Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक » मंत्रीमंडळ विस्तार आणि विकासाचा वेग!

मंत्रीमंडळ विस्तार आणि विकासाचा वेग!

•चौफेर : •अमर पुराणिक•

मोदी मंत्रीमंडळावर डॉक्टर्स, इंजिनीअर्स, बँकर्स अशा स्कॉलर लोकांचा पगडा आहे. सामाजिक क्षेत्राबरोबर राजकारणही ‘शिकलेल्यांचे क्षेत्र’ होत असेल त्याचे भरभरून स्वागतच करायला हवे. हुशार व्यक्तींच्या कौशल्यांचा व त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा राष्ट्रीय राजकारणात सहभाग करून घेत ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला हा प्रयत्न सफल होणार यांत शंका नाही.

MODI-PARRIKAR-PRABHU-SINHAमे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राची धूरा हाती घेतली. त्यावेळी मंत्रीमंडळ स्थापन करताना त्यांनी कोणताही पसारा न वाढवता आपले मंत्रीमंडळ संक्षिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. ’लेस गव्हर्मेट’चा यशस्वी वापर करत मोदींनी देशाची प्राथमिक घडी बसवण्यात बर्‍यापैकी यश मिळवले आहे. पण वेगवान प्रगतीची कास धरणार्‍या मोदींनी गेल्या रविवारी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला आहे. गेल्या पाच महिन्यात मोदींनी ज्या वेगाने विकास कामांचा सपाटा लावला आहे ते पाहता मंत्रीमंडळ विस्ताराचा निर्णय योग्यच म्हणावा लागेल. मंत्रीमंडळातील हा पहिला फेरबदल अंतिम नसून भविष्यात आणखीन परिवर्तनाची शक्यता आहेच. मंत्रीमंडळाचा विस्तार करताना येथून पुढची वाटचाल आणखी दमदार असेल याचे संकेत मोदींनी दिले आहेत. गोव्याची माजी मुख्यमंत्री मनोेहर पर्रिकर आणि सुरेश प्रभु यांची केंद्रिय मंत्रीमंडळातील निवड याचे द्योतक आहे.
प्रगती आणि विकास या दोन संकल्पनांनी सध्या भारतीय जनमानसावर चांगलीच पकड घेतली आहे. त्यातच जागतिक अर्थव्यवस्था आणि जगातील अन्य प्रगत देशांतील उद्योग, राहणीमान व जीवनशैली यांच्याशी परिचित होण्याच्या संधी गेल्या काही वर्षांत इंटरनेट आणि सोशल मिडियामुळे वाढल्या आहेत. त्यामुळे आर्थिक वाढ, जीडीपी, विकास हे शब्द थोडेबहुत सामान्य भारतीयांच्या तोंडी रुळू लागले आहेत. उदारीकरणाचा प्रभाव असलेल्या व त्याचा हिस्सा असलेल्या भारतीयांच्या किमान दोन पिढ्यांनी आर्थिक वाढीचा दर आणि विकास या मुद्द्यावरच केंद्रातील सत्ता पालटली आहे. या जागरूक अशा कोट्यवधी भारतीयांनी देशाच्या वेगवान विकासाच्या दृष्टीने भाजपाच्या हाती एक हाती सत्ता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाच महिन्यात विकास कामांची चूणूक दाखवली आहे.
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार तसेच काही फेरबदल करताना विकासाचा दमदार वेग साधण्याचा प्रयत्न करत तीन राज्यांत होणार्‍या निवडणुकांवर देखील लक्ष ठेवले आहे. मे महिन्यात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यानंतर विस्तार कधी होणार याची अनेकांना उत्सुकता होती. क्षमतेपेक्षा अधिक खाती सांभाळावी लागत असल्याने काही मंत्र्यांची दमछाक होत होती. आता ही अडचण काही प्रमाणात दूर झाली असे म्हणता येईल. मंत्र्यांची संख्या कमी ठेवूनही उत्तम सरकार देता येते असे मोदी यांचे तत्व असून त्यात गैर काही नाही. त्यामुळेच त्यांनी संख्या कमी ठेवण्यावर भर दिला. मात्र एवढ्‌या मोठ्‌या देशाच्या तेवढयाच मोठ्‌या समस्या लक्षात घेता तत्वाला मुरड घालणे अपरिहार्य ठरते. त्यामुळे नव्या विस्तारात ४ कॅबिनेट आणि १७ राज्यमंत्र्यांचा समावेश केला आहे. मंत्र्यांची संख्या आता ६६ वर गेली असली तरी यापूर्वीच्या मनमोहनसिंग सरकारच्या तुलनेत ती कमीच आहे. त्या मंत्रीमंडळात ७८ मंत्री होते. मोदींच्या मंत्रीमंडळात काही नवख्या-अनानुभवी लोकांना संधी दिल्याची काहींची तक्रार आहे. पण मोदींनी जुन्या जाणत्या अनुभवी लोकांच्या अनूभवाचा, कार्यशैलीचा देशाला फायदा करुन देत असतानाच तरुण व नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना मंत्रीमंडळात संधी देऊन पुढची पीढी तयार करण्याचा सुवर्णमध्य साधला आहे.
मंत्रीमंडळ विस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारपूर्वक पावले टाकत चार हुशार नेते केंद्रीय मंत्री मंडळात सहभागी करून घेतले आहेत. ते म्हणजे मनोहर पर्रिकर, सुरेश प्रभू, जयंत सिन्हा आणि राजीवप्रताप रुडी.
मनोहर पर्रीकर आणि सुरेश प्रभू यांची राजकारणातील प्रतिमा अतिशय स्वच्छ, प्रामाणिक असून दोघेही कामसू व अभ्यासू म्हणून ओळखले जातात. आयआयटीयन असलेले मनोहर पर्रीकर हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्रीपदावर आरुढ झाले आहेत. मनोहर पर्रीकर हे अतिशय परिश्रमी, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी राज्याचा नावलौकिक वाढविला आहे. अतिशय साधी राहणी आणि सातत्याने जबाबदारीची जाणीव असलेला नेता,करारी व्यक्तिमत्त्व आणि शिस्तबद्ध संघस्वयंसेवक अशी त्यांची ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी योग्य निवड केली आहे. निर्णय घेताना ते कायम देशहिताचाच विचार करतील याची सर्वांनाच खात्री आहे. चीन आणि पाकिस्तान सीमांवर सध्या जो ताणतणाव दिसून येतो त्यामुळे उत्पन्न होणार्‍या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाला राजनीतीज्ञ आणि जाणकार तंत्रज्ञ अशी दुहेरी क्षमता असलेल्या नेत्याची आवश्यकता होती. राजकारण आणि अभियंते अशा दोन्ही भूमिका लीलया पेलणारे पर्रीकर यांच्या रुपाने ती भरून निघेल. त्यांच्या शैलीला नवे आयाम लाभू शकतील. हे महत्वपूर्ण खाते सांभाळणे म्हणजे कोणा येरागबाळ्याचे काम नव्हे. मनोहर पर्रीकर यांची आज ज्या संरक्षणमंत्री पदावर नियुक्ती झाली त्या पदास न्याय मिळाला असे म्हणण्यास वाव आहे.
चार्टड अकाऊंटन्ट असलेले सुरेश प्रभू राजापूर मतदारसंघातून सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात उद्योग, उर्जा, अवजड उद्योग, पर्यावरण अशा महत्त्वपूर्ण खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. त्यावेळी प्रभू यांच्या कामाचे सर्वच राजकीय पक्षांनी कौतुक केले होते. सुरेश प्रभूंचा पहिल्या कॅबिनेट मंत्रीमंडळात सहभाग होईल असे वाटत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सुरेश प्रभूंसाठी आग्रह धरला होता. मात्र शिवसेनेने प्रभू यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. मात्र मोदींनी शिवसेनेचा विरोध झुगारुन प्रभू यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. शपथविधीपूर्वी सुरेश प्रभू यांनी शिवसेनेचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला त्यामुळे मंत्रीपदाचा मार्ग सुकर झाला. वाजपेयी यांच्या काळातील मंत्रीपदाचा तसेच विविध अभ्यास मंडळांवरील अनुभव आणि कार्यक्षमता लक्षात घेता सुरेश प्रभू रेल्वे खात्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील अशी आशा करायला हरकत नाही. पण ते नद्याजोड, उर्जा, तंत्रज्ञान क्षेत्रात जास्त माहीर आहेत. तसे मंत्रीपद त्यांना मिळाले असते तर ते जास्त योग्य झाले असते.
जयंत सिन्हा यांची नियुक्ती काहीशी अनपेक्षित परंतु सुखद म्हणायला हवी. माजी केद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा याचे सुपुत्र असलेले जयंत सिन्हा हे उच्चविद्याविभूषित आहेत. पर्रीकर यांच्याप्रमाणे आयआयटीयन तर आहेतच परंतु हार्वर्ड बिझीनेस स्कूलमधून व्यवस्थापन शिकलेले आहेत.
केद्रीय मंत्रीमंडळात हंसराज अहीर यांचा समावेश ही महाराष्ट्राच्या दृष्टीने आणखी एक महत्वाची बाब. गेली अनेक वर्षे चंद्रपूर जिल्ह्यातून निवडून येणारे अहीर स्वभावाने सौम्य भासत असले तरी त्याच्या कामाचा उरक मात्र प्र्रचंड आहे. हंसराज अहिरांनी संपुआ सरकारचा कोळसा गैरव्यवहार उघडकीस आणाल होता.
मंत्रीमंडळात नव्याने वर्णी लागलेल्या काही राज्यमंत्र्यांची नियुक्ती  येत्याकाळात होणार्‍या निवडणूका लक्षात ठेवून केलेली दिसते. नवी दिल्ली, बिहार आणि बंगाल या तीन राज्यांत नजीकच्या काळात निवडणुका व्हायच्या आहेत. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी डॉ. हर्षवर्धन यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्याची भाजपाची खेळी यशस्वी ठरली होती. त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी हर्षवर्धन यांच्याकडील आरोग्य खाते बदलून त्यांना विज्ञान खाते देण्यात आलेले असावे. याचा अर्थ निवडणुकीकडे ते जास्त लक्ष पुरवू शकतील. बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजीवप्रताप रूडी, गिरीराजसिंह यांच्याबरोबरच लालूप्रसाद यादव यांचे कट्टर विरोधक रामकृपाल यादव यांची मंत्रीमंडळात वर्णी लावण्यात आली आहे. यातून मोदीं यांनी विकासाबरोबरच राजनीतीही साध्य केल्याचे दिसते.
एकूणच मोदी मंत्रीमंडळावर डॉक्टर्स, इंजिनीअर्स, बँकर्स अशा स्कॉलर लोकांचा पगडा आहे. सामाजिक क्षेत्राबरोबर राजकारणही ‘शिकलेल्यांचे क्षेत्र’ होत असेल त्याचे भरभरून स्वागतच करायला हवे. हुशार व्यक्तींच्या कौशल्यांचा व त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा राष्ट्रीय राजकारणात सहभाग करून घेत ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला हा प्रयत्न सफल होणार यांत शंका नाही.

Posted by : | on : 18 Nov 2014
Filed under : Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *