Home » Blog, उद्योग भरारी, उद्योग भरारी :अमर पुराणिक, औद्योगिक, स्थंभलेखक » हिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर

हिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर

• उद्योग भरारी : अमर पुराणिक
‘‘सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने सोलापूरचा वस्त्रोद्योग हा सोलापूरच्या प्रगतीचा कणा असल्याने वस्त्रोद्योगाला पुन्हा बळ मिळणे आवश्यक आहे. जगभरात लोक सोने आणून सोन्याचे दागिने करतात, पण सोलापूरकर मातीचे सोने करतो. सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चादर किंवा टेरीटॉवेल उत्पादनांच्या सर्वच प्रक्रिया ‘इन हाऊस’ म्हणजे एकाच ठिकाणी व एकाच छताखाली केली जाते. म्हणजे प्रत्येक चादर व टॉवेल उत्पादक सूत खरेदी केल्यानंतर डाईंग, प्रोसेसिंगपासून विक्रीसाठी माल तयार होईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया स्वत:च करतो, हे सोलापूरच्या वस्त्रोद्योगाचे खास असे वैशिष्ट्य आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांच्या नगरीत वस्त्रोद्योग रुजला आणि फोफावला, पण आता अडचणीत असलेला हा उद्योग सिद्धेश्‍वरांच्या आशीर्वादानेच पुन्हा वाढत राहील! असा विश्‍वासही सत्यराम म्याकल यांनी व्यक्त केला.
himalaya textilesगेल्या अनेक शतकांपासून सोलापूर शहराचा वस्त्रोद्योगाला वरदहस्त लाभला. वस्त्रोद्योग आणि विशेषत: सोलापूरची चादर व टेरीटॉवेल जगप्रसिद्ध झाले. किंबहुना सोलापुरी चादर ही सोलापूरची ओळखच झाली. सोलापूरच्या विकासात वस्त्रोद्योगाने अनन्यसाधारण भूमिका निभावलेली आहे. शून्यातून विश्‍व निर्माण करणार्‍या वस्त्रोद्योग क्षेत्रातील काही नामवंत उद्योजकांमध्ये ‘हिमालया टेक्स्टाईल्स’चे सत्यराम म्याकल यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. हिमालया टेक्स्टाईल्सचे सत्यराम म्याकल यांचा जन्म सोलापुरात झाला. आजोबा श्रीराम रामय्या म्याकल हे रझाकार चळवळीच्या वेळी आंध्र प्रदेश सोडून सोलापुरात आले. वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रात अतिशय तज्ज्ञ असलेले श्रीराम म्याकल यांनी सोलापुरात हँडलूमचा उद्योग सुरू करून वस्त्रोद्योगात मोठी झेप घेतली. अतिशय सचोटी, शिस्त, सच्चेपणा आदी पारंपरिक संस्कारांवर त्यांची मोठी श्रद्धा होती. आयुष्यभर श्रीराम म्याकल यांनी आपली तत्त्ववादी भूमिका कोणत्याही परिस्थितीत सोडली नाही. हेच संस्कार त्यांनी त्यांच्या पुढील पिढीत देखील रुजविले. ‘‘आज मी जी काही प्रगती साधली आहे, त्याला आमच्या आजोबांचे संस्कार, माझी आई रामबाई म्याकल यांची प्रेरणा आणि पत्नी गीतांजली म्याकल यांची समर्थ साथ कारणीभूत आहेत’’ असे आदरयुक्त प्रतिपादन सत्यराम म्याकल यांनी तरुण भारतच्या उद्योग भरारीसाठी घेतलेल्या मुलाखतप्रसंगी केले.
सोलापूरच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला सर्वात मोठा पहिला फटका बसला तो सी.डी. देशमुख अर्थमंत्री असताना. त्यावेळी सरकारची धोरणे उद्योगानुकूल तर नव्हतीच, पण उद्योगवाढीला चाप लावणारी होती. तेव्हाचे शासनाचे निर्णय उद्योगांची पीछेहाट करणारे होते. यात अनेक वस्त्रोद्योजक देशोधडीला लागले. या फटक्यातून आम्ही देखील सुटलो नाही, असे सत्यराम म्याकल यांनी सांगितले. सत्याराम म्याकल यांचे वडील तुकाराम म्याकल यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीत उपजीविकेसाठी डॉ. कल्याणी यांच्याकडे मिश्रक (कंपौंडर) म्हणून नोकरीला प्रारंभ करीत आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली. पुढे ते आरएमपी डॉक्टर (रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर) म्हणून काम करीत कुटुंबाचा चरितार्थ चालवू लागले. अशाही प्रतिकूल परिस्थितीत आमच्या शिक्षणाकडे आई, वडील व आजोबांनी विशेष लक्ष दिले. त्याच काळात आम्हाला माझे आजोळ चाटला म्हणजे चाटला टेक्स्टाईल्स परिवाराने मोठा आधार दिला. माझी आई रामबाई तुकाराम म्याकल या चाटलांसारख्या नामवंत कुटुंबातील असून देखील तेव्हा आमच्या शिक्षणासाठी विड्या वळून अर्थाजन करीत होत्या. कारण आम्ही तिघे भाऊ व एक बहीण इतक्यांचा चरितार्थ आमच्या आई-वडिलांना चालवायचा होता. आई रामबाई म्याकल यांनीच म्याकल कुटुंबाने पुन्हा उद्योगक्षेत्रात मोठी भरारी घ्यावी यासाठी प्रचंड प्रेरणा दिली. तर माझी पत्नी सौ. गीतांजली यांनी तितकीच समर्थ साथ दिली. आजोबा श्रीराम म्याकल यांनी अशाही परिस्थितीत उद्योगक्षेत्रात बळावलेल्या अनेक वाईट कृती व प्रवृत्तीला आळा घातला, त्यासाठी त्यांनी उपोषणाचा देखील मार्ग अवलंबला.
याच काळात कुटुंबाला वाईट परिस्थितीतून बाहेर काढून पुन्हा गतवैभव प्राप्त करण्याची इच्छा मनात रुजली असल्याचे सत्यराम म्याकल यांनी सांगितले. शालेय शिक्षणासह महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केले. शिक्षण संपल्याबरोबर आई म्हणाली की, पुढे काय? तर मी म्हणालो, परीक्षेचा निकाल येऊ दे, त्यानंतर मी सी.ए. होणार असल्याचा मानस पालकांसमोर व्यक्त केला, पण मी उद्योगक्षेत्रात यश मिळवावे अशी त्यांची इच्छा होती. बी.कॉम. झाल्यानंतर आई-वडिलांच्या इच्छेप्रमाणे चाटला टेक्स्टाईल्समध्ये काम सुरू करीतच उद्योगक्षेत्राची बाराखडी गिरवायला सुरुवात केली. १९७६ ते ८६ या १० वर्षांत उत्पादन, मार्केटिंग व वितरणातील सूक्ष्मता आत्मसात केली.
इतक्या प्रदीर्घ अनुभवानंतर १९८६ साली स्वत:च्या चादर उत्पादन उद्योगाला सुरुवात केली. नवा उद्योग सुरू करण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँक  व डीआयसीने कर्जसहाय्य दिले. तेव्हा सोलापूर जनता बँकेचे पालक संचालक माजी खासदार लिंगराज वल्याळ, रंगण्णा क्षीरसागर, पुलगम टेक्स्टाईल्सचे पुलगम यांचे सहकार्यं लाभले. तेव्हा पावणेचार लाख रुपये कर्जावर ८ लूमद्वारे उत्पादनाला सुरुवात केली. यातले वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच आम्ही स्वतंत्र मार्केटिंग सुरू केले. सन १९८९-९० मध्ये टॉवेल उत्पादनाला सुरुवात केली. सुरुवातीला ८लूम होत्या. आता ६० आहेत. या व्यवसायात माझे दोघे धाकटे बंधू रवींद्र आणि श्रीधर व मुले योगेश आणि ऋषीकेश हे देखील कार्यरत आहेत. धाकटे चिरंजीव अनुदीप याचे बीडीएसचे वैद्यकीय शिक्षण सुरू आहे. व्यवसाय वृद्धीसाठी श्रीनिवास सोनी, धायफुले आदींचेही मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सत्यराम म्याकल यांनी आवर्जून नमूद केले.
बदलत्या काळाबरोबर अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे महत्त्वाचे होते. त्यादृष्टीने १९९६ साली टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने दक्षिण भारताचा अभ्यासदौरा केला. तेथील उत्पादन पद्धती आणि डाईंगच्या नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपल्या उत्पादन तंत्रात तसा बदल केला. तेव्हापासून आमची डाईंग पद्धती आणि रंगसंगती सर्वांत दर्जेदार ठरू लागली. नंतर त्यामुळे मार्केट वाढले, मागणी वाढली. उद्योगाच्या यशाचे गमक सांगताना सत्यराम म्याकल म्हणाले की, कोणत्याही उद्योगात मालाचा पुरवठा वेळेवर करणे अतिशय महत्त्वाचे असते. आज मी जे काही यश मिळविले आहे, ते सर्व अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत केलेले आहे. कच्चा माल, रंग खरेदी करताना योग्य दर्जाची समज असणे व योग्य ठिकाण निवडणे महत्त्वाचे ठरते. आलेला माल उत्तम दर्जाने प्रोसेस करून ठराविक कालावधीत हा माल बाजारात उतरवणे अपरिहार्य असते. बाजाराच्या व ग्राहकांच्या मागणीप्रमाणे उत्पादन असणे, हे व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. मालाचे योग्य माकेर्र्टिंग आणि त्याहूनही अतिमहत्त्वाचे म्हणजे विकलेल्या मालाची वेळेवर वसुली होणे हे महत्त्वाचे असते. हीच चतु:सूत्री उद्योगवाढीस पूरक ठरते. व्यवसाय करताना तत्त्वे सोडता कामा नये, असा मोलाचा सल्ला देत सत्यराम म्याकल म्हणाले की, आमच्या उत्पादनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, आमच्या उत्पादनांचा भारतभर एकच भाव असतो.
हिमालया टेक्स्टाईल्सचे ‘हिमटेक्स’ आणि ‘रामांजली’ हे बॅ्रंड संपूर्ण भारतीय बाजारपेठेत अतिशय लोकप्रिय आहेत. उद्योगातील अद्ययावत तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी आजपर्यंत युरोप, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, दुबई आदी ठिकाणी दौरे केेले. हिमालया टेक्स्टाईल्सने गेल्यावर्षी ९ कोटी रुपयांची उलाढाल केली. चालू आर्थिक वर्षात उलाढालीचे लक्ष्य १५ कोटींचे आहे, पण मंदीचा विचार करता ही उलाढाल ११ कोटींपर्यंत जाणे अपेक्षित आहे. चिंचोळी एमआयडीसीत नव्या प्रकल्पासाठी जागा घेतलेली असून, लवकरच तेथे नवा उद्योग सुरू करणार असल्याचे सत्यराम म्याकल यांनी सांगितले.
सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने सोलापूरचा वस्त्रोद्योग हा सोलापूरच्या प्रगतीचा कणा असल्याने वस्त्रोद्योगाला पुन्हा बळ मिळणे आवश्यक आहे. जगभरात लोक सोने आणून सोन्याचे दागिने करतात, पण सोलापूरकर मातीचे सोने करतो. सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चादर किंवा टेरीटॉवेल उत्पादनांच्या सर्व प्रक्रिया ‘इन हाऊस’ म्हणजे एकाच ठिकाणी केली जाते. म्हणजे प्रत्येक चादर व टॉवेल उत्पादक सूत खरेदी केल्यानंतर डाईंग, प्रोसेसिंगपासून विक्रीसाठी माल तयार होईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया स्वत:च करतो, हे सोलापूरच्या वस्त्रोद्योगाचे खास असे वैशिष्ट्य आहे.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांच्या नगरीत वस्त्रोद्योग रुजला आणि फोफावला, पण आता अडचणीत असलेला हा उद्योग सिद्धेश्‍वरांच्या आशीर्वादानेच पुन्हा वाढत राहील! असा विश्‍वासही सत्यराम म्याकल यांनी व्यक्त केला.

सोलापूरकर मातीचे सोने करतो : सत्यराम म्याकल

satyaram myakal - himalaya textiles
सत्यराम म्याकल
सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी काही काळ प्रयत्न करून चालणार नाही तर त्याचा सतत पाठपुरावा करणे गरजेचे आहे. कारण सोलापूरला बसलेल्या ‘सेटबॅक’मधून इतक्या सहजतेने बाहेर काढणे शक्य नाही, त्यासाठी तितकेच प्रबळ प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन, सत्यराम म्याकल यांनी केले. या उद्योगात आता दिवसेंदिवस टेक्स्टाईल कामगारांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे उत्पादन क्षमतेवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो. जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने आणि ग्राहकांच्या वाढत्या मागणीचा विचार करता, टेक्स्टाईल उद्योगाचे मोठ्या प्रमाणात ‘ऑटोमेशन’ होणे ही काळाची गरज आहे. कच्च्या मालावर महापालिकेकडून घेतली जाणारी २ टक्के जकात खूपच झाली. ती कमी होणे आवश्यक आहे. शिवाय महापालिकेकडून कोणत्याच बाबतीत सुविधा व सहकार्य मिळत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात कर घेऊनही किमान पाण्याची सुविधा देखील दिली जात नाही. रस्ते, पाणी, ड्रेनेज आदी सुविधांसाठी टीसीआयडीएसकडून १५ कोटी रुपये मिळाले होते. टीसीआयपीएस (टेक्स्टाईल क्लस्टर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम) योजनेखाली साडेचौदा कोटी रुपये मिळाले. एफ्लुएंट ट्रीटमेंंट प्लांटसाठी केंद्राचे १०० टक्के अनुदान असून देखील महापालिका अजूनही याचे काम सुरू करीत नाही. असे असताना सोलापूर महापालिका स्वत:च्या चुका झाकून उद्योजकांवरच आरोप करते, हे सोलापूरच्या उद्योगवाढीला घातक आहे. मनपाकडे उद्योगवाढीसाठी कोणताही उपक्रम नाही, हे खेदाने सांगावे लागते. भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने मनपाने सकारात्मक भूमिका घेतल्यास, सोलापूरच्या उद्योगाला चांगले दिवस येतील. शिवाय सोलापूरच्या उद्योजकांना औद्योगिक वृद्धी आणि अद्ययावत ज्ञानाच्या दृष्टीने मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे.
तरुण भारत, सोलापूर, रविवार, दि. १७ ऑक्टोबर २०१०
Posted by : | on : 20 November 2011
Filed under : Blog, उद्योग भरारी, उद्योग भरारी :अमर पुराणिक, औद्योगिक, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *