Home » Blog, इतर, सामाजिक » मातृ-पितृसेवेचा रोटरी क्लबचा पुण्यप्रद उपक्रम

मातृ-पितृसेवेचा रोटरी क्लबचा पुण्यप्रद उपक्रम

रोटरी अन्नपूर्णा योजना : वयोवृद्धांना सन्मानाने जेवण मिळावे म्हणून ही योजना

 •अमर पुराणिक
“आपल्या तथाकथित सुसंस्कृत समजल्या जाणार्‍या भारतीय समाजात अनेक संस्कृतिहीन घटना घडत आहेत. आज एकविसाव्या शतकात आपण मोठी प्रगती साधलेली असली तरी सांस्कृतिक मूल्यं मात्र गमावली आहेत. आजच्या समाजाने भौतिक प्रगती केलेली असली तरी सांस्कृतिक नीतिमूल्यांबाबत मात्र रसातळाला गेला आहे. ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव, अतिथी देवो भव’, अशी संस्कृृती व संस्कार सांगणार्‍या आपल्या हिंदू संस्कृतीची भौतिक सुखाच्या मागे लागून मोठी हानी झाली आहे. आज समाजात ज्येष्ठांची मोठी कुचंबणा होत आहे. काहीजण तर दोनवेळच्या अन्नाला महाग झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक सुज्ञाला प्रश्‍न पडतो की, जर मुले पाहात नसतील तर यांच्याकडे कोण पाहणार? याला उत्तर दिलं ते रोटरी क्लब ऑफ सोलापूूरनं, ‘रोटरी अन्नपूर्णा योजना’ सुरू करून. अशा योजना अनुकरणीय असून इतर संस्थांनीदेखील असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे.”
rotary annapurna yojnaआपल्या तथाकथित सुसंस्कृत समजल्या जाणार्‍या भारतीय समाजात अनेक संस्कृतिहीन घटना घडत आहेत. आज एकविसाव्या शतकात आपण मोठी प्रगती साधलेली असली तरी सांस्कृतिक मूल्यं मात्र गमावली आहेत. आजच्या समाजाने भौतिक प्रगती केलेली असली तरी सांस्कृतिक नीतिमूल्यांबाबत मात्र रसातळाला गेला आहे. यात सर्वात मोठी समस्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची होत असलेली अवहेलना. ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव, अतिथी देवो भव’, अशी संस्कृृती व संस्कार सांगणार्‍या आपल्या हिंदू संस्कृतीची भौतिक सुखाच्या मागे लागून मोठी हानी झाली आहे. आज समाजात ज्येष्ठांची मोठी कुचंबणा होत आहे. काहीजण तर दोनवेळच्या अन्नाला महाग झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक सुज्ञाला प्रश्‍न पडतो की, जर मुले पाहात नसतील तर यांच्याकडे कोण पाहणार? याला उत्तर दिलं ते रोटरी क्लब ऑफ सोलापूूरनं, ‘रोटरी अन्नपूर्णा योजना’ सुरू करून.
आचार्य गिरिराज किशोरजी व्यास यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने रोटरी क्लब सोलापूरच्या वतीने अन्नपूर्णा योजनेला प्रारंभ केला. आळंदीत आचार्यजी ज्ञानेश्‍वरीचे अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी डब्यांची सोय करतात. तेव्हाचे रोटरी अध्यक्ष राज मिणीयार हे आचार्यांचे शिष्य असल्याने त्यांचे आळंदीला जाणे-येणे होते. राज मिणीयार यांनी हा उपक्रम पाहिला व आपणही अशी एखादी योजना सुरू करावी अशा भावनेने त्यांच्या मनात घर केले व तेव्हाचे रोटरी सचिव किशोर चंडक व इतर रोटेरियन सहकार्‍यांशी चर्चा करून वृद्धांसाठी ‘रोटरी अन्नपूर्णा योजना’ सुरू करण्याचा मानस पक्का केला.
आजच्या सामाजिक स्थितीबद्दल बोलताना रोटरीचे सध्याचे अध्यक्ष प्रा.डॉ. नागेश धायगुडे म्हणाले की, आज समाजात ज्येष्ठ नागरिकांची मोठी अवहेलना होते. प्रत्येकाची वेगवेगळी कारणे आहेत. काहींची आर्थिक परिस्थिती नाही, तर काहींचे हात-पाय उतारवयामुळे काम करत नाहीत. काहींची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, मुले मोठ्या हुद्द्यावर आहेत, तर काहींची मुले परदेशात आहेत. ही मुले कृतघ्नपणा करतात व त्यांच्या पालकांना पाहत नाहीत. आर्थिक सुबत्ता असलेली ही मुलेे आपल्या आई-वडिलांना टाकून देतात. ही स्थिती घृणास्पद असली तरी हे आजच्या समाजाचे वास्तव आहे. आपल्या समाजाची नीतिमूल्ये अशी रसातळाला गेलेली आहेत आणि ही स्थिती सामाजिक संतुलनाच्या दृष्टीने भयावह ठरणारी आहे.
आयुष्यभर खस्ता खावून आपल्या मुलांना मोठे करणार्‍या पालकांना मुलांच्या स्वयंंकेद्रित व स्वार्थी वृत्तीमुळे म्हातारपणी अन्नान्न दशा होते. अशा दुर्दशेत जगणार्‍या पालकांना जेवणाचा डबा देण्याची योजना म्हणजे आई-वडिलांच्या सेवेचे पुण्यप्रद काम होय. हिंदुधर्मशास्त्रात अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. आजची सामाजिक स्थिती व गरज लक्षात घेऊन वयोवृद्धांना सन्मानाने जेवण मिळावे म्हणून तात्काळ ही योजना राबवण्याचे काम हाती घेतल्याचे माजी अध्यक्ष राज मिणीयार व माजी अध्यक्ष किशोर चंडक यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. अतिशय अवघड असली तरी रोटरीने ही योजना सुरू केली व गेली चार वर्षे हा उपक्रम शिस्तबद्धपणे व अव्याहतपणे सुरू आहे.
या योजनेसाठी रोटरीने अन्नपूर्णा योजना समिती नेमली व काही विशिष्ट निकष ठरवले. ज्यांनी आयुष्यभर नोकरी किंवा व्यवसाय केला, भीक न मागता आयुष्यभर कष्ट करून कुटुंब जोपासले, काहींची पूर्वी आर्थिक स्थिती उत्तम होती, पण आयुष्याच्या अंतिम टप्प्यात विपन्नावस्था आली. मुलांची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही काही पालकांची मुले त्यांच्याकडे पाहत नाहीत, अशा वयोवृद्ध पालकांसाठी रोटरी अन्नपूर्णा योजनेचा लाभ दिला जातो.
वालचंद महाविद्यालयाच्या प्रा. विलास बेत यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांकडून यावर सर्वेक्षण करून गरजू ३०० लाभार्थी निवडले व त्यातूनही अतिगरजू असे १०० लाभार्थी निवडले आणि दि. ४ ऑगस्ट २००७ रोजी या योजनेचा शुभारंभ आचार्य गिरिराज किशोरजी व्यास व डी.जी. विनय कुलकर्णी यांच्या हस्ते, तेव्हाचे अध्यक्ष राज मिणीयार व सचिव किशोर चंडक, रोटरीचे पदाधिकारी, सदस्यांच्या उपस्थितीत केला.
या योजनेसाठी अनेकांनी सढळ हाताने व निर्मळ मनाने मदत केली व तो मदतीचा ओघ वाढतच आहे. सर्वप्रथम स्टील मर्चंट्‌स असोसिएशनने यासाठी लागणारे डबे दिले. तसेच हे डबे गरम पाण्यात धुण्याची सोय नॅशनल लॉंड्रीचे भोसले यांनी करून दिली. पहिल्यावर्षी सुग्रास व परिपूर्ण जेवण पुरवण्याचे काम ‘सुगरण’च्या मीनाबेन शहा यांनी आनंदाने स्वीकारले व ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर केवळ ११ रुपयांत डबा देण्यास सुरुवात केली. रोटेरियन कुशाल डेढिया यांच्या सर्वोदय भांडार येथे यातील डबे तपासले जातात, त्यांचे वजन केले जाते व वेळेवर गरम गरम जेवणाचे डबे लाभार्थ्यांना घरपोच दिले जातात. नंतर दुसर्‍या वर्षापासून चंद्रिका चौहान व शुभांगी बुवा यांच्या ‘उद्योगवर्धिनी’ या संस्थेद्वारे सकस व संपूर्ण आहार असलेले डबे देण्यास प्रारंभ केला व आजतागयात विनाखंड देत आहेत. सुरुवातीला हे डबे लाभार्थ्यांना सायकलवर घरपोच दिले जात होते, पण १०० डबे देण्यास वेळ जाऊ लागला, त्यामुळे गरम डबे खायला मिळावेत या उद्देशाने नंतर रिक्षामधून डबे देण्यास सुरुवात केली. श्री. कुमार पाटील या प्रामाणिक, जबाबदार व शिस्तबद्ध व्यक्तीने कोणतीही अपेक्षा न ठेवता रिक्षातून डबे देण्याची जबाबदारी स्वीकारली. आजपर्यंतच्या चवळजवळ चार वर्षांच्या कालावधीत कुमार पाटील यांनी एकही दिवस चुकवला नाही किंवा सुट्‌टी घेतली नाही. अविरतपणे व अतिशय निष्ठेने ते हे काम करतात, हे कौतुकास्पदच नव्हे तर अनुकरणीय म्हणाले लागेल. शिवाय रोटेरियन कुशाल डेढिया व रोटेरियन केतन व्होरा हे मुख्यत्वे सर्व जबाबदारी समर्थपणे सांभाळतात, नव्हे तर झपाटल्यासारखे काम करतात. अतिशय तळमळीने व आत्मीयतेने एखाद्या व्रतस्थासारखे कार्य हे दोघे रोटेरियन करतात. रोटरीच्या सर्व महत्त्वाच्या उपक्रमात माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. एम.जी. प्रधान, सुप्रसिद्ध सी.ए. द.ना. तुळपुळे, डॉ. राजीव प्रधान व जुबीन अमारिआ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते.
योजना राबवताना अनेक अडचणी आल्या, पण ज्येष्ठांच्या आशीर्वादाने यावर मात केली. कर्फ्यूमध्ये सुद्धा पोलिसांच्या सहकार्यामुळे एकही दिवस चुकवला नाही. आरटीओने देखील यासाठी परवानगी देऊन पूर्ण सहकार्य केले. सर्वात अवघड काम म्हणजे या योजनेसाठी पैसा उभा करणे. पहिल्या वर्षी या योजनेला ५ लाख रुपये खर्च आला, पण आज वाढलेल्या प्रचंड महागाईमुळे हा खर्च वाढला असून, यावर्षी या योजनेला वर्षाला ९ लाख रुपये खर्च येतो.
या योजनेची समाजाभिमुखता व पारदर्शकता पाहून अनेकांनी हातभार लावला. साधारणपणे ६० टक्के खर्च समाजातील अशा दानशूर व्यक्तींकडून केला जातो. बाकीचा ४० टक्के खर्च रोटेरियन मंडळी करतात. हे करीत असताना कोणी डबा दिला व कोणाला दिला? ही माहिती गुप्त ठेवली जाते. डॉ. रायखेलकर यांनी हा उपक्रम पाहून आपल्या आई-वडिलांच्या नावे डबे दिले. माजी महापौर विठ्ठल करबसु जाधव यांनी महापौर असताना या उपक्रमाची दखल घेऊन मोठी मदत केली व आजपर्यंत ते दरवर्षी या उपक्रमासाठी १० हजार रुपये देतात. या योजनेमुळे बर्‍याच लोकांमध्ये आपल्या पालकांबद्दल जागरुकता निर्माण झाली व आपल्या पालकांची काळजी ते घेऊ लागले, हे देखील या योजनेचे यशच म्हणावे लागेल. हे करताना समाजातील अनेक बरे-वाईट पैलू पाहायला मिळाल्याचे किशोर चंडक व राज मिणीयार यांनी सांगितले.
राष्ट्रीय, धार्मिक सणांना गोड जेवणाचा डबा दिला जातो. तसेच नवरात्रीत उपवासाचे डबे दिले जातात. या शिवाय या ज्येष्ठांना वर्षातून एकदा कपडे दिले जातात. ब्लँकेट व जेवण्याच्या भांड्यांचा सेट देखील दिला जातो. उतरवयात मुख्यत्वे ज्येष्ठांना गरज असते ती वैद्यकीय तपासणीची, त्यासाठी त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते. सुरुवातीला अश्‍विनी रुग्णालयात ही तपासणी केली, नंतर डॉ. श्रीकांत पागे व डॉ. सौ. पागे यांच्या ‘मेडिसिटी’ या रुग्णालयात ही वैद्यकीय तपासणी केली जाते व त्यांना लागणारी औषधे पुरवली जातात. तसेच दरवर्षी देवदर्शनाची सहल देखील काढली जाते व जवळच्या धार्मिक स्थळांना दर्शनासाठी नेण्याची सोय केली आहे. यासाठी प्रा. ए.डी. जोशी व अमोल जोशी यांच्या इंडियन मॉडेल स्कूलच्या वतीने प्रवासाची सोय केली जाते.
नेहमीप्रमाणेच शासनाला कोणत्याही सत्कार्याचे सोयरसुतक नाही. शासनाने या योजनेचीही दखल घेतलेली नाही. मात्र रोटरी इंटरनॅशनलने याची दखल घेऊन सर्वोत्कृष्ट प्रकल्प म्हणून ‘रोटरी आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरविले आहे, पण अशा कोणत्याही पुरस्काराची किंवा दखलीची वाट न पाहता रोटरीने हा उपक्रम नेटाने सुरू ठेवला आहे. शासन नसले तरीही समाज व ज्येष्ठांचे आशीर्वाद या उपक्रमाच्या पाठीशी आहेत.
तरुण भारत, सोलापूर, रविवार, दि. ०८ मे २०११
Posted by : | on : 21 Nov 2011
Filed under : Blog, इतर, सामाजिक
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *