Home » Blog, पंचनामा: भाऊ तोरसेकर, स्थंभलेखक » समाजाला संवेदनाशून्य बनवणारा बौद्धिक एड्स

समाजाला संवेदनाशून्य बनवणारा बौद्धिक एड्स

•पंचनामा : भाऊ तोरसेकर•

sad boyएड्स हा काय प्रकार असतो? त्याला रोग म्हणता येत नाही. कारण त्या आजाराने कोणी मरू शकत नाही. पण एकदा त्याची बाधा झाली, मग तुम्ही इतर कुठल्याही आजाराने मरू शकता. इतर कुठलाही रोग तुमचा जीव घेऊ शकतो. याचे कारण असे, की एडस तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्तीच नष्ट करीत असतो. माणसाला आजार वा रोगबाधा होते, तेव्हा त्याचे जंतू शरीरात प्रवेश करत असतात. त्यांच्यावर उपाय म्हणुन आपण औषधोपचार घेतच असतो. पण त्याच्याही आधी आपले शरीर आपोआपच त्या रोगाशी लढू लागलेले असते. तशी जन्मजात व्यवस्थाच शरीरात उपजत असते. एडस त्याच प्रतिकारशक्तीला खच्ची करत असतो. एकदा शरीरातील ही शक्ती खचली, मग बारिकसारीक आजारही असाध्य होऊन जातात. म्हणुनच एडस कुठल्याही प्राणघातक रोगापेक्षा भय़ंकर आजार मानला जातो. जी गोष्ट मानवी आरोग्याची आहे तीच समाज आरोग्यालाही लागू होत असते. कुठलाही समाज हा त्याच्या प्रतिकारशक्तीवर टिकून रहात असतो. नैसर्गिक व इतर कुठल्याही आपत्तीमधुन माणसाला टिकून रहायचे असेल, तर त्याच्यात उपजत बचावाची प्रवृत्ती असते, तशीच देहात प्रतिकारशक्ती असते. या दोन गोष्टीवर मात केली, तर माणसाला संपवणे शक्य असते.

शिकारी श्वापदाने नरडीचा घोट घेतलेल्या हरीण, गाय यांची अवस्था आपण बघतो ना? ते जिवंत असतात. पण शिकार्‍याने त्यांना इतके जायबंदी केलेले असते, की ते प्राणी उघड्या डोळ्यानी आपला फ़डशा पाडला जात असताना बघतात. पण काहीही करू शकत नसतात. एडस वा अनिच्छा ही तशीच अवस्था आहे. आणि हे फ़क्त जखमी, रोगबाधीत माणसासाठीच खरे नाही. चांगल्या धडधाकट माणूस व समाजासाठीही खरे असते. लढण्याची, प्रतिकाराची इच्छाच नसेल, तर हाताशी हत्यार शस्त्र असून उपयोग नसतो. त्यामुळेच तुमचे शत्रु तुम्हाला मारण्यासाठी हत्यार वापरण्यापेक्षा आधी तुमची प्रतिकारशक्ती वा इच्छाशक्ती मारण्याचा विचार करत असतात, तसा डाव खेळत असतात. प्रतिकाराला घाबरलेला जमाव, पळत सुटणारी गर्दी, कळप, यांच्यासमोर एखादा बंदुकधारी सुद्धा शुर असतो. कारण तो तुमच्यपेक्षा बलवान नसतो, तर तुम्ही त्याच्याशी दोन हात करायची इच्छाच गमावून बसलेले असता. एडस माणसाची तशीच अवस्था करून टाकतो. तो माणसाला संवेदनाशून्य करुन टाकतो. इच्छाहीन करून सोडतो. मग अशी माणसे मृत्यूची प्रतिक्षा करत जगत असतात. त्यांना मारण्याची गरज नसते. आज आपण भ्रष्टाचार, गैरकारभार, अन्याय, अत्याचार, घातपात, दहशतवाद, अनागोंदी, अराजक यांनी इतके गांजलेले आहोत, की आपण त्याचा प्रतिकार करायची इच्छाच गमावून बसलो आहोत. अधुनमधून आपण तावातावाने त्याच्या विरुद्ध बोलत असतो. पण त्याच्याविरुद्ध लढायची वेळ आली, मग काढता पाय घेत असतो. अगतिक होऊन त्याच्याकडे बघत बसतो. कोणीतरी येऊन यातून सुटका करावी, अशी आपली अपेक्षा असते. आणि अशी आपली अवस्था कोणी केली आहे? आपल्यातली प्रतिकारशक्ती कोणी संपवली आहे? कधी याचा बारकाईने शोध आपण घेतला आहे काय?

माणसावर विषप्रयोग केला तर तो लगेच शोधून काढता येतो, तेवढे विज्ञान आता पुढारले आहे. पण गुन्हेगार हा नेहमीच कायदा व पोलिसांच्या पुढे एक पाऊल असतो असे म्हणतात. त्यामुळेच पकडला जाऊ नये म्हणुन गुन्हेगार गुंतागुंतीचे मार्ग शोधत असतो. सहाजिकच हल्ली अनेकजण पकडला जाणार नाही असा विषप्रयोग करत असतात. त्याला स्लो पोयझनिंग असे म्हटले जाते. क्रमाक्रमाने ज्याचा विपरित परिणाम साधला जाईल, असा तो विषप्रतोग असतो. त्यातून शरीरातील एक एक अवयव निकामी होत जातात. आणि अखेरीस शरीर त्या विषाचा बळी होत असते. पण ते विष तपासात सापडू शकत नाही. आपल्या समाजमनावर असाच एक संथगतीने विषप्रयोग गेल्या काही वर्षात चालू आहे. त्यातून आपला समाज असा निष्क्रीय, निराश, वैफ़ल्यग्रस्त बनवण्यात आलेला आहे. त्याच्या संवेदना पद्धतशीर रितीने बधीर करण्यात आलेल्या आहेत. राग, लोभ, उत्साह, तिव्रता, प्रक्षोभ, प्रतिसाद, चिंता या सगळ्या मानवी स्वभावाच्या उपजत प्रतिक्रिया असतात. कोणी अंगावर धावून आला तर त्याचा प्रतिकार करणे, स्वत:चा बचाव करणे, ही माणसाची उपजत प्रवृत्ती असते. तसे तो वागत नसेल तर तो दोष असतो. ती संवेदनाशून्यता असते. अशी प्रतिक्रिया नैसर्गिक असते आणि असायला हवी. ती नसती तर जगात कधी माणूस कोणाशी लढला नसता. लढाया झाल्याच नसत्या. जो बलवान त्याच्यासमोर बाकीचे नतमस्तक होऊन जगले असते. पण माणुस भावनाप्रधान असतो म्हणुनच तो प्रतिक्रिया देतो.

जसा सचिनच्या शतकानंतर तो नाचू लागतो तसाच सचिनचे शतक हुकले तर नाराज होतो. भारतिय संघ जिंकल्यावर फ़टाके वाजवणाराच पराभव झाल्यावर खेळाडूंच्या घरावर दगड फ़ेकायलासुद्धा जातो. त्याचे जेवढे प्रेम खरे असते, तेवढाच त्याचा संतापसुद्धा खरा असतो. त्यालाच माणुस म्हणतात. याऐवजी दोन्ही प्रसंगी शांत बसणारा संवेदनाशून्य असतो. त्याला त्या क्रिकेटशी काहीही कर्तव्य असू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्या सर्वजनिक जीवनात घडणार्‍या घटनांबद्दल सौम्य वा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतो तोच खरा माणूस असतो. नसेल त्याच्यात आणि कत्तलखान्यातील बोकडामध्ये कुठलाही फ़रक नसतो. आज आपल्यातली ती प्रतिकारशक्तीच प्रयत्नपुर्वक संपवण्यात आलेली आहे. ते काम मोठ्या प्रमाणात माध्यमांकडून करून घेतले जात आहे. त्यासाठी माध्यमात प्रचंड प्रमाणात भांडवल गुंतवणूक करण्यात आलेली आहे. त्यातून जी स्वतंत्र वृत्तपत्रे आहेत, स्वयंभू नियतकालिके आहेत, त्यांना चालू रहाणे, व्यवहारी दृष्टीने चालू रहाणे अशक्य व्हावे अशी परिस्थिती जाणिवपुर्वक निर्माण केलेली आहे. जास्त पाने, कमी किंमत यातून अशी वैचारिक पत्रे बंद पाडली. मग लोकांपर्यंत जाणार्‍या माहितीची सर्व सुत्रे ठराविक लोकांच्या हाती येतात. मग आपल्याला हवे तसे लोकांचे मत बनवता येते. त्यातूनच हा संथ विषप्रयोग करण्यात आलेला आहे.

एक नमुना इथे मी देईन. कुठेही घातपात झाला मग तात्काळ लोकांचा प्रक्षोभ होत असतो. तर त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले जाते. ते ठीकच आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे त्यावर मेणबत्त्या पेटवण्याचा तमाशा सुरू केला जातो. जणू मेणबत्त्या पेटवणे हे दहशतवाद संपवण्याचे एकमेव जालिम औषध असावे असा तमाशा मांडला जातो. कुणावर संशय घेऊ नका, दहशतवादाला धर्म नसतो, असली भंपक भाषा सुरू होते. मारल्या गेलेल्या लोकांबद्दल सहानुभुती बाजूला रहाते आणि संशयीतांच्या धरपकडीत कोणावर अन्याय झाला, त्याचाच गवगवा सुरू होतो. पोलिस पकडतात त्याच्याबद्दल सहानुभुती आणि घातपातात मारले गेलेत त्यांच्याविषयी अवाक्षर काढले जात नाही. जणु मेलेत ते मरण्यासाठीच जन्माला आलेले असावेत आणि ज्याच्याबद्दल संशय आहे, ज्यांची धरपकड झाली, त्यांच्या अन्यायासाठीच लढायला हवे असे सुचवले जात असते. जीवानिशी मेले त्यांच्याविषयीची ही अनास्था काय सांगते? उलट ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्याबद्दलची आपुलकी काय सांगते? जनमानसावर कोणता परिणाम घडवते? तुम्ही आपल्या सुरक्षेसाठी भांडू नका तर संशयीत असतील त्यांच्यासाथी भांडा. तोच माणुस असण्याचा दाखला आहे.

घातपात होऊनही मुंबई पुणे दुसर्‍या दिवशी कार्यरत होते, ही माणुसकीची नव्हे तर संवेदनशून्यतेची साक्ष असते. त्याचेच कौतुक केले जाते. यालाच मी स्लो पोयझनिंग म्हणतो. आज मुंबई वा देशात अनेक ठिकाणी स्फ़ोट झाले त्यात मेलेल्या वा जखमी झालेल्या अनेकांना न्याय वा मदत अजु्न मिळालेली नाही. पण त्यांची कुठले माध्यम दादफ़िर्याद घेत नाही. पण एखाद्या संशयीत घातपात्याला पोलिसांकडून वाईट वागणूक मिळाली असेल तर त्यावर सतत कार्यक्रम चालू असतात. यातून समाजाच्या मनात असलेली चीड नष्ट करण्याचा पद्धतशीर प्रयास होत असतो. नेते, कार्यकर्ते यांना डिवचायचे, चिडवायचे. पण त्यांनी चिडून प्रतिक्रिया दिली, मग मात्र त्यांनाच गुन्हेगार ठरवायचे. थोडक्यात अपमानित होणे, हल्ले सहन करून प्रतिकार न करणे, अवहेलना सहन करणे म्हणजे जागरुक समाज अशी चुकीची मुर्दाड मनोवृत्ती जोपासली जात आहे. त्यालाच मी स्लो पोयझनिंग म्हणतो.

आज आपण अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, अनाचार, अराजक निमुटपणे सहन करतो, कारण याप्रकारे आपल्या उपजत प्रतिकार शक्तीला खच्ची करण्यात आलेले आहे. ते काम मोठ्या प्रमाणात माध्यमांकडून करून घेतले जात आहे. त्यासाठी मग तर्कशुद्ध खोटे बोलु शकणारे लिहू शकणारे बुद्धीमंत कामाला जुंपण्यात आलेले आहेत. त्यांना आपण घडघडीत खोटे बोलतो व लिहितो हे चांगलेच ठाऊक असते. म्हणुनच ते कधी त्यांच्या प्रामाणिकपणाचा दाखला द्यायला पुढे येत नाहीत, कोणी तसे विचारले तर ऐकले नाही, बघितले नाही असे भासवून पळ काढतात. तोंड लपवून बसतात. अगदी बेशरमपणे खोटरडेपणा चालूच ठेवतात. आणि हे जगात पहिल्यांदाच घडते आहे असेही मानायचे कारण नाही. अस्पृश्यता ही काय वेगळी भानगड नव्हती. त्या दलितांना असेच प्रतिक्रियेपासून परावृत्त करण्यात आले होते. अन्याय सोसून जगण्याची सवय त्याच्या हाडीमाशी खिळवण्यात आलेली होती. त्याचाच हा आधुनिक प्रयोग चालू आहे. मी इथे ज्यांना सवाल करतो, दाखले मागतो, पुरावे देऊन उत्तर मागतो, ते गप्प रहातात, कारण त्यांच्यापाशी त्याच्या खरेपणाचा पुरावाच नाही ना? समाजाला संवेदनाशुन्य बनवण्याच्या कारस्थानातले भागिदार कुठल्या तोंडाने खुलासा करणार? कसली सफ़ाई देणार?
( http://bhautorsekar.blogspot.in/  )

Posted by : | on : 22 November 2012
Filed under : Blog, पंचनामा: भाऊ तोरसेकर, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *