Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राष्ट्रीय, स्थंभलेखक » स्टार्टअप इंडिया : देश उभा राहतोय!

स्टार्टअप इंडिया : देश उभा राहतोय!

•चौफेर : अमर पुराणिक•

ज्या देशात व्यवसाय प्रारंभ करणे आणि तो सातत्याने यशस्वीरित्या चालवणे सोपे आहे असेच देश विकसित आणि संपन्न होऊ शकले आहेत. आणि ज्या देशात व्यवसाय करणे अवघड आहे ते देश अविकसित अवस्थेत पिचत पडले आहेत. ब्रिक्स देशात भारत हा व्यवसाय करण्यात आणि नवा व्यवसाय सुरु करण्यात सर्वात मागे आहे. जोपर्यंत भारतात उद्योग-व्यवसाय करणे आणि चालवणे सुलभ होत नाही तोपर्यत विकास आणि संपन्नतेची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. भारतात एक म्हण प्रचलीत आहे आणि ती खरी आहे की, व्यवसायातच लक्ष्मी निवास करते! जागाच्या तुलनेत आपण खूप मागे आहोत हे जाणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया आदी योजना राबवत आहेत. आता त्यांनी स्टार्टअप इंडिया या उपक्रमाची घोषणा केली आहे.

narendra-modi-starup india-standup indiaपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारी रोजी ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेची औपचारिक घोषणा करत मेक इन इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया या अभियानांच्या शृंखलेत स्टर्टअप इंडिया योजनेचा समावेश केला आहे. त्यांनी स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत नव्या उद्योगांसाठी प्रस्तावित सुविधांचे विवरण देत असताना सांगितले की, या योजनेमुळे नव्या उद्योजकांना आपला उद्योग सुरु करणे सुलभ होणार आहे. पंतप्रधानांनी १० हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी  देण्याची घोषणा करताना सांगितले की या निधीत चार वर्षात दर वर्षी २५०० कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. मोदी सरकार नवे उद्योजक आपल्या पायावर उभे राहिले पाहिजेत यासाठी प्रयत्नशील आहे. याच कार्यक्रमात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, सरकार लयसंस परमिट राज हद्दपार करुन नवे व्यवसाय सुरु करण्याची प्रक्रिया सोपी करु इच्छिते.
कार्पोरेट प्रमाणेच स्टर्ट-अप हा शब्दही अमेरिकेत रुढ झाला. त्याचा शब्दप्रयोग आता जगातील अन्य देशातही होऊ लागला आहे. स्टार्ट-अपचा शब्दप्रयोग हा व्यवसाय किंवा उद्योग क्षेत्रात नव्या उद्योग उभारणीच्या अनुषंगाने वापरला जातो. अर्थातच नवे उद्योग उभारणार्‍या नव्या उद्योजकालाही हा शब्दार्थ लागू होतो. पण स्टर्टअपद्वारे निर्माण होणार नवा उद्योजक हा सरकारी उद्योग विकास संस्थांच्या उद्योग विकास कार्यक्रमाद्वारे प्रेरित आणि प्रशिक्षित झालेल्या नव्या उद्योजकांपेक्षा भिन्न आहे. अनेकदा आपण पाहिले आहे की, अनेक तरुणांना जेव्हा नोकर्‍या मिळत नाहीत तेव्हा शेवटी नाईलाजाने औद्योगिक केंद्रांच्या उपक्रमात मार्गदर्शन घेऊन एखादा व्यवसाय सुरु करतो. बहुदा असे तरुण लघु किंवा सुक्ष्म उद्योग सुरु करतात पण सोबतच नोकरी शोधणेही सुरुच असते. जोपर्यंत चांगली नोकरी मिळत नाही तो पर्यंतच ते व्यवसाय करतात आणि एकदा नोकरी मिळाली की आपल्या उद्योगाला रामराम करतात. असे करण्याला अनेक कारणे असतात. तुटपुंज्या भांडवलावर उद्योग उभारणे आणि तो फायद्यात चालवणे अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि जरी उद्योग चालला तरी त्यातील मिळणारा नफा हा अतिशय तुटपुंजा असतो त्यामुळे अशा उद्योजकांचे व्यवसाय करत असतानाही नोकरी शोधणे सुरु असते. पण स्टार्टअप इंडिया उपक्रम तसा नाही. हे अभियान त्या तरुणांसाठी आहे जे आपले करिअर उद्योजक म्हणूनच करु इच्छितात. ज्यांच्याकडे विशेष कौशल्य आहे असे तरुण नवा व्यवसाय, नवे तंत्रज्ञान, नवनवी उत्पादने आपल्या नव्या संकल्पनेने आणि कल्पकतेने निर्माण करु इच्छितात. असे तरुण लघु उद्योग नव्हे तर मध्यम उद्योग उभारु इच्छितात आणि त्यांच्यात तेवढे सामर्थ्य आहे अशा तरुणांसाठी स्टार्टअप इंडिया हा योग्य पर्याय ठरणार आहे.
स्टार्टअप इंडियाची संकल्पना नवी असली तरी भारत यात मागे नाही तर भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. नॅसकॉमच्या एका अहवालानुसार २०१४ मध्ये १७९ असे नवे उद्योग होते यात १४,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आणि ६५ हजार लोकांना रोजगार मिळाला.२०१५ मध्ये ४०० स्टार्टअप मधून ३२,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
बाराव्या पंचवार्षिक योजनेपर्यंत भारतात असा अनुभव आला आहे की, नवा व्यवसाय सुरु करणार्‍या तरुणांपैकी केवळ २० ते २५ टक्के यशस्वी होतात आणि सुरु केलेल्या उद्योगांपैकी ५० टक्के उद्योग ३ वर्षात बंद पडतात. आजपर्यंत तरी अशा प्रकारे नवा उद्योग सुरु करुन आपल्या पायावर उभे राहून सातत्याने उद्योग चालवणे खूप कठीण आहे. भारतात व्यवसाय सुरु करुन तो चालवणे किती अवघड आहे ते जागतिक बँकेच्या ‘डुईंग बिजनेस २०१६’ या अहवालात स्पष्ट केले आहे. जागतिक बँकेच्या २०१६ च्या अहवालाप्रमाणे जगातील १८९ देशांत केलेल्या सर्वेक्षणानुसार व्यवसाय करण्याच्या सुलभतेबाबतील भारताला १०० पैकी केवळ ५४ गुण मिळाले असल्याने भारत १३० व्या स्थानावर गेला आहे म्हणजे मागास देशांत गणला गेला आहे. न्यूझीलंड, डेन्मार्क, दक्षिण कोरिया, इंग्लंड, अमेरिका आदि पहिल्या ७ देशांना ८२ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त झाले आहेत. यावरुन लक्षात येते की भारतात व्यवसाय करणे किती अवघड आहे आणि नवा व्यवसाय सुरु करणे तर त्याहूनही कठिण आहे. १८० देशात भारत १५५व्या क्रमांकावर होता. भारतापेक्षा चीनची स्थिती कित्येक पटीने चांगली आहे. चीन जगात ८४ व्या स्थानावर आहे.
ज्या देशात व्यवसाय प्रारंभ करणे आणि तो सातत्याने यशस्वीरित्या चालवणे सोपे आहे असेच देश विकसित आणि संपन्न होऊ शकले आहेत आणि ज्या देशात व्यवसाय करणे अवघड आहे ते देश अविकसित अवस्थेत पिचत पडले आहेत. ब्रिक्स देशात भारत हा व्यवसाय करण्यात आणि नवा व्यवसाय सुरु करण्यात सर्वात मागे आहे. जोपर्यंत भारतात उद्योग-व्यवसाय करणे आणि चालवणे सुलभ होत नाही तोपर्यत विकास आणि संपन्नतेची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. भारतात एक म्हण प्रचलीत आहे आणि ती खरी आहे की, व्यवसायातच लक्ष्मी निवास करते! जागाच्या तुलनेत आपण खूप मागे आहोत हे जाणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया आदी योजना राबवत आहेत. आता त्यांनी स्टार्टअप इंडिया या उपक्रमाची घोषणा केली आहे. या माध्यमातून जागतिक स्थरावर देशाची स्थिती सुधारणे शक्य होणार आहे. मोदींच्या परदेश दौर्‍यांच्या प्रयोजनामागे हे ही एक महत्त्वाचे कारण आहे.
जागतिक बँकेच्या २०१६ डुईंग बिजनेसच्या अहवालानुसार मोदी सरकार भारतात नवे व्यवसाय उभे करणे, ते स्थिर करणे यात येणार्‍या समस्यांबाबत परिचित आहे आणि त्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नरत आहे, त्याचाच परिणाम म्हणून गेल्या एका वर्षात भारत १३४ व्या क्रमांकावरुन १३० व्या क्रमांकावर आला आहे. खरे तर आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. जागतिक बँकेच्या अहवालाप्रमाणे मोदी सरकार एका वर्षात लाल फितीच्या कारभारावर नियंत्रण मिळवण्यात बर्‍यापैकी यशस्वी झाले आहे. येत्या काळात त्याचे दृष्य परिणाम दिसू लागतील. नव्या उद्योजकांना उद्योग उभारणी आणि गुंतवणूकीसाठी केलेल्या मोदी सरकारच्या प्रयत्नांचे या अहवालात कौतुक केले आहे. जागतिक बँकेचे चिफ इकॉनॉमिस्ट आणि सीनियर व्हाईस पे्रसिडेंट कौशिक बसु यांच्या मताप्रमाणे जर मोदी सरकारने आर्थिक सुधारणा करुन व्यवसाय आणि उद्योग वाढवण्याचे प्रयत्न सातत्याने चालू ठेवले तर येत्या पाच वर्षात भारत चीनच्या बरोबरीला पहिल्या शंभरात येईल.
नवी दिल्लीत १६ जानेवारी रोजी झालेल्या स्टार्टअप इंडियाच्या सम्मेलनात भाग घेणार्‍या देश-विदेशातील उद्योजकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांची  वाहवाह केली आहे. संमेलनात उद्योजकांचा उत्साह आणि गुंतवणुकीची उत्सुकता पाहता भारत स्टर्टअप हब बनेल असे वातावरण जागतिक पातळीवर निर्माण झाले आहे. यात दुमत नाही की स्टर्टअप इंडियामुळे जिडीपीच्या वृद्धीबरोबरच विकास साधला जाईल आणि नवे रोजगार उपलब्ध होतील. स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया या अभियानांना यश मोठे मिळणार आहे यात वाद नाहीच मोदी सरकार आणि भाजपाला याचे श्रेय जाते. पण कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी राष्ट्रीय विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत हीन राजकारण थांबवणे आवश्यक आहे. जर विरोधकांचेही या उपक्रमांना सहकार्य लाभले तर जास्त वेग साधणे शक्य होणार आहे. अन्यथा कॉंग्रेस आणि विरोधकांनी गलिच्छ राजकारण खेळायचे थांबवले नाही तरीही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देश विकास साधेलच त्यासाठी मोदी सरकारला थोडा त्रास सहन करावा लागेल आणि जनतेला थोडी जास्त कळ काढावी लागेल इतकेच. पण आता देश उभा राहतोय व विकासाच्या मार्गावरुन चालू लागला आहे आणि लवकरच धावूही लागेल यात शंका नाही.

Posted by : | on : 24 Jan 2016
Filed under : Blog, चौफेर : अमर पुराणिक, राष्ट्रीय, स्थंभलेखक
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *