Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक » कॉंग्रेसचा झाला संसदीय मुखभंग!

कॉंग्रेसचा झाला संसदीय मुखभंग!

•चौफेर : अमर पुराणिक•

जर कॉंग्रेस आपल्या अडमुठ्‌या भूमिकेवर अडून राहणार असेल तर मग भाजपाला इतर विरोधी पक्षांना कॉंग्रेसपासून वेगळे पाडावे लागेल किंवा मग  संसद चालवल्याशिवाय शासन चालवण्याचा उपाय शोधावा लागेल. कॉंग्रेसला आपले उरले सुरले अस्तित्व शिल्लक राखायचे असेल तर अवसानघातकी राजकारण सोडणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर मग कॉंग्रेसचा अंत जवळ आला आहे असे म्हणावे लागेल. पण स्वत:च्या अंताबरोबरच कॉंग्रेस देशाचे फार मोठे नुकसान करत आहे, त्याला जबाबदार कॉंग्रेसच आहे.

sushma swaraj-arun jeitley - in parliamentपाहता पाहता संसदेचे पावसाळी अधिवेशन पाण्यात वाहून गेले. आपल्या विक्षिप्त भूमिकेने सोनिया आणि राहुल गांधी यांनी पावसाळी सत्र विफल केले. या पुर्ण संसदीय सत्रादरम्यान कॉंग्रेसने लोकसभा आणि राज्यसभेत जसे वर्तन केले तसे उदाहरण इतिहासात सापडणे मुश्किल आहे. पावसाळी अधिवेशनाचे वाटोळे केल्यानंतर सोनिया आणि राहुल गांधी सर्वांच्या टीकेचे लक्ष्य बनले आहे. आता ते आपण किती योग्य केले हे दर्शवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लोकसभेत अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी ज्या तर्‍हेने कॉंग्रेसची पोलखोल केली ती पाहता कॉंग्रेसला पळता भुई थोडी झाली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अक्षरश: तोंडावर पडण्याची वेळ आली.
सुषमा स्वराज आणि शिवराजसिंह चौहान यांच्या राजिनाम्यावर अडून बसलेल्या कॉंग्रेसने सुषमा स्वराज आणि शिवराजसिंह चौहान यांच्यावर आरोप केले. कॉंग्रेसच्या काळात झालेल्या प्रचंड मोठ्‌या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन भाजपाने असाच संसदेत गोंधळ घातला होता म्हणून आम्हीही संसद चालू देणार नाही अशी विक्षिप्त भूमिका कॉंग्रेसने घेतली आहे. कॉंग्रेसने प्रथम हे समजून घेणे आवश्यक आहे की, ए. राजा, पवन बंसल, अश्‍विनी कुमार किंवा मग अशोक चव्हाण यांच्यावर त्यांनी केलेल्या घोटाळ्याच्या प्रकरणात गुन्हे-याचिका दाखल झालेल्या होत्या. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांना राजिनामा द्यावा लागला होता. त्यांनी केलेल्या घोटाळ्याचे बरेच पुरावे होते. त्यामुळे कॉंग्रेसने केलेला संसद न चालू देण्याचा आणि राजिनाम्याचा अट्‌टाहास मात्र पुरता फसला. पहिल्यांदी कॉंग्रेस सुषमा स्वराज, शिवराजसिंह चौहान आणि वसुंधरा राजे यांच्या राजिनाम्यावर अडली होती आणि सत्र संपण्याच्या दोन दिवस आधी ललित मोदी प्रकरणावर स्थगन प्रस्ताव आणला. आश्‍चर्यकारकरितीने सरकारने या स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची स्विकृती दिली आणि तेथून पुढे कॉंग्रेसच्या खर्‍या फजितीला सुरुवात झाली. कॉंग्रेसने उगारलेले शस्त्र बुमरँगसारखे त्यांच्यावरच उलटले.
ललित मोदी प्रकरणावर चर्चेच्या दरम्यान अतिशय वाईट तर्‍हेने उघडी पडलेली कॉंग्रेस हे सत्य का स्विकारत नाही की, केवळ राहुल गांधींनी आरोप केला म्हणून  सुषमा स्वराज आरोपी ठरत नाहीत. त्यासाठी आरोप कागदोपत्री सिद्ध करावा लागतो, किमान आरोप टिकण्याइतका तरी त्यात दम असावा लागतो. त्यामुळे राहुलने केलेला पोकळ आरोप सुषमा स्वराज यांच्या राजिनाम्याचा आधार होऊ शकत नाही. कॉंग्रेस नेत्यांनी लोकसभेतील सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांची भाषणे नीट ऐकलेली दिसत नाहीत. कारण स्वराज आणि जेटली यांनी त्यांच्या भाषणात कॉंग्रेसने केलेल्या आरोपांचा फज्जा उडवला आहे. अरुण जेटली यांनी तर हे ही सिद्ध केले आहे की, कॉंग्रेसच्या कार्यकाळात ललित मोदी याच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या नावावर कॉंग्रेस नेत्यांनी काय काय कारस्थानं केली होती. अरुण जेटली यांच्या सडेतोड उत्तराने खरे तर सोनिया आणि राहुल गांधी यांचे नाक कापले गेले आहे.
सुषमा स्वराज यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांच्या उत्तरादाखल राहुल गांधींना विचारले की, बोफोर्स प्रकरणात क्वात्रोची आणि युनियन कार्बाईड प्रकरणात एंडरसन याना देशातून पळून जाऊ देण्याच्या बदल्यात राजीव गांधी यांनी पैसे घेतले होते त्याचे उत्तर अजुनपर्यंत सोनिया किंवा राहुल गांधी यांनी दिलेले नाही. भोपाळ वायू दुर्घटनेला जबाबदार असलेल्या युनियन कार्बाइड कंपनीचा प्रमुख एंडरसन याला भारतातून पळून जाऊ देण्याच्या बदल्यात अमेरिकेत शिक्षा भोगत असलेल्या अदिल शहरयार याच्या सुटकेचा मुुद्दाही सुषमा स्वराज यांनी मांडला. ही प्रकरणे खूप जुनी आहेत पण अजुनही त्यांची उत्तरे सोनिया गांधी यांनी दिलेली नाहीत. एंडरसनला पलायनाला मदत केल्याच्या बदल्यात गांधी परिवाराचे खास असलेले युनुस खान यांचे चिरंजिव आणि राजीव गांधी यांचे मित्र आदिल शहरयार अमेरिकेच्या जेलमधून सुटून भारतात येऊ शकले.
आदिलची सुटका रहस्यमय पद्धतीने झाली होती आणि राजीव गांधी यांनी त्याच्या सुटकेसाठी विशेष प्रयत्न केले होते. गांधी घराण्याने सांगावे की काय कारण आहे की राजीव गांधी यांना भोपाळमध्ये हजारो लोकांचे हकनाक गेलेले जीव विसरुन आदिल याची सुटका करणे आवश्यक वाटले. गांधी परिवारावर हा ही आरोप आहे की, याच कारणास्तव भोपाळ वायु दुर्घटना पिडीतांना पर्याप्त मदत/नुकसान भरपाई मिळू शकली नाही. राहुल गांधी सुषमा स्वराज यांना अपराधी ठरवत आहेत, पण हे सांगत का नाहीत की त्यांच्या वडिलांनी अमेरिकेत शिक्षा भोगत असलेल्या अपराध्याची का मदत केली? राहूल गांधी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत की, सुषमा स्वराज यांनी इतकेच म्हंटले होती की, ललित मोदी याला ब्रिटनहून पोर्तूगालला आपल्या आजारी पत्नीला पाहण्यासाठी जाण्याची परवानगी ब्रिटीश सरकार आपल्या नियमांच्या आणि कायद्याच्या चौकटीत देत असेल तर त्याचा भारत-ब्रिटन संबंधावर प्रभाव पडणार नाही. आता काय राहुल गांधी हे सिद्ध करण्याच्या स्थितीत आहेत की, ललित मोदी याला ब्रिटन सरकारने पोर्तुगालला जाऊ दिल्यामुळे भारत-ब्रिटन संबंधांवर काय दूष्परिणाम झाले आहेत? कदाचित राहुल गांधी यांच्या बौद्धिक क्षमतेपलिकडची ही गोष्ट आहे. पण सिद्ध न करु शकणार्‍या आरोपांचा सपाटा मात्र राहुलकडून सुरु आहे.
कॉंग्रेस नेत्यांनी घातलेला गोंधळ तर वाह्यात होताच कारण सोनिया आणि राहुल गांधी यांची त्यांना फुस होती पण इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गोंधळाला साथ देण्याचे कारण काय? जर कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांव्यतिरिक्त इतर विरोधी पक्ष संसदेत राजिनाम्याची मागणी करत नव्हते तर मग ते बिजद आणि अन्ना द्रमुक यांच्या सोबत का नव्हते? जर कॉंग्रेस आपल्या अडमुठ्‌या भूमिकेवर अडून राहणार असेल तर मग भाजपाला इतर विरोधी पक्षांना कॉंग्रेसपासून वेगळे पाडावे लागेल किंवा मग  संसद चालवल्या शिवाय शासन चालवण्याचा उपाय शोधावा लागेल. कॉंग्रेसला आपले उरले सुरले अस्तित्व शिल्लक राखायचे असेल तर अवसानघातकी राजकारण सोडणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर मग कॉंग्रेसचा अंत जवळ आला आहे असे म्हणावे लागेल. पण स्वत:च्या अंताबरोबरच कॉंग्रेस देशाचे फार मोठे नुकसान करत आहे त्याला जबाबदार केवळ कॉंग्रेसच आहे.

Posted by : | on : 23 Aug 2015
Filed under : Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *