Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, सांस्कृतिक » ‘कातळमनीचा ठाव’ : हृदयाचा ठाव घेणारे लिखाण

‘कातळमनीचा ठाव’ : हृदयाचा ठाव घेणारे लिखाण

• अमर पुराणिक •

आनंद देशपांडे एक शिवरायभक्त, उदयोन्मुख लेखक, ज्यांचे लेखन त्यांच्या वयापेक्षा २० वर्षांनी प्रगल्भ आहे. ज्यांच्यावर गो.नी. दांडेकर व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अशा दिग्गजांचे संस्कार झाले आहेत. १ जून २००९ रोजी गो.नी. दांडेकरांच्या पुण्यतिथीदिनी आनंद देशापांडे यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन गोनीदांच्या कन्या व जावयांच्या हस्ते झाले होते. प्रकाशक पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी त्याचदिवशी ‘कातळमनीचा ठाव’ या दुसर्‍या पुस्तकाच्या प्रकाशनाची घोषणाही केली होती. पहिल्या पुस्तकाच्या यशस्वी प्रकाशनानंतर केवळ चारच महिन्यांत ‘कातळमनीचा ठाव’ हे दुसरे पुस्तक ३ ऑक्टोबर रोजी प्रकाशित होत आहे. दै.तरुण भारतचे माजी संपादक व विद्यमान अध्यक्ष विवेक घळसासी यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
‘कातळमनीचा ठाव’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील किल्ले, विशेषत: रायगडाच्या पर्यटनाचा आनंद स्वत: आनंद देशपांडे यांनी अनुभवला आणि तेच अनुभव दै. सोलापूर तरुण भारतमधून पर्यटन व भटकंती विषयक लेखमालिकेच्या माध्यमातून प्रकाशित केले. आता महाराष्ट्रातील दुर्गप्रेमी वाचकांना हे लेखन पुस्तक स्वरूपात वाचता येणार आहे. शिवरायप्रेमींना ही एक अद्वितीय पर्वणीच आहे!
आनंद देशपांडे हे गाढे शिवभक्त, शिवरायांचा वावर जेथे जेथे झाला, तेथे तेथे प्रत्यक्ष अनेकवेळा जाऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली किल्ले पर्यटन करून आपले चित्तथरारक व अंतर्मुख करणारे अनुभव ‘कातळमनीचा ठाव’ या पुस्तकातून नेमक्या व प्रभावी शब्दांत टिपले आहेत. या पुस्तकावर बाबासाहेब पुरंदरे व गो.नी. दांडेकरांच्या लेखनाचा प्रभाव जाणवतो. ते या दोन्ही दिग्गजांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिष्यच असल्याने असे होणे स्वाभाविकच आहे, पण स्वत: आनंद देशपांडेही त्यात प्रभावीपणे प्रकट होतात. ‘कातळमनीचा ठाव’ वाचल्यानंतर एक गोष्ट ध्यानात येते, ती म्हणजे आनंद देशपांडे हे निसर्गाशी संवाद साधणारे आणि निसर्गाच्या गूढ अंतरंगात डोकावून आपले कल्पक विचार अतिशय प्रभावीपणे मंाडणारे लेखक असल्याची प्रचिती वाचकांना आल्याशिवाय राहात नाही. या पुस्तकातील बरेचसे अनुभव व प्रसंग थेट वाचकांच्या काळजाला हात  घालतात. आनंद देशपांडे स्वत: मी कोणी मोठा लेखक नसल्याचे म्हणतात, पण त्यांचेच लिखाण त्यांचे हे विधान खोडून टाकते. कदाचित त्यांच्यातला हा विनय असावा.
३० प्रकरणांतून केलेले किल्लेवर्णन वाचताना प्रत्येक वाचकाच्या अंगात वीरश्री संचारेल यात शंकाच नाही! मला हे पुस्तक वाचताना सर्वात भावली ती ‘गढ मे गढ रायगढ’ व ‘आता सुखाने मरेन’ ही दोन प्रकरणे आणि त्यातील ७३ वर्षीय बंगाली ग्रहस्थ सोमदत्त चट्टोपाध्याय हे व्यक्तिमत्त्व. पोक्त, वैचारिक बैठक असणारे, हिंदूंच्या व विशेषत: मराठी माणसाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे हे दादा व्यक्तिमत्त्व आनंद देशपांडे यांनी फारच प्रभावीपणे उभे केले आहे.
भिषोण सुंदर – अशी खास बंगाली ढंगात सोमदत्त चट्‌टोपाध्याय यांनी दिलेली गडाच्या सौंदर्यावर अर्थपूर्ण प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब असणारे सोमदत्तदां ‘मुझे कुछ नही होगा’ असे म्हणत कोलकात्याहून शिवप्रेम, हिंदुत्वप्रेमापायी रायगड पाहायला आले होते. ७३ वर्षीय बंगाली सोमदत्तदांची जिद्द व श्रद्धाभाव विलक्षण वाटतो आणि आपण मराठी माणसे मात्र येथल्या येथे रायगडही पाहत नाही, हा आपल्या वागण्यातला विरोधाभास आनंद देशपांडेंनी अगदी पोटतिडकीने मांडलाय. शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर सोमदत्तदांचे ध्यान लागणे शिवरायांचे योगीत्व स्पष्ट करते आणि ‘आज मेरा जीवन सफल हो गया, रायगढ देख लिया, अब चैनसे मरूंगा’ चा  त्यांचा सार्थक भाव वैराग्य व तृप्ती दर्शवितो. शिवरायांना ‘योद्धा योगी’ का म्हटले जाते, त्याचे उत्तर देशपांडे यांनी येथे दाखवून दिले आहे.
‘उत्तर का इतिहास समझौतोंका इतिहास है| दख्खन का इतिहास जो इतिहास शिवछत्रपतीने निर्माण किया, वह संघर्षोंका इतिहास है’ याचे नेमक्या शब्दांत सोमदत्तदांद्वारे केलेल हे वर्णन आनंद देशपांडेंनी प्रभावीपणे व्यक्त करीत नेमकी भेदकता साधली आहे.
‘सुनो आनंद, मेरी एक बात ध्यान मे रख्खो, सही मायने मे अगर जीवन का अर्थ समझना चाहते हो, तो बेचैनी में जिओ और चैनसे मरो|’ हा सोमदत्तदांचा अनुभवाचा सल्ला आपणा वाचकांनाही जगण्याची नवी ऊर्मी व दिशा दाखवतो. इतिहास संरक्षण ऐतिहासिक स्थळ संरक्षणाबाबत आनंद देशपांडे यांनी सणसणीत ताशेरेच ओढले आहेत व महाराष्ट्रीयांची शिवाजी महाराजांबद्दल असलेली बेगडी आस्था, मान खाली घालायला लावणारी असल्याचे त्यांनी आत्मपरीक्षणाच्या दृष्टीने योग्यरीतीने मांडली आहे.
‘रायगडावरील धुकेजलेला पाऊस’ या पहिल्या प्रकरणात पावसाळ्यातील रायगडाचे निसर्गवर्णन सृष्टिदेवतेच्या दिव्य स्वरूपाची प्रचिती देते आणि तेथील चित्तथरारक अनुभवांचे वर्णन शिवरायांच्या काळातील प्रतिकूल परिस्थितीची चुणूक दाखविते. दर्‍या, खोरे, घाट आदी रायगड परिसराचे आनंद देशपांडे यांनी केलेले लालित्यपूर्ण सुंदर वर्णन आपल्यात एकदातरी गड पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण करते.
‘शिवथरघळीची निसरडी वाट’मध्ये समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिलेल्या स्थानाचे यथोचित वर्णन, वैराग्यसंपन्न वातावरणनिर्मिती झाल्याचा अनुभव वाचकांना देते.
तिसर्‍या लेखांकातील प्रतापगडाचे वर्णन आणि लेखकाच्या बहिणीवर पडलेला शिवचरित्राचा प्रभाव व श्रद्धा यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेबद्दलचा प्रचंड आत्मविश्‍वास, आपल्यातही आत्मविश्‍वास निर्माण करतो. ‘हिरवा हिरवा घाट’ हे प्रकरण आपल्याला निसर्गाविषयी जागृत करते, तसेच ‘वृक्षायन’मधील निसर्गसंगोपन व वृक्षमहिमा वाचकांत पर्यावरणाच्या असंतुलनाच्या परिणामांची नव्याने जाणीव करून देते. ‘भग्न भुलेश्‍वर’मध्ये सोलापूर-पुणे मार्गावरील महादेेवाचे भव्य व प्राचिन मंदिर, सुंदर कोरीवकामांचा उत्कृष्ट नमुना असल्याचे देशपांडे म्हणतात आणि भग्नावस्थेतील या मंदिरातील अवशेष पाहून मुस्लिम धमार्ंध राजवटीची क्रूर कृत्ये पाहून लेखकाच्या मनात काय त्वेष निर्माण झाला असेल, याची कल्पना येते.
शिवकालीन किंवा एकूणच सर्व इतिहासकालीन संपत्ती जपण्याबाबत शासन उदासीन आहे. शिवरायांच्या दिग्विजयी पुरुषार्थाला वाट चुकलेला देशभक्त म्हणणारे नपुंसक सर्वधर्मवादी राजकीय नेत्यांच्यावरही लेखकाने आसूड ओढले आहेत. छत्रपती शंभुराजांचे जन्मस्थान पुरंदर गडाची अतिशय दुरवस्था पाहूनही हेच जाणवते. नेत्यांची घरे राष्ट्रीय स्मारकाच्या नावाखाली जपण्यात व्यर्थ पैसा खर्च करतात, पण या प्राचीन इतिहासाकडे कोणालाही बघायला वेळ नाही, याची आनंद देशपांडे यांना वाटणारी खंत वाचकांनाही चिंता करायला लावते.
आयुर्वेदिक वनौषधी, शतकानुशतके निसर्गाकडे दुर्लक्षाचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. झाडे तोडताना तिशीतला लाकूडतोड्या आणि साठीची वसंताची आई दोन भिन्न प्रवृत्तीची माणसे एकाच ठिकाणी, एकाच वेळी पाहिल्यावर लेखकाच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता जाणवते.
‘किल्ले भ्रमंतीबरोबरच निसर्गाचं संतुलन राखा, निसर्ग वाचवा!’ हाच संदेश लेखक आनंद देशपांडे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून दिला आहे. आनंद देशपांडे यांचे सकस लिखाण आपल्याला काहीतरी वेगळे आणि चांगले वाचल्याचे समाधान नक्कीच देईल, यात शंका नाही!
दै. तरुण भारत, सोलापूर.

 

Posted by : | on : 23 Sep 2011
Filed under : Blog, चौफेर : अमर पुराणिक, सांस्कृतिक
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *