Home » Blog » कै. विष्णुपंत गुंडोपंत वळसंगकर तथा गुरुराव वळसंगकर : एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

कै. विष्णुपंत गुंडोपंत वळसंगकर तथा गुरुराव वळसंगकर : एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

कै. विष्णुपंत गुंडोपंत वळसंगकर तथा गुरुराव वळसंगकर :
एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

परिचय लेख
•ऍड. अशोक वळसंगकर
सुप्रसिद्ध विधिज्ञ, इतिहास अभ्यासक स्वा. सावरकरांचे भक्त कै. नानासाहेब तथा गुरुराव वळसंगकर यांनी प्रचंड लिखाणरुपी साहित्याचा अमोल खजिना निर्माण केला आहे, त्या खजिन्यातील एक एक अलंकार ‘दै. तरुण भारतच्या’  ‘आसमंत’ पुरवणीत प्रसिध्द करीत आहोत. त्यांच्या चिंतनाचा, विचारांचा व हिंदूत्वावरील जाज्वल्य निष्ठेचा परिचय व्हावा……..
जुन्या पिढीतील निष्णांत कायदेपंडित, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम भक्त, हिंदुमहासभेचे एक जुन्या पिढीतील नेते अशी कै. नानासाहेब तथा गुरुराव वळसंगकर यांची ओळख, सोलापुरातील रहिवाशांना निश्‍चितच आहे.
‘वकिली व्यवसाय नि मी’ अशा शीर्षकाचे एक पुस्तक १९८६ मध्ये त्यांनी लिहून त्यांच्याच चिरंजीवांच्या ‘नटराज प्रकाशन’ या प्रकाशन संस्थेतर्फे प्रसिध्दही केले होते. कै. नानासाहेबांनी या पुस्तकाद्वारे वकिलीचा व्यवसाय जो ‘नोबेल प्रोफेशन’ म्हणून मानला जातो, तो त्यांनी कसा आदर्शवत आपल्या निवृत्तीच्या क्षणापर्यंत केला, त्यांनी वकिलीचा व्यवसाय कसा निष्ठेनी, नितीमत्तेनी लोकक्षोभाची तमा न बाळगता आपल्या पक्षावरील निष्ठेने विनामूल्य कसा केला, त्याचप्रमाणे पक्षकाराच्या हिताकरीता जे कायद्याला संमत आहे, त्या तत्त्वांवर निष्ठा ठेवून तत्परतेने व सेवावृत्तीने आपल्या पक्षकारांची सेवा योग्य व वाजवी असे सेवाशुल्क घेऊन कशी केली याबद्दल अतिशय सुंदर पध्दतीने विवेचन त्या पुस्तकात केले आहे. त्यांच्या मते, भगवान श्रीकृष्ण हे पाच हजार वर्षांपूर्वी पेक्षाही अधिक काळाचे एक आदर्शभूत पहिले वकील होते, ज्यांनी पांडवांची न्यायपक्षाची बाजू घेऊन वकिली केली व ती ही कोणताही स्वार्थ मनात न धरता, अशारितीने कै. नानासाहेबांनी वकिली पेशाचे उच्च स्वरुप त्या पुस्तकात कथन केले आहे. ‘वकिली व्यवसाय नि मी’ या त्यांच्या पुस्तकात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती भीमराव नाईक यांनी अभिप्राय नोंदवला व कै.नानासाहेब तथा गुरुराव वळसंगकर यांचे परममित्र सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कै. विद्यारण्य दत्तोपंत तुळजापूरकर यांनी ही उत्तम असा अभिप्राय कळविला होता. कै. नानासाहेबांचे लहानपणापासूनचे मित्र ज्येष्ठ विधिज्ञ कै. रावसाहेब भालचंद्र गणेश जोशी, कै. लक्ष्मीकांत वासुदेवराव मोहोळकर, तसेच त्यांना ही ज्येष्ठ असलेले विद्वान विधिज्ञ कै.व्ही.एस. देशपांडे अशा सर्व विद्वत्‌जनांनी नानासाहेबांच्या स्वानुभवाच्या पुस्तकाचे खूपच स्वागत केले होते.
सन १९३५ ते सन १९८५ अशा दीर्घ काळातील नानासाहेबांच्या वकिली व्यवसायातील सर्व अनुभव विशेषत: सामाजिक अंगाचे अनुभव त्या पुस्तकात नानासाहेबांनी खूपच बोलके केलेले आहेत. त्यांनी चालविलेल्या अनेक महत्त्वाच्या खटल्यांचा परामर्श त्यांनी अतिशय परखडपणे व निर्भिडपणे या पुस्तकात घेतला आहे. न्यायाधीशांच्या वर्तनाबद्दल, विद्वत्तेबद्दल तसेच त्यांच्या तत्त्वनिष्ठेबद्दल त्यांनी या पुस्तकात आपले सडेतोड प्रतिपादन केले आहे. वकिलांची कर्तव्ये कोणती, वकिलांतील वाढत्या अपप्रवृत्ती कोणत्या व त्यावर उपाय काय असावेत, न्यायखात्यातील कर्मचारी, त्यांची वागणूक, त्यांच्या कृती व त्यासंबंधी काय उपाययोजना करावी, कोर्टात येणार्‍या सर्वसामान्य जनतेवर कसा अन्याय होतो, त्यांना लवकरात लवकर कसा न्याय मिळेल, याचीही अतिशय समर्पक चर्चा या पुस्तकात त्यांनी केली आहे.
कै.नानासाहेब यांनी १९३५ ते १९८५ अशा प्रदीर्घ पन्नास वर्षे सक्रीयपणे, समर्थपणे व तत्त्वनिष्ठेने वकिली व्यवसाय केला व आपल्या पित्याने कै. गुंडोपंत सखाराम वळसंगकर यांनी सन १९०२ मध्ये वळसंगकर घराण्यात वकिली व्यवसायाची जी मुहूर्तमेढ रोवली त्याची उत्तुंग अशी पताका फडकाविली व तीच उत्तुंग पताका किंवा ध्वज पुढील पिढीच्या हाती सोपविला. अस्मादिक विधिज्ञ अशोक विष्णुपंत वळसंगकर १९७३ पासून वकिली व्यवसायात त्याच निष्ठेने कार्यरत आहेत. माझे चिरंजीव अनिरुध्द अशोक वळसंगकर याने ही घराण्याची पताका आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकावली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालय, गुजरात उच्च न्यायालय, नागपूर उच्च न्यायालय अशा न्यायालयांत तो कार्यरत आहे.
कै. नानासाहेब यांनी पूर्ण सक्षमपणे वकिली व्यवसाय पुढे चालविण्यास सक्षम असतानाही स्वतःहून १९८५ मध्ये निवृत्ती स्वीकारली. ती अशी की पुन्हा म्हणून न्यायालयात त्यांनी वकील म्हणून पाऊल ठेवले नाही. कठोर निर्णय घेणे हा त्यांचा वाणा व निवृत्त जीवन जगणे ही त्यांची इच्छा होती. त्यांना जवळजवळ नव्वद वर्षांचे  आयुष्य लाभले. निवृत्तीनंतरचे आयुष्य त्यांनी सर्व तर्‍हेच्या वाचनात व लिखाणात घालवले. अफाट तैलबुध्दी, जबरदस्त स्मरणशक्ती, तसेच वाचनाचा त्यांचा प्रचंड आवाका होता. स्वा. सावरकर त्यांचे दैवत. स्वा. सावरकरांच्या साहित्याची त्यांनी पारायणे केली. सावरकरांवरील अन्य जणांनी, जे जे लिहिले ते ते त्यांनी वाचलेेले होते. वाचनाच्या त्यांच्या वेडाने त्यांनी वेद वाङ्‌मय, उपनिषदे, महाभारत, पुराणे अशी वाङ्‌मये व साहित्यातील सर्व तर्‍हेचे प्रकार चौफेर असे वाचनाची आवड होती. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संपादिलेले ज्ञानकोषाचे सर्व खंड कै. गुंडोपंतांनी विकत घेतले होते. ते सर्व खंड कै. नानासाहेबांनी वाचून काढले. निवृत्तीनंतर त्यांनी घरबसल्या कायदेशीर सल्ला देण्याचेही काम केले, आपले कायद्याचे ज्ञानही अद्ययावत असावे म्हणून मी चालू केलेले कायद्याचे रिपोर्टस् म्हणजे दरमहा येणारे कायद्याच्या संबंधातील उच्च न्यायालयाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे अहवाल, ते नियमितपणे वाचत असत व एखादा महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या वाचनात आल्यावर माझ्या फावल्या वेळात त्यावर ते चर्चाही करीत.
नानांची एक्काहत्तरी आम्ही सर्व कुटुंबिय, आप्तेष्ट व मित्रमंडळींनी सार्वजनिकपणे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश शहा व त्यांच्या पत्नी यांच्या उपस्थितीत साजरी केला होती.
असे हे निपुण विधिज्ञ ३० जानेवारी २००३ रोजी निवर्तले, त्यांनी त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यात ज्या प्रचंड लिखाणरुपी साहित्याचा अमोल असा खजिना निर्माण केला आहे, त्या खजिन्यातील एक एक अलंकार आम्ही ‘तरुण भारतच्या’ सौजन्याने प्रसिध्द करीत आहोत. येत्या ३० जानेवारी २०१२ या दिवशी नानासाहेबांना जाऊन नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या लिखाणाचे प्रकाशन ही त्यांना श्रध्दांजलीच होय.
Posted by : | on : 3 Dec 2011
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *