•अमर पुराणिक, सोलापूर•
देशभक्ती, त्याग आणि निष्ठा या मूल्यांचे पवित्रपणे आचरण करणारी पिढी डॉ. हेडगेवारांनी घडविली. स्वयंसेवकांमध्ये ‘राष्ट्राय स्वाहा’ची वृत्ती पेरली व ‘इदं न मम’ची निष्ठा रूजविली. योगीपुरुष श्रीगुरुजींनी संघाची धुरा प्रतिकूल काळात समर्थपणे पेलली व वर्धीष्णू केली. संघाच्या मुशीतून अनेक सामान्य वाटणार्या पण असामान्य असणार्या विभूती निर्माण झाल्या. अशा विभूतींमध्ये नरहर व्यंकटेश तथा ‘भाऊ’ पडसलगीकर यांचा समावेश होतो. त्यांना बुद्धिबळातील भीष्माचार्य संबोधले जाते. असे हे भीष्माचार्य भाऊ पडसलगीकर यांचे काल दि. ७ सप्टेंबर रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन न येणारी आहे. असा बुद्धीबळाचा भीष्माचार्य पुन्हा होणे नाही.भाऊंनी संघकार्याबरोबरच बुद्धिबळाच्या प्रचार, प्रसार व प्रबोधनाचा ध्यास घेऊन बुद्धिबळाचा खेळ संवर्धित केला. असे हे बुद्धिबळाचे भीष्माचार्य भाऊ पडसलगीकर म्हणजे सर्वांसाठी आदरणीय व अनुकरणीय व्यक्तिमत्त्व. सातारा जिल्ह्यातील कर्हाड तालुक्यातील वींग या ग्रामी त्यांचा जन्म आषाढ शुद्ध सप्तमी, शुक्रवार, दि. ४ जुलै १९१९ साली झाला. १९४१ साली विवाह झाला. त्यांना एक मुलगा (कृष्ण नरहर पडसलगीकर, एम.एस्सी., पीएच.डी. मुंबई विद्यापीठ), पाच मुली व १२ नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाऊंनी संघाचे कार्य अगदी लहानपणापासून सुरू केले. एफ.वाय.बी.ए.त शिकत असताना स्वातंत्र्य संग्रामात त्यांना अटक झाली आणि शिक्षण थांबले. बुद्धिबळाची पंरपरा त्यांच्या घरात आजोबा, पणजोबांपासून सुरू होती. भाऊंनाही बुद्धिबळाची जात्याच आवड. १९३३ पासून बुद्धिबळात पूर्ण वेळ उडी घेतली. बुद्धिबळाचा खेळ लोकप्रिय होण्यासाठी मोठ्याप्रमाणात प्रयत्न केले. बुद्धिबळासाठी पैसा जमवायचा होता म्हणून भाऊंनी कुस्त्या लढायला सुरुवात केली. त्यामुळे व्यायाम हा आलाच. भाऊ दररोज दोन हजार जोर व दोन हजार बैठका मारत. गेल्यावर्षी ते सोलापूरला आले असता नव्वदीतही त्यांची शरीरयष्टी या आफाट व्यायामाची प्रचिती देत होती. भाऊंनी ज्ञानोपासनेबरोबरच बलोपासनेला ही तितकेच महत्त्व दिलेले होते.१९०९ साली पहिली बुद्धिबळाची टुर्नामेंट झाली. देशाचे पहिले बुद्धिबळ चँम्पियन होण्याचा मान मोरोपंत मेहेंदळे (हरिपूर). मोरोपंताबरोबर भाऊंचा वेगळाच ऋणानुबंध होता. ‘भाऊ पडसलगीकर बुद्धिबळातच मरेल’ अशी भविष्यवाणी मोरोपंत मेहेंदळ्यांनी केली होेती आणि आजतागायत भाऊंनी हे शब्द खरे ठरवत निधनापर्यंत म्हणजे काल दि. ७ सर्प्टेबर ०९ रोजी पर्यंत हे शब्द खरे ठरविले. तारुण्याच्याकाळापासून बुद्धिबळाच्या शिक्षण व प्रचारप्रसारात भाऊंनी मोरोपंताबरोबर मोठे कार्य केले. विनायक खाडिलकर, अण्णा गद्रे, बाबा बोडस आदी सांगली, कोल्हापूर, सातार्याच्या तरुणांना बुद्धिबळाचे शिक्षण दिले. १९५० साली भाऊ बुद्धिबळ स्पर्धेकरिता पुण्याला गेले आणि तेथून पुढे राज्य व राष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळाचा प्रचार, प्रसार शिक्षण व प्रबोधन कार्य सुरू केले. गेल्यावर्षी सोलापूर मुक्कामी दै. तरुण भारतचे कार्यवाह दिलीप पेठे यांच्या घरी भाऊंशी झालेल्या दिलखुलास चर्चेत भाऊ सांगत होते की, पारतंत्र्याच्या त्याकाळात बुद्धिबळाच्या स्पर्धा घेण्यासाठी ब्रिटिश फेडरेशनची परवानगी घ्यावी लागे. बुद्धिबळ हा खेळ मूळ भारतीयच. त्याचे मूळ रामायणात सापडते. रावणाची पत्नी मंदोदरी ही बुद्धिबळात अतिशय प्रवीण होती. बर्याच बुद्धिबळाच्या चाली व नियम हे तेव्हाचेचे आहेत. राणी मंदोदरीच्या चालीचा वापर रामायणातील युद्धात रावणाने केला आहे, पण रावणाने केलेल्या वाईट कर्मास मंदोदरीचा विरोध होेता. अशा बुद्धीबळाच्या प्राचिनत्वाचा भाऊंनी खुलासा केला होता.भाऊ पडसलगीकरांनी गेली ४२ वर्षे अखंडपणे बुद्धिबळ स्पर्धा चालू ठेवल्या आहेत. १९५० साली ऑल इंडिया चेस फेडरेशनची स्थापना व १९६३ साली ऑल महाराष्ट्र चेस असोसिएशनचे भाऊ अध्यक्ष झाले. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघाबरोबर १९८७ साली संघव्यवस्थापक व संघप्रशिक्षक म्हणून भाऊंनी रशियाचा दौरा केला. दोनवर्षीपुर्वी श्रीगुरुजींच्या जन्मशताब्दीनिमित्त आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा भरविली. ही स्पर्धा बुद्धिबळ क्षेत्रात अविस्मरणीय ठरली. दरवर्षी पंधरा लाख रुपयांच्या बक्षिसांची स्पर्धा श्रीगुरुजींच्या नावाने भरविण्याचा मानसही भाऊंनी यावेळी व्यक्त केला होता. सध्याच्या भाऊंच्या शिष्यामध्ये बुद्धिबळ चॅम्पियन्स जयश्री संकपाळ (कदम), सातारा, भाग्यश्री साठे, प्रवीण ठिपसे, पुष्पा मंगल, पल्लवी शहा, शिल्पा व अश्विनी पाच्छापूरकर, भगिनी, पुष्कर पराडकर आदींचा समावेश आहे. नूतन बुद्धिबळ मंडळ सांगली, ही भाऊंची संस्थाही बुद्धिबळात मोठे कार्य करते आहे.डॉ. हेडगेवारांवर भाऊंची निष्ठा व प्रेम असिम होते. देशाप्रती निर्व्याज प्रेम व त्याग भावनांचे बिज भाऊंच्या मनात डॉ. हेडगेवारांनीच रूजविले. सध्याचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे वडील मधुकरराव भागवत (चंद्रपूर) यांच्यामुळे डॉ. हेडगेवारांचा पहिला परिचय १९३५ साली झाला. तत्त्व, देशभक्ती व निष्ठेमुळे कायमचा संघ स्वयंसेवक बनलो असे त्यावेळी भाऊ म्हणाले होते. त्याकाळी सांगली येथे गणेश (प्रभात) शाखा प्रदीर्घकाळ चालविली. पारतंत्र्याच्या काळातही विक्रमी संख्येने शाखा चालविली. हजाराच्या आसपास संख्या असणारी शाखा चालवल्याचे भाऊ अभिमानाने सांगत होते. त्यावेळी बोलताना भाऊ पुढे म्हणाले होते की, शाखेतील कामाबरोबरच प्रत्येक स्वयंसेवकाच्या आर्थिक कौटुंबिक व सामाजिक गरजांचा विचार केला, नोंदी ठेवल्या. उपजिवीकेच्या साधनांपासून ते सोयरिकीपर्यंतचे कार्य भाऊंनी केले. त्यामुळे माझे संघाशी अतुट ऋणानुबंध निर्माण झाले. माझ्या स्वयंसेवकात निष्ठा व देशभक्ती रूजविली. भाऊंचा व श्रीगुरुजींचा परिचय १९४० सालादरम्यान झाला. यावर बोलताना भाऊ म्हणाले होते की, गुरुजींनी ही वेगवेगळी मूल्ये आमच्यात रूजविली. संघाच्या अतिशय प्रतिकूल काळात गुरुजींनी ज्या निष्ठा वधैर्याने संघ वाढविला, त्याला तोड नाही. श्रीगुरुजींचे धैर्य हे अनुकरणीय होते. अ.स.भीडे हे स्वातंत्र्यवीर सावरकर समर्थक त्यांच्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांशी संबंंध आला. त्याकाळात स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे वाचन, अभ्यास ‘स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात आमच्या पाठीमागे ब्रिटिश पोलीस लागले होते. म्हणून भूमीगत झालो, पण वसंतदादा पाटलांना वारण्याला जायचे होते त्यांच्या पायात काटे मोडले होते. काही मार्ग चिखलाचा होता म्हणून वंसतदादाला पाठकुळी घेऊन चिखल पार करून दिला.’ हा थरारक अनुभव भाऊंनी कथन केला होता. अशा छोट्या छोट्या गोष्टी भाऊंना कालपर्यंत लख्ख आठवत होत्या. दै. तरुण भारत, सोलापूरचे कार्यवाह श्री. दिलीप पेठेंंच्या घरच्या मुक्कामी डॉ. हेडगेवार व श्रीगुरुजींबद्दल बोलताना भाऊ भारावून व तल्लिन होऊन गेले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता, आदर भावनांचे अश्रू भाऊंच्या डोळ्यात तरळलेले मी आजही विसरु शकलेलो नाही. आशा या तत्त्व व सत्वशील भाऊंना राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू, बुद्धिबळ प्रशिक्षक व बुद्धिबळ संघटक म्हणून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यामध्ये १९८९-९० साली शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, १९९१ साली फाय फाऊंडेशन पुरस्कार, १९९४-९५ साली दादोजी कोंडदेव राज्य पुरस्कार व २००५-०६ मध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. असे हे बुद्धीबळातील भिष्माचार्य भाऊ पडसलगीकर आज आपल्यातून जाणे ही राष्ट्राची, बुद्धीबळाची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघपरिवाराची फार मोठी हानी आहे. अशा भिष्माचार्याचे मार्गदर्शन आम्हा पामरांना कोठून मिळणार. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना.• • •
दै. तरुण भारत, सोलापूर, दि. ८ सप्टेंबर ०९