Home » Blog » असा येडा पंतप्रधान पुन्हा होऊ नये!

असा येडा पंतप्रधान पुन्हा होऊ नये!

सडेतोड : अरुण रामतीर्थकर

आता मात्र हद्द झाली! चरणसिंह आणि चंद्रशेखर  यांनी दगाबाजी करून पंतप्रधानपद मिळवले तरी  त्यांचा एवढा राग आला नव्हता. देवेगौडा आणि गुजराल हे तर कोणी तयार नाही म्हणून बोहल्यावर चढवलेले पंतप्रधान, त्यांच्याबद्दल काय बोलायचे? मात्र विद्यमान पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल राग आहे, घृणा आहे. पराकोटीचा तिरस्कार वाढतो त्याचवेळी बाहुला पंतप्रधान असताना आतापर्यंत एकाही पंतप्रधानाला तोंड द्यावे लागले नाही, अशा जनक्षोभाला त्यांना तोंड द्यावे लागते, याबद्दल कीवही वाटते! पाप दुसरे करतात, मात्र ते बसते यांच्या माथी. हे त्यांना कळत असेल वा नसेल, पण या पापांचे ते समर्थन करतात, मग यांना येडा असेच म्हणावे लागेल.
 एका शहराच्या पोलीस कमिशनरच्या आड दडण्याची वेळ १२० कोटी लोकसंख्येच्या देशाच्या पंतप्रधानावर आली. यावरून पंतप्रधान काय पात्रतेचा, ते देशाला कळले. वयाची ८० वर्षे पूर्ण झाली आहेत. गांधी-नेहरू परिवाराबाहेरचे असूनही पंतप्रधानपदावर ६ वर्षे राहण्याचा अटलबिहारी वाजपेयी यांचा विक्रम त्यांनी मोडला आहे. आपले सहकारी एवढी पापे करीत असताना १० जनपथचा पट्टा गळ्यातून काढून फेकून देण्याची बुद्धी आयुष्याच्या संध्याकाळीही त्यांना का होत नाही? एवढा कसला सत्तालोभ? ‘सत्तातुराणां न भयं न लज्जा’ हे मनमोहनसिंग यांच्याबाबत तंतोतंत लागू पडते. आत्ताच्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाबाबत मनमोहनसिंग आणि कंपनीने डावपेच म्हणून ज्या गोष्टी केल्या, त्या पाहिल्यावर वेडेपणा हाच शब्द आठवतो. भले या वेडगळ, पोरकट कल्पना कपिल सिब्बल, चिदंबरम् या वकिलांच्या असतील. वेडगळ कल्पनांना पंतप्रधान हो तरी कसे म्हणाले? १६ ऑगस्टपासून पुन्हा उपोषण हे अण्णांनी एप्रिलमध्येच जाहीर केले होते. कायदा पाळायचा म्हणून ते परवानगी मागायला गेले, तर त्यांना या ऑफिसातून त्या ऑफिसात अशा १५-२० दिवस चकरा मारायला लावण्याची कल्पना कोणाची?
दिग्विजय खान नावाचा एक दुसरा वेडा आहे. तो म्हणे कॉंग्रेसचा सरचिटणीस! ‘‘अण्णांनी पुन्हा उपोषण केले, तर बाबा रामदेवप्रमाणे ते चिरडू. अण्णांच्या उपोषणाला १० हजार लोकांचा पाठिंबा मिळाला तरी खूप झाले असे मी म्हणेन’’ हे उद्गार आहेत त्या दुसर्‍या वेड्याचे. कॉंग्रेस आणि मनमोहनसिंग त्या वेड्याचे बोलणे खरे धरून चालले. अण्णांना अटक केल्यावर दिल्लीुत आणि देशात सर्वत्र प्रामुख्याने तरुणांनी रस्त्यावर येऊन अहिंसात्मक पद्धतीने रोष व्यक्त केला, तेव्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि निष्णात वकील थंड पडले. ही अटकही चुकीची. पूर्वदक्षता म्हणून पकडता येते, पण ते गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांना. अण्णांवर कोणता गुुुन्हा होता, की ते आणखी गुन्हा करण्याची शक्यता वाटली.
मला दिल्लीच्या मॅजिस्ट्रेटचेही आश्‍चर्य वाटते. अण्णांनी जामीन दिला नाही, तर वैयक्तिक जामिनावर किंवा नुसती समज देऊन सोडता येते. ७ दिवसांची कोठडी हा काय वेडेपणा? अण्णा असा कोणता गुन्हा करणार होते, ज्याच्या तपासासाठी पोलिसांना ७ दिवस द्यावेत असे मॅजिस्ट्रेटला वाटले.
हेही कायद्याप्रमाणे झाले असे आपण मानू. मग १२ तासांच्या आत सुटका हा काय प्रकार आहे? न्यायव्यवस्था राजकारण्यांच्या हातचे एवढे बाहुले झाली? खरा आचरटपणा येथेच झाला. परिस्थिती चिघळतेय असे दिसताच अण्णांना सोडायचे, पण राहुल गांधीला त्याचे श्रेय द्यायचे असे ठरले. राहुल-पंतप्रधान भेट होताच अण्णांच्या सुटकेचे आदेश निघाले, पण अल्पशिक्षित अण्णा दसपट हुशार निघाले. त्यांनी अटींसह बाहेर यायलाच नकार दिला. अण्णांना जबरजस्तीने बाहेर काढून हवाईदलाच्या विमानाने त्यांच्या गावात न्यायाचे आणि घरात नजरकैदेत ठेवायचे असे ठरले, पण तिहारच्या प्रत्येक फाटकापाशी हजारो लोक जमलेले. ‘राहुलच्या मध्यस्थीने अण्णांची सुटका’ असा ढोेल कॉंग्रेसला बडवायचा होता, पण तो ढोल वाजण्यापूर्वीच फुटला. कॉंग्रेसला राहुल देवदूत, तारणहार, मसिहा वगैरे वाटत असेल, पण कायद्याने ७०० खासदारांपैकी तो एक आहे. मॅजिस्ट्रेटचा निर्णय त्यांच्या शब्दाने रद्द कसा होतो? यालाच कायद्याचे राज्य म्हणायचे का?
शिवाजी महाराजांनी आग्‌र्रयाहून सुटून उत्तर भारत गाजवला, तर अण्णांनी तिहारमधून न सुटून सारा देश गाजवला. या सुटका प्रकरणाने कॉंग्रेसची बेइज्जती झाली, पंतप्रधानांची अब्रू गेली आणि राहुल नामानिराळा राहिला! गांधी-नेहरू घराणे पूर्वीपासूनच असे स्वार्थी आहे. नेहरूंमुळे ६२ चे चीनयुद्ध हरलो. लांच्छन आले तर बळी दिला संरक्षणमंत्री कृष्ण मेननचा. ७१ चे बांगला देश युद्ध जिंकले. ६२ च्या न्यायाने भारतरत्न किताब संरक्षणमंत्री जगजीवनराम यांना मिळायला हवा होता, पण इंदिरा गांधींनी तो स्वत:कडे घेतला. म्हणजे वाईट झाले तर दुसरा जबाबदार आणि चांगले झाले तर श्रेय गांधी- नेहरू या घराण्याला! आता अण्णा मंगळवारी रात्री सुटले असते तर राहुल गांधींची यशस्वी मध्यस्थी म्हणून कॉंग्रेसवाल्यांनी ढोल पिटून आपले कान बधिर केले असते. राहुलच्या मध्यस्थीचे तीनतेरा वाजले! आणि संसदेत हल्ला झाला मनमोहनसिंग यांच्यावर, राहुल पुन्हा गडप! उपोषण ३ दिवस, ७ दिवस, २१ दिवस, हा काय आचरटपणा?
बेअक्कल सहकार्‍यांमुळे मनमोहनसिंग यांच्यावर ही वेळ आली आहे असे समजू नका, तेही तसेच आहेत. १९९३ साली कॉंग्रेसचे रामनिवास मिर्झा यांच्या अध्यक्षतेखालील जेपीसीने त्यांना एकमताने दोषी ठरवले. त्यांना राजीनामा द्यावा लागला, पण नरसिंहरावांनी तो स्वीकारला नाही. थॉमसला सतर्कता आयोगाच्या अध्यक्षपदी नेमण्या संदर्भात सुप्रीम कोर्टात ते धादांत खोटे बोलले. बुधवारी संसदेतील निवेदन याला मी बरळणे म्हणेन. संसद सर्वोच्च. कायदा येथे होणार, बाहेर नाही हा मुद्दा त्यांनी विस्ताराने मांडला. भल्या माणसा, दोन महिने अण्णा टीमबरोबर चर्चा कोणी केली? त्यावेळी विरोधी पक्षांना एकदा तरी बोलावले का? तुम्ही आणि अण्णा परस्पर विधेयक ठरवीत होता तेव्हा संसद सर्वोच्च नव्हती. अण्णांच्या लाथा बसल्यावर मनमोहनसिंगांना सांसदीय प्रथा आठवली.
बरळताना मनमोहनसिंग नागरी हक्काचे संरक्षण करू म्हणाले. अरे, बाबा रामदेवांच्या अनुयायांवर मध्यरात्री झोेपेत असताना लाठीमार, हेच का तुझे नागरी हक्काचे संरक्षण? आपण काय करतो आणि काय बोलतो, याचे भान नसले की त्यालाच बरळणे म्हणतात.
माझे देवाजवळ एक मागणे आहे. नेहरूंपासून अनेक पंतप्रधान पाहिले. असला पंतप्रधान पाहिला नाही. या देशाची काही पुण्याई शिल्लक असेल तर असला पंतप्रधान माझ्या पुढच्या पिढीच्या नशिबात  देऊ नकोस! -रविवार, दि. २१ ऑगस्ट २०११

Posted by : | on : 8 Feb 2012
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *