Home » Blog, सडेतोड : अरुण रामतीर्थकर, स्थंभलेखक » बाबा रामदेव आणि राजकीय सारीपाट

बाबा रामदेव आणि राजकीय सारीपाट

सडेतोड : अरुण रामतीर्थकर

नॉस्टरडॅम नावाचा एक फ्रेंच ज्योतिषी काही शतकांपूर्वी होऊन गेला. त्याने आगामी हजार वर्षांचे जगाचे भविष्य सांगणारा ग्रंथ लिहिला. त्यात आपल्या देशाबद्दल भाष्य आहे. अनेक वर्षांचे पारतंत्र्य संपून स्वतंत्र झाल्यावर काही वर्षांनी भगव्या कपड्यातील एक नेता उदयास येईल, तो सत्ताधीश होईल. त्याच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्ता होईल, असे नॉस्टरडॅमचे ४०० वर्षांपूर्वी भारताबद्दल केलेले भविष्य आहे. इतक्या वर्षांत मी पाहिले की, घडून गेलेल्या गोष्टींचा नॉस्टरडॅमच्या भविष्याशी ओढून ताणून संबंध जोडला जात होता. भारताबद्दलचे त्याचे भविष्य मला तद्दन खोटे वाटले. कारण स्वातंत्र्य मिळाल्यावर ज्यांच्या हाती सत्ता गेली, त्या नेहरूंनी हार्मोनियमवर बंदी घातली तशी भगव्यावर बंदी घातली नाही एवढेच, पण साधू, संत आणि भगवे कपडे परिधान करणारे यांना जेवढे म्हणून अवमानित करता येईल तेवढे केले. नेहरूंचा कित्ता पुढार्‍यांनी गिरवला. फादर, बिशप, काडिनल यांना प्रतिष्ठा होती, मुल्ला, मौलवी, इमाम यांनाही प्रतिष्ठा होती. मात्र भगव्या कपड्यातील व्यक्ती म्हणजे टिंगल टवाळीचा विषय बनवण्यात आला होता. १९९० नंतर टवाळी कमी झाली. भगव्या कपड्यातील साधू संसदेत दिसले. साध्वी ऋतंबरा, उमा भारती, प्रज्ञा किंवा आचार्य धर्मेंद्र, मंहत नृत्यगोपालदास अशी नावे आदराने घेतली जाऊ लागली.
पण एवढे पुरेसे नव्हते. भगव्या कपड्यातील नेतृत्व उदयास येईल असे वाटण्याचे एकही लक्षण दिसत नव्हते. मात्र गेल्या आठवड्यात केंद्रातील सरकारने त्यांच्या नावाची घेतलेली धास्ती म्हणजे वारे बदलले याचे लक्षण होते. भगव्या कपड्यातील एक साधू खास विमानाने दिल्लीत येतो. विमानतळावर त्याला भेटायला पाच-पाच केंद्रीय मंत्री येतात (पंतप्रधान आले नाहीत हे नशीब) अशी व्ही.आय.पी.वागणूक आजवर कोणाला मिळाली? बाबा रामदेव गेले दोन महिने देशभर हिंडले. त्यांच्या दिमतीस खास विमाने, रामलीला मैदानावर उपोषण स्थळासाठीचा खर्च  सारेच अजब. यातील काही मुद्दे पाळीव पत्रकार रामदेव यांच्यावर टीका करण्यासाठी वापरतात. आमच्या साधूंनी अनवाणी, पायी फिरावे असा नियम आहे का? गेले ४ दिवस सर्व वृत्तवाहिन्यांवर रामदेव हा एकच विषय आहे. सरकारच्या मंत्रीगटाची नॉर्थ ब्लॉकमध्ये बैठक, कॉंग्रेसच्या कोअर ग्रुपची बैठक. का तर रामदेव नावाच्या वादळाला तोंड कसे द्यायचे याची रणनीती ठरवण्यासाठी. सरकार एवढे घाबरलेले मी आजवर पाहिले नव्हते. हे घाबरणे भगव्या कपड्यातील दाढी मिशा वाढवलेल्या एका माणसासाठी आहे. नॉस्टरडॅम तुला आज प्रथमच नमस्कार.
बाबा रामदेव यांना भाजपा आणि रा.स्व.संघ यांनी लगेच पाठिंबा जाहीर केला. तसूभरही मतभेद नसल्यामुळे भूमिका घेणे लगेच शक्य झाले, पण इतरांचे काय? रामदेव यांचा लढा कोणत्याही पक्षाविरुद्ध नाही हे खरे, पण काळा पैसा जमवण्यात कॉंग्रेसी नेतेच प्रामुख्याने आहेत. रामदेवना पाठिंबा म्हणजे कुर्‍हाडीवर पाय मारणे अशी कॉंग्रेसची अवस्था आहे. त्यामुळे या पक्षाला भूमिका नाही. कॉंग्रेसच्या दृष्टीने बाबा रामदेव म्हणजे धरले तर चावते सोडले तर पळते अशी आहे.
मायावतींचा बहुजन समाज पक्ष, मुलायमसिंह यांचा समाजवादी पक्ष आणि जयललितांचा अण्णाद्रमुक हे तीन पक्ष समान भूमिकेत आहेत. कॉंग्रेसने आपल्याला मदतीची हाक द्यावी आणि आपण पळत जाऊन कॉंग्रेसला मदत करावी यासाठी हे तिघे आतूर आहेत. सी.बी.आय.कडून एवढ्या लाथा बसल्या तरी द्रमुकने निर्लज्जपणे पाठिंबा चालू ठेवला आहे. ती त्यांची अपरिहार्यता आहे. ही स्थिती आणखी किती काळ सांगता येत नाही. त्यामुळे मायावती, जयललिता, मुलायमसिंह यांना रामदेव यांचे समर्थन करता येत नाही, तसाच विरोधही करता येत नाही. तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि बिजू  जनता दलाचे नवीन पटनाईक हे आपापल्या राज्यात मुख्यमंत्री म्हणून समाधानी आहेत. राष्ट्रीय राजकारणात त्यांना रस नाही. म्हणून तेही गप्प आहेत. कर्नाटकातील एच.डी. देवेगौडाचा जेडीएस हा पक्ष राष्ट्रीय राजकारणात नगण्य आहे. देवेगौडा माजी पंतप्रधान म्हणून राजकीय सन्मान मिळवून आहेत. अथक प्रयत्न करूनही, राज्यपालांची मदत घेऊनही मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हटवण्यात ते अपयशी ठरले. २ जूनला येडियुरप्पा विश्‍वासमत जिंकले देवेगौडा, कुमारस्वामी यांचा तूर्त दुखवटा चालू आहे.
रामदेव यांच्यामुळे खरी पंचाईत झाली ती मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि बिहारमधील जनता दलाची. रामदेव हे नाव सर्वतोमुखी होऊ लागले त्यावेळी आंतरराष्ट्रीय औषध कंपन्यांकडून पैसे घेऊन मार्क्सवाद्यांनी रामदेव यांच्या औषधावर बेछूट टीका केली. त्यांच्या आयुर्वेदी औषधात हाडांचा चुरा असतो असा आरोप केला. तो खोटा ठरल्यावर कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याचा आरोप केला. प्राचीन भारतीय पंरपरेचा वारसा सांगणारे रामदेव मार्क्सवाद्यांना शत्रू वाटतात. मार्क्सच्या आधीचे सारे खोटे असे ते मानतात. मात्र रामदेव यांचा काळ्या पैशाचा मुद्दा मार्क्सवाद्यांना मान्य आहे. रामदेव अमान्य, पण त्यांचे मुद्दे मान्य अशी विचित्र अवस्था मार्क्सवाद्यांची झाली आहे. सबब तमाम साम्यवादी मंडळी तोंडात मीठाची गुळणी घेऊन गप्प आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार आणि शरद यादव यांनी एवढा आचरटपणा केला नाही. मात्र हिंदुत्वाची त्यांना ऍलर्जी आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यास या दोघांनी कडवा विरोध केला. नरेंद्र मोदी चालले नाहीत. एकदम भगव्या कपड्यातील रामदेव त्यांना कसे चालतील. स्वामी रामदेव म्हणजे भंपक स्वामी अग्निवेश नाही हे या दोघांना समजते. त्यामुळेच भाजपाशी युती असूनही रामदेव यांच्याबाबत जदयुला कोणतीही भूमिका नाही.
राजकीय सारीपाटावर स्वामी रामदेव या नावाच्या राजाला शह देईल असे एकही, प्यादे, उंट, हत्ती नाही. रामदेव यांना किती व्यापक जनसमर्थन आहे हे सध्या दिसतच आहे. रामदेव नावाचे वादळ अल्पजीवी ठरते की परिवर्तन घडवते हे लवकरच ठरेल. नॉस्टरडॅमचे भविष्य खरे ठरले असे आज जरी म्हणता येत नसले तरी ते खरे ठरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली हे नक्की.
रविवार,  दि. ०५ जून २०११, तरुण भारत, सोलापूर

Posted by : | on : 12 Jun 2011
Filed under : Blog, सडेतोड : अरुण रामतीर्थकर, स्थंभलेखक
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *