Home » Blog » हुशार निर्मलबाबा, आपणच मूर्ख

हुशार निर्मलबाबा, आपणच मूर्ख

सडेतोड : अरुण रामतीर्थकर
जीवनातील गंभीर समस्यांवर रोज पाणीपुरी खा, असा सल्ला देणार्‍या निर्मलबाबास ४ महिन्यांत १२३ कोटी रु. मिळाले. तो मूर्ख नाही. धर्माला ग्लानी आली असता असे पैसे खर्च करणारे हिंदूच मूर्ख, बावळट आहेत.

गेल्या महिन्यात काही हिंदी वृत्तवाहिन्यांवर निर्मलबाबा या तथाकथित चमत्कारी पुरुषाच्या दरबाराचे थेट प्रक्षेपण चालू होते. तास-दीड तासाचे थेट प्रक्षेपण म्हणजे ३०-४० लाखांची कमाई,  हे घबाड ज्यांना मिळाले ते खुष होते. निर्मलबाबाचा उदोउदो करत होते, पण ज्यांना हे घबाड मिळाले नाही, अगदी प्रयत्न करूनही मिळाले नाही त्यांनी निर्मलबाबा हा कसा ढोंगी आहे याचा तपशील जाहीर करायला सुरुवात केली. वाईटातून चांगले होते ते असे. निर्मलबाबा हे काय प्रस्थ होते हे लक्षात आल्यानंतर एक हिंदू म्हणून मला माझ्याच थोबाडीत मारून घ्यावी असे वाटले. हिंदू समाज किती बावळट आणि मूर्ख आहे. मिळवलेला पैसा कसा खर्च करायचा याची अक्कल आणि सामाजिक भान नसल्यामुळे ४ जानेवारी ते १४ एप्रिल या काळात बाबाच्या खात्यावर तब्बल १२३ कोटी रु. जमा झाले. म्हणजे दिवसाला एक कोटीपेक्षा अधिक कमाई या बाबाची होती. धिरुभाई अंबानीच्या दोन्ही पोरांना तरी हे जमते का? एवढे मिळवतही असतील, पण त्यासाठी भांडवली गुंतवणूक, सरकारी सोपस्कर अशा अनेक गोष्टी केल्यावर एवढी प्राप्ती असेलही. हा बाबा पैशाचीही गुंतवणूक न करता खुर्चीवर नव्हे सिंहासनावर बसून काही तासांत कोटी रु. कमावत होता.

या बाबाला काही आध्यात्मिक अधिष्ठान असावे, वेद उपनिषदांचा अभ्यास असावा, तर असे काही नाही. निर्मलसिंह नरुला नावाचा हा उडाणटप्पू गृहस्थ. अनेक धंदे करून त्याने पैसे गमावले. झारखंड विधानसभेचे सभापती इंद्रसिंह नामधारी त्याचे मेव्हणे. त्यांनी बरेच वेळेला त्याला वाचवले, पण मेव्हण्याची लक्षणे ठिक दिसेनात हा एक दिवस आपल्याला गोत्यात आणेल असे लक्षात आल्यावर नामधारींनी त्याला हाकलून दिले.
दिल्लीत येऊन निर्मलने हा बुवाबाजीचा धंदा सुरू केला. समाजात दुःखे भरपूर आहेत. सोनिया गांधी चालवत असलेले मनमोहन सिंग सरकार या दुःखात भरच घालत आहे. असे दुःखी, पीडित लोक बाबाला गाठ पडले. बाबा, लग्न झाल्यापासून माझा धाकटा भाऊ वेगळ व्हायचे म्हणतो, वाटणी मागतो, रोज भांडण करतो असे दुःख एक जण सांगतो. बाबा उपाय सांगतो, आलू समोसा हरी चटणीके साथ रोज खाना, तकलिफ दूर हो जाएगी. एक प्रौढावस्थेकडे झुकलेला तरुण नोकरीच मिळत नाही अशी व्यथा मांडतो. बाबा थोडावेळ विचारमग्न होतात. मग पांढरा रूमाल वापर. त्याची घडी चौकोनी न करता त्रिकोणी करून खिशात ठेव. महिन्याभरात तुझे काम होईल, असे बाबा ठामपणे सांगतात. लग्नाचे जमत नाही असे सांगणार्‍या तरुणीला बाबा रोज पाणीपुरी खायला, तर कोणाला रोज भेळ खायला सांगतात. हे उपाय ऐकून कोणीही बुचकळ्यात पडले, पण याच कार्यक्रमात चार-पाच जण बाबाचा जयजयकार करत आपले काम यशस्वी झाल्याचे सांगतात. भेळ खा, पाणीपुरी खा, रूमालाची घडी अशी ठेव, झोपताना पांढरा लेंगा कधीही घालू नको हे काय दुःखावरील उपाय झाले?
मला दुःख वाटते आणि चीड येते ती याचीच. बाबाबद्दल मला बिलकुल राग नाही. दुनिया झुकती हे झुकानेवाला चाहिए. निर्मलबाबाला दुनियेला कसे झुकवायचे ते कळले. राग येतो ते बाबाच्या बँकेतील खात्यावर १२३ कोटी रु. भरणार्‍या मूर्ख लोकांचा. हे लोक खेडेगावातील अडाणी नाहीत. दिल्ली आणि तत्सम मोठ्या शहरातील सुशिक्षित लोक आहेत. पुट्टपूर्तीचे सत्य साईबाबा यांच्याबद्दल बरेच प्रवाद होते, पण त्यांनी बांधलेली रुग्णालये, गरिबांना महागडा उपचार स्वस्तात उपलब्ध करून देतात. आजही त्यांच्या पश्‍चात हे कार्य चालू आहे. या निर्मलबाबाने काय केले? ग्रेटर कैलास भागातील हेडस् हॉटेल ३० कोटी रु. ना विकत घेतले. १५ एप्रिलला आपल्या खात्यावरून त्याने १०५ कोटी रु. काढले. त्यातून तो आणखी तारांकित हॉटेले विकत घेऊन हॉटेलांची साखळी तयार करणार आहे. तो लुच्चा आहे, लबाड आहे. ४२० आहे हे सर्व खरे. मग एका प्रश्‍नाला २ हजार रु. आधी देऊन प्रश्‍न विचारून सल्ला दिल्यावर प्राप्तीनुसार आणखी निधी अर्पण करणार्‍यांना काय म्हणायचे?
एकीकडे देवालयांकडे ५००-६०० किलो सोने आणि कोट्यवधींची रोकड आहे. दुसरीकडे अनाठायी खर्च करणार्‍या श्रद्धाळू हिंदूंच्या खिशात पैसेही सुळसुळत आहेत. अशी सधनता असल्यावर मग आपल्या धर्मालाच ग्लानी का आली आहे. धर्म संकटात आहे. उद्या आपणही संकटग्रस्त असू याची जाणीव १०० कोटींपैकी ९९ कोटी हिंदूंना नसावी. उर्वरित एक कोटी म्हणजेही अतिशयोक्ती होते. फक्त काही लाख हिंदूंना या धोक्याची जाणीव आहे. घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे असा प्रकार त्यांच्याबाबतीत आहे. निर्मलबाबास १०० कोटी रु. देणारे, शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टचे पदाधिकारी कसे पैसे खातात हे उघड झाल्यावरही साईबाबांच्या मस्तकी २०-२५ किलो सोन्याचा मुकुट घालतात. साईबाबांना अर्पण म्हणजे या ट्रस्टींना अर्पण एवढेेही त्यांच्या लक्षात येत नाही. २५ किलोचा मुकुट म्हणजे आजच्या बाजारभावाने ७५ कोटी रु. हेच पैसे देशकार्य, धर्मकार्य याला अग्रक्रम देऊन प्रकाशनाचा व्यवसाय करणार्‍यांना देऊन उर्जितावस्था का आणत नाहीत?
आज मदरशाची सर्वतोपरी जबाबदारी सरकार घेते. आजचा कृष्ण (मनमोहन) योगक्षेमम् वहाम्यहम् म्हणत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मात्र वेदपाठ शाळांची दैन्यावस्था आहे. धर्मजागृतीचे काम करणार्‍यांना फिरण्यासाठी पदरचे पैसे खर्च करावे लागतात. वनवासींचे धर्मांतर रोखायचे तर परदेशातून येणार्‍या प्रचंड मदतीपुढे टिकाव लागत नाही. त्यातून एखादे स्वामी लक्ष्मणानंद उभे ठाकले, तर त्यांची हत्या होते. फादर स्टेन्सच्या हत्येचा गवगवा होतो, पण ही हत्या दुर्लक्षित राहते. असे का? मला जमणार नाही, पण धर्मकार्यास मी यथाशक्ती आर्थिक पाठबळ देत जाईन, असा विचार प्रत्येक हिंदूंच्या मनात आला पाहिजे. निर्मलबाबाची भरपूर बेजमी झाली आहे. देवस्थानांकडेही आता रग्गड पैसा झाला आहे. त्याचा अनुचित विनियोग होत आहे. आता हा प्रकार बंद करा. देवळात जाऊन देवाला नुसता नमस्कार करा. देवाला श्रीमंत केल्यावर सोरटी सोमनाथचे काय झाले ते आठवा. तिरुपती बालाजीला घरातूनच नमस्कार करा. सर्वसाक्षी परमेश्‍वराला तो पोचेल. या बाबतीत मुस्लिमांचा आदर्श ठेवा. प्रत्येक मुस्लिम जकात म्हणून उत्पन्नाचा हिस्सा मशिदीत देतो. या पैशाचा विनियोग फक्त धर्मासाठीच होतो. त्यातून जे काही निर्माण होईल मग ती कब्रस्तानची कंपौंड वॉल असली तरी ती अल्लाची असते. ती पाडायचा प्रसंग आला तर शेकडो मुस्लिम लगेच जमतात, कारण परमेश्‍वराच्या वस्तूचा विध्वंस त्यांना मान्य नाही. आपण देवस्थानांना देणग्या देतो. पुण्य मिळाले समजतो. विनियोग कसा झाला किंवा होतो हे पाहतही नाही. हा हलगर्जीपणा आता खूप झाला. आता भोंदूबाबा किंवा श्रीमंत आणि शासनाधीन देवस्थानास तांबडा पैसाही देऊ नका. धर्मकार्य करणार्‍या, धर्म टिकवणार्‍या संस्थांना पैसा, कपडे, धान्य कशाही प्रकारे मदत करा. लक्षात ठेवा आज तुम्ही धर्माचे रक्षण केलेत तरच उद्या हा धर्म तुमचे संरक्षण करणार आहे. निर्मलबाबा नाही.
रविवार, दि. २७ मे २०१२
Posted by : | on : 30 May 2012
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *