Home » Blog » हे कसले भूषण?

हे कसले भूषण?

    प्रशांत भूषण यांच्या देशद्रोही आणि धोकादायक विधानाचे खंडन वैचारिक पातळीवर करण्यासाठी भूषण यांना मारहाण होण्याआधी इतक्या दिवसात एक तरी पुरोगामी, एकतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाला का पुढे आला नाही? तोंडाला कुलूप लावून हे लोक का गप्प बसले? हिंदुस्थानच्या राष्ट्रवादाचे नुकसान झाले, हिंदुस्थानचे तुकडे झाले तर गप्प बसा, उलट त्यांना प्रोत्साहन द्या अशी यांना आंतरराष्ट्रीय गॉडफादर्सकडून सूचना तर नाही ना? प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला करणार्‍या तरुणांनी या तथाकथित पुरोगामी, विचारवंत, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाल्यांच्या अशा विषयातील निष्क्रियतेला चव्हाट्यावरच आणले आहे. या बोलघेवड्या लोकांनी प्रशांत भूषण यांचे काश्मीरबाबतचे देशद्रोही म्हणणे त्याच वेळी सप्रमाण खोडून काढले असते, प्रशांत भूषण यांच्या विधानाचा विरोध करण्यासाठी हे जर पुढे सरसावले असते तर कदाचित प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला झालाही नसता. काश्मीरच काय, देशाचा कोणताही भाग या भारतभूमीपासून वेगळा करण्याचे तर्कट मांडणारा कोणीही असो, तो कितीही मोठा असो त्याचा मोठेपणा, त्याचा शहाणपणा सगळा बिनकामाचा आहे असेच म्हणावे लागेल. स्वार्थासाठी प्रत्यक्ष आईला बाजारात नेऊन विकणारी ही औलाद या देशाच्या काय कामाची? मात्र, या देशातल्या माध्यमांची आणि मानवी हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षक असल्याचा आव आणत घसे ताणून ओरडणार्‍यांचीही अजब तर्‍हा सुद्धा पहा कशी आहे. प्रशांत भूषण या पढतमूर्खाने थेट देश तोडण्याच्या दिशेने सप्टेंबर महिन्यात केलेल्या बडबडीकडे दुर्लक्ष करून जेव्हा काही तरुणांनी संत तुकारामांचा उपदेश अंमलात आणून ‘तुका म्हणे ऐशा नरा… ’ उक्तीप्रमाणे खेटरांनी पूजा बांधताच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढण्याला अगदी अहमहमिकेने सुरुवात झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा आणखी असले अनेक प्रकारचे स्वातंत्र्य हा देश स्वतंत्र राहील तरच राहील ना? या देशाचे तुकडे करण्याचा देशद्रोही सल्ला जर या देशातील बुद्धीवंत निर्लज्जपणे देऊ लागले तर हा देश एकसंध, सार्वभौम, स्वतंत्र कसा राहील? या देशात राहून, या देशाचे अन्नपाणी पिऊन देह वाढवून, या देशात नाना लटपटी, लफडी करून कोट्यवधी रूपयांची माया जमविल्यानंतर हे दीडशहाणे जर या देशाच्या स्वातंत्र्यावर, देशाच्या एकात्मतेवर संकट येईल अशा पद्धतीने पांडित्य पाजळू लागले तर या देशात लोकांच्या धमण्यात रक्त आहे आणि ते उसळते याची त्यांना जाणीव करून देण्याची इच्छा काही तरुणांना झाली तर त्यात अस्वाभाविक काही नाही. प्रशांत भूषण यांनी आपले पांडित्य पाजळले आणि त्यांनतर दहा दिवसंानी त्यांना मारहाण झाली. या दहा दिवसात जर एकही पुरोगामी, विचारवंत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कळवळा असलेल्याने आपली अभिव्यक्ती, आपले स्वातंत्र्य, आपले पुरोगामित्व, आपली बुद्धी प्रशांत भूषण यांचा फुकटचा सल्ला कसा मूर्खपणाचा आणि बेईमानीचा आहे हे दाखविण्यासाठी थोडीही झिजविली असती तर त्यांना प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला करणार्‍या तरुणांवर टीका करण्याचा हक्क प्राप्त झाला असता. या तरुणांनी प्रशांत भूषण यांची खबर घेतली नसती तर कदाचित प्रशांत भूषण यांच्या या बेताल बडबडीवर कोणीही कधीच काही बोलले नसते आणि ही बडबड हे भारतीय लोकांचे प्रातिनिधिक मत असल्याचा अर्थ काढत आंतरराष्ट्रीय पातळीवर कदाचित काश्मीरबाबत अवसानघात करण्याचे दावे फुटीरतावाद्यांनी केले असते. कारण, प्रशांत भूषण हा काही उपटसुंभ विचारवंत नाही. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला देशातील सर्वसामान्य जनतेने अभूतपूर्व पाठिंबा दिला होता. या आंदोलनात अण्णांच्या टीममधील प्रशांत भूषण हे एक प्रमुख कायदेपंडित होते. त्यांचे मत हे केवळ त्यांचे मत न राहता ते भारतातील सामान्य जनतेचे प्रातिनिधिक मत म्हणून त्याकडे जगातील लोक पाहण्याचा धोका होता. मग असे असताना प्रशांत भूषण यांच्या देशद्रोही आणि धोकादायक विधानाचे खंडन वैचारिक पातळीवर करण्यासाठी इतक्या दिवसात एक तरी पुरोगामी, एकतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाला का पुढे आला नाही? तोंडाला कुलूप लावून हे लोक का गप्प बसले? हिंदुस्थानच्या राष्ट्रवादाचे नुकसान झाले, हिंदुस्थानचे तुकडे झाले तर गप्प बसा, उलट त्यांना प्रोत्साहन द्या अशी यांना आंतरराष्ट्रीय गॉडफादर्सकडून सूचना तर नाही ना? प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला करणार्‍या तरुणांनी या तथाकथित पुरोगामी, विचारवंत, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाल्यांच्या अशा विषयातील निष्क्रियतेला चव्हाट्यावरच आणले आहे. या बोलघेवड्या लोकांनी प्रशांत भूषण यांचे देशद्रोही म्हणणे त्याच वेळी सप्रमाण खोडून काढले असते, प्रशांत भूषण यांच्या विधानाचा विरोध करण्यासाठी हे जर पुढे सरसावले असते तर कदाचित प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला झालाही नसता. काश्मीरमधून सर्व लष्करी दळे काढून घ्या, काश्मीर देशद्रोह्यांकरता मोकळे सोडा, मग तेथे सार्वमत घ्या आणि त्यानंतरही जर काश्मीरमधील लोकांनी सार्वमत घेताना भारतातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली तर मग त्यांना देशातून बाहेर जाऊ द्या असे होते प्रशांत भूषण यांचे शब्द. काश्मीरमध्ये सुरक्षा दले असताना निवडणुकीत हिंसाचार होतो, स्फोट होतात, बलात्कार होतात, खून होतात, लूट होते, दगडफेक तर थेट सैनिकांवर होते आणि हे सर्व माहिती असून हा पुस्तकपंडित म्हणतो, काश्मीरचे रान अतिरेक्यांना आणि पाकधार्जिण्या नापाक लोकांना मोकळे सोडा! तेथे सार्वमत घ्या! काश्मीरमधून देशभक्तांना या अतिरेक्यांनी पळवून लावले. काश्मिरी पंडितांना देशोधडीला लावले. आपल्याच देशात निर्वासित बनविले. फूटपाथवरचे जिणे त्यांच्या नशिबी आणले. त्या पंडितांचे दु:ख या प्रशांत भूषण महाशयांना कधी दिसले नाही? अशा भंपक सार्वमताच्या, अशा पुळचट लोकशाहीच्या प्रयोगाने एकदा या देशाची फाळणी झालीच आहे. पुन्हा तोच विषप्रयोग कशाकरता करून घ्यायचा? सार्वमताचा प्रश्‍न केव्हाच निकाली निघाला आहे. काश्मीर ही कोणाच्या बापाची किंवा अजोबाची जहागीर नाही. काश्मीरसाठी या शंभर कोटींच्या देशातली कानाकोपर्‍यातील आणि प्रत्येक जाती पंथातील सैनिकांचे रक्त सांडले आहे. जिथे आमच्या शूर सैनिकांचे रक्त सांडले, जिथे पं. श्यामाप्रसाद मुखर्जींसारख्यांनी बलिदान दिले त्या काश्मीरवर काश्मीरमध्ये नंगानाच घालणार्‍या देशद्रोही मूठभर पाकधार्जिण्यांच्या मतांचा अधिकार कसा काय असू शकतो? सार्वमत घ्यायचे तर समस्त हिंदुस्थानातील शंभर कोटी जनतेचे घ्या! आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीरबाबत सार्वमताचा विषय केव्हाच संपलेला असताना, कसलीही चर्चा नसताना आत्मघातकी विचार नाक वर करून हे लोक मांडू कसे शकतात? प्रशांत भूषण यांच्या मतांना खोडून काढण्यासाठी विचारानेच सामना करायला हवा होता. शारीरिक हल्ला करणे चूक आहे हे सर्व बरोबर! मात्र संतापाची परिसीमा झाली. तरुणांची डोकी खवळली आणि त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर हे काम कोणी केले? कशाकरिता केले? याचा काहीही विचार न करता सर्रास कथित पुरोगामी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे टपून बसलेले बगळे यांनी क्षणही न दवडता, थोडेही डोके न वापरता संघ, हिंदुत्ववादी संघटना यांच्यावर तुटून पडले. लगेच गांधीहत्येचा यांना आठव झाला. लगेच यांना रामजन्मभूमी आठवली. कोणी वृत्तपत्रातून, कोणी दूरदर्शनवाहिन्यांमधून संधी सापडेल तेथे संघ, भाजप, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल यांना शिव्यांची लाखोली वाहायला अगदी उत्साहाने सरसावले. देशाच्या विरोधात कोणी बोलला आणि संतप्त होऊन त्याला विरोध करणारे हेच असणार असे गृहित धरून मारहाण करणारे कोण आहेत, हे न पाहता डोळे झाकून यांनी संघ, भाजप, विहिंप यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून टाकले. मारहाण करणारे या संघटनांचे नाहीत हे लक्षात आल्यावरही ही मंडळी माघार घ्यायला तयार नव्हती. तरी यात संघाच्या लोकांचाच हात आहे असे म्हणून खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं असा कार्यक्रमच चालूच होता! देशभक्तीच्या विषयात देशाच्या बाजूने कोणी श्रीराम सेना असो की कोणीही असो, त्यांनी काही आक्रमक कृती केली की करणारा कोण आहे हे न पाहता डोळे झाकून संघ आणि संघविचारांच्या संघटनांना शिव्या द्यायच्या आणि नाक वर करून पुन्हा देशभक्तीचा मक्ता संघ, भाजप यांनाच आहे काय असा दीडशहाणा प्रश्‍नही उर्मटपणे विचारायचा असा यांचा दुहेरी कावा आहे. यांना जरा सांगितले पाहिजे की संघविचारांच्या चळवळीला देशभक्तीचा मक्ता आहे की नाही माहिती नाही मात्र, या चळवळीचा जन्मच मुळी देशभक्तीच्या भावनेतून झाला आहे. संघाच्या शाखेवर रोज प्रार्थना म्हटली जाते. ही प्रार्थनाच या सर्व चळवळीतील प्रत्येकाच्या जीवनाचे ध्येय असते, प्रेरणा असते, संकल्प असते. या प्रार्थनेतील महत्वाचे अंतिम वाक्य आहे – ‘परम् वैभवं नेतु मे तत् स्वराष्ट्रम्’ म्हणजे (हे राष्ट्र परमवैभवाला नेण्यासाठी मी कटिबद्ध होत आहे.) मग यांच्या कृतीत देशभक्तीशिवाय दुसरे काय असणार? देशभक्तीला अवमानित करण्यासाठी कोणी काही कृत्य केले तर हे अस्वस्थ होणार! मात्र,संतप्त झाले म्हणून या देशातील बहुसंख्य जनताजनार्दनाने तयार केलेला कायदा हे मोडणार नाहीत, हातात घेणार नाहीत याची खात्री देशाला आहे. फक्त देशहिताचा सौदा करत पांडित्य पाजळणार्‍यांना नाही! अण्णा हजारे यांच्या एकूण आंदोलनाचीच अवस्था आता जरा विचित्र झाली आहे. धड ना समाजकारण, धड ना राजकारण, धड ना राष्ट्रकारण अशा पेचात अण्णा अडकले आहेत. फक्त मान्यतेची, प्रसिद्धीची सायच पाहिजे, बाकी काही नको असे चालत नसते. भ्रष्टाचाराचा रोज अनुभव घेणारी, रोज नागवली जाणारी, त्रस्त जनता एका नि:स्पृह, अराजकीय, निरपेक्ष सामाजिक कार्यकर्त्याच्या हाकेसरशी रस्त्यावर उतरली. सरकारला झुकवायला लावले. मात्र, त्यानंतर आता अण्णांना दिशा सापडत नाही की काय? असा प्रश्‍न पडला आहे. कधी गांधी, कधी महात्मा, कधी राष्ट्रपिता याची चर्चा भ्रष्टाचार निर्मूलनापेक्षा जास्त चवीने चालली आहे. कोणीही न विचारता अण्णा स्वत:च आम्ही कॉंग्रेसला पाठिंबा देणार नाही, आम्ही भाजपच्याही बरोबर नाही, सर्व पक्षातील चांगल्या लोकांनी नवा पक्ष काढावा अशी रोज एक नवी राजकीय विधाने करत आहेत. आम्हाला राजकारण करायचे नाही म्हणायचे आणि रोज एक राजकीय विधान करायचे. आम्हाला बाकी कशात रस नाही असे म्हणायचे आणि प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रश्‍नात फुकटचा उरफाटा सल्ला द्यायचा. अण्णांचे उपोषण सुरू होण्यापूर्वी रा.स्व.संघाची कर्नाटकात मंगळूर जिल्ह्‌यात पुत्तूर येथे अ. भा. प्रतिनिधी सभेची बैठक झाली होती. त्यात जे दोन ठराव झाले त्यापैकी एक ठराव चीनच्या कागाळ्यांबाबत होता आणि दुसरा वाढत्या भ्रष्टाचाराबाबत आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी लोकांना संघर्ष करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन करणारा होता. या बैठकीनंतर अण्णांचे आंदोलन सुरू झाले. अण्णांच्या आंदोलनात शहरातून प्रचंड संख्येने सर्व जाती, पंथ, राजकीय, सामाजिक विचारांचे लोक सहभागी झाले होते. विषय निर्विवाद असल्याने सर्वच मंडळी हिरीरीने आली होती. मात्र, कोणी लेबल लावून आले नव्हते. त्यात अण्णांना बदनाम करण्यासाठी सरकार या आंदोलनामागे संघ आहे अशा प्रकारे दुष्प्रचार करण्याला लागले होते. त्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांना सूचना होत्या की अण्णांच्या आंदोलनात मदत तर करायची मात्र संघटनेने आणि स्वयंसेवकांनी आपले नाव, संघटनेचे वेगळे अस्तित्व कोठेही नोंदवायचे नाही अशा समजदारीने काम चालले होते. या पार्श्‍वभूमीवर सरसंघचालकांनी आमचा अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा होता असे म्हणताच अण्णा पाल अंगावर पडल्यासारखे किंचाळले की, ‘नाही नाही आमचा संघाशी काही संबंध नाही .. ! इतकेच नाही तर त्याही पुढे जाऊन अण्णांनी आणखी पुढची मजल मारली आणि कॉंग्रेस, भाजप यांच्या जोडीला संघालाही बसवून हे सगळेच भ्रष्टाचारी आहेत असे ठोकून दिले. सर्वसामान्य माणूस अण्णांनाही पाहतो आहे आणि संघालाही पाहतो आहे. कॉंगे्रसलाही पाहतो आहे, अन्य राजकारण्यांनाही पाहतो आहे. आपल्याला सामान्यांचा पाठिंबा असल्याने आपण काहीही बोलले तरी चालते असा ग्रह करून घेऊन अण्णा जर संघाबाबतही अशी बडबड करत असतील तर हे सर्व दुरून पाहणारा सर्वसामान्य माणूस अण्णांवर विश्‍वास ठेवणार नाही. घरादारावर, सुखवस्तू नोकर्‍यांवर, संसाराच्या स्वप्नांवर लाथ मारून हजारो तरूण देशकार्यासाठी संघ सांगेल ते काम करत देशाच्या कानाकोपर्‍यात, तालुकापातळीपर्यंत, विविध विषयात काम करत असल्याचा अनुभव सर्वसामान्य लोक घेत आहेत. त्यांना माहिती आहे संघाचा स्वभाव. त्यांना माहिती आहे संघाचा विचार. त्यांना माहिती आहे संघकार्यकर्त्यांचा त्याग. त्यांना माहिती आहे संघसंस्कारांचे बळ! त्यांना अण्णांचा लोकपालही हवा आहे आणि संघही हवा आहे. अण्णा जर लोकपालासाठी मिळालेली मान्यता वापरून संघावरही दुगाण्या झाडू लागले तर लोक ते सहन करणार नाहीत. एका गोष्टीत लोकमान्यता मिळाली म्हणून अन्य प्रत्येक क्षेत्रात आपल्या सोयीने आपण काहीही बोललो तर लोक तेही ऐकून घेतील असे कोणीही समजण्याचे कारण नाही. कदाचित त्यांना संघाचे स्वयंसेवक लगेच वाद घालणार नाहीत, उत्तर देणार नाहीत पण, समाजातूनच त्यांना परस्पर उत्तर मिळेल. लोकमान्यतेचा पारा खाली उतरलेला नंतर जाणवेल! तेव्हा एका गोष्टीत कोणी भूषण ठरले असतील, कोणी नावाचे भूषण असतील किंवा कोणी पद्मभूषणच्या पदव्या मिळविलेले असतील तरी त्यांनी देशहिताशी खेळ करण्याचा नाद करू नये. आपल्याला आता कोणत्याही विषयात बोलण्याचा परवाना मिळाला आहे असेही समजू नये. भारतीय जनता अतिशय सूज्ञ, संवेदनशील, देशभक्त आहे एवढे भान त्यांनी सतत ठेवावे इतकेच!
  स्रोत: तरुण भारत : 10/15/2011
http://amarpuranik.in/?p=506
Posted by : | on : 16 October 2011
Filed under : Blog.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *