Home » Blog » शिवनारायण, श्याम तुम्ही लकी आहात

शिवनारायण, श्याम तुम्ही लकी आहात

 सडेतोड : अरुण रामतीर्थकर

तुम्हाला प्रश्‍न पडला असेल की, हे दोघे कोण आणि त्यानंा नशिबवान का म्हणायचे! त्यांना लॉटरी किंवा मटका लागलेला नाही, त्यांचा घोडा रेसमध्ये पहिला आला असेही नाही. आणि तसे असते तर मी त्यांना लकी म्हटले नसते. मटका, लॉटरीतून कितीसे मिळतात. दिल्लीत कॉंग्रेसवाले आणि त्यांचे मित्र मटका न लावता अब्जावधी रु. कमावत आहेत. मटक्यातून एखाघाला पाच पन्नास हजार रु. मिळाले तर त्याला लकी म्हणण्याचे दिवस मागेच संपले. कोणताही आर्थिक लाभ झालेला नसताना या दोघांना मी लकी म्हणतो. कोणतीही निवडणूक न लढवता पंतप्रधान झालेले मनमोहनसिंग किंवा शिर्डी, सिद्धी विनायक ट्रस्टवर  नेमणूक होऊन पैशात लोळणारे महाभाग यांच्या सुदैवापेक्षा शिवनारायण, श्याम हे दोघे आधिक सुदैवी आहेत.
या दोघांवर खूदा मेहरबान झाला, परमेश्‍वर प्रसन्न झाला, न्यायदेवतेने डोळयावरची पट्टी सोडून त्यांच्यावर कृपाकटाक्ष टाकला आणि मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणात तीन वर्षापूर्वी अटक झाली असताना ३ ऑगस्टला या दोघांना चक्क जामीन मिळाला. तुम्ही म्हणाल, काय वेडगळपणा आहे. जामीन मिळणे हा न्याय प्रक्रियेतील एक नेहमीचा भाग आहे. रोज देशभरात हजारो आरोपींचे जामीन होत असतील. त्यात या दोघांना जामीन मिळाला तर त्यात मला हर्षवायू होण्याचे कारण नाही. पण महाराज, हे एवढे साधेसुधे प्रकरण नाही. दस्तरखुद्द सोनिया गांधी, त्यांना इटालियन म्हणत त्यांचे शार्गीद झालेले शरद पवार, चिदंबरम झालेच तर तो तोंडाळ दिग्विजयखान. ही  सारी मंडळी अतिरेक्यांना धर्म अतिरेक्यांना धर्म नसतो असे म्हणत हिंदु टेररीस्ट असा जप करायला लागली. नेमणूक आणि पगार त्यांच्याकडून मिळणार म्हटल्यावर  करकरेेंची एस. आय. टी. उत्खनन करायला लागली. देशातील दहशती कारवायांबद्दल जे जे पकडले ते मुस्लिम निघाले. तो योगायोग नव्हता वस्तुस्थिती होती. कांही मुस्लिम आणि बिनबुडाच्या सेक्युलरोनी मग ओरड सुरू केली. प्रश्‍न आला व्होट बँकेचा. एक गठ्ठा मताचा. अशी गठ्ठा मते मिळतात म्हणूनच कपील सिब्बल अण्णा हजारेंना दिल्लीच्या चांदणी चौक मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवायचे आव्हान देतात. व्होट बँक हातची जाणे म्हणजे सत्ता गमावणे. स्फोट होतच होते. माणसे मरत होती. जनमत प्रक्षुब्ध होत होते. कात्रीत सापडल्यावर नवी आयडिया काढली. स्फोटातील आरोपी पकडत असतानाच कांही स्फोटाबद्दल हिंदुंना पकडायचे. त्यांना अतिरेकी ठरवायचे. त्यांतल्या त्यात भगवे कपडे धारण करणार्‍यांना टार्गेट करायचे म्हणजे हिंदु टेररिस्ट हा शब्द परफेक्ट कॉंईन होईल.
हेमंत करकरेंच्या एस. आय. टी. ने ही जबाबदारी घेतली.आगापिछा न पाहता मालेगाव,हैद्राबाद, अजमेर आणि समझोता एक्स्प्रेस असे चार चार स्फोट हिंदुंच्या नावावर जमा केले. साध्वी प्रज्ञासिंह, स्वामी असीमानंद आणि इतर यांना पकडले. रा. स्व. संघ, बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद एवढेच काय स्वातंत्र्यवीर सावरकरांची अभिनव भारत ही संघटना या सर्वांवर राळ उडवण्यात आली. या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी झाली. शरद पवार म्हणजे तर ग्रेट माणूस मालेगाव स्फोटाबद्दल प्रज्ञासिंगला पकडल्यावर ‘‘ बघा आता देशातील बॉंबस्फोट थांबले.’’ असे विधान केले. जणू मार्च १९९३ मधील मुंबई स्फोटापासून जुलै २००८ मधील मालेगावच्या स्फोटापर्यंत सर्व स्फोट हिंदुनीच केले असे शरद पवार सुचवत होते. आता त्यांची बोलती बंद झाली आहे.
मुस्लिम पकडले म्हणून हिंदु पकडायचे म्हणून अनेक हिंदु पकडले. त्यात हे शिवनारायण आणि श्याम या दोघांचा समावेश होता. त्यांना ३ वर्षे तुरुंगात ठेवूनही एस. आय.टी आणि एन. आय. ए. ला कस्पटा एवढाही पुरावा सापडला नाहीु. सज्जड पुरावा आहे म्हणत त्यांनी ३६ महिने न्यायालयाला फसवले. आता न्यायालयानेच त्यांना भंपक तपास यंत्रणा ठरवत या दोघांना जामीन दिला. या दोन अन्वेषण संस्थात हुशार अधिकारी निवडले जातात की गणंग टाकाऊ, असे अधिकारी नेमले जातात अशी शंका आहे.
अतिशयोक्ती नाही, पण खरच हिंदु अतिरेकी म्हणून भरलेले खटले वेडगळपणाचे आहेत. त्यात राष्ट्रहिताचा विचार झाला नाही. कर्नल पुरोहितावर समझोता एक्स्प्रेसमधील स्फोटाचा आरोप आहे. लष्करातून आरडीएक्स चोरून ते स्फोटासाठी वापरले. हा प्रारंभीचा आरोप. डब्याची तपासणी झाली त्यात स्फोटासाठी आरडीएक्सचा वापरच झाला नाही असा निष्कर्ष निघाला. त्याचवेळी लष्कराने जाहीर केले की आमच्या साठयातील एक ग्रॅमही आरडीएक्स चोरीस गेलेले नाही. म्हणजे पुरोहितांवरील आरोप साफ खोटे. खरे असते तर ३ वर्षात खटला का उभारला गेला नाही?
आय. एस. आयच्या कारवायात पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांचा सहभाग उघड झाल्यावर पाकिस्तान कर्नल पुरोहितांचे नाव घेऊ लागला. म्हणजे खोटा खटला भरून आपण  आपलेच नुकसान करून घेतले.साध्वी प्रज्ञा यांचेही तसेच घातपाताच्या कबुलीसाठी १४ वेळेस नार्को टेस्ट झाली.त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊन त्या रुग्ण झाल्या. कसाबचे लाड चालु देत. साध्वी प्रज्ञा यांना औषधोपचार मिळत नाही. खायला कदान्न मिळते. त्यांच्यावर मालेगाव स्फोटाचा आरोप आहे. ३ वर्षात एकही पुरावा नाही. तरीही तुरुंगात स्वामी आसिमानंद यांची कबुली म्हणजे एक जोक कोठडीत छळ करून कबुली घेतली. कोर्टात स्वामींनी धळामुळे दिलेला कबुली जबाब नाकारला. ही सर्व मंडळी निरपराध असताना कोठडीत आहेत. हिंदु असणे हा त्यांचा एकमेव  अपराध आहे.
शिवनारायण आणि शामराव. ३ वर्षानंतर का होईना तुम्ही जामीनावर सुटला. आप्तांना भेटाल, घरचे जेवाल. हिंदु म्हणून कोठडीतच तुमचा मृत्यू घडवून आणण्याचा कट होतो.त्यातून वाचला. प्रज्ञासिंह, पुरोहित, आसिमानंद यांच्यापेक्षा तुम्ही सुर्देवी नाही का? हे तिघे आणि कशात भाग नसताना पकडलेले इतर यांचे मरण कोठडीतच असावे का हे त्या आंधळया न्यायदेवतेलाच माहिती. शिवनारायण आणि श्याम. कॉंग्रेसी कटामुळे तुमच्या आयुष्यातील ३ वर्षे वाया गेली तरी उर्वरित आयुष्य तुम्हाला मिळाले आहे याबद्दल देवाचे आभार माना.
हिंदु म्हणून या देशात अन्याय कसा होतो याचे आणखी एक उदाहरण देतो. गुजरात दंगलीत जोहरा आणि बिस्किस या दोघींवर अत्याचर झाला. मोठी दंगल होती. घर कोणी पेटवले त्यांना माहिती नाही. पण तिस्ता सेटलवाड या बयेने या दोघींना भरीस घातले.आजुबाजुच्या ४०-५० लोकांची , अर्थात हिंदु नावे घेतली. खटला झाला. नंतर मुंबईत वर्ग झाला. ३ वर्षानी जोहरालाच अपराधी वाटले. तिने पत्रकार परिषद घेऊन तिस्ताच्या सांगण्यावरून मी ही नावे घेतली. प्रत्यक्षात ते आरोपी नाहीत.. त्यातील काहींनी दंगल काळात मला मदतच केली होती असे े सांगितले. मग सर्व ‘आरोपी’ सुटले. खोटा खटला उभा केला म्हणून तिस्ता सेटलवाडकर कोणतीच कारवाई झाली नाही. होणारही नाही. कारण हिंदुंना निष्कारण छळणे हा या देशात अपराधच होत नाही. त्या उलट झाले तर मात्र महापाप.
 असो, एसआयटी आणि एनआयए वाल्यांनो तुम्ही साध्वी, स्वामी  अशा हिंदु अतिरेक्यांना पूर्वीच पकडले आहे. अजून पुरावा सापडत नाही. तुम्हाला एक मैत्रीचा सल्ला देतो. तुमचे ते प्रशिक्षण गुंडाळून ठेवा. ऍगाथा ख्रिस्तीच्या कादंबर्‍या वाचा. तिचा नायक हर्क्युल. पायरो हा कसा धडा लावतो. ऍगाथाची एक नायिका जेन मार्पल आहे. ७० वर्षाची ही वृद्धा अपंग आहे. खूर्चीत बसून ती गुन्ह्याची उकल करते. ऑर्थर कौननडाईलचा शेरलॉक होम्स कशी बुद्धी चालवतो ते वाचा. या वाचनाने थोडी तरी अक्कल येईल . इंग्रजी कांदंबर्‍यांचे वाचन भारी पडत असेल, तर आपल्या बाबुराव अर्नाळकरांच्या कादंबर्‍या वाचा. त्यांचा धनंजय , काळा पहाड हे कसे खरे आरोपी पकडतात ते कळेल. पण उपयोग काय? ‘ हिंेदु टेररिस्ट ’ हा शब्द सरकारला रुढ करायचाय. तुम्ही बुद्धी वाढवून तरी उपयोग काय?
रविवार, दि. ०७ ऑगस्ट २०११

http://amarpuranik.in/?p=489
Posted by : | on : 8 February 2012
Filed under : Blog.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *