Home » Blog » पगडीसोबती झरदारी लांडोर नाचला नवा

पगडीसोबती झरदारी लांडोर नाचला नवा

भाऊ तोरसेकर 

गेल्या आठवड्यात अचानक पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ़ अली झरदारी भारत भेटीसाठी येऊन गेले. त्यातून पुन्हा जुन्या व शिळ्या कढीला ऊत आणण्याचा सोहळा वाहिन्या व वृत्तपत्रांनी पार पाडला. मग त्यात २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यापासून, सईद हफ़िजवर खटला भरण्यापासून पाक तुरूंगात खितपत पडलेल्या सर्वजीतसिंग याच्या सुटकेपर्यंत; सर्वच विषयांचे चर्वितचर्वण झाले. अर्थात वृत्तपत्रांना डझनभर पाने भरायची असतात आणि वाहिन्यांना चोविस तास प्रक्षेपण करायचे असते. त्यासाठी नियमित ताजातवाना मालमसाला कुठून आणणार? मग अशा शिळ्यापाक्या घटना फ़ोडणीला टाकून ताज्या म्हणून वाढाव्याच लागतात. तेव्हा झरदारी यांच्या भारत भेटीचा सोहळा व्हायचाच होता. त्याला पर्याय नव्हता की उपाय नव्हता. मात्र हे सर्व करताना किंवा त्यात भाग घेताना भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग किती गंभीर होते? किंवा पाकचे अध्यक्ष म्हणून इथे शाही इतमामात आलेले झरदारी किती गंभीर होते? याचा कोणीही विचार तरी केला काय? कारण त्या दोघांपैकी कोणीही नवे काहीच बोलला नाही. जुन्याच विषयांची, मागण्यांची, आग्रहाची, तक्रारींची व आश्वासनांची उजळणी तेवढी झाली. त्यामुळे झरदारी यांच्यासाठी जेवढे कौतुक अजमेरचे होते, तेवढे दिल्लीचे दिसले नाही. पण हा फ़रक कुठल्या माध्यमाने बारकाईने बघितलाच नाही.

   याच्या आधी पाकिस्तानचे दोन अध्यक्ष भारतात येऊन गेले होते. त्यातले लष्करशहा जनरल झिया उल हक राजकारणापेक्षा अजमेर शरिफ़ दर्ग्याला भेट देण्यासाठीच आले होते. बाकी राजकारणात ते पडलेच नाहीत. दुसरे लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ़, वाजपेयी पंतप्रधान असताना आले होते. त्यांनी मात्र शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी दौरा केला होता. त्याचवेळी अजमेर शरिफ़ दर्ग्याला भेट देण्याचा त्यांचा मानस होता. पण तो पुर्ण झाला नाही. त्यांची शिखर परिषद अपेशी झाली आणि अजमेरला जाणेही त्यांना साधले नाही. कारण त्या परिषदेनंतर जे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करायचे होते, त्याचा सर्वमान्य मसूदाच तयार होऊ शकला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत त्या मसुद्यावर घोळ चालू राहिला व ते काम उरकून अजमेरला जायचा मुशर्रफ़ यांचा बेत बारगळला होता. त्या चारपाच दिवसात ताजमहाल या ऐतिहासिक वास्तूसमोर आपल्या पत्नीसह रंगीबेरंगी वेशभूषेत छायाचित्रे टिपण्या पलिकडे मुशर्रफ़ काहीही साधू शकले नाहीत. आणि राजकीय अनुभव नसताना केलेल्या मुत्सद्देगिरीमध्ये त्यांनी एक सत्य नकळत सांगून टाकले होते.  

   भारतीय संपादकांशी केलेल्या एका विस्तारित संवादात त्यांनी भारताला खुश करणारा कुठलाही मसूदा केल्यास आपण, माघारी पाकिस्तानला परतू शकणार नाही. आपल्याला इथे दिल्लीत कोठी खरेदी करून इथेच मुक्कम ठोकावा लागेल याची कबुली दिली होती. तेच पाकिस्तानचे भारतविषयक वा परराष्ट्र धोरण आहे. मग तिथला पंतप्रधान गिलानी असो, की नवाज शरिफ़ असोत; राष्ट्राध्यक्ष झदारी असोत, की मुशर्रफ़ असोत. भारताशी वैर हेच त्यांचे राष्ट्रीय धोरण आहे आणि त्यात बदल करणारा वा भारताशी मैत्रीचे संबंध जोडणारा कुणी, पाकिस्तानात राष्ट्रीय नेता होऊच शकत नाही. आणि झालाच तर त्याला त्या अधिकार पदावर टिकून रहाता येणार नाही. अनवधानाने मुशर्रफ़ त्याची कबूली देऊन गेले होते. त्यामुळेच मग भारत पाक भेटी व चर्चा हा एक मुत्सद्देगिरीसाठी विरंगुळ्याचा खेळ होऊन बसला आहे. या विषयात लिहिणारे, बोलणारे व अभ्यास करणारे, यांच्यासाठी तो जिव्हाळ्याचा विषय असेल. भारतासाठीही तो अगत्याचा मामला आहे. पण पाक राज्यकर्ते वा सत्ताधीश यांच्यासाठी दोन देशातली बोलणी हा निव्वळ टाईमपास असतो. मग त्याला झरदारी तरी अपवाद कशाला असतील?  

   चार वर्षापुवी मुंबईवर हल्ला झाला, त्यानंतर दोन्ही देशातील बोलणेही बंद झाले होते. मग इजिप्तच्या शर्म अल शेख परिषदेत ती कोंडी फ़ुटली. तेव्हाही भारताच्या पंतप्रधानांनी पाक पंतप्रधान युसूफ़ रझा गिलानी यांना चार शब्द ऐकवण्या ऐवजी, त्यांच्याचकडून चार शेलके शब्द ऐकले होते. मुंबई हल्ल्यातील आरोपी व सुत्रधार तोयबा यांच्या पापाबद्दल बोलणे दुर राहिले, गिलानी यांनी भारतीय हेरखाते बलुचीस्तानात घातपात घडवत असल्याची तक्रार तेव्हा मनमोहन सिंग यांच्याकडे केली. त्यावर आपल्या पंतप्रधानांनी पुरावे असतील तर द्या, कारवाई करू; असे गिआनी यांना आश्वासन दिले होते. बाकी भारताला पाककडून होणार्‍या डोकेदुखीबद्दल काही बोलले गेले नाही. मग मायदेशी परतलेल्या पंतप्रधान सिंग यांच्यावर टिकेची झोड उठली होती. तेह स्वाभाविकच होते. कारण गिलानी यांचे आक्षेप हा निव्वळ कांगावा होता. चोराच्या उलट्या बोंबा होत्या. तर अशी भारत पाक बोलणी व संवादाची पुर्वपिठीका आहे. पाकला युद्धात चारीमुंड्या चित करणारे, शास्त्रीजी व इंदिराजी यांनी नांगी ठेचल्यावर, पराभूत पाक नेत्यांशी बोलणी केली होती. तेवढी वगळता, कधी पाकनेते शहाण्यासारखे बोललेले नाहीत. त्यांना शहाण्यासारखी भाषा कळतच नाही हा इतिहास आहे. मग झरदारी सारखा नाचरा थिल्लर माणुस राष्ट्राध्यक्ष झाला, म्हणून दोन देशातील समस्या व वाद सोडवण्यात कसली कामगिरी पार पाडू शकणार होता? त्याच्याकडून आशा बाळगणेच मुर्खपणा होता. आणि झालेही तसेच. डोंगर पोखरून उंदीर काढला म्हणतात, तशी झरदारी यांची ही भारत भे्ट काहीही निष्पन्न न होताच संपली.

  अर्थात झरदारी राष्ट्राध्यक्ष झाले हाच एक राजकीय अपघात आहे. आधीच्या राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ़ यांनी आपल्या सत्तेला लोकशाही म्हणून मान्यता मिळावी, म्हणुन केलेल्या चुकांचा तो परिणाम आहे. नवाज शरीफ़ पंतप्रधान असताना त्यांनी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी एक नवा कायदा संमत करून घेतला. त्यात आपल्याला अडकवण्याचा त्यांचा हेतू असल्याची शंका येताच, पराभूत पंतप्रधान बेनझीर भुत्तो परदेशी पळून गेल्या होत्या. तर त्यांच्या भ्रष्टाचाराचे सर्व हिशोब व व्यवहार संभाळणारे त्यांचे पतीम आसिफ़ अली झरदारी शरीफ़ यांच्या तावडीत सापडले. त्यांच्यावर देशाची संपत्ती पळवल्याचा आरोप ठेऊन  गजाआड ढकलण्यात आले. त्या काळात झरदारी “श्रीयुत दहाटक्के” अशा टोपण नावाने ओळखले जात होते. शरीफ़ यांना हाकलून मुशर्रफ़ यांनी सत्ता बळकावल्यावरही झरदारी तुरूंगातच होते. पण नंतरच्या राजकारणात मुशर्रफ़ यांनी आपल्या हुकूमशाहीला लोकशाही म्हणूण मान्यता मिळवण्यासाठी काही राजकीय कसरती केल्या. त्यामूळे झरदारी तुरूंगातून बाहेर आले. एक अध्यक्षिय आदेश जारी करून मुशर्रफ़ यांनी आठ हजार खटले रद्दबातल केले. त्यातच झरदारी सुटले. म्हणजे त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली नाही. तर खटलाच मागे घेण्यात आला होता. आता एका याचिकेचा निकाल देताना पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने मुशर्रफ़ यांचा तो अध्यक्षिय आदेशच रद्द केला आहे. त्यामुळे त्यात मुक्त झालेल्यांवर पुन्हा खटले भरण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यात पुन्हा झरदारी आरोपी झाले आहेत. त्या प्रकरणाने अलिकडे पाकिस्तानचे राजकारण ढवळून काढले आहे.

   झरदारी आता अध्यक्ष आहेत आणि म्हणुनच त्यांच्यावर न्यायालयात खटला भरणे अशक्य आहे. कारण जगात कुठल्याही देशात राष्ट्राध्यक्षाच्या नावानेच सरकारचा कारभार चा्लत असतो. त्याला म्हणूनच न्यायालयीन कटकटीतून सवलत मिळालेली असते. मग पाक सरकारने झरदारी यांच्यावर खटला भरायचा कसा, असा तिथे घटनात्मक पेचप्रसंग उभा राहिला आहे. त्यात मग आदेशाचे पालन करत नाही, म्हणुन सर्वोच्च न्यायालयाने थेट सरकारचे प्रमुख युसूफ़ रझा गिलानी यांना कोर्टात पाचारण केले होते. कोर्टाचा अवमान ही सुनावणी अजून चालू आहे. त्याच पेचात अडकलेले झरदारी सध्या कमालीचे बेचैन आहेत. त्यांना भारत पाक यांच्यातील वादविवादात काडीचा रस नाही. दोन्ही देशातील वाद संपवण्यापेक्षा त्यांना स्वत:च्या गळ्यात अडकलेला नव्या खटल्याचा फ़ास सोडवायचा आहे. ते काम कुठल्या कायदेपंडीताला जमणारे नाही. त्यामुळेच त्यात काही चमत्कार घडावा अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यात पीर फ़कीर साधूसंत यांचे आशीर्वाद उपयोगी पडू शकतात, अशी भारतीय उपखंडातील लोकांची समजूत आहे. मग अशा चमत्कारी बाबा, फ़कीर संताकडे माणुस धाव घेत असतो. त्यात पुन्हा ज्याचे नाव मोठे व किर्ती मोठी तिकडे अडल्यानडल्यांचा ओढा असतो. दिल्लीचा निजामुद्दीन अवलिया किंवा अजमेरचा दर्गा त्यासाठी जगप्रसिद्ध आहे. त्यामुळेच झरदारी यांना तिथे जायचे, तर भारतात येणे आवश्यक होते. शिवाय जगाला आपण पीरफ़कीराला शरण गेलो हे दाखवायचे नव्हते. त्यामुळेच त्यांनी दिल्ली भेटीचे निमित्त केले. मुळ हेतू अजमेरला शरण जाण्याचा होता. त्यासाठी दिल्लीवारी हे निमित्त करण्यात आले. मग खरा हेतू साध्य झाला आणि देखावा केला हो हेतू फ़सला.

   मुळात झरदारी हा राजकीय नेताच नाही. भुत्तोची कन्या बेनझीर हिला वारश्यात जे राजकारण मिळाले, त्याचे फ़ायदे नवरा म्हणून झरदारी घेत गेले. त्यात बेनझीर बदनाम झाल्या. झरदारी तर तुरूंगातच गेले होते. त्याची जाणीव असल्यानेच त्यांनी बेनझीरच्या घातपाती हत्येनंतर लगेच राजकीय हालचाली केल्या नाहीत. फ़ार कशाला आपल्या बदनामीचा मतदानावार परिणाम होईल, म्हणुन मागे राहून त्यांनी आपल्या शाळकरी पुत्राला आईच्या जागी पक्षप्रमुख बनवले. त्याचे नाव बिलावल. तोही परवा पित्यासमवेत दिल्ली, अजमेर भेटीला आला होता. बेनझीर जेवढ्या मुरब्बी राजकारणी होत्या, त्याचा लवलेशही झरदारी यांच्यात नाही. पण बेनझीरचा पती म्हणुन त्यांनी निवडणुक पश्चात लुडबुडायला सुरूवात केली. बेनझीरच्या मृत्यूची सहानुभूती मिळवून त्यांचा पक्ष अधिक संख्येने निवडून आला. बाकी पक्षांच्या स्पर्धेत त्याला जास्त जागा मिळाल्य. अधिक मुशर्रफ़ यांनी नवाज शरीफ़ यांना निवडणूक लढवायची बंदी घातल्याने झरदारी यांचे फ़ावले. मग ते आपण खुपच मुरब्बी व मुत्सद्दी राजकीय नेता असल्यासारखे वागू लागले. मात्र त्यातून त्यांचेच काही सहकारी व बेनझीरचे निष्ठावंत नाराज होत गेले. बेनझीर हुशार व अनुभवी होत्या. तेवढी झरदारी यांची कुवत नाही. पण म्हनतात ना, मोर नाचला मग लांडोर नाचतो. पण देखणा पिसारा नसल्याने लांडोराचा नाच हास्यास्पद ठरतो. झरदारी यांची सध्या तशीच अवस्था झालेली आहे. त्यांना कमीशन खाणे कळते व तसलेच व्यवहार करण्यात त्यांची गुणवत्ता, त्यांनी राजकीय डावपेच खेळले तर ते उलटणारच ना? त्याच अतिशहाणपणाने आता त्यांच्यावर गंडांतर आले आहे. त्यातून सुटण्यासाठी त्यांना दैवाची साथ व संत पीराचे आशीर्वाद हवेत. त्यासाठीच ही अजमेर भेट होती.

   तर यातला मुद्दा इतकाच, की जो राष्ट्राध्यक्ष म्हणून इथे आला; तो स्वत:च पाकिस्तान न्यायालयासमोरचा एक बंभीर आरोपी आहे. त्याने तिथल्या न्यायव्यवस्थे समोर मुंबई हल्ल्यातील सुत्रधार सईद हफ़िज याच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा बाळगणे निव्वळ मुर्खपणा नाही काय? आपण कसे कोर्टाच्या तावडीतून सुटणार याच्या चिंतेने ग्रासलेला माणूस पीरासमोर गुडघे टेकायला आला असताना, त्याच्याकडे सईद हफ़िजबद्दल बोलणेच चुक होते. त्याला सरळ सांगायला हवे होते, जा तिकडे अजमेरला आणि तिथूनच परत जा. उगाच लांडोराप्रमाणे नाचायचे कारण नाही. पण आपले पंतप्रधान व सरकार तरी काय कमी अडचणीत आहे? यांनाही त्यांच्या पापावरून लोकांचे लक्ष काही काळ उडाले तर हवेच होते. मग त्यांनीही झरदारी यांच्या या नाचकामाचा तमाशा मांडला तर नवल कुठले? पंतप्रधान सिंग व झरदारी यांच्या भेटीगाठी, संवाद व त्याच्या बातम्या बघितल्यावर, मला एक जुने गाजलेले मराठी गाणे  आठवले. “पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा”. त्याच शब्दात थोडाफ़ार फ़ेरफ़ार केल्यास ताज्या झरदारी भारतभेटीचे नेमके वर्णन होऊ शकेल. “पगडीसोबती झरदारीचा लांडोर नाचला नवा”. इथे झरदारी नावाच्या नाच्याचे स्वागत करणारे भारतीय नेता मनमोहन सिंग आहेत आणि ते पगडी परिधान करतात. त्यांना काय ही झरदारी भेट म्हणजे आपल्या यशस्वी कारकिर्दीतला शिरपेचातील तुरा वाटला काय?

   शांतता हवी असेल तर आधी सईद हफ़िजवर कारवाई करा, असे सिंग यांनी झरदारीला सांगितल्याचे प्रसिद्ध झाले आहे. शांतता कोणाला हवी आहे? पाकिस्तानला शांतता हवी असेल तर त्याला भारतापुढे गुडघे टेकण्याची गरज नाही. त्यानेच उचापती चालवलेल्या आहेत. त्या थांबवल्या मग भारतपाक सीमेवर आपोआप शांतता नांदू शकते. शांतता त्यांना नकोच आहे. कारण शांततेमध्ये करण्यासारखे कुठलेही काम पाकिस्तनात उपलब्धच नाही. म्हणूनच त्या देशात सतत उचापती चालू असतात. जेव्हा आतल्या उचापतींचा त्यांना कंटाळा येतो, तेव्हा ते शेजारीपाजारी देशात घातपात, स्फ़ोट अशा उचापती करतात. थोडक्यात त्यांच्या उचापतींपासून इतरांनाच शांतता हवी आहे, मुक्ती हवी आहे. अगदी अवघ्या जगालाही पाकच्या उचापतखोरीतून शांतता हवी आहे. मग त्याच उचापतखोरांच्या म्होरक्याला शांतता हवी तर, असे सिंग फ़र्मावतात, त्याचा अर्थ काय घ्यायचा? मनमोहन सिंग विनोद करीत असतात की काय? की शांतता म्हणजे काय तेच आता भारत सरकार विसरून गेले आहे? नसेल तर झरदारी यांना इथे येण्याचे आमंत्रण तरी कशाला द्यायचे? ज्यातून काहीही साध्य होणार नाही याची पुर्ण खात्री देता येते, त्या बैठका वा वाटाघाटी हव्यातच कशाला?

   आणि योगायोग बघा. त्याच झरदारी भेटीच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेत कसाबवरील खर्चासंबंधाने एक पश्न विचारला गेला. साडेतीन वर्षात या खुनी पाक जिहादीसाठी सरकारने चक्क २६ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आर आबा पाटिल यांनी दिली. आपल्या उचापतखोर, खुनी, जिहादींची इतकी बडदास्त भारत सरकार ठेवत असेल, तर पाकच्या जिहादी सरकारने वा त्यांच्या राष्ट्राध्यक्षाने शांततेच्या गोष्टी कराव्यातच कशाला? धर्मासाठी जिहाद करावा आणि जिहाद केल्यास स्वर्ग मिळतो अशी समजूत आहे. मेलेल्यांना तो स्वर्ग दिसला, की नाही अल्लाजाने. पण कसाबला मात्र भारताच्या तुरूंगात जिवंतपणी स्वर्ग लाभला आहे. तसे त्याला सांगून मुंबईत जिहादी हत्याकांड करायला पाठवणार्‍या सईद हफ़िजवर मग पाकिस्तानात कोण कायदेशीर बडगा उचलणार? अशा काही कारवाया करायला अधिकार हाती असावा लाग्तो. पाकिस्तानात तसा अधिकार निवडून आलेल्या सरकारला नसतो. त्यांना लष्कराच्या मर्जीवर सत्ता उपभोगता तेय असते. पण तेवढ्या मर्यादा असूनही तिथले पंतप्रधान युसूफ़ रझा गिलानी मिळेल तेवढे स्वातंत्र्य व अधिकार वापरण्याची हिंमत दाखवतात तरी. इथे आपल्या देशात पंतप्रधानाला तेवढाही अधिकार नाही. त्यांना पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधींच्या तोंडाकडे आशाळभूतपणे बघत बसावे लागते. ते कुठल्या तोंडाने पाक नेत्यांशी बोलणी करणार?

   मग ते ज्यातून काहीही होऊ शकणार नाही, अशा विषयात बोलतात. आधी सईद हफ़िजवर कारवाई करा असे मनमोहन सिंग त्यामुळेच झरदारींना म्हणाले. कारण झरदारी त्यावर काही करू शकत नाहीत व करणार नाहीत याची सिंग यांना खात्री आहे. ज्यातून काही निष्पन्न होणारच नाही त्याबद्दल बोलणे त्यांना खुप सुरक्षित वाटते. त्याचाच तो परिणाम आहे. थोडक्यात गेल्या आठवड्यात जो भारत पाक संवाद वा बोलणी झाली, तो सगळा प्रकारच निरर्थक व निरुपयोगी होता. ज्याला जागतिक राजकारणात नाच्या माणुस मानले जाते, अशा झरदारींनी उगाच भारतवारी केली. मनमोहन सिंग यांनी ती “यशस्वी” होण्यास हातभार लावला. बाकी त्यातून काही निष्पन्न झाले नाही. होणारही नव्हते. यांची पगडी शाबूत तर झरदारी यांच्या लांडोरासारख्या नाचाला मोराच्या नाचाचा सन्मान मिळाला. बाकी शून्य. ज्या दोन व्यक्तीना आपापल्या पदावर अधिकाराशिवाय बसायची संधी मिळाली आहे, त्यांनी जागतिक व्यासपीठावर एक छान नाटक सादर करून उत्तम अभिनयाच्या टाळ्या मिळवल्या इतकेच. मध्यंतरी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक विनोद केला होता. मनमोहन सिंग यांना ऑस्कर पारितोषिक देणार असे कळले. चौकशी केली कशाबद्दल? तर पंतप्रधानाचा अभिनय उत्तम केल्याबद्दल असे म्हणत मोदींनी सिंग यांची खिल्ली उडवली होती. त्यावर अनेकांना हसू आले. कारण पंतप्रधानांनी स्वत:ला तेवढे हास्यास्पद करून घेतले आहे. त्याच अभिनयात आता झरदारी यांनीही भर घातली म्हणायची. नशीब तुमचे आमचे, दोघांनी झिम्माफ़ुगड्या घालून पगडीसोबती झरदारी लांडोर नाचरा नवा, ताल नाही धरला.
१५/४/१२ – http://panchanaama.blogspot.in/2012/04/blog-post_16.html

Posted by : | on : 29 Apr 2012
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *