Home » Blog » नाट्य संमेलन एकदाचे उरकले

नाट्य संमेलन एकदाचे उरकले

सडेतोड : अरुण रामतीर्थकर

सांगलीच्या ९२ व्या नाट्य संमेलनात एक जेवणावळी सोडल्या तर वाखाणण्याजोगे काही झाले नाही. ऐनवेळचे उद्घाटक अमोल पालेकर यांनी कालबाह्य तर्कदृष्ट विचार मांडून प्रथमग्रासे मक्षिकापात: केला प्रेक्षकांनी नाकारलेल्या समांतर रंगभूमीचा विचार पारंपरिक रंगभूमीच्या व्यासपीठावर मांडून पालेकर यांनी मिळालेल्या व्यासपीठाचा दुरूपयोग केला आहे. 

२ वे मराठी नाट्य संमेलन सांगलीत झाले. झाले म्हटले की गर्दी अगदी सपक वाटते, संपन्न झाले की कसे भारदस्त आणि अदबशीर वाटते. तरीही मी नाट्य संमेलन उरकले असेच म्हणेन. अगदीच यथार्थ वर्णन करायचे झाले तर एकदाचे पार पडले असेच म्हणणे योग्य ठरेल.  नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने असे म्हणतात, येथे ते लागू पडते. संमेलन घ्यायचे म्हटले तर प्रथम त्याचा लोगो तयार करायला हवा हे काम एका निर्बुद्ध माणसाकडे दिले. त्याने ९२ हा आकडा काढताना त्यात वेढावाकडा करून गणपती कोंबला. श्रीगणेशाची ही चक्क विटंबना होती . विटंबना म्हणजेच कल्पकता, कला असे समजण्याचे दिवस आता सरत चालले आहेत अशा लोगोला विरोध झाला. लगेच काही जण समर्थन करायला लागले. बर्‍याच वादंगानंतर लोगो बदलणे भाग पडले.
संमेलन म्हणजे मिरवण्याची संधी. संमेलन सांगलीत घ्यायचे म्हणजे सांगलीत. तेथे सवता सुभा असेल याची काय कल्पना. सांगलीतच चिंतामणीनगर येथे नाट्य शाखा आहे. शफी नायकवाडी हे गृहस्थ त्याचे अध्यक्ष आहेत. या गृहस्थाची प्रथम ओळख सांगतो. काही वर्षांपूर्वी हे गृहस्थ राज्यनाट्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सोलापूरला आले होते. त्यांचे स्वत:चे नाटकही सांगलीत होते. एका केंद्रावर स्पर्धक असलेला दुसर्‍या केंद्रावर परीक्षक हे स्पर्धा संयोजकांना चालले कसे हा प्रश्‍नच आहे. स्पर्धेत आपल्या नाटकाचा प्रयोग आल्यावर नायकवाडी सोलापुरातील स्पर्धेतील प्रयोग न पाहता सांगलीला निघून गेले. बाकी प्रयोग तीन परीक्षकांपुढे, तर एक प्रयोग दोन परीक्षकांपुढे झाला त्याचेही समर्थन झाले. नायकवाडी यांचा वट्ट किती हे समजले.  या नायकवाडींनी नाट्य संमेलनाचे यजमानपद चिंतामणी नगरलाही मिळाले पाहिजे अशी मागणी केली. याला प्रतिसाद मिळत नाही असे दिसताच त्यांनी कोर्टात जाऊन संमेलनावर स्टे आणण्याची धमकी दिली. याला म्हणतात सच्चे रंगभूमी प्रेम! संमेलन कोर्टबाजीत अडकायला नको म्हणून नायकवाडींनाही सामावून घेण्यात आले.
एवढ्या प्रसूती वेदना झाल्यानंतर स्वागताध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमपत्रिका जाहीर केली.  त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर एकदम दुर्लक्षित ठेवले गेले. त्यावर प्रश्‍न विचारला जाताच एका प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्यात येणार आहे असे टकले म्हणाले. दिले नाही. का नाही ते त्यांनाच माहिती आहे. टकलेंनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. १५ वर्षांपूर्वी हेमंत टकले हे नाव कोणाला माहीत नव्हते आणि आणखी १० वर्षांनी हे नाव कोणाला आठवणारही नाही; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव ७५ वर्षांपूर्वीही होते, गाजले आणि यावतचंद्रवदिवाकरो गाजत राहणार आहे. सावरकर या नावाबद्दलची मळमळ दिसल्यावर पुढची वाटचाल स्पष्टच होती. ४० वर्षांनंतर घाशीरामचा प्रयोग या संमेलनात ठेवायचा निर्णय झाला तो कोणाचा याचे उत्तर मिळाले नाही. पुण्यातूनच ठरले असे उत्तर मिळाले. अधिक चौकशी केली असता ते तसेच निघाले. पुण्यातून घाशीराम हे नाटक नाट्य संमेलनावर लादले गेले. संमेलन २१ जानेवारी रोजी होते त्याचे सर्व कार्यक्रम ठरले होते. पूर्वसंध्येचा म्हणजे २० जानेवारीचा कार्यक्रमही ठरला होता, पण पुण्याचा हट्ट म्हणून घाशीराम १९ जानेवारीला झाले. घाशीरामसाठी एवढा अट्टहास का?
परगावच्या प्रतिनिधींना खुष ठेवण्याचा रामबाण उपाय संयोजकांनी योजला. रोज सकाळचा नाष्टा आणि दोन वेळचे जेवण त्यात कसलीही उणीव ठेवली नाही. एकही पदार्थ तीन दिवसांत रिपीट केला नाही. संमेलन दुय्यम, पण या जेवणावळी गाजल्या इतक्या की, अर्धा रिकामा मंडप जेवणानंतर पूर्ण रिकामा दिसत असे. कार्यकर्ता म्हणून २५० बिल्ले वाटले होते. प्रतिनिधींना मदत करण्यासाठी हे कार्यकर्ते होते. एरवी ते गायब असत जेवणाच्या वेळी मात्र सर्व कार्यकर्ते दिसत. सांगली आणि मिरजेत संमेलनाचे कार्यक्रम होते. वातावरण निर्मितीसाठी काहीही झाले नाही. महापालिकेच्या हद्दीत फलक, कमानी, पोस्टर किंवा सैनिकातून पॅम्प्लेट यापैकी काहीही झाले नाही. मिरजेतील बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन दिवस कमान उभारावी, तर निधी नाही म्हणून उत्तर आले. एवढे औदासिन्य, एवढी काटकसर केली तर लोकांचा प्रतिसाद कसा मिळणार. नाटक सोडले तर सर्व कार्यक्रमात मंडप रिकामा हे दृश्यच अपयश सांगून गेले. संमेलनाची स्मरणिका निघाली त्यात दहा पाने राजकीय लोकांची.  येथे आचारसंहिता आड आली नाही. अमिताभ बच्चनचा फोटो आवर्जून छापला, पण बालगंधर्व नाही. कोल्हटकर पिता-पुत्र सांगलीचे. दोघेही नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्यांचाही विसर संयोजकांना पडला.
जे झाले त्यातूनही संस्मरणीय नसले तरी वैचारिक खाद्य म्हणावे असेही काही लाभले नाही. उद्घाटक म्हणून अमोल पालेकरची निवड करणार्‍यांना शतश: दंडवत! मुख्यमंत्री येणार नव्हतेच मग अशोक सराफ यांच्यासारखा ज्येष्ठ रंगकर्मी का सुचला नाही. पालेकर आणि नाटक यांचा संबंध काय? हिंदी सिनेमात गाजला हे मान्य, पण मराठी रंगभूमीत पालेकरचे योगदान काय? मग जुनेच तुणतुणे पालेकरनी वाजवले. सेन्सॉर बोर्ड रद्द करा आणि प्रयोगिक समांतर वगैरे रंगभूमीचा विकास. दोन्ही गोष्टी अशक्य. सेन्सॉर बोर्डाने आशयाला धक्का लागेल अशी काटछाट सुचविल्याची  किती निर्मात्यांची तक्रार आहे? माझ्या आठवणीनुसार दादा कोंडके यांच्यानंंतर तक्रार करणारे पालेकरच आहेत. दादा आणि सेन्सॉर यांचे भांडण रास्त होते. दादा सकारण आणि सोदाहरण भांडायचे. त्यांच्या एका चित्रपटात ‘चोळी दाटली अंगाला बाई, कापडं का फटल गं ’ या गाण्याला सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला. त्यावर  दादांनी तुझीया उरोज बहरावरी  कंचुकी तटतटली भरजरी हे नाट्यगीत कसे चालते, कंचुकी आणि चोळी यात फरक काय असा प्रश्‍न करून दादांनी सेन्सॉर बोर्डाला पराभूत केले होते. सेन्सॉर बोर्ड रद्द करा म्हणताना कोणत्या नाटकातील कोणत्या भागावर  सेन्सॉर बोर्डाने विनाकारण आक्षेप घेतला याचे एकतरी उदाहरण पालेकरनी द्यावयास हवे होते. वस्तुस्थिती अशी आहे की, सेन्सॉर बोर्ड फारच मठ्ठ आहे, उदार आहे. नको तेही मान्य करते त्यामुळे बाहेर विरोध करणार्‍यांना सेन्सॉर मान्य आहे, असे सांगून गप्प करता येते. पालेकरना काहीतरी खळबळजनक बोलायचे होते. भाषण मसालेदार करायचे होते म्हणून हे तर्कविसंगत विधान केले. त्यांना एकही उदाहरण देता आले नाही त्यातच त्यांची स्टंटबाजी दिसली.
दुसरा मुद्दा समांतर, प्रयोगित वगैरे रंगभूमीचा. ती विकसित करायला त्यांचा हात कोणी धरला. त्यांची छबीलदास नाटके टिंगलीचा विषय होऊन विस्मृतीत गेली. प्रेक्षक कमी त्यापेक्षा स्टेजवर पात्रे जादा म्हणजे छबीलदासी नाटक. इकडे प्रेक्षक वळले नाहीत. त्यांना काय गुरासारखे शिवाजी मंदिर किंवा रवींद्र नाट्य गृहातून वळवून छबीलदासमध्ये आणून बसवायचे? नाटक करायचे ते ‘स्वान्त सुखाय’. आपल्याला आवडलं, पटलं ते इतरांनी आवडून घ्यावे हा हट्ट कशासाठी?  प्रचार करायचा  तर रस्त्यावर उभे राहून करा. पारंपरिक रंगभूमीच्या व्यासपीठावरून समांतर रंगभूमीच्या नावे गळा काढणे हा अधमपणा झाला. भारतात राहून पाकिस्तानचे भले चिंतणारा आणि पालेकर यांची वृत्ती एकच दिसते. मराठी नाटक पूर्वी पाच अंकाचे होते. पहाटेपर्यंत चाले. नंतर ते तीन अंकाचे झाले आता दोन अंकी आणि दोन-अडीच तासांचे झाले. पूर्वी नाटकात मुबलक पदे होती वन्समोअरही मिळायचे. आता नाटक संपूर्ण गद्य आहे. कालानुरूप मराठी रंगभूमी परिवर्तन होत आहे हे कोणाच्या सांगण्यावरून नाही. अमोल पालेकर ज्या रंगभूमीचा ध्यास घेतात ती केव्हाच कालबाह्य झाली आहे. विधवेच्या केशवपनाचा आज आग्रह धरण्यासारखे पालेकरांच्या उद्घाटक भाषणाचे स्वरूप आहे. खरे तर नाट्य संमेलनाचे उद्घाटन आणि नाट्य चळवळीबद्दल चार शब्द यात आचारसंहिता आड येतच नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले असते, त्यांचे भाषण झाले असते तर अमोल पालेकरांचे दळभद्री विचार ऐकण्याची  वेळच आली नसती. 
बाकी सांगली तर भाग्यवान. राज्य सरकार, महापालिका, जिल्हा परिषद, एवढेच नव्हे तर ना. प्रतीक पाटील यांच्या कोळसा खात्याच्या कोलइंडियानेही घसघशीत देणगी दिली. एकूण जमा १ कोटीच्यावर गेली आहे. एका महिन्याच्या आत म्हणजे २२ फेब्रुवारीपूर्वी सर्व हिशोब जाहीर केला जाणार आहे. पाहू या, त्यावेळी काय वादंग होते ते.
रविवार, दि. २९ जानेवारी २०१२
Posted by : | on : 16 May 2012
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *