावाला असे कुटुंबिय धावून येत राहिले. मग वाल्मिकी बाजूला पडला आणि वाल्यांची मागणी वाढत गेली व संख्या, पैदास वाढत गेली. आज त्यांना कोणी वाल्या म्हणत नाही, तर वेगवेगळ्या नावाने ओळखले जात असते.
   कुठे या आधुनिक काळातल्या वाल्यांना घोटाळेबाज म्हणतात, कुठे भ्रष्टाचारी म्हणतात, कुठे आदरणिय नेता म्हणतात, तर कुठे निवडून येण्याची क्षमता असलेले राजकारणी म्हणतात. कुठे कार्यसम्राट तर कुठे कर्मवीर वा महर्षि म्हटले जाते. त्यातला जो कोणी पकडला जातो, तेवढ्याला वाल्या म्हणतात आणि पकडला जात नाही तोपर्यंत तोच वाल्मिकी म्हणुन सन्मानाने मिरवत असतो. आणि अशा आधुनिक वाल्मिकी रुपात मिरवणार्‍या एका वाल्यानेच मला तो दृष्टांत दिलेला आहे. त्याच्याच कृपेने मी आज ही गोष्ट नव्या स्वरूपात वाचकांना सांगू शकतो आहे. जेव्हा अशा प्रकारे मी वाल्याची गोष्ट त्याला कथन केली, तेव्हा तो वाल्या हसला आणि म्हणाला; अहो नारदमुनी आज त्या गोष्टीतल्या सारखे प्रामाणिक व विवेकबुद्धी शाबूत असलेले नारद उरलेत कुठे आपल्या  पृथ्वीतलावर? कदाचीत तुम्ही एकटेच असाल आणि तुम्ही तर वाल्यांच्या वाटेकडे सुद्धा फ़िरकत नाही. मग वाल्मिकी निर्माण तरी कसे व्हायचे? उलट आजच्या युगातले अनेक नारदमुनीच वाल्याचे भागिदार झालेत आणि त्याला वाल्मिकी होण्यापासून परावृत्त करत असतात.
   आहे ना चमत्कारिक कहाणी? आधुनिक जमान्यातले वाल्या आणि नारदमुनी? नारद हा तिन्ही जगात अखंड भ्रमंती करणारा, तसाच कळलाव्या म्हणून प्रसिद्ध होता. आज जसे आपण ब्रेकिंग न्यूज देणारे बघत असतो, त्यांचा नारदमुनी हा पुर्वज. इथे भोलानाथाचे काही ऐकायचे आणि तिकडे जाऊन ब्रह्मदेवाच्या कानावर घालायचे, त्यावर त्याची प्रतिक्रीया मागायची. मग ब्रह्मदेवाने जे काही सांगितले, त्याला मीठमिरची लावून विष्णूच्या कानी घालायचे; हेच काम तेव्हा पुराणकाळात नारदमुनी करत होते ना? आज ब्रेकींग न्यूज देणारे काय वेगळे करतात? तिकडे दिल्लीत शरद पवारांच्या थोबाडीत कोणी मारले, तर लगेच अण्णा हजारेंना त्याची वार्ता सांगून त्यावर “एकही मारा” अशी प्रतिक्रिया मिळवून, थेट प्रक्षेपण करणारे नारदाचे आजचे वंशज नाहीत का? मग पुन्हा अण्णांची ती प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांना दाखवून त्यांच्या पुत्रधर्माची जाणीव त्यांच्यात जागवणारे नारदाचे आजचे वारस नाहीत का? दुसरीकडे स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा, चारा घोटाळा, आदर्श घोटाळा करणारे प्रत्यक्षात वाटमारीच करीत नाहीत काय? जो पैसा सामान्य जनतेचा आहे, तो इथून तिथे चालला असताना, वाटमारी करून हडप करणारे; वाल्याचे वंशज नाहीत? असे शेकडो लहानमोठे वाल्या आज प्रतिष्ठेने मिरवत असतात ना? त्यांच्या वाटेवर अखंड कॅमेरा व माईक घेऊन प्रतिक्षेत बसलेले नारद काय कमी आहेत? जेवढ्या वाहिन्या त्याच्या शंभर पटीने नारदांची संख्या आहे. त्यातल्या किती नारदांनी वाल्याला वाल्मिकी होण्याचा उपदेश केला आहे? की त्याच्या वाटामारीत भागीदारी करण्याचा प्रयास केला आहे?
   एखादा वाल्या पश्चात्तापाने दग्ध सुद्धा होत असेल. पण त्याला पश्चात्ताप होत असताना आमचे आधुनिक नारद,  त्याला तपश्चर्या करायला सांगणार्‍यांनाच उलट सवाल करू लागतात. वाल्याच्या पापाचे पुरावे मागू लागतात. आणि आपण सामान्य माणसे तरी किती स्वच्छ आहोत? किती प्रामाणिक आहोत? आपल्याला वाल्याने सुधारणे हवे आहे काय? त्याने घोर तपस्या करून वाल्मिकी व्हावे आणि सत्यवादी रामाची कहाणी सांगावी; अशी आपली तरी अपेक्षा असते काय? उलट आपल्याला आपल्या भागात एखादा वाल्या व्हावा अशीच अपेक्षा असते. आपण वाल्याचे भक्त झालेले आहोत. आणि भक्त म्हणण्यापेक्षा वाल्याचे कुटुंबिय म्हणणे योग्य होईल. जो कोणी इतरांचे काही बळकावून, लुबाडून आपल्याला आणुन देणार आहे, तो आपल्याला प्यारा असतो. शरद पवार यांनी बारामतीचा विकास खुप केला असे मी कित्येक वर्षांपासून ऐकत आलो आहे. पण तो विकास करताना त्यांनी राज्याच्या अन्य विभागातल्या विकासाच्या किती योजना, किती निधी, किती सुविधा व किती पाणी बारामतीकडे पळवून आणले, त्याचा कोणी कधी हिशोब दिला आहे काय? आज बारामतीच्या सभोवताली जे अनेक दुष्काळी तालूके आहेत, त्यांच्या हक्काचे पाणी बारामतीला वळवून व पळवून नेण्यात आलेले नाही, याची कोणी ग्वाही देऊ शकणार आहे काय? कुठल्याही गुंतवणुकीच्या, विकासाच्या योजना येताना मुख्यमंत्री वा अन्य कुठलाही सत्तेचा वापर करून शरदरावांनी बारामतीकडे वळवल्या ती वाटमारी नव्हती; असे धोरण नियमाच्या आधारे व प्रामाणिकपणे पवार सांगू शकतील काय? नसेल तर ती वाटमारी नाही काय?
   एक गोष्ट खरी आहे. या सर्व राजकीय कसरतीसाठी आरोपांचा बोजा पवारांनी आपल्या डोक्यावर घेतला आहे. त्या पापात सहभागी व्हायला किती लोक तयार असतील? असेच कमी अधिक प्रमाणात गावोगावी पसरलेले लहानमोठे वाल्या आहेत. कोणी तालूक्याच्या योजना आपल्या गावात आणून बळकावल्या. कोणी अशा योजनांचा पैसा वा निधी थेट गडप केला. कोणी अधिकाराचा वापर करून सामान्य जनतेची लूट वाटमारीप्रमाणेच केली आहे. अशा अनेक लोकप्रिय नेत्यांना आपण पुन्हा पुन्हा निवडून देतो. त्यांनी अन्य गावांच्या विभागांच्या योजना पळवताना सरकारी निधी वा साधनांची वाटमारी केलेली आहे. आपल्याला त्यातला हिस्सा हवा असतो. त्यातून आपला काही स्वार्थ साधला जावा, अशीच आपली अपेक्षा असते. त्याने पापकर्म सोडून साधू बनावे, प्रामाणिकपणे सार्वजनिक विकासाचे कार्य करावे, अशी आपली अपेक्षा असते काय? मग तो निवडून आलेला उमेद्ववार असो, की अधिकार पदावर जाऊन बसलेला आपला कोणी मित्र परिचित वा आप्तस्वकीय असो. त्याने वाल्या होऊन त्याच्या वाटमारीचे लाभ आपल्याला मिळवून द्यावेत, अशीच आपली अपेक्षा नसते का? आज ज्याला आपण बोकाळलेला भ्रष्टाचार म्हणतो, ती जागोजागी चाललेली वाटमारीच आहे ना? त्यातल्या कुठल्या वाल्याने पापक्षालन करून तपश्चर्या करावी आणि वाल्मिकी व्हावे, अशी आपली अपेक्षा असते? प्रत्येकाने आपल्याच मनाशी या प्रश्नाचे उत्तर द्यावे. खरेच आपण आजकाल वाल्मिकीच्या शोधात असतो, की कुठे वाल्या आपल्या मदतीला येईल अशा शोधात असतो? आपल्याला वाल्याच्या कुटुंबियांप्रमाणे पाप करणारा कोणी तरी हवा असतो. त्याच्या पापात भागिदारी नको असते. पण पापातले लाभ हवे असतात. आपल्यातले कितीजण ही वस्तुस्थिती नाकारू शकतील?
   तुकाराम ओंबळे आपल्या घरातला असावा असे किती लोकांना प्रामाणिकपणे वाटते? जे बदनाम पोलिस खाते आहे त्यातलाच तो एक होता. आज तो जीवंत असता तर त्याच्या अंगावरचा गणवेश बघून कितीजणांनी त्याला वाल्मिकी मानले असते? एका निर्णायक क्षणी त्याने स्वत:च्या नसेल, पण पोलिस खात्याच्या पापाचे परिमार्जन करण्यासाठी घोर प्रायश्चित्त करण्याचा निर्णय घेतला. आपण त्याला २६ नोव्हेंबर उजाडला मग गौरवतो. पण बाकीचे ३६४ दिवस आपल्याला तो आधुनिक वाल्मिकी आठवतो तरी काय? आपल्या आसपास वावरणारे आपलेच सगेसोयरे जेव्हा वाल्या कोळ्याप्रमाणे राजरोस वाटमारी करत असतात, त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याइतके तरी आपण प्रामाणिक राहिलो आहोत काय? त्या वाटमारीला आजकाल आपण कमाई म्हणू लागलो आहोत. त्यामुळेच वर्षातून एकदा वाल्मिकीला पिंड द्यायचा आणि रोजच्या जीवनात मात्र आपण वाल्याची पूजा बांधत असतो. मग तो पैसे खाणारा नगरसेवक असेल, अधिकारी असेल, आमदार वा मंत्री असेल. नैतिक जबाबदारी स्विकारून तेव्हा गृहमंत्री पदाचा राजिनामा देणारे आर आर आबा पुन्हा वर्षाभरात गृहमंत्री पदावर विराजमान झाले. याला आजकालच्या जमान्यातले पापक्षालन म्हणतात. जे लोकांच्या विस्मृतीवर अवलंबून असते. लोक आपल्याकडे बघत असतात, तोवर पश्चात्ताप करायचा. लोकांची पाठ वळली वा लोकांना विसर पडला, मग आपले पापक्षालन संपलेले असते. पहिल्याच श्राद्धाला त्याच ओंबळेला आबा श्रद्धांजली वहायला पुन्हा गृहमंत्री होतात, इतके काम सोपे झालेले आहे.
   त्याचवेळी नैतिकतेची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्रीपद सोडणारे विलासराव आता कोर्टाने ताशेरे झाडल्यावरही राजिनामा देण्याचा विचारही करत नाहीत, तिथे वाल्याची महत्ता लक्षात येऊ शकते. लातूरमध्ये त्यांनी मिळवलेले यश त्याच वाल्याची महत्ता सांगत असते. लातुरकरांना वाल्मिकीशी काही कर्तव्य असते काय? अजिबात नाही. त्यांना विलासरांवांच्या वाल्यागिरीचे खुप कौतुक आहे. अर्थात विलासरावांच्या पापात कोणी सहभागी होणार नाही. पण त्यांच्यामुळे जे लाभ मिलणार आहेत, त्यात प्रत्येक लातुरकरांना भागी हवी आहे. मुंबईत तेच बघायला मिळेल. ठाण्यात वा पुण्यात तेच आढळून येईल. सातारा असो की यवतमाळ, सिंधुदुर्ग असो की धुळे, सगळीकडे  आपण वाल्याचे कुटुंबीय होऊन बसलो आहोत. आपल्याला वाटमारी करून कमाई आणणारा वाल्या हवा असतो. प्रामाणिकपणे काम करणारा, विकासाची सचोटी दाखवणारा, सर्वांचा सर्वांगिण विकास करणारा नको आहे. सरकारी खर्चाने टीव्ही फ़ुकट देणारा, काहीतरी मो्फ़त देणारा व त्यासाठी वाटमारी करणारा आमदार, खासदार, पक्ष, सत्ता, सरकार आपल्याला हवे आहे. आपण वाल्यांच्या शोधात असतो. आणि मग वाल्या तरी कोणावर रोज दरोडे घालणार? कुठून लूट आणणार? मग तो आपल्या काहीजणांची लूट करतो आणि त्यातला काही हिस्सा आपल्या पैकी काहीजणांच्या तोंडावर मारतो. आपण खुश असतो. आपल्याला काही फ़ुकट मिळाले, म्हणून आपण आनंदी असतो. वाल्मिकी कोणाला हवा आहे? वाल्याचा पश्चात्ताप कोणाला हवा आहे? तुकाराम ओंबळे कोणाला हवा आहे?
   ज्या दिवशी वाल्याचे कुटुंबिय असल्याप्रमाणे वागायचे आपण बंद करू; त्या दिवसापासून परिस्थिती बदलू लागेल. वाल्याला मिरवायचे असेल, तर त्याला वाल्मिकी व्हावे लागेल. कारण नारदाचा उपदेश आता त्याला मिळू शकत नाही. आजच्या नारदाने त्याला वाटसरू लूटण्याऐवजी आपल्याच कुटूंबाला वा शेजार्‍यापाजार्‍यांना लुटून परमार्थ साधायचा चमत्कारिक उपदेश चालविला आहे. आजचा नारदच वाल्याच्या वाटमारीतला भागिदार झाला आहे. त्याचे उदात्तीकरण करू लागला आहे. आणि बिचारे वाल्याचे कुटुंबीयच वाल्याच्या वाटमारीचे बळी झाले आहेत. त्यामुळे वालाचा वाल्मिकी होणे ही त्याच्या कुटुंबाचीच गरज झाली आहे. मग सांगा, आपण वाल्याला सुधारण्याची मोहिम कधी व कशी सुरू करणार आहोत? कारण आजच्या युगातला वाल्या आपल्याच कुटुंबाला लुटू लागला आहे. आणि आपण मात्र आपला वाल्या दुसर्‍या कुणाला लुटून आपली सोय लावील, अशी भाबडी आशा बाळगून फ़सत चाललो आहोत. सांगा काय करायचे?
( ३/६/१२ )http://panchanaama.blogspot.in/
http://amarpuranik.in/?p=451
Posted by : | on : 17 June 2012
Filed under : Blog.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *