Home » Blog, आंतरराष्ट्रीय, चौफेर : अमर पुराणिक, स्थंभलेखक » कशाला हवाय ऑस्कर!

कशाला हवाय ऑस्कर!

•चौफेर : •अमर पुराणिक•
 हे सर्व प्रकार पाहिल्यानंतर सनी देओल जे म्हणतो त्यातील तथ्य लक्षात येऊ शकते. असे अनेक विकृत प्रकार न करता देखील अनेक चांगले चित्रपट देता येऊ शकतात. अनेक भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांनी असे उत्तमोत्तम चित्रपट दिलेले आहेत. अनेक चित्रपटांनी इतिहास निर्माण केलेला आहे, हे विसरता कामा नये. उत्तम दर्जाला उत्तम बाजारपेठ मिळते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याला फक्त योग्य प्रसिद्धी मिळाली पाहिजे. असे झाले तर चांगल्या चित्रपटांचे नक्कीच कौतुक होते, झालेले आहे. मग ते समांतर सिनेमे असूद्यात किंवा व्यावसायिक असूद्यात. भारतीय पुरस्कार देताना देखील त्याचा दर्जा सांभाळणे महत्त्वाचे आहे. वशिलेबाजी, भ्रष्टाचाराला फाटा दिला पाहिजे. उत्तमोत्तम चित्रपटांना त्यांच्या श्रमाचे कौशल्याचे बक्षीस मिळाले पाहिजे. असे झाले तर भारतीय पुरस्कारांचे देखील महत्त्व नक्कीच वाढेल. किंबहुना ऑस्करपेक्षाही हे पुरस्कार मोठे ठरतील. त्यामुळे आपण भारतीयांनी ऑस्करसारख्या पुरस्कारांच्या पाठीमागे लागून ऑस्करचे महत्त्व नाहक न वाढवता केवळ दर्जाला महत्त्व दिले तर सनी देओलला ‘भारतीयांना ऑस्करमध्ये जाण्याची गरज काय?’ असा सवाल विचारायचा प्रसंग येणार नाही आणि माध्यमांना सनीच्या योग्य विधानावर विनाकारण भूवया उंचवायची संधी मिळणार नाही.

हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सनी देओल याने, ‘भारतीयांना ऑस्करमध्ये जाण्याची गरजच काय?’, असे मत व्यक्त केले. सनीच्या या वक्तव्यावर माध्यमांनी बर्‍याच उलट-सुलट बातम्या दिल्या, पण एक भारतीय म्हणून विचार करता सनी देओल यात काय चुकीचे बोलला हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरतो. भारतीय प्रेक्षकांची करमणूक करणे हेच भारतीय कलावंतांचे काम आहे आणि हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवायला हवा. सनी पुढे म्हणतो, ‘भारतीयांनी ऑस्करमध्ये जाण्यासाठी इतकी धावपळ का करावी?, आपण आपल्या देशात समाधानी नाही काय?, या देशातील पुरस्कार प्राप्त करून आपले समाधान होत नाही काय?’ असे प्रश्‍न सनी देओलने केला आहे. ‘माझे असे स्पष्ट मत आहे की, आपल्या देशातील १३० कोटी नागरिकांचे मनोरंजन करणे, हेच आपले पहिले कर्तव्य आहे’, असे मतही त्याने यावेळी व्यक्त केले.
खरं तर, सनीने उपस्थित केलेले प्रश्‍न महत्त्वाचे आहेत. ऑस्कर पुरस्काराचे इतके महत्त्व का?, भारतीय चित्रपटांना आणि भारतीय पुरस्कारांना महत्त्व नाही का? की आपल्या आजपर्यंतच्या पाश्‍चिमात्त्यांच्या गुलामीच्या मानसिकतेचे हेही एक प्रतीक आहे?, भारतीय सिनेमांचा दर्जा कमी आहे का? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात.
८५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय कलावंतांची भूमिका असलेल्या  ‘लाईफ ऑफ पाय’ या चित्रपटाला चार ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळाले आहेत. भारतीय कलावंतांनी या चित्रपटात काम केले असल्याने, भारतीयांना या पुरस्कारांचा आनंद होतो आहे. एका बाजूला ही आनंदाची गोष्ट असताना. दुसर्‍या बाजूला या स्पर्धेत ‘बर्फी’ या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले, पण पुरस्कार मिळाला नाही याचे दु:खही आहे. पण असे का होते याचा विचार मात्र होताना दिसत नाही.मुळात ऑस्करचे इतके महत्त्व का? हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. ऑस्करचे इतके महत्त्व वाढण्याचे कारण म्हणजे ऑस्करचा प्रचार, सातत्य, दर्जा, नावीन्याला प्राधान्य हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. यातून आजपर्यंत अनेक चांगल्या चित्रपटांना पुरस्कार मिळाले आहेत. ही काही महत्त्वाची कारणे ऑस्करचा सन्मान वाढवण्यास कारणीभूत आहेत. हे भारतीय पुरस्कारांच्या बाबतीत होऊ शकत नाही का?
भारतात एनएफडीसी, राष्ट्रीय पुरस्कारांना देखील तितकाच दर्जा होता, महत्त्व होते. हे महत्त्व साधारणपणे १९९५ पर्यंत टिकून होते. पण नंतर मात्र ही पत घसरत गेली. ही पत घसरण्याला अनेक कारणे आहेत. साधारणपणे ७०-८० च्या दशकातील समांतर चित्रपट पाहिले की हे लक्षात येते की, भारतीय चित्रपटही खूप दर्जेदार होते, पण व्यावसायिकतेच्या आक्रमणात हे समांतर चित्रपट मागे पडत गेले. ओम पुरी, नसिरुद्दिन शहा, मिथुन चक्रवर्ती, स्मिता पाटील, शबाना आजमी, अमरिश पुरी, कुलभूषण खरबंदा, अनुपम खेर, मास्टर मंजुनाथ, रघुवीर यादव असे अनेक दर्जेदार कलावंत याच समांतर चित्रपटांतून पुढे आले. मृणाल सेन, गुलजार, सत्यजित रे, के. बालाचंदर, के, विश्‍वनाथ, बापू, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी असे अनेक दर्जेदार दिग्दर्शक या समांतर चित्रपटांनी दिले. मग हे चक्र का थांबले हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुरस्कारांचे व्यावसायिकीकरण आणि सुमार दर्जांच्या व्यावसायिक चित्रपटांचा समांतर चित्रपटात शिरकाव आणि अशा टूकार चित्रपटांना पुरस्कार आणि भाडोत्री उदो,उदो (माध्यमांनी केलेला). समांतर सिनेमे हे केवळ ‘दाद’ आणि ‘पुरस्कार’ यांचे भूकेले असतात. समांतर सिनेमातून पैसा मिळवणे हे अशक्यप्राय म्हणावे लागेल. मग कमीत कमी उत्तम दर्जाच्या चित्रपटांना योग्य चिकित्सा करून न्याय देणे, पुरस्कार दिले जाणे महत्त्वाचे ठरते. नेमके हेच १९९५ नंतर घडले नाही. वशिलेबाजी, पुरस्कार मॅनेज करणे, पुरस्कार विकत घेणे असे अनेक भ्रष्ट प्रकार घडू लागले आणि समांतर सिनेमांचा सूर्यास्त होऊ लागला. त्याबरोबर दर्जेदार सिनेमांचाही दुष्काळ पडला. समांतर सिनेमांची व्यावसायिक सिनेमांबरोबर तांत्रिक बाबतीतच तुलना होऊ लागली आणि चित्रपटांचे विषय, गुणवत्ता दुर्लक्षिल्या जाऊ लागल्या. यामुळे पुरस्कारांचे महत्त्व आणि पत कमी होऊ लागली. राष्ट्रीय पुरस्कारांनाही पत राहिली नाही.
यासारखी अनेक कारणे, पैलू ऑस्करचे महत्त्व वाढवण्यास कारणीभूत आहेत. परदेशी चित्रपट महोत्सवामध्येही भारतीय संस्कृती आणि भारतीय दर्जेदार सिनेमे सादर झालेले किंवा त्या अनुषंगाने निर्माण केलेले सिनेमे दिसत नाहीत. ७०-८० च्या दशकात भारताचे दारिद्र्य समांतर चित्रपटांमधून, चित्रामधून मांडण्याचा प्रकार झाला आणि त्याला या परकीयांनी उचलून धरले. सहाजिकच प्रत्येक जण आंतरराष्ट्रीय दर्जावर पोहोचण्यासाठी तेच करू लागला. याचा अर्थ ऑस्करवाले किंवा आंतरराष्ट्रीय चित्रपट परीक्षक, समीक्षक हे दर्जापेक्षा आंतरराष्ट्रीय राजकारणच जास्त खेळत होते. ते भारतीय संस्कृती आणि आणि उत्तम दर्जेदार चित्रपट डावलत होते आणि अजूनही तेच करत आहेत. आपल्या भारतीयांनाही भारतीय संस्कृती आणि आपण भारतीय असण्याची लाज वाटते. मग अशा विषयांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर नेेणे आणि मांडणे ही दूरची बाब झाली. यामुळेच अभिनेता सनी देओलने मांडलेल्या मताचे महत्त्व आहे. आपल्याला आपण भारतीय असल्याचे गर्व असणे आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान असणे, आपल्या कौशल्यावर विश्‍वास असणे याचे महत्त्व सनीने अधोरेखित केले आहे.
दुसर्‍या बाजूला ऑस्करसाठी चित्रपट पाठवत असताना आपले भारतीय कलावंत अनेक गोष्टीत कमी पडतात. एक म्हणजे ‘युनिकनेस’, ‘अद्वितीय’. ऑस्करसाठी चित्रपट हा वेगळ्या विषयावर असावा ही सामान्य आर्हता आहे. ऑस्करच नव्हे तर, कोणत्याही पुरस्कारांसाठी निवड व्हावी म्हणून असे वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट निर्माण करणे महत्त्वाचे असते. असे असताना अमीर खानने ‘लगान’ हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवला. पण लगान हा चित्रपटच मुळात इंग्रजी चित्रपटावरून चोरलेला असताना आपण ऑस्कर पुरस्कार मिळण्याची अपेक्षा कशी ठेऊ शकत होतो. अमीर खानने ‘लगान’ हा चित्रपट जॉन हस्टन दिग्दर्शित आणि सिल्वेस्टर स्टॅलन, मायकल केन, फुटबॉलपटू पेले, डॅनियल मेस्सी अभिनीत १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘एस्केप टू व्हिक्टरी’ या इंग्रजी चित्रपटाची भ्रष्ट नक्कल होता. व्हिक्टरीमध्ये विषय फुटबॉलवर तर लगानमध्ये क्रिकेट इतकाच बदल होता. मग अशा चोरलेल्या चित्रपटांना कसे पुरस्कार मिळतील. ‘व्हिक्टरी’ला ऑस्करचे नामांकन मिळालेले नसताना ‘लगान’ला नामांकन मिळाले हिच आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणावी लागेल. शिवाय आंग्लसाहेबांना स्वत:चा अपमान करणारे चित्रपट कसे आवडतील.
दुसरा ऑस्करप्राप्त चित्रपट म्हणजे ‘स्लमडॉग् मिलेनियर’. या चित्रपटाने ऑस्कर पटकावला. आम्हा भारतीयांना त्याचा प्रचंड आनंद ही झाला. पण यावर आपण एक भारतीय म्हणून आत्मपरीक्षण करताना मात्र आपल्याला संताप आल्यावाचून राहत नाही. ‘स्लमडॉग मिलेनियर’सारख्या सूमार आणि घाणेरड्या चित्रपटाला ऑस्कर मिळतो हा धक्का आपल्याला बसल्याशिवाय राहत नाही. बीभत्स आणि घाणेरडे चित्रण, सुमार विषय आणि विस्कळीत कथा असतानाही या चित्रपटाला पुरस्कार मिळाला. यापाठीमागे केवळ आंतरराष्ट्रीय राजकारण आणि  भारतीय बाजारपेठ हेच कारण असू शकते.
आजपर्यंत ऑस्कर पुरस्कार निवडीबाबतही अनेक घोटाळे आणि आरोप झालेले आहेत, वशिलेबाजी झालेली आहे, राजनैतिक आणि आर्थिक गणिते उघडी पडली आहेत. याही वेळी  इराणमधील ओलिस नाट्यावर आधारित बेन ऍफलेक्स यांच्या ‘ऑर्गो’ या चित्रपटाला तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत, पण अर्गोला सर्वोत्तम चित्रपटाचा मिळालेला पुरस्कार राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप इराणचे सांस्कृतिक मंत्री मोहम्मद होसैनी यांनी केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी व्हाईट हाऊसचे प्रतिनिधित्व करत पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहणे हे पुरस्कार मिळवण्यामागे पहिले कारण असल्याचा दावा इराणमधील प्रसारमाध्यमांनी केला आहे. इराण विरोधी चित्रपटाला पुरस्कार सोहळ्यास नामांकन देण्यात येणे आणि त्याचवेळी मिशेल ओबामा यांनी उपस्थित राहणे यामागे पाणी मुरत असल्याचे इराणच्या प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. इराण विरोधी असल्याने कोणतेही कथानक आणि तांत्रिक बाबी नसूनही अर्गो चित्रपटाला पुरस्कार दिल्याचा आरोप होसैनी यांनी केला आहे. यातून पाश्‍चिमात्त्य राष्ट्रांचे आंतरराष्ट्रीय राजकारण उघड होते.
भारतीय चित्रपट ऑस्करमध्ये जावेत, त्यांना पुरस्कार मिळावेत म्हणून आपल्या बर्‍याच निर्मात्या, दिग्दर्शकांनी नावीन्यांच्या नावाखाली विकृतीला महत्त्व दिले, विकृत चित्रपट बनवले, केवळ बनवले नाही, तर भारतीय प्रेक्षकांवर जबरदस्ती प्रचार करून लादण्याचा प्रयत्न केला. तशी विकृत संस्कृती रुजवण्याचेही प्रयत्न झाले आहेत.
हे सर्व प्रकार पाहिल्यानंतर सनी देओल जे म्हणतो त्यातील तथ्य लक्षात येऊ शकते. असे अनेक विकृत प्रकार न करता देखील अनेक चांगले चित्रपट देता येऊ शकतात. अनेक भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांनी असे उत्तमोत्तम चित्रपट दिलेले आहेत. अनेक चित्रपटांनी इतिहास निर्माण केलेला आहे, हे विसरता कामा नये. उत्तम दर्जाला उत्तम बाजारपेठ मिळते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याला फक्त योग्य प्रसिद्धी मिळाली पाहिजे. असे झाले तर चांगल्या चित्रपटांचे नक्कीच कौतुक होते, झालेले आहे. मग ते समांतर सिनेमे असूद्यात किंवा व्यावसायिक असूद्यात. भारतीय पुरस्कार देताना देखील त्याचा दर्जा सांभाळणे महत्त्वाचे आहे. वशिलेबाजी, भ्रष्टाचाराला फाटा दिला पाहिजे. उत्तमोत्तम चित्रपटांना त्यांच्या श्रमाचे कौशल्याचे बक्षीस मिळाले पाहिजे. असे झाले तर भारतीय पुरस्कारांचे देखील महत्त्व नक्कीच वाढेल. किंबहुना ऑस्करपेक्षाही हे पुरस्कार मोठे ठरतील. त्यामुळे आपण भारतीयांनी ऑस्करसारख्या पुरस्कारांच्या पाठीमागे लागून ऑस्करचे महत्त्व नाहक न वाढवता केवळ दर्जाला महत्त्व दिले तर सनी देओलला ‘भारतीयांना ऑस्करमध्ये जाण्याची गरज काय?’ असा सवाल विचारायचा प्रसंग येणार नाही आणि माध्यमांना सनीच्या योग्य विधानावर विनाकारण भूवया उंचवायची संधी मिळणार नाही.
तरुण भारत, आसमंत, ३ मार्च २०१३.

Posted by : | on : 6 Mar 2013
Filed under : Blog, आंतरराष्ट्रीय, चौफेर : अमर पुराणिक, स्थंभलेखक
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *