Home » Blog » कोणत्या प्रकारचा राजकारणी आहे हा?

कोणत्या प्रकारचा राजकारणी आहे हा?

  ते एकदम स्तब्ध आणि आश्‍चर्यचकित झाल्यासारखे दिसत होते. एक युरोपियन मुत्सद्दी एका भारतीय मित्राच्या मदतीने तेथे सुरू असलेली चर्चा समजून घेण्याचा प्रयत्न करीत होते. हे समजून घेताना तारांबळ उडाल्याने, त्यांनी मला विचारले, ‘हे भारतातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि हा कार्यक्रमदेखील त्यांच्याच पुस्तकाच्या प्रकाशनाचा आहे, तरीही त्यांनी, सोनिया आणि मननोहनसिंगांबद्दल चकार शब्द काढला नाही, असे का ? त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप करून ते हवी तशी प्रसिद्धी मिळवू शकले असते, माध्यमांमध्ये त्यांची चर्चाही झाली असती. पण, सध्याच्या उत्तेजक आणि परस्पर आक्रमक राजकीय वातावरणात गडकरी गरिबी, ऊर्जा, शेती, शेतकरी, शिक्षण आणि जलसंधारणासह सुदूर भागातील, खेड्यांमधील मुलींना नव्या शाळांची कवाडं खुली करून देण्यासाठी कसा पुढाकार घेतला, याबद्दल भरभरून बोलत होते. आश्‍चर्य आहे ! गडकरी कशा प्रकारचे राजकारणी आहेत? राजकारण्यांनी देशाच्या आणि पक्षाच्या ध्येय-धोरणांबद्दल बोलण्याचा नेहेमीचा प्रघात आहे. विरोधकांवर आरोप करा, त्यांच्यावर टीका करा, त्यांच्यातील कमतरतेवर बोट ठेवा आणि कसेही करून प्रसिद्धीच्या झोतात राहा. पण यांनी तर तो प्रघातच मोडीत काढला. अगदी नेहेमीचे संकेत डावलून उलट कृती केली. एखाद्या राजकारण्यासाठी स्वप्नवत ठरावा, असा तो कार्यक्रम होता. जीवनाच्या विविन्न क्षेत्रातील मातब्बर आणि दिग्गज मंडळी व्यासपीठावर विराजमान होती. विकासाच्या राजकारणाबद्दल तसेच विभिन्न विषयांवरील विशेषतः गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यावरील त्यांनी दिलेल्या भाषणांचा समावेश असलेल्या हिंदी भाषेतील पुस्तकाच्या प्रकाशनाचा तो आगळावेगळा सोहळा होता. अनेक देशांचे राजदूत, मुत्सद्दी, पुढारी, राजकीय कार्यकर्ते, लेखक आणि प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी सभागृह गच्च भरलेे होते. अलंकारिक भाषाशैलीने तसेच हाय प्रोफाईल राजकीय ड्रामा करून गडकरी या संधीचा लाभ घेऊ शकले असते. त्याबद्दल कुणाची तक्रारही राहिली नसती. नेहेमी असेच होत असते, त्यामुळे त्याकडे स्वाभाविकतेनेच पाहिले गेले असते. फुशारक्या मारण्यास अनुत्सुक असलेल्या गृहस्थासारखे ते बोलले. मी लेखक नाही. आधी टिपणे काढून भाषण देण्याची माझी सवय नाही. माझे भाषण आयत्यावेळी तयार केलेले असते. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर माझे अनुभवच मी कथन करीत असतो. हे पुस्तकदेखील त्यापेक्षा निराळे नाही. यात माझ्या अनुभवांचेच संकलन आहे. मी ना विद्वान आहे ना परिपूर्ण लेखक. तुम्ही मला एक सुमार बुद्धीचा सामान्य कार्यकर्ता संबोधू शकता, ज्याने एकेकाळी नागपुरातील भिंतींवर भारतीय जनता पार्टीची पोस्टर्स चिकटविली आहेत. अटलजी आणि अडवाणीजी यांच्या पोस्टर्सकडे पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दल इतका भीतीयुक्त आदरभाव निर्माण झाला की, जेव्हा केव्हा हे नेते नागपुरात येत, तेव्हा मी त्यांच्या कारपर्यंत जाण्याचेही टाळत असे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले. एकदा दारिद्र्याने गांजलेल्या आणि नक्षलवादाने त्रस्त असलेल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना, माझी नजर अंगावर साडीसारखे झिरझिरीत कापड पांघरलेल्या एका वृद्ध महिलेकडे गेली. तिची दशा पाहून मी अस्वस्थ झालो. तिची मुलगी आत, झोपडीत होती. आम्ही स्थानिक समस्यांबद्दल तिच्याकडे विचारणा करू लागताच, अनिच्छेनेच तिने होकार दिला आणि ती झोपडीच्या आत गेली. थोड्याच वेळात तिची मुलगी झोपडीबाहेर आली. आपल्या आईने परिधान केलेले साडीसारखे तेच वस्त्र तिने अंगावर घेतले होते. दारिद्र्य कुठल्या थरापर्यंत राहू शकते, याचा प्रत्यक्ष अनुभव मला या प्रसंगातून आला. या घटनेने माझे हृदय पिळवटून निघाले आणि त्यातूनच मी गरिबांसाठी, वंचितांसाठी, वनवासींसाठी आणि रंजल्या-गांजल्यांसाठी काम करण्याची प्रेरणा घेतली. गडकरींचेच हे शब्द. ते त्यांच्या अंतःकरणातून बोलतात. बनावट कीर्ती अथवा न मिळवलेल्या शिष्यवृत्तीचे कवच धारण करण्याची गरज त्यांना कधीच भासत नाही. माझ्या माहितीनुसार भारत बालाने कधीच कोणत्याही व्यक्तीवर, त्यातल्या त्यात एखाद्या राजकीय नेत्यावर लघुपट तयार केलेला नाही. पण त्यांना गडकरींवर लघुवृत्तपट तयार करण्यात हशील आहे, असे वाटले. १० मिनिटांचा हा वृत्तपट सर्वांच्या डोळ्यात प्रकाश पाडणारा ठरावा. विदर्भातील होरपळलेली जमीन, वंचित आदिवासी आणि ग्रामीण लोकांना गडकरींच्या दूरदृष्टीमुळे कसा फायदा झाला, याचे सुरेख वर्णन यात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या चमत्कारिक आर्थिक व्यवस्थापनामुळे तापलेल्या मातीला पाणी मिळाले आणि तिच्यात प्राण आला. त्यांच्याच पुढाकारामुळे विकासाच्या मार्गावर शेवटच्या टोकाला उभी असलेली व्यक्ती लाभान्वित झाली. याला सामाजिक उद्योजकता म्हणतात, असे ते सांगतात. जनतेला ऊर्जेच्या बचतीचे महत्व पटवून देणे, खेड्यांमध्ये सौर दिव्यांचे वाटप, जंगली श्‍वापदे आणि तृणभक्षींपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी आदिवासी खेड्यांमध्ये सौर कुंपणांची उभारणी हे आतापर्यंत कुठेही न पाहिलेले प्रयोग त्यांनी विदर्भात करून दाखविले. नव्या शाळा सुरू करणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, शेतकर्‍यांना पाणी साठवण्यासाठी मदत करणे, धरणं बांधणे ही कामेही त्यांच्याच दूरदृष्टीमुळे सहज साकारू शकली. विदर्भातील सहा जिल्हे आत्महत्याग्रस्त आहेत. आतापर्यंत येथे कर्ज, सिंचनाचा अभाव आणि नापिकीला कंटाळून सात हजारांवर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेथील शेतकर्‍यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठीही त्यांच्या इच्छाशक्तीमुळे पावले उचलली गेली. लाखो टन इथेनॉलची निर्मिती ही त्यांच्याच कल्पनेतून साकार होऊ शकली. यामुळे आयातीत कच्च्या तेलावरील परावलंबित्व कमी झाले. पूर्ती ऍग्रोटेकच्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि त्यातून अल्पशिक्षित महिलांना यशस्वी उद्योजिका करण्याचे श्रेयही त्यांनाच द्यावे लागेल. गडकरी काय चीज आहे, हे यावरून पटकन ध्यानात येईल. सारे राजकारणी जी कामे नित्य करतात त्यापेक्षा निश्‍चितच ही कामगिरी मोलाची आणि जनतेच्या सर्वांगीण उन्नतीची आहे. सरकारनेच ही सारी कामे करावी, अशी सार्‍या राजकारण्यांची नेहेमीचीच अपेक्षा असते आणि तेच त्यांचे नित्याचे कर्म असते. ज्या ठिकाणी खरोखरीच राजकारण्यांनी कामे करावी, आगळे प्रकल्प उभारावेे, अशी ही परिस्थिती नाही का? त्यांनी तसा नित्याचा धर्म का करू नये? तुमच्याजवळ मुद्दे असतील, बोलायला काही जागा असतील तर त्यांच्यावर शंभर वेळा नव्हे तर हजार वेळा टीका करायला हरकत नाही. पण त्यांची विकासाची, प्रगतीची, जनतेच्या हाकेला ओ देत धावून जाण्याची आणि नवे काहीतरी करून दाखवण्याची बाब आगळीच म्हणावी लागेल. (लेखक राज्यसभा सदस्य आहेत)
स्रोत: तरुण भारत : 10/14/2011
Posted by : | on : 16 Oct 2011
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *