Home » Blog » पारशी नववर्षारंभ : ‘पतेती’

पारशी नववर्षारंभ : ‘पतेती’

•अमर पुराणिक•

मानवतेच्या धर्मात सर्वात जास्त महत्त्व माणुसकीचे. ही माणुसकी जपणारी माणसे आजच्या जगात दुर्मिळच. हूमत-पवित्र विचार, हूकत- पवित्र वाणी आणि हवरस्त- पवित्र कर्म या त्रिसूत्रीचे तळमळीने, आत्मीयतेने आणि तत्परतेने जपणारा, खराखुरा मानवधर्म आचरणारा समाज म्हणजे पारशी समाज. पारशी समाजात जे.आर.डी. टाटांपासून ते आपल्या सोलापूरच्या झुबीन व मंजुश्री अमारियांपर्यंत अशी उच्च जीवनमूल्ये जपणारी माणसे आहेत.
उद्या पारशी नववर्षारंभ सन १३७८ अर्थात नवरोज. पारशी नूतन वर्षाचा प्रारंभ ‘फरवर्दीन’ मासाने होतो. तत्पूर्वी आज पारशी वर्षाचा अखेरचा दिवस ‘पतेती’ म्हणून साजरा केला जातो. मुळात पारशी समाजात सणांची मांदियाळी नाहीच. वर्षभरात पतेती, नवरोज व चैत्रात जमशेदजी नवरोज हे तीन सण साजरे केले जातात. चैत्रातला जमशेदजी नवरोज हा ‘चैत्रगौरी’प्रमाणे साजरा केला जातो. पारशी वर्षाचे शेवटचे दहा दिवस हे पितृपक्षाप्रमाणे पितरशांतीकरिता  पाळले जातात. या दहा दिवसांत प्रत्येक पारशी कुटुंबाकडून पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून फुले किंवा फुलदाणी वाहिली जाते. नवरोजला नव्या वर्षाच्या प्रारंभानिमित्त मंगलमय वातावरणात सकाळी अग्यारीत अग्नीची पूजा केली जाते. तसेच  पंचमहाभूतांची देखील पूजा केली जाते. पारशी समाजाचे दैवत म्हणजे ‘अग्निदेव’ व धर्मसंस्थापक झरतुष्ट्र हे होत. ‘अवेस्ता’ या पारशी धर्मग्रंथातील शांतिपाठांचे मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने करतात. यादिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करून नवे कपडे परिधान करतात. शेवया, शिरा, मिष्ठान्न व विशेषत: गोड दही आदी पदार्थ बनविले जातात. तसेच जेवणात पुलाव, डाळ, पात्राणी आदी विविध पंचपक्वान्नांचा घाट घातला जातो. पाहुणे, शेजारी व मित्रांना मिठाई व शुभेच्छा दिल्या जातात.
अग्निदेवाचे भक्त असलेले पारशी लोक अग्यारीमध्ये अखंड अग्नी तेवत ठेवतात. प्राचीन काळी पर्शियातून आणलेला अग्नी गुजरात राज्यातील वापी व दमणजवळ ‘उदवाडा’ या ग्रामी अद्यापही अखंडपणे तेवत आहे. सोलापूरसह सर्वत्र हा अग्नी तेवत ठेवणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. या अग्नीसाठी चंदनाची लाकडे वापरली जातात. पारशी अग्यारीत दररोज पाच पूजा केल्या जातात.
अतिशय प्रेमळ, सुस्वभावी, प्रामाणिक व जुळवून घेणारी वृत्ती असणार्‍या पारशीजनांची संंख्या देशात खूपच कमी आहे. खरेखुरे अल्पसंख्याक असूनही शासनाकडे कोणतीही मागणी या समाजाकडून आजपर्यंत झालेली नाही. अशा निष्पाप व निर्मळ लोकांची दखल शासनाने घेणे गरजेचे आहे. प्रामाणिकपणा व सचोटी ही वैशिष्ट्ये जन्मताच असलेल्या पारशी समाजाचे आपल्या भारताच्या प्रगतीत मोठे योगदान असल्याचे मत दै. तरुण भारतशी बोलताना झरिन साम अमारिया, झुबिन व मंजुश्री अमारिया यांनी व्यक्त केले व पारशी नववर्षाच्या शुभेच्छा त्यांनी सर्व शहरवासीयांना दिल्या.

Posted by : | on : 27 Dec 2011
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *