Home » Blog » माझी मुलगी प्रज्ञा

माझी मुलगी प्रज्ञा

माझी मुलगी प्रज्ञा

काही नेते उघडपणे प्रज्ञाच्या समर्थनार्थ पुढे आले नाहीत, त्यामुळे मी अजीबात विचलित झालेलो नाही. कारण माझ्या मुलीने काहीही चुकीचे केलेले नाही. मालेगाव स्फोटात प्रज्ञाचा हात नाही, याची मला 99 टक्के खात्री आहे. एक टक्का यासाठी नाही कारण, गेल्या दोन वर्षांपासून ती साध्वी आहे आणि ती माझ्या येथील घरी आलेली नाही. कारण साध्वीने आईवडिलांच्या घरी यायचे नसते, असा नियम आहे. ती आता मला “पिताजी’ म्हणत नाही आणि त्याऐवजी “डॉक्टरसाब’ असे म्हणते.
“”मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोप ठेवून पोलिसांनी जरी माझ्या मुलीला अटक केली असली, तरी माझी मुलगी निर्दोष आहे, ती असे कृत्य करूच शकत नाही,” असे तिचे वडील डॉ. चंद्रपालसिंग यांनी “रेडिफ डॉट कॉम’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
डॉ. चंद्रपालसिंग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि गेल्या 35 वर्षांपासून ते संघाचे काम करीत आहेत. आपली मुलगी निर्दोष कशी आहे, हे त्यांनी रेडिफच्या शीला भट यांच्याशी आपल्या सुरत येथील निवासस्थानी बोलताना सांगितले.
“”साध्वीचे जीवन हेच खरे जीवन आहे असे मला वाटते आणि त्यामुळेच तिला साध्वी होण्यासाठी मी स्वत: प्रोत्साहन दिले. प्रज्ञाला खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे आणि या खोटारडेपणाचा आम्हा सर्वांना खूप त्रास होत आहे. साध्वी झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत तिने “जय वंदे मातरम्‌’ ही संघटना स्थापन केली. ज्या महिलांचे, दिशाभूल करून धर्मांतरण करण्यात आले, त्या महिलांना मदत करणे, ज्यांच्या दाम्पत्य जीवनात वाद आहेत, त्यांना मदत व मार्गदर्शन करणे अशी कामे ती या संघटनेमार्फत करीत आहे. संपूर्ण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परिवार हा तिचा परिवार होता.”
पोलिस हे राजकीय पक्षांच्या दबावाखाली काम करीत आहेत, असे त्यांनी पोलिसांबाबत विचारले असता सांगितले. “”पोलिसांना राजकारण्यांचे 85 टक्के ऐकावेच लागते. नंतर ते माफी मागतात आणि सांगतात की, आम्हाला असे करण्यास भाग पाडण्यात आले होते.
आणिबाणीच्या काळात हे सर्व मी अगदी जवळून बघितले आहे. पोलिसांच्या यादीत माझे नाव सगळ्यात वर होते. मी देशविरोधी आहे, महात्मा गांधी यांचा वध करणाऱ्या संघटनेशी माझा संबंध आहे आणि मी समाजातील सौहार्द नष्ट करीत आहे, असा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला होता. त्या वेळी मी भूमिगत झाल्याने मला अटक झाली नव्हती,” असेही डॉ. सिंग यांनी सांगितले.
“”प्रज्ञाजवळ मोटारसायकल होती हे आम्ही नाकारत नाही. साडेचार वर्षांपूर्वी भोपाळ येथे तिच्या गाडीची कागदपत्रे आणि तिचे पदवी प्रमाणपत्र हरविले होते. तिला एका ऑटोरिक्षाने धडक दिल्यानंतर तिची पर्स हरविली होती, त्या वेळी तिच्या डोक्यालाही मार लागला होता. आजारातून बरे झाल्यानंतर तिने मोटारसायकल विकण्याचे ठरविले. ही गोष्ट अभाविपतील तिच्या सहकाऱ्यांना कळली. एक वर्ष जुनी तिची मोटारसायकल चांगल्या स्थितीत होती आणि तिची किंमत 43 हजार रुपये होती. गाडीचा सौदा झाला. ज्या मनोज शर्माने गाडी घेतली त्याने केवळ 24 हजार रुपये दिले. तो अभाविपच्या सर्व कार्यक्रमांना हजर राहायचा आणि सुरतलाही यायचा.
आम्ही कागदपत्रांवर सह्या केल्या. गाडी शर्माच्या नावे करण्यासाठी आम्ही मदत करू, असे आरटीओची कामे करणाऱ्या दलालांनी सांगितले. दरम्यानच्या काळात शर्माच्या घरून मोटारसायकलच चोरी गेली. मग मोटारसायकल चोरी गेल्याची तक्रार त्याने का दिली नाही, असे विचारले असता, ती गाडी माझ्या नावाने नसल्याने तक्रार केली नाही, असा दावा मनोजने केला होता. मनोजला “सिमी’ आणि चर्चमधील काही मंडळींनीही लक्ष्य केले होते. कॉंग्रेसच्या एका ख्रिश्चन सदस्याचा खून झाला होता आणि त्या प्रकरणात मनोजचे नाव घुसवण्यात आले. अशा प्रकारे प्रज्ञाची मोटारसायकल त्या “कॅम्प’मध्ये पोहोचली होती. मग मालेगाव स्फोटात ही मोटारसायकल आढळून आली, तेव्हा चेसिस नंबरवरून पोलिसांनी आमचे घर गाठले आणि प्रज्ञाला अटक केली.
9 ऑक्टोबर रोजी दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सामंत हे सुरतमधील आमच्या घरी आले. काही प्रश्न विचारायचे आहेत असे मला म्हणाले. हा चेसिस नंबर असलेली मोटारसायकल कुठे आहे, असे त्यांनी मला विचारले. ती माझी नाही, माझ्या मुलीची आहे, असे मी सांगितले. चार वर्षांपूर्वीच तिने ती विकली. हा प्रश्न का विचारत आहे, हे मी त्या अधिकाऱ्याला विचारले तेव्हा नंतर सांगतो असे तो म्हणाला.
प्रज्ञाचा फोन नंबर त्याने मला विचारला. मी त्याला तो मिळवून दिला. त्याने मोटारसायकलबाबत तिला विचारले असता, काही वर्षांपूर्वी ती माझी होती, नंतर मी ती विकली असे तिने सांगतिले. सुरतला येऊ शकतेस का, असे अधिकाऱ्याने प्रज्ञाला विचारले. प्रज्ञा 12 ऑक्टोबरला मध्यप्रदेशातून आली. पोलिसांनी लागलीच तिला ताब्यात घेतले आणि तिला बेकायदेशीर रीत्या 12 दिवस कोठडीत ठेवले.
मी याबाबत तक्रार केली नाही. कायद्याच्या प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने सहकार्य केले पाहिजे अशी माझी धारणा आहे. तुम्ही कडक वागू शकता आणि तसे झाले तर तुम्ही प्रामाणिक आहात याचा मला आनंदच होईल, असे मी त्यांना म्हणालो. तुम्ही प्रामाणिक असाल तर मी तुमचे स्वागतच करील. मी तुम्हाला कशाला घाबरू? जे दोषी असतील ते तुम्हाला घाबरतील. मी घाबरण्याचे कारण नाही. प्रज्ञा मला म्हणाली, “”पिताजी, माझा हेतू वाईट नव्हता, मी काहीही चूक केलेली नाही, अशा प्रकारची कल्पनाही कधी माझ्या मनात आली नाही. माझी काळजी करू नका. तुम्ही अगदी तणावमुक्त राहा. या संकटातून मी सहीसलामत परत येईन. माझ्यावर विश्वास ठेवा. जरी मी तुरुंगात असले तरी निर्दोष सिद्ध होऊनच परत येईन.”
प्रज्ञाचे अनेक मित्र-मैत्रिणी ख्रिश्चन व मुसलमान आहेत. माझा हिंदू धर्मावर आणि अहिंसेवरही विश्वास आहे. त्यामुळे माझी मुलगी प्रज्ञा निर्दोष सुटून परत येईल, याची मला खात्री आहे. राजकीय वातावरण तापविण्यासाठीच हे प्रकरण उभे करण्यात आले आहे. सिमी चुकते आहे हे तुम्ही ऐकले आहे?”
डॉ. चंद्रपालसिंग पुढे म्हणतात, “”मी तुम्हाला प्रश्न विचारतो. ज्याचा बॉम्बस्फोटात प्रत्यक्ष संबंध आहे, ती व्यक्ती आपले वाहन वापरू देईल काय? दहशतवादी कृत्यात सहभागी असलेली व्यक्ती सहजासहजी एटीएसच्या बोलावण्यावरून शरण येईल काय? नातेवाईक प्रज्ञाला भेटायला गेले असता, इथे येण्याची गरज काय, माझ्यावर तुमचा विश्वास नाही काय, असा प्रश्न प्रज्ञाने कशाला विचारला असता? एवढेच काय, तर पोलिसांना त्यांचे काम करू द्या, एक दिवस त्यांना मला सोडावेच लागेल, असेही ती म्हणाली होती.
साध्वी असल्याने ती तशीही कमी अन्नग्रहण करते. खाण्यापूर्वी ती पोळी आणि वरण एका छोट्या बाऊलमध्ये एकत्र कुस्करते आणि त्याची चव सौम्य होऊ देते. आता ती तुरुंगात कशी आहे हे मला माहिती नाही. तिने स्वत:ची संघटना स्थापन केली असल्याने तिचा आता अभाविपशी काही संबंध नाही. भारतीय जनता पार्टी आणि विश्व हिंदू परिषदेशी तिचा कधीच संबंध आला नाही. त्यामुळे भाजपा व विहिंपचा दावा खरा आहे. मी संघाचा स्वयंसेवक आहे. पण, संघात स्वयंसेविका नसतात. त्यामुळे तिचा संघाशीही थेट संबंध नाही. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा अभाविपशी संबंध होता आणि प्रज्ञाही अभाविपशी संबंधित होती. त्यामुळे काही कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांच्या भेटी झाल्या होत्या.
काही नेते उघडपणे प्रज्ञाच्या समर्थनार्थ पुढे आले नाहीत, त्यामुळे मी अजीबात विचलित झालेलो नाही. कारण माझ्या मुलीने काहीही चुकीचे केलेले नाही. मालेगाव स्फोटात प्रज्ञाचा हात नाही, याची मला 99 टक्के खात्री आहे. एक टक्का यासाठी नाही कारण, गेल्या दोन वर्षांपासून ती साध्वी आहे आणि ती माझ्या येथील घरी आलेली नाही. कारण साध्वीने आईवडिलांच्या घरी यायचे नसते, असा नियम आहे. ती आता मला “पिताजी’ म्हणत नाही आणि त्याऐवजी “डॉक्टरसाब’ असे म्हणते.
देशात झालेल्या स्फोटांबाबत ती अस्वस्थ आहे हे मला माहिती आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि तो तिला मान्य आहे. नागरिकांनी आधी राष्ट्राचा विचार करावा असे तिला वाटते. भारतात जेव्हा हिंदू राष्ट्र स्थापित होईल, त्या वेळी या भूमीवर कोणतेही पाप होणार नाही असे आम्हाला वाटते. हिंदुत्व हा काही धर्म नाही, तर तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे, असे सुप्रीम कोर्टानेही स्पष्ट केले आहे.”
बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलताना डॉ. सिंग म्हणतात, “”ते प्रज्ञाला मदत करीत नाहीत, तर हिंदू मते एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कॉंग्रेसही तेच करीत आहे. हे काही योग्य नाही. हिंदू मतपेढी तयार करण्यासाठी ठाकरे प्रज्ञाला पाठिंबा देत आहेत, तर मुसलमानांची मते मिळविण्यासाठी कॉंग्रेस तिचा छळ करीत आहे. कॉंग्रेस काय खेळी खेळत आहे, हे मुस्लिमांना चांगले ठाऊक आहे.
मला मोदींच्याही पाठिंब्याची गरज नाही. मी जर काही अन्याय केला असेल, तर मला त्याची शिक्षा झालीच पाहिजे आणि प्रसंगी फासावरही लटकवले पाहिजे. मी जर काही चुकीचे कृत्य केलेच नाही तर मोदी माझ्या मदतीला न धावले तरीही मी सुरक्षित बाहेर येणारच. गरज आहे ती आत्मविश्वासाची. मी औपचारिकपणे कधीही मोदी यांना भेटलो नाही. पण, ते मला आणि मी त्यांना चांगले ओळखतो. तेही रा. स्व. संघाचे कार्यकर्ते आहेत आणि मी स्वयंसेवक आहे.
मला गरज आहे ती ईश्वराच्या आणि समाजाच्या पाठिंब्याची. माझ्या मुलीने काही चुकीचे कृत्य केले असते तर केव्हातरी तिने त्याबाबत मला सांगितलेच असते. माझ्यापासून काही लपवून ठेवण्याइतपत ती सक्षम नाही. मी मेली तरी चालेल, पण मी बॉम्ब पेरणारच, असे तिने मला सांगितलेच असते. पण तसे तिने केले नाही. म्हणूनच माझी मुलगी निर्दोष आहे, याची मला खात्री आहे.”
(रेडिफवरून साभार)
अनुवाद : गजानन निमदेव

Posted by : | on : 31 Jan 2012
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *