Home » Blog » गज़लविराम!

गज़लविराम!

 ‘ये दौलतभी ले लो, ये शौहरतभी ले लो भले छिन लो मुझसे मेरी जवानी मगर मुझको लौटा दो बचपन का सावन वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी’ या ओळींनी असंख्य रसिकांच्या हृदयात अढळ सिंहासन प्राप्त केलेल्या गजलसम्राट जगजित सिंह यांनी आज अखेर मृत्यूला कवटाळले. ‘मौत भी मै शायराना चाहता हूँ-आ तुझे मै गुनगुनाना चाहता हूँ|’ या मुलायम स्वरांमध्ये मृत्यूलाही सहज स्वीकारण्याचे स्वप्न पाहणार्‍या जगजित सिंह यांनी गजलच्या क्षेत्रावर अक्षरशः राज्य केले. दोन आठवडे झुंजल्यानंतर अखेर जगजित सिंह यांचे निधन झाले. उर्दूची ‘मिल्कियत’ समजणार्‍या नवाबांच्या दुनियेतून गजलला मुक्त करून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणारा गजलसम्राट गेला. प्रख्यात गजल गायक गुलाम अली यांच्यासोबत जगजित सिंह संयुक्त मैफील करणार होते. त्याच दिवशी मेंदूत रक्तस्राव होऊन जगजित सिंह यांना लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली. प्रकृती सुधारत असल्याचे देखील डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. ‘हाये कैसे इस भरी महफिल मे रुसवाई हुई’ या त्यांनीच गायलेल्या गजलेतील शब्दांप्रमाणे वैद्यकीय उपचारांना न जुमानता जगजित सिंह यांनी गजलेची मैफील अर्धवट सोडली. गेली चार दशके जगजित सिंह आपल्या सुरांनी रसिकांना रिझवत होते. राजस्थानात जन्मलेला, मात्र मूळचा पंजाबी असलेला तरुण ‘जीत’पार्श्‍वगायक होण्यासाठी धडपडत मुंबईला आला. त्यापूर्वी काही काळ शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. ख्याल, ठुमरी, ध्रुपद यातील बारकावे जाणून घेतले. तलत मेहमूद, मोहम्मद रफी, मन्नाडे, किशोर कुमार अशा तगड्या व जमलेल्या गायकांचा तो काळ होता. त्यात या तरुणाची धडपड सुरू होती. चित्रपटात पडद्यावर झळकणार्‍या नायकाला आपले पार्श्‍वगायन सूट होऊ शकत नाही, हे लक्षात येताच त्याने आपला मार्ग बदलला. मुंबईत ‘जीत’या शीख युवकाचा जगजित झाला. १९७६ साली जगजित सिंह यांचा ‘द अनफॉरगेटेबल’ हा एचएमव्हीने काढलेला अल्बम हीट झाला. गजलचे स्वरूप पुष्कळसे बदलवल्याने या गायकावर तेव्हा टीकाही झाली. मात्र, जगजित सिंह यांचे संथपणे मार्गक्रमण सुरूच होते. गेल्या चार दशकांमध्ये जगजित सिंह यांचे पन्नासहून अधिक अल्बम निघाले. तुमको देखा तो ये खयाल आया, ये तेरा घर ये मेरा घर, झुकी झुकीसी नजर, होठोसे छुलो तुम मेरा गीत अमर कर दो, होशवालो को खबर क्या बेखुदी क्या चीज है अशी सुरेल गाणी जगजित सिंह यांनी दिली. गजलांचे डिजिटल रेकॉर्डिंग पहिल्यांदा जगजित सिंह यांनीच केले. सतार, संतूर, बासरी या भारतीय वाद्यांसह व्हायोलिन, गिटार, ऑक्टोपॅड, सिंथेसायजर या पाश्‍चात्त्य वाद्यांचा त्यांनी गजलमध्ये समर्पक वापर केला. अनेक नवे प्रयोग केले. फेस टु फेस या गाजलेल्या अल्बममध्ये ‘दैरो हरम मे बसने वालो मयखानोमे फुट न डालो’ या गजलमध्ये जगजित सिंह यांनी समूहस्वराचा अतिशय सुंदर वापर केला. दोन शेरांच्या मध्ये संगीताचे तुकडे न वापरता समूह स्वरांचा साज त्यांनी चढवला. सुळावर चढवल्या जाणार्‍या येशू ख्रिस्त या प्रतीकाचा वापर करून जीवनात सत्य निष्ठेने किंवा प्रामाणिकपणे जगणार्‍या लोकांच्या वेदना मांडणार्‍या ‘सच्ची बात कही थी मैने, लोगो ने सुली पे चढाया’ या गजलला दिलेला स्वरसाज आणि समूहस्वर काढून टाकला, तर ही गजल कोणीच ऐकणार नाही. किंबहुना तो समूहस्वरच त्या गजलचे सगळ्यात मोठे सौंदर्यस्थळ बनले आहे. जगजित सिंह यांनी गायिलेल्या गजल सागरात हात घातल्यास कितीतरी मौल्यवान मोती हाती येतात. प्रत्येक मोत्याचे मूल्य व सौंदर्य वेगवेगळे असल्याचेच आपल्याला जाणवते. ‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी’ही कफील आजर यांची गजल जगजित सिंह यांच्या तोडून ऐकताना लाखो गजलप्रेमींना ती आपलीच भावना वाटली. ठुकराओं अबके प्यार करो मै नशे मे हूँ, या गजलला तरुणांनी बेधुंद दाद दिली. कौन आया रास्ते आयनाखाने हो गये, रात रोशन हो गई दिन भी सुहाने हो गये, या बशीर बद्रनच्या शब्दांनी अनेक मैफिली रंगल्या. खर्‍या अर्थाने गजल घराघरात पोहोचवली. अनेकांचे भावविश्‍व समृद्ध केले. लोक गजलमध्ये का रमतात, या प्रश्‍नाचे उत्तर शोधले तर सर्वांच्याच भावनांना वाट मोकळी करून देणारा तो प्रभावी काव्य प्रकार असल्याचे उत्तर मिळते. जगजित सिंहांनी अशा असंख्य रसिकांचे प्रेम मिळवले. गजल हा शब्दप्रधान गायकीचाच प्रकार असण्यावर जगजित सिंह यांनी शिक्कामोर्तब केले. अनेकदा अनेकांना गजलचे शब्द समजले नाही तरी ती गजल आवडते. याचे पूर्ण श्रेय त्या संगीताचे असते. त्या गजलला दिलेली चाल, ठेका, स्वर आवडत असतात. मात्र, गजलमध्ये शब्दांसाठी स्वर आहेत, स्वरांसाठी शब्द नाही, हा विचार जगजित सिंह यांच्या गजल ऐकताना प्रामुख्याने आपल्याला जाणवतो. शायराला त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात आलेले किंवा त्याने सोसलेले अनुभव तो गजलमधून व्यक्त करतो. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत ही अनुभवांची शिदोरी कायम असते. यातूनच गजलचा दमदार शेर तयार होतो. लखलखीत अनुभव घेऊन येणारा तलवारीसारखा खणखणता शेर लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्याला पोषक असाच स्वरसाज असणे आवश्यक असते. हे पथ्य जगजित सिंह यांनी पाळले असे त्यांच्या अनेक गजलांवरून म्हणता येईल. तलम-मुलायम गळा लाभलेल्या जगजित सिंहांनी शब्दांचा ‘भाव’ सांभाळला. शब्दांशी इमान राखले. लतादीदींसोबत आलेला त्यांचा हळुवार ‘सजदा’हा अल्बमही रसिकांना भावला. जगजित सिंह यांच्या आयुष्यात त्यांना एक मोठे दुःख होते. १९९० साली जगजित सिंह यांचा मुलगा विवेक अपघातात ठार झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी चित्रा सिंह या धक्क्यातून सावरूच शकल्या नाही. त्यांनी गाणं बंद केले होते. तेव्हापासूनच जगजित सिंह यांच्या आवाजात एक वेगळाच दर्द जाणवू लागला, असे त्यांच्या चाहत्यांचे मत होते. या आघातानंतर त्यांची पॉंडेचेरीच्या योगी अरविंद आश्रमाने काढलेली ‘मॉं’ही ध्वनिफीत त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी म्हणावी लागेल. ‘आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे’या अरविंदांच्या देवीमंत्रापासून ते निराला यांच्या ‘वीणावादिनी वर दे’ अशा भक्तिगीतांचा तो अल्बम आहे. अंबे चरणकमल है तेरे, दे मॉं नीज चरणो का प्यार, मेरे अंत तमस को ज्योतिर्मयी करो, या भक्तिगीतांमध्ये जगजित सिंह यांनी अक्षरशः जीव ओतला. प्रामुख्याने ही गाणी गाताना त्यांच्या अभिजात सुरांनी कळस गाठल्याचे जाणवते. त्यांच्या लाखो चाहत्यांनी या भजनांची पारायणे केली. गजल न आवडणार्‍या मंडळींनीही या गाण्यांवर भरपूर प्रेम केले. श्रीराम, श्रीकृष्ण यांच्यावर भजनांसह त्यांनी अनेक भक्तिरचना गायल्या. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कविताही जगजित सिंह यांनी गायल्या आहेत. गेयता नसलेल्या या कवितांचे सादरीकरण कठीण होते. मात्र, त्यांनी ही कसरत सुरेलपणे सांभाळली आहे. गजलशिवाय जगजित सिंह यांची कामगिरी मोठी असली तरी त्यांना चित्रपट संगीतात फारसे यश मिळाले नाही. काही चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. मात्र, ते चित्रपट पार कोसळले. त्या चित्रपटातील गाणेही लोकप्रिय झाले नाही. अखेर जगजित सिंह यांना तो नाद सोडावा लागला. केवळ हिंदीच नव्हे तर उर्दू, पंजाबी, बांगला, गुजराथी, सिंधी आणि नेपाळी भाषांमध्येही त्यांनी गाणी व गजल गायल्या. दूरदर्शनवर गुलजारांची निर्मिती, नासिरुद्दीन शहाचा बेफाम अभिनय आणि जगजितचा स्वरसाज असे समीकरण असलेल्या मिर्झा गालिबनेही अफाट लोकप्रियता मिळवली. गालिबला चढवलेला जगजितचा स्वरसाज आजही लोकांच्या कानात ताजा आहे. त्यांच्या या यशस्वी कारकीर्दीबद्दल भारत सरकारने २००३ साली त्यांना पद्मभूषण सन्मान देऊन गौरविले होते. या पदावर पोहोचण्यासाठी प्रचंड परिश्रम केलेले जगजित सिंह व्यक्तिगत आयुष्यात अतिशय संवेदनशील होते. संघर्षाच्या प्रारंभिक काळात प्रस्थापित गायकांच्या विरोधात वस्तुस्थितीला धरून मात्र प्रक्षोभक विधान केल्याने ते चांगलेच अडचणीतही आले होते. अलीकडे जोरात असलेल्या आयटम सॉंग प्रकाराला त्यांचा विरोध होता. तो त्यांनी जाहीरपणे व्यक्तही केला होता. गुलाम अली, मेहंदी हसन, बेगम अख्तर, तलत मेहमूद अशी गजलच्या क्षेत्रात मोठी नामावली असताना जगजित सिंह यांनी स्वतःचे एक स्थान उभे केले होते. वेगळी ओळख उभी केली होती. गजलच्या आणि गायकीच्या क्षेत्रात खूप काही मागे ठेवून जगजित सिंहांनी निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने गजल आणि संगीत क्षेत्राने खूप काही गमावले आहे. त्यांच्याच स्वरात सांगायचे झाल्यास, ‘तुम चले जाओगे तो सोचेंगे, हमने क्या पाया हमने क्या खोया!’
स्रोत: तरुण भारत : 10/11/2011
http://amarpuranik.in/?p=514
Posted by : | on : 16 October 2011
Filed under : Blog.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *