Home » Blog » होय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात!

होय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात!

  नागपूर येथील विजयादशमीच्या उत्सवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या भाषणानंतर कॉंग्रेसचे प्रवक्ते दिग्विजयसिंह, मनीष तिवारी या मंडळींना आनंदाच्या उकळ्या फुटत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. अण्णांच्या आंदोलनामागे संघाचा हात होता असा म्हणे या विद्वान, मुत्सद्दी राजकारण्यांनी आधीच शोध लावला होता. आता खुद्द सरसंघचालकांनीच त्यांच्या भाषणात अण्णांच्या आंदोलनात संघाचे स्वयंसेवक होते, हे स्पष्टपणे सांगितल्याने आमचेच खरे होते, अशी या लोकांनी ओरड करण्याला सुरूवात केली आहे. दिग्विजयसिंह आणि मनीष तिवारी यांचा बोलण्याचा तोरा असा आहे की, जणू अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात भाग घेणे हा देशद्रोहापेक्षाही भयानक गुन्हाच आहे! प्रसारमाध्यमेही या ढालगज लोकांच्या सुरात सूर मिसळत अशा कुतर्कांना मान्यता दिल्यासारखे प्रसिद्धी देतात. भ्रष्टाचार निर्मूलन हा काही केवळ अण्णा हजारे यांच्याशी जोडलेला विषय नाही. देशाच्या कानाकोपर्‍यातून जमेल त्याने जमेल तसे या विषयात काम करण्याची गरज आहे. सज्जनशक्ती जागी होऊन अशा विषयात सक्रिय झाल्याशिवाय अशा विषयांचे निर्मूलन होणे केवळ अशक्य आहे. संघ तर या देशाला परमवैभवाला नेण्याचा नित्य संकल्प करणारी संघटना आहे. केवळ संघाचे स्वयंसेवकच नव्हे, तर देशातील प्रत्येक व्यक्ती ही देशभक्तीच्या विचाराने भारलेली असावी. सर्व समाजाचे एक स्पंदन कायम देशासाठी चालत राहावे, यासाठी संस्काराच्या आधारावर परिवर्तन करण्यासाठी तर संघाचा जन्म आहे. त्यामुळे केवळ भ्रष्टाचार निर्मूलनच नव्हे, तर देशात घडणार्‍या, भविष्यात घडवावयाच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीत संघाचा हात असला तर बिघडले कुठे?
   होय, या देशात जे काही चांगले घडले पाहिजे त्या सर्व बाबतीत अगदी सुरूवातीपासून संघाचा हात काम करतो आहे. फाळणी झाली, पाकिस्तानातील हिंदूंच्या जिवावर बेतले तेव्हा हिंदूंना सुरक्षितपणे भारतात आणण्यात संघाच्या स्वयंसेवकांचा हात होता, परकीय आक्रमण परतवताना सैन्याला मदत करण्यात संघाचा हात होता, देशातील अडाणी, वनवासींना धर्मांतरित करून देशात फूट पाडण्याचे कारस्थान हाणून पाडण्यात संघ स्वयंसेवकांचा हात असतो, देशात गोहत्याबंदी करून भारतीय शेती वाचविण्यासाठी आंदोलन करण्यात संघाचा हात असतो, मोरवीला पूर येवो, आंध्रमध्ये वादळ येवो, की किल्लारीचा भूकंप येवो, प्रत्येक ठिकाणी पीडित बांधवांना खरी मदत करण्यात, त्यांचे अश्रू पुसण्यात संघाचा हात असतो, सुदूर खेड्यात आरोग्याच्या सुविधा पोहोचविणे असो की, वाड्या-वस्त्यांत शिक्षणाचा प्रकाश पोहोचविण्याचे काम असो, प्रत्येक वेळी संघाचा हात पुढे असतो…! एक ना दोन, शेकडो क्षेत्रे आहेत की, जेथे संघाचे स्वयंसेवक नि:स्वार्थ भावनेने, राष्ट्रीय भावनेने काम करत आहेत. कुठे सेवावस्तीत सेवाकार्य करताना, कुठे एक छान संस्कारवर्ग चालवताना, कुठे उत्तम रुग्णालय चालविताना, कुठे संस्कारक्षम शाळा चालविताना, कुठे पारध्यांसारख्यांच्या मुलासाठी वसतिगृह चालवताना, कुठे पूर्वांचलातून मुले इकडे आणून त्यांच्याशी प्रेमाचा धागा जोडताना, कुठे अचानक झालेल्या अपघातात जखमी बांधवांना मदत करताना, एक ना दोन अशा लक्षावधी वेळेला चांगल्या कामात संघाचा हात असल्याचा अनुभव गावागावातल्या लोकांना येत असतो. कुठेतरी भूकंपासारख्या, पुरासारख्या प्रसंगात भले भले जिथे थकतात तिथे संघाचे स्वयंसेवक अगदी प्रेते उचलायलाही पुढे होतात. कुणीतरी संघाच्या द्वितीय सरसंघचालकांना एकदा विचारले होते की, ‘‘तुम्ही या स्वयंसेवकांना शाखेत प्रशिक्षण तरी कसले देता?’’ तेव्हा ते मंद स्मित करून म्हणाले होते, ‘‘आम्ही शाखेत फक्त कब्बडी खेळतो.’’ आपला देश, आपला समाज यांच्यावर अकृत्रिम प्रेमाचा शाखेतल्या खेळ, गोष्टी, कार्यक्रम यातून होणारा सहज संस्कार देशबांधवांसाठी संकटप्रसंगी धावून जाण्याची तयारी करत असतो.
    देशाची संस्कृती, स्वदेश, स्वभाषा यांचा अभिमान व्यक्त करण्याला चतुर दीडशहाण्या लोकांनी एक शिवी रूढ केली आहे ती म्हणजे- भगवेकरण! अटलजींचे सरकार केंद्रात सत्तारूढ झाले तेव्हा शैक्षणिक धोरणात राष्ट्रभक्तीचे, सांस्कृतिक मूल्यांचे संस्कार देण्यासाठी प्रयत्न सुरू करताच हे सरकार भगवेकरण करत असल्याची ओरड या लोकांनी सुरू केली. शिक्षणाचे भगवेकरण याबाबत संघाचे तत्कालीन प्रवक्ते मा. गो. वैद्य यांना पत्रकारांनी विचारले तेव्हा ते म्हणाले होते की, ‘‘आम्हाला तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राचे भगवेकरण करायचे आहे.’’ भगवेकरण म्हणजे त्याग, तपस्या, बलिदान, नि:स्वार्थता यांचा संस्कार. मात्र, भगवेकरण म्हणजे काहीतरी भयानक आहे. लोकांच्या दृष्टीने काहीतरी घातक आहे, असा आव आणून भगवेकरण, भगवेकरण अशी ओरड करायची एक बदमाशी काही लोकांनी या देशाच्या सार्वजनिक जीवनात आणली. तोच प्रकार थोड्या वेगळ्या प्रकारे ‘संघाचा हात’ असल्याचे आरोप करून पुन्हा चालू आहे. म्हणून या पार्श्‍वभूमीवर निक्षून सांगितले पाहिजे की, संघाचा हात म्हणजे त्यागाचा हात. संघाचा हात म्हणजे देशभक्तीचा स्पर्श. संघाचा हात म्हणजे समाजहिताचे आश्‍वासन! ज्यांना राजकीय स्वार्थासाठी देशहिताचा सौदा करायचा आहे त्यांना संघाच्या हाताची भीती वाटणारच! ज्यांच्या तोंडातून व्यक्तिगत स्वार्थाची लाळ सतत टपकते आहे त्यांना संघाचा त्यागाचा हात दिसला की, आता चपराक बसेल अशी भीती वाटणारच! ज्यांना समाजहिताचा सौदा करून स्वत:चे हितसंबंध फक्त पाहायचे असतात त्यांना संघाचा हात दिसला की, भीतीने कापरे भरणारच!
    सरसंघचालकांनी, दसर्‍याच्या आपल्या भाषणात भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत असे म्हटले तरी काय? त्यांचे भाषण हे लेखी उपलब्ध आहे. या भाषणात भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाबाबत ते म्हणतात की, ‘‘चारही बाजूने सर्वसामान्य माणसावर पडत असलेल्या मारामुळे निर्माण झालेला असंतोष भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या निमित्ताने प्रकट झाला. परदेशी बँकांत असलेला काळा पैसा परत आणणे, भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर कायदा करणे, कोणत्याही दबावाला बळी न पडता त्या कायद्याची अंमलबजावणी करणे, त्या कायद्याच्या कक्षेत पंतप्रधानांसहित सर्व उच्चपदस्थांचा समावेश करणे आदी मुद्दे जनतेची भावना व्यक्त करणारे मुद्दे बनले. जनमताच्या दबावापुढे शासनाला झुकावे लागले. मात्र, अजून यश बरेच दूर आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बळीचा बकरा म्हणून काही लोक कायद्याच्या कचाट्यात आले आहेत, मात्र अनेक सूत्रधार सुखनैव बाहेर फिरत आहेत. दीर्घकालीन लढाईत यश हवे असेल, तर या विषयात प्रयत्न करणार्‍या सर्व छोट्या-मोठ्या प्रवाहांनी मतभेद विसरून एकत्र यावे लागेल. भ्रष्टाचाराचा हा विषय केवळ पैशाच्या अपहारापुरता मर्यादित नाही. जवळजवळ सर्व घोटाळ्यांच्या चौकशीत हे स्पष्ट झाले आहे की, सर्व मोठ्या प्रकरणांत भ्रष्टाचारी लोकांच्या पैशाच्या व्यवहारात विदेशी गुप्तचर संस्था, गुन्हेगारी गट जोडलेले आहेत. त्यामुळे हा प्रश्‍न थेट देशाची एकात्मता, सार्वभौमत्व आणि सुरक्षिततेशी जोडला गेला आहे. याकरिता श्रेय घेण्यासाठी टपलेल्या संशयास्पद पार्श्‍वभूमी असलेल्या शक्तींपासून दूर राहिले पाहिजे. राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम्, भारतमाता अशा प्रतीकांना दोषपूर्ण भ्रमित दृष्टिकोन आणि सवंग लोकप्रियतेपोटी नाकारणे हे कोणत्याही राष्ट्रीय आंदोलनात घडता कामा नये. तथाकथित अल्पसंख्यकांमध्ये असलेल्या संकुचित, कट्टरपंथी आणि फुटीरतावादी विचार ठेवणार्‍यांचे लांगूलचालन करणार्‍या प्रवृत्तींना दूर ठेवावे लागेल. ’’
    या प्रस्तावनेनंतर सरसंघचालकांनी संघाचा या आंदोलनातील सहभाग कसा होता, हे सांगताना या भाषणात म्हटले की, ‘‘संघाचे स्वयंसेवक भ्रष्टाचाराच्या विरोधात चालणार्‍या सर्व आंदोलनात सन्मान किंवा प्रतिष्ठा यांची अपेक्षाही न करता सहजस्वभावानुसार सहभागी होतच असतात. परंतु, हे सर्वांना लक्षात ठेवावे लागेल की, केवळ कायदा करून भ्रष्टाचाराची समस्या संपणारी नाही. भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार्‍या व्यवस्थांमध्ये आमूलाग्र परिवर्तन करावे लागेल. या दृष्टीने प्रशासनातील पद्धती अधिक पारदर्शी आणि लोकाभिमुख कराव्या लागतील. संस्कारांच्या प्रशिक्षणाचे वातावरण त्यामध्ये तयार करावे लागेल. निवडणूक पद्धतीत गुन्हेगारी आणि पैशाचा प्रभाव संपविण्यासाठी सुधारणा करावी लागेल. जनतेचे खरे प्रतिनिधित्व प्रकट करेल अशी सहजता त्यात आणावी लागेल. करप्रणाली अधिक सुसह्य करावी लागेल. शिक्षणपद्धतीला व्यापारीकरणातून मुक्त करून सुसंस्कारदायक करावे लागेल. व्यवस्थेमध्ये सुधारणा आणि परिवर्तन याचे सर्वंकष चित्र समोर ठेवून ते लागू करण्यासाठी दबाव निर्माण करावा लागेल.’’
    सरसंघचालक आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, ‘‘सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट ही की, समाजात सामाजिक जबाबदारीची जाणीव, विशुद्ध चारित्र्य, सेवा आणि परोपकार या मूल्यांची वृद्धी यांचे संस्कार स्थापित करावे लागतील. आपल्या प्रत्यक्ष व्यवहारातून या संस्कारांचे वातावरण तयार करणार्‍या आचरणांची उदाहरणे गावागावांत, नागरिकांच्या वस्तीवस्तीत उभी केल्याशिवाय समाजातून भ्रष्टाचाराचे निर्मूलन होणे अशक्य आहे. या मूलभूत महत्त्वपूर्ण कार्यावर लक्ष केंद्रित करून संघाचे काम चालले आहे.’’
    भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाबाबत मोहनजी म्हणाले की, ‘‘मात्र आंदोलनाच्या काळात सर्व घटनाचक्रात शासनातील उच्चपदस्थांची जी प्रवृत्ती पुढे आली ती आश्‍चर्यचकित करणारी आणि चिंता उत्पन्न करणारी होती. आपल्या उचित मागण्यांसाठी आंदोलन करणार्‍या नि:शस्त्र प्रजेवर दमनचक्र, छळ, कपट, उद्धटपणाचे प्रयोग, ते विदेशी सरकार असेल तर कदाचित समजू शकतो, पण स्वतंत्र देशात आपल्याच सरकारकडून अशा व्यवहाराची अपेक्षा कशी करता येईल? एकूण आपल्या राजकीय क्षेत्रात सत्तास्वार्थ हाच प्रमुख झाल्यामुळे राष्ट्रहिताच्या बाबी गौण ठरून त्यांची उपेक्षा होत आहे. प्रजेबाबत संवेदनहीनता आली आहे. याला क्षमा नाही आणि याचे कारण काय ते सर्वांच्या लक्षात आले आहे. मात्र, आता यामुळे एक नवी गोष्ट पुढे आली आहे ती ही की, आपल्या देशाचे भवितव्य असल्या राजकारण्यांच्या हातात किती सुरक्षित आहे ? हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.’’
    सरसंघचालकांच्या भाषणातील भ्रष्टाचार निर्मूलनाच्या आंदोलनाबाबतचा हा शब्दन्‌शब्द पाहिल्यावर यात दिग्विजयसिंग यांना गुदगुल्या व्हाव्यात असे काय आहे बरे? संघाचे स्वयंसेवक मान, सन्मान, प्रतिष्ठा, श्रेय याचा विचार न करता जे जे देशाकरिता हिताचे, जे जे समाजाकरिता चांगले असेल त्यामध्ये सहजपणे सहभागी होतात. कारण तो संस्कार त्यांना नित्य शाखेत झालेला असतो. अण्णा हजारे, रामदेवबाबा असे कोणत्याही सत्‌पुरुषाने देशाच्या हिताचे आंदोलन उभे केले तर संघस्वयंसेवक, संघावर निष्ठा असणारा समाजातील हितचिंतक मोठा वर्ग त्यात आपोआप सहभागी होतो. जयप्रकाशजींच्या आंदोलनातही अशाच प्रकारे स्वयंसेवक सहभागी झाले होते. अण्णांच्या आंदोलनात संघाचा हात होता, असा आरोप करण्यासारखे त्यात विशेष ते काय? कॉंग्रेसच्या दिग्विजयसिंग यांच्यासारख्यांचा एकच हेतू असतो की, अशा आंदोलनांत संघाचा हात आहे असे म्हणून आरोप केला की, ही आंदोलने चिरडून टाकण्यासाठी त्यांना सेक्युलर लोकांंची मान्यता न मागता गृहीत धरता येते. म्हणून या आंदोलनांना बदनाम करण्यासाठी तसा आरोप वारंवार करत राहायचा. आंदोलन करणारेही मग घाबरून ‘नाही नाही, आमचा संघाशी काही संबंध नाही,’ असे खुलासे करू लागले की, मग या विघ्नसंतोषी लोकांना विकटहास्य फुटू लागते. मात्र, ही गोबेल्सची नीती फार काळ चालत नसते.
    संघाने निखळ सत्य आणि देशप्रेम, मानवता आणि आपुलकी या गोष्टी सोबत घेऊन वाटचाल केली आहे, करणार आहे. त्यामुळे अशा गैरसमज, द्वेष, आरोप यामुळे संघाचे काम विचलितही होणे नाही, की कलंकितही होणे नाही. याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुम्हाला सोडून आणि विरोध कराल तर तुमचा विरोध तुडवून संघ मानवतेच्या, हिंदुत्वाच्या, भारतमातेच्या अंतिम विजयाकडे पुढे पुढेच जाणार आहे. सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात आहे. हे लोकांना जसे जसे अनुभवाला येईल तसे तसे संघ आणि समाज यांतील अंतर कमी होत जाईल. त्यानंतर मग आता दिग्विजयसिंग यांच्यासारखे लोक, कशातही नाक कापले तरी आम्हाला दोन भोके आहेतच, असा तोरा दाखवू लागतील, तर त्यांची भूमिका वरचेवर हास्यास्पद, कीव करावी अशी होत जाणार आहे, यात शंका नाही!
भ्र. ९७६५५५३५४५
स्रोत: तरुण भारत : 10/8/2011
http://amarpuranik.in/?p=507
Posted by : | on : 16 October 2011
Filed under : Blog.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

One Response to होय, सर्वच चांगल्या गोष्टीत संघाचा हात!

  1. Anonymous Reply

    5 November 2011 at 2:54 am

    LEKH KHUP CHAN AHE. ASE LEKH PRASIDDHA KAREVET. DHANYAWAD!.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *