Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, व्यक्तीविशेष, सामाजिक, स्थंभलेखक » नानाजी देशमुख : एक ‘राजर्षी’

नानाजी देशमुख : एक ‘राजर्षी’

•अमर पुराणिक, सोलापूर•

इंदिरा गांधींविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणणारे आणि इंदिरा गांधींना पराभूत केल्यानंतर निरिच्छपणे मंत्रिपद नाकारणारे आणि त्याहूनही अधिक म्हणजे त्यानंतर चक्क राजकारण संन्यास घेणारे नानाजी देशमुख हे भारतीय राजकारणातील अतिशय वेगळे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना राजकारणातील ऋषी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. राजकारणात कुठे जायचे नि नेमके कधी थांबायचे, हे कळालेला हा भारतीय राजकारणातील कदाचित एकमेव नेता असावा.नानाजींनी अगदी छोट्या वयात माता-पित्यांचे छत्र गमावले. त्यांच्या मामांनी त्यांचे पालनपोषण केले. अतिशय गरिबीत त्यांनी आपले बालपण काढले. त्यांच्याजवळ शिक्षणासाठी देखील पैसा नव्हता, परंतु त्यांच्यात शिक्षण व ज्ञानप्राप्तीची प्रचंड इच्छाशक्ती होती. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आपले शिक्षण पूर्ण केले. राजस्थानातील पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट मधून त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले. त्यांनी आपले उच्च शिक्षण संपल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात उडी घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक प.पू. डॉ. हेडगेवारांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर होता. प.पू.डॉ. हेडगेवार आणि नानाजी देशमुख यांचे अगदी पारिवारिक संबंध होते. प.पू.डॉ. हेडगेवार यांनी नानाजींमध्ये लपलेली प्रतिभा ओळखली व संघाच्या शाखेत येण्यासाठी प्रेरित केले आणि नानाजी देशमुख रा.स्व. संघात दाखल झाले. संघावरील त्यांची निष्ठा आणि निर्मोही वृत्ती व प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करण्याची क्षमता पाहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजी यांनी त्यांच्यावर प्रचारक म्हणून जबाबदारी सोपवून गोरखपूर येथे पाठवले. नंतर नानाजी देशमुख उत्तर प्रदेशचे प्रांत प्रचारक झाले. याच काळात आग्रा येथे त्यांची भेट दीनदयाळ उपाध्याय यांच्याशी झाली. उत्तर प्रदेशात संघाची विचारसरणी रुजविण्याचे मुख्य श्रेय नानाजींनाच जाते. नानाजी देशमुखांचा जन्म जरी महाराष्ट्रातला असला तरीही त्यांची कर्मभूमी मात्र उत्तर प्रदेश व राजस्थान होती. नानाजी देशमुख हे राष्ट्रसेवेत पूर्णपणे अर्पित झालेेले व्यक्तिमत्त्व होते.प्रतिकूल परिस्थितीत अनेकानेक अडचणींना तोंड देत नानाजींनी संघाचा विचार या भागात पोहोचविले. जवळपास अडीचशे शाखा त्यांनी गोरखपूर परिसरात स्थापन केल्या. नानाजींंनी कायमच शिक्षणावर जोर दिला. त्यांनी त्या अनुशंगाने उचलेले पहीले पावुल म्हणजे सरस्वती शिशू मंदिर होय. या सरस्वती शिशू मंदिर शाळेची त्यांनी १९५० मध्ये गोरखपूर येथे स्थापना केली. १९४७ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रधर्म, पाञ्चजन्य व स्वदेश या नियतकालिकांच्या संपादकांना म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना मार्गदर्शनाची भूमिका नानाजींकडे सोपविण्यात आली होती. नानाजी या नियतकालिकांचे प्रबंध निर्देशक म्हणून काम पाहू लागले. आर्थिक अडचणीत दैनिक किंवा साप्ताहिक चालविणे मुश्किल कार्य होते, पण त्यांचा उत्साह व इच्छाशक्ती मात्र दांडगी होती. उत्कट राष्ट्रप्रेमामुळेच त्यांनी सर्व प्रतिकूलतेवर मात करीत या नियतकालिकांना एक चांगली ओळख निर्माण करून दिली. नानाजींचे राजकीय जीवन हे राजकारणी कसा असावा, याचा वस्तुपाठच आहे. संघप्रणित भारतीय जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना जेव्हा करण्यात आली, त्यावेळी श्रीगुरुजींनी उत्तर प्रदेशात या पक्षाचे सचिव म्हणून नानाजींवर जबाबदारी सोपवली. नानाजींनी उत्तर प्रदेशात प्रत्येक जिल्ह्यात पक्षाची मजबूत बांधणी केली. त्यांच्यामुळेच तिथल्या राजकारणात जनसंघ एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला. १९५७ पर्यंत भारतीय जनसंघाने उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांत आपले स्थान निर्माण केले. या काळात नानाजी देशमुखांनी उत्तर प्रदेशचा झंझावाती दौरा केला. भारतीय जनसंघाने उत्तर प्रदेशातील प्रमुख राजकीय शक्ती म्हणून आपली पाळेमुळे रुजवली. या राज्यात १९६७ साली चौधरी चरणसिंहांच्या नेतृत्वाखाली सर्वात पहिले गैरकॉंग्रेसी सरकार सत्तेत आणण्याचे श्रेय नानाजींना जाते. नानाजींचे चौधरी चरणसिंह आणि डॉ राममनोहर लोहिया यांच्याची खूप चांगले संबंध होते. लोहियांना तर त्यांनी संघाच्या एका कार्यशाळेतही आणले होते. जयप्रकाश नारायण यांच्याशीही नानाजींचा स्नेह होता. आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतही नानाजींनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.नानाजी देशमुखांनी सर्व विरोधकांना इंदिरा गांधींच्या विरोधात एकत्र आणले. सर्व पक्षांचा विलय करून जनता पार्टी स्थापन करण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी देऊ केलेले मंत्रिपद त्यांनी विनम्रतापूर्वक नाकारले. या निवडणुकीत नानाजी बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राजकीय निवृत्ती स्वीकारली. यानंतरचे संपूर्ण आयुष्य त्यांनी सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले. उत्तर प्रदेशात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची दूरदृष्टी, अटलबिहारी वाजपेयी यांचे अमोघ वक्तृत्व आणि नानाजींच्या संघटनात्मक कार्यामुळे पुढे भारतीय जनता पार्टी एक मोठी शक्ती बनली. त्याकाळात नानाजी देशमुखांनी कॉंग्रेसच्या कुशासनाचा बुरखा फाडला. अणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात त्यांनी मोठे आंदोलन छेडले होते. जयप्रकाश नारायण यांनी केलेल्या आंदोलनात पोलिसांच्या लाठ्या खाऊन जयप्रकाश नारायण यांना यातून सुरक्षित बाहेर काढले. त्यावेळी पोलिसांच्या लाठीहल्ल्यात नानाजींना खूप मार लागला होता, त्यात त्यांच्या हातही मोडला होता.१९८० मध्ये घेतलेल्या राजकीय निवृत्तीनंतर आपले संपूर्ण जीवन सामाजिक आणि रचनात्मक कार्यात खर्च केले. तसेच ते कायम आश्रमात राहिले आणि कधीही आपल्या कार्याचा प्रचार केला नाही. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश यांच्या सीमेवरील चित्रकूट येथे त्यांनी अतिशय महत्त्वाचे काम याकाळात केले. चित्रकूट ग्रामोदय विश्‍वविद्यालय या देशातील पहिल्या ग्रामीण विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली. या चित्रकूट ग्रामोदय विश्‍वविद्यालयाचे ते पहिले कुलगुरू होते. तेथील उजाड परिसर त्यांनी हिरवागार करून दाखवला. केवळ शेतीच नव्हे तर तेथील सामाजिक जीवनातही त्यांनी अनेक बदल घडविले. त्यांनी कृषी, कुटिरोद्योग, ग्रामीण आरोग्य आणि ग्रामशिक्षण आदी कार्यावर जोर देऊन मोठे कार्य हाती घेतले. त्यांनी गरिबी निर्मूलनासाठी आणि नागरिकांच्या कमीत कमी गरजा पुरवण्यासाठी प्रदीर्घ अभियान चालवले. येथील गावातील कलह, वाद यांना मूठमाती देण्यासाठी तंटामुक्तीचे अभियान तेव्हा राबवले होते. या ग्रामकलह मुक्तीसाठी त्यांनी गावातील पंचांची कमिटी बनवली. त्याद्वारे अनेक भांडणे मिटवली गेली आणि सामाजिक सलोखा उत्पन्न केला. नानाजींनी उत्तर प्रदेशातील सर्वात मागासलेला जिल्हा गोंड आणि महाराष्ट्रातील बीड जिह्यात बरेच सामाजिक कार्य केले. त्यांनी चालवलेल्या उपक्रमांचा उद्देश होता, प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येकाच्या शेताला पाणी. १९६९ साली पहिल्यांदा ते चित्रकूट येथे आले आणि शेवटपर्यंत ते चित्रकूटचेच होऊन राहिले. त्यांनी प्रभू रामचंद्राची कर्मभूमी असलेली चित्रकूट नगरी पाहिली आणि मंदाकिनीच्या तटावर बसून आपल्या उर्वरित जीवनकालात चित्रकूट नगरीला बदलण्याचा निर्धार केला. आपल्या वनवासाच्याकाळात प्रभू श्रीरामाने दलित बंधूंच्या उत्थानाचे कार्य केले. नानाजींनीही हीच प्रेरणा घेऊन चित्रकूट नगरीला सामाजिक कार्याचे केंद्र बनवले. नानाजींचे स्नेही सांगतात की, राजा प्रभू रामचंद्रापेक्षा वनवासी रामाचे नानाजींना आकर्षण असल्याचे नानाजी सारखे म्हणायचे, म्हणून उर्वरित जीवन चित्रकूटमध्येच दीनदुबळ्यांंच्या सेवेत घालवायचे. हे तेच स्थान आहे, जेथे श्रीरामाने आपल्या वनवासाच्या १४ वर्षांपैकी १२ वषर्ंे गरिबांच्या सेवेत घालवली. नानाजींनीही आपल्या आयुष्यातील अंतिम क्षणापर्यंत या प्रणाचे पालन केले. नानाजींनी वयाच्या ९४ व्या वर्षी आपले प्राण चित्रकूट येथेच २७ फेब्रुवारी २०१० रोजी सोडले.माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीही त्यांच्या संघटन कौशल्याचे आणि दीनदयाळ शोधसंस्थेच्या कामाचे प्रत्यक्ष भेटीत कौतुक केले होते. या संस्थेच्या मदतीने शेकाडो गावे तंटामुक्त, कोर्ट-दाव्यांपासूून मुक्त करण्याचा आदर्श आपणा सर्वांसमोर ठेवला आहे. डॉ. अब्दुल कलाम या भेटीत म्हणाले होते की, ‘चित्रकूटमध्ये मी नानाजी देशमुख आणि दीनदयाळ उपाध्याय संस्थेच्या सहकार्‍यांशी बोललो. दीनदयाळ शोधसंस्थेच्या ग्रामीण विकास उपक्रमाचे देशभर अनुकरण केल्यास, बलशाली भारत निर्माण होईल. या संस्थेचे कार्य अनुपम आहे!’ नानाजी देशमुखांच्या म्हणण्याप्रमाणे जर लोक भांडतच बसले, तर त्यांना विकासाला वेळच मिळणार नाही. शोषित आणि दलितांच्या उत्थानासाठी नानाजींच्या समर्पित कार्याची डॉ. कलाम यांनी मनापासून स्तुती केली होती. नानाजींना अनेक पुरस्कारांनी आणि पदांनी गौरविण्यात आले आहे. रालोआ सरकारच्या काळात १९९९ मध्ये त्यांना राज्यसभेचे सन्माननीय सदस्यत्व देण्यात आले होते. नुकतेच त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.   
• दै. तरुण भारत, सोलापूर. ७ मार्च १०

Posted by : | on : 8 January 2011
Filed under : Blog, चौफेर : अमर पुराणिक, व्यक्तीविशेष, सामाजिक, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *