Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राष्ट्रीय, स्थंभलेखक » सुभाषबाबूंचा आत्मा कॉंग्रेसला क्षमा करणार नाही!

सुभाषबाबूंचा आत्मा कॉंग्रेसला क्षमा करणार नाही!

•चौफेर : अमर पुराणिक•

गेल्या ६० वर्षात नेताजींच्या फाईल्स दाबून ठेऊन कॉंग्रेसने खेळलेल्या अनेक घाणेरड्‌या खेळी बाहेर पडत आहेत. शिवाय यातील अनेक पुरावे, फाईल्स कॉंग्रेस सरकारने नष्ट केल्या असण्याची शक्यता जास्त आहे. केंद्रात जवळजवळ कायमच कॉंग्रेसचेच सरकार होते. पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारित त्या फाईल्स असल्यामुळे ते पुरावे नष्ट केले असल्याच्या संशयाला दुजोरा मिळतो. सेक्यूलरवादाचा जप करत कॉँग्रेसने विशेषत: नेहरु-गांधी घराण्याने मोगलशाहीच राबवली आहे.

netaji subhashchandra bose4नुकतेच पश्‍चिम बंगालच्या सत्तारुढ सरकारने गेल्या शुक्रवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधीत ६४ फाईल्स सार्वजनिक केल्या. आणि त्यामुळे नव्याने काही मुद्दे जगासमोर आले. १९४५ मध्ये विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाला होता ही बाब खोटी ठरली आहे. तर नेताजींच्या कुटुंबातील सदस्यांवर पाळत ठेवली जात होती, ते १९६४ पर्यंत ते हयात होते, तर दुसर्‍या माहितीप्रमाणे गुमनामी बाबांच्या रुपात सुभाषबाबू १९८५ पर्यंत जीवीत होते, याशिवाय अनेक मुद्दे समोर येत आहेत. केंद्र सरकारही लवकरच पंतप्रधान कार्यालयाच्या अख्त्यारित असलेल्या गोपनिय फाईल्स सार्वजनिक करण्याची शक्यता आहे.
नेताजींसंबंधित फाईल्स सार्वजनिक केल्यानंतर अनेक बाबींचा पुर्नविचार करावा लागणार आहे. गेल्या ६० वर्षात नेताजींच्या फाईल्स दाबून ठेऊन कॉंग्रेसने खेळलेल्या अनेक घाणेरड्‌या खेळी बाहेर पडत आहेत. शिवाय यातील अनेक पुरावे, फाईल्स कॉंग्रेस सरकारने नष्ट केल्या असण्याची शक्यता जास्त आहे. केंद्रात वाजपेयी सरकार वगळता जवळजवळ कायमच कॉंग्रेसचेच सरकार होते. पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारित त्या फाईल्स असल्यामुळे ते पुरावे नष्ट केले असल्याच्या संशयाला दुजोरा मिळतो. सेक्यूलरवादाचा जप करत कॉँग्रेसने विशेषत: नेहरु-गांधी घराण्याने मोगलशाहीच राबवली आहे. सेक्यूलरच्या नावाखाली अनेकांची गळचेपी केलेली आहे. मी मागे अनेक लेखात सेक्यूलर हा शब्द आता शीवी झाला असल्याचे म्हटले होते ते यासाठीच. संघ, भाजपाच्या नावाने गळे काढत स्वत: असली अनेक अश्‍लघ्य कृत्यं जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी आणि सोनिया गांधींनी केली आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस असुद्या स्वा. सावरकर असुद्यात किंवा भगतसिंग असुद्या. प्रत्येक प्रखर राष्ट्रप्रेमी क्रांतीकार्‍यांबद्दल अशीच विकृत भूमिका नेहरु-गांधी घराण्याने ठेवली आहे. सत्तेच्या मोहापायी नेहरुंनी ब्रिटीशांची तळी उचलली तर इंदिरा गांधींनी त्याची री ओढली. आता सोनिया गांधीबद्दल तर बोलायलाच नको. त्यांचे इटलीप्रेम कमी न होता वाढतच आहे. त्यांना तर भारताचे नागरिकत्व घ्यायलाही लाज वाटली. गेल्या दहा वर्षाच्या सत्ताकाळात केवळ घोटाळे करण्यापलीकडे काहीही करता आलेले नाही. कोणतेही राष्ट्रहीत साधता आले नाही.
नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस (सुभाषचंद्र बोस यांचे बंधू शरदचंद्र बोस यांचे नातू) यांनी कॉंग्रेसवर थेट आरोप केले आहेत. कॉंग्रेसने गठीत केलेले सर्व आयोग केवळ दिखाव्यासाठी होते. कॉंग्रेसने केवळ नाटकबाजी करुन देशाला धोका दिला आहे. चंद्रकुमार बोस यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. १९५६ साली नेहरु सरकारने गठीत केलेल्या शाहानवाज खान कमिटीने नेहरुंच्या मर्जीप्रमाणे अहवाल तयार केले आहेत. यामागील वस्तूस्थिती अशी आहे की शाहनवाज खान हे आजाद हिंद फौजेत केवळ १५ महिनेच होते आणि ते नेहरु परिवाराच्या जवळचे स्नेही होते. येवढेच नव्हे तर शाहनवाज खान नेहरू सरकारमध्ये मंत्री होते. नेहरु सरकारने बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री विधानचंद्र राय यांना बोस परिवार आणि त्यांच्या समर्थकांवर पाळत ठेवण्याचेही आदेश दिले होते. चंद्रकुमार बोस यांच्या आरोपातील तथ्य हे आहे की, तेव्हा सुभाषचंद्र बोस समर्थक आणि फॉरवर्ड ब्लॉकच्या कार्यकत्यांना नक्सलवादी ठरवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर १९७० मध्ये इंदिरा सरकारने खोसला अयोग गठित केला. पण खोसला आयोगाने प्रामाणिकपणे अहवाल सादर केला नसल्याचा आरोप चंंद्रकुमार बोस यांनी केला आहे. जस्टीस जी.डी. खोसला हेही नेहरु परिवाराचे जवळचे स्नेही होते. यात चंद्रकुमार बोस यांचा सर्वात गंभीर आरोप हा आहे की, खोसला आयोगाच्या तपासादरम्यान इंदिरा गांधी सरकारने नेताजींसंबंधीत महत्त्वाच्या चार फाईल्स नष्ट केल्या होत्या.
चंद्रकुमार बोस यांच्या मते १९९९ साली अटलबिहारी वाजपेयी सरकारने गठित केलेल्या जस्टीस मुखर्जी आयोगाने चांगले व प्रमाणिकपणे काम केले आहे. जस्टीस मुखर्जी यांच्या अहवालात हे सिद्ध झाले होते की नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नव्हता. पण अटल सरकारनंतर आलेल्या सोनिया गांधींच्या मनमोहन सरकारने तो अहवाल रद्द ठरवून केराच्या टोपलीत टाकला. यातील एका महत्त्वाच्या पैलूवर चंद्रकुमार बोस यांनी प्रकाश टाकला आहे की, जस्टीस मुखर्जी आयोगाला तपासादरम्यान १८ ऑगस्ट १९४५ नंतरच्या गुप्त फाईल्स दिल्या गेल्या नव्हत्या. आता मोदी सरकार मात्र यात लक्ष घालेल असा विश्‍वास चंद्रकुमार बोस यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या अहवालावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली आहे. शिवाय नवी समिती गठित करुन त्यांना सर्व गुप्त कागदपत्रे द्यावीत जी कागदपत्रे जस्टीस मुखर्जी आयोगाला दिली गेली नव्हती, ती द्यावी. ज्यायोगे सत्य जगासमोर येईल, असे चंद्रकुमार बोस यांनी म्हटले आहे.
याबाबतीत अजून एक मुद्दा सांगितला जातो की, स्वातंत्र्यानंतर भारताला सत्ता हस्तांतरण करताना असा करार कॉंग्रेसने केला होता की, सुभाषबाबूंबद्दल ब्रिटीशांचीच भूमिका पुढे राबवली जाईल. यातील तथ्यही समोर येणे गरजेचे आहे. १९६४ मध्ये अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएकडील फाईल्समध्ये अशी माहिती आहे की सुभाषचंद्र बोस यांचा अपघातात मृत्यू झालेल्या बातमीवर सीआयएला विश्‍वास नव्हता. सीबीआयच्या अहवालात काही शक्यता जाहीर केल्या होत्या की सुभाषचंद्र बोस हे साधूच्या रुपात भारतात राहिले होते. असेच काहीसे मत जस्टीस मुखर्जी आयोगाने मांडले आहे. त्यात उत्तरप्रदेशात रहाणारे गुमनामी बाबा वा भगवानजी हेच सुभाषचंद्र बोस होते यावर प्रकाश टाकला आहे.
सुभाषचंद्र बोस यांचे मृत शरीर कोणी पाहिले नाही. त्यांच्या मृत शरीराचे छायाचित्रही उपलब्ध नाही. त्यांचे डेथ सर्टीफिकेटही नाही. सुभाषचंद्र बोस आपल्या सहकार्‍यांसोबत विमानात बसणार होते पण ऐनवेळी निर्णय बदलला. जपानची सुभाषबाबूंना मित्रराष्ट्रं आणि ब्रिटीशांपासून वाचवण्यासाठी सुरक्षित जागी पोहोचवण्याची गुप्त योजना होती. त्यांना प्रथम सुरक्षित स्थळी पोहोचवले आणि नंतर मृत घोषित केले असाही तर्क मांडला जातो. जपानमधील रेंकोजी मंदिरात ज्या अस्थि ठेवल्या आहेत त्या अस्थी सुभाषबाबूंच्या नसून जपानी सैनिक इचीरो ओकुरा याच्या असल्याचे मुखर्जी आयोगाने सिद्ध केले होते. या शिवाय अनेक तर्कवितर्क मांडले गेले आहेत.
चंद्रकुमार बोस यांच्याप्रमाणेच अनेक अभ्यासकांनी आपली मत मांडली आहेत. अनेक अभ्यासकांनी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल संशोधन करण्याचा सतत प्रयत्न करुन अनेक तथ्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय जपान आणि जर्मनीने भारताच्या स्वतंत्र्यासाठी सुभाषबाबूंना खूप मदत केली होती. त्यांच्याकडेही अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यांचाही खूलासा आणि सत्यता या गोपनिय फाईल्समुळे प्रकाशात येईल. नेताजींच्या फाईल्स आता सार्वजनिक केल्या असल्या तरी अजून त्या आपल्याला वाचायला उपलब्ध नाहीत. लवकरच सर्व देशवासियांना वाचायला त्या उपलब्ध होतील आणि सर्व तथ्य समोर येतील अशी आशा आहे. स्वातंत्र्यापुर्वी ब्रिटीशांनी सुभाषबाबूंना खूप त्रास दिला, तर ती छळाची परंपरा कॉंग्रेसने स्वातत्र्यानंतरही आजतागयात चालू ठेवली होती. आता मात्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतीत गुढता राहणार नाही आणि सत्य जगासमोर येण्याची आशा बळावली आहे. नेताजींच्या फाईल्स सार्वजनिक करण्यामागे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकारण असल्याचे बोलले जातेय. तर काहींनी भाजपा नेताजींची समर्थक आहे आणि त्याचे श्रेय भाजपा घेण्याची शक्यता होती त्यामुळे ममतादीदींनी या फाईल्स जाहीर करुन भाजपावर कुरघोडी केल्याची चर्चा सुरु आहे. ममता बॅनर्जी यांच्या राजकारणापेक्षा नेताजी हा विषय देशाच्या जिव्हाळ्याचा आहे. यात कॉंग्रेसची करणी मात्र आजपर्यंत जशी वाईट होती तशी याही बाबतीच वाईट ठरली आहेत. पण आता जनतेला यातील सत्य कळाल्यानंतर त्याची फळे कॉंग्रेसला विशेषत: सोनिया आणि राहूल गांधींना जनता भोगायला लावेल हे निश्‍चित. सुभाषबाबूंचा आत्मा कॉंग्रेसला क्षमा करणार नाही!

Posted by : | on : 27 September 2015
Filed under : Blog, चौफेर : अमर पुराणिक, राष्ट्रीय, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *