Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक » भाजपाचं झंझावाती नेतृत्व

भाजपाचं झंझावाती नेतृत्व

•चौफेर : •अमर पुराणिक•
आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी कार्यशैलीचा उभ्या महाराष्ट्राला चांगलाच परिचय झालेला आहे. ते शांत स्वभावाचे अन् आक्रमक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. अभ्यासू, अजातशत्रू, धोरणी आणि अनुभवीही असणारे देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याने महाराष्ट्र भाजपात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. भाजपा नेते, कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत तर केलेच, पण नागरिक आणि बिगर भाजपामतदारांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या प्रदेश भाजपाध्यक्षपदी निवड झाल्याचा ‘योग्य व्यक्ती निवडला’ अशा शब्दात आनंद व्यक्त केला. हीच बाब महाराष्ट्र भाजपाच्या उज्ज्वल भवितव्याची नांदी ठरली आहे. भाजपा श्रेष्ठींनी लहान वयात दूरदृष्टी लाभलेलं युवा नेतृत्व महाराष्ट्राला दिले ही महाराष्ट्रवासियांसाठी उज्वल भविष्याची नांदी ठरेल यात शंका नाही. 
देवेंद्र फडणवीस…! फक्त नावच पुरे. कारण देवेेंद्र फडणवीस यांचे कामच तसे आहे. आजपर्यंत त्यांच्या प्रभावी कार्यशैलीचा उभ्या महाराष्ट्राला चांगलाच परिचय झालेला आहे. ते शांत स्वभावाचे अन् आक्रमक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. अभ्यासू, अजातशत्रू, धोरणी आणि अनुभवीही असणारे देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याने महाराष्ट्र भाजपात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. भाजपा नेते, कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत तर केलेच, पण नागरिक आणि बिगर भाजपामतदारांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या प्रदेश भाजपाध्यक्षपदी निवड झाल्याचा ‘योग्य व्यक्ती निवडला’ अशा शब्दात आनंद व्यक्त केला. हीच बाब महाराष्ट्र भाजपाच्या उज्ज्वल भवितव्याची नांदी ठरली आहे. भाजपा श्रेष्ठींनी लहान वयात दूरदृष्टी लाभलेलं युवा नेतृत्व महाराष्ट्राला दिले ही महाराष्ट्रवासियांसाठी उज्वल भविष्याची नांदी ठरेल यात शंका नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात आपली अमीट छाप पाडणारे भाजपाचे युवा नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड म्हणजे येत्या निवडणुकीत  भाजपा-शिवसेना-रिपाइंचा सत्ताधीश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी तारुण्यावस्थेत आणि राजकारणात एकाच वेळी प्रवेश केला. बालपणापासूनच घरातूनच राष्ट्रीय विचारांचे बाळकडू मिळाले. देवेंद्रजींचे वडील गंगाधरराव फडणवीस हे हडाचे संघ, भाजपा कार्यकर्ते, ते नागपूर पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले होते. महाविद्यालयातील निवडणुकांपासून ते वॉर्ड अध्यक्ष, मंडल भाजपाध्यक्ष, प्रदेश युवा मोर्चा, राष्ट्रीय युवा मोर्चा, भाजपा नगरसेवक, महापौर, पहिले मेयर इन कौन्सिल आणि त्यानंतर आमदार, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशी यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करीत देवेंद्र फडणवीस यांनी आम जनतेलाही मोहून घेतले. वयाच्या केवळ २१ व्या वर्षी ते नगरसेवक झाले तर २६ व्या वर्षी महापौर झाले. असा राजकारण आणि समाजकारणाचा गाढा अभ्यास असलेला झंझावाती नेता प्रदेश भाजपाध्यक्षपदी विराजमान होणे यात आजच भाजपाला अर्धे यश मिळाल्यासारखे आहे.
मंगळवार, दि. ३० एप्रिल रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दुष्काळी पाहणी दौर्‍यावर आ. देवेंद्र फडणवीस आले असता त्यांच्याशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळाली. तरुण भारतच्या वाचकांसाठी देवेंद्रजींशी संवाद साधला असता त्यांनी अनेक विषयांवर मनमोकळेपणाने माझ्याशी वार्तालाप केला.
यावेळी बोलताना आ. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझी प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली, गोपीनाथ मुंंडे साहेबांनी पुढाकार घेतला, नितीन गडकरी साहेबांनी होकार दिला आणि सर्वांनीच माझ्या निवडीला पसंती दर्शवली. पक्ष हा एका नेमक्या दिशेने जातोय हे माझ्या निवडीने प्रथम अधोरेखित केले आहे. माझ्या समोर अनेक प्रश्‍न आहेत, मला वाटते की, सध्याचे जे सरकार आहे ते जनतेच्या मनातून पूर्णत: उतरलेले आहे. जनतेला हे सरकार आता नको आहे. आता जनतेला सक्षम पर्याय हवाय आणि तो पर्याय आम्ही आहोत, हे जनतेच्या मनावर बिंबवणं हे माझ्या समोरचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी ‘अनकॉम्प्रोमायझिंग पार्टी’, अर्थात कोणत्याही प्रकारचा समझोता न करणारा पक्ष अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची जडण घडण आम्हाला करायची आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये काही राजकीय समझोते आम्हाला करावे लागतात, पण जनतेच्या हिताविरुद्ध जाऊन कोणत्याही परिस्थितीत आम्ही समझोते करणार नाही,’ ही गोष्ट आ. देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केली. ते पुढे म्हणाले की, जनतेच्या हिताकरिता एखादी राजकीय खेळी म्हणून एखादी गोष्ट करावी लागली तर ती करु. आम्हाला शिवछत्रपतींच्या गनिमीकाव्याचा वारसा आहे. आम्हाला जनतेच्या हितासाठी गनिमीकावा करावा लागतो. जनतेच्या हितासाठी करूही, पण जनतेच्या हिताविरुद्ध काय वाट्टेल ते झाले तरीही समझोता करायचा नाही यावर पार्टी ठाम असल्याचे आ. फडणवीस यांनी निक्षून सांगितले.
दुसरी गोष्ट अशी की, निवडणुकीला सामोरे जात असताना भाजपाशी मोठ्याप्रमाणात युवावर्ग जोडणे हे आमचे मोठे अभियान आहे. पक्ष मजबूत आहे, गावोगावी युवा कार्यकर्तेदेखील आहेत, पण अधिक प्रमाणात पक्षाशी युवा जोडणे आणि त्या युवकांना हा माझा पक्ष आहे, माझ्या ज्या आशा, आकांक्षा आहेत त्यांची पूर्तता करण्याची शक्ती केवळ भाजपात आहे, असा आत्मविश्‍वास तरुणांमध्ये निर्माण करून एक सकारात्मक चित्र आम्ही निश्‍चितपणे तयार करू, असा आत्मविश्‍वास आ. फडणवीस यांनी व्यक्त केला. एका बाजूला आम्ही युवकांना जोडायचं असं म्हणतो त्याचबरोबर आम्ही केवळ विरोधी पक्षात आहोत म्हणून बोट दाखवणार नाही. प्रश्‍न मांडणे हे आमचे काम आहे, पण अनेक वेळा विरोधीपक्ष प्रश्‍न मांडतो त्यावर उपाय आहेत का?असं विचारल जातं, याचं उत्तर आहे आमच्याकडे, प्रत्येक समस्येवर उपाय आहेत. जर भाजपाचं राज्य आलं, तर महाराष्ट्राला काय करायचं आहे, कोठे न्यायचे आहे याची ब्लू प्रिंट भारतीय जनता पक्षाकडे तयार आहे. आम्ही समस्या मांडत असताना त्या समस्येवर उपाय देखील सांगतो. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याकरिता आज सगळ्यात मोठी अडचण ही प्रशासनिक अकार्यक्षमता आहे. कोठेही सरकारमध्ये प्रशासनिक क्षमता आणि आत्मविश्‍वास या दोन्ही गोष्टी दिसत नाहीत. आम्ही ‘टेस्टेड’ आहोत, कारण सहा वर्षे भाजपाचे केंद्रातील सरकार आणि साडेचार वर्षे महाराष्ट्र राज्यातले भाजपा-शिवसेनेचे युती सरकार या दोन्ही सरकारच्या परफॉर्मन्सबद्दल कोणीच वाईट म्हणत नाही. काही चुका झाल्या असतील म्हणून आम्हाला सत्तेतून बाहेर जावं लागलं, पण असं कोणी म्हणत नाही की, आमचे नाकर्ते सरकार आहे. लोक अजूनही आमच्या सरकारच्या दमदार कारकीर्दीबद्दल बोलतात. त्यामुळं आम्ही आता ‘ट्राईड अँड टेस्टेड’ आहोत. आता आम्ही ज्या काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करून त्यातून शिकून अधिक चांगल्या प्रकारचं राज्य देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे जनतेला आम्ही समजाऊन सांगू, पटवून देऊ.
अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की, भाजपा-शिवसेना आणि रिपाइं युतीनीच आम्ही निवडणुकीला समोरे जाणार आहोत, पण हे करत असताना एक ‘लार्जर अलाईन्स’ देखील विरोधकांचा व्हावा, असा प्रयत्न देखील आम्ही करू. तो कुठल्या प्लॅटफॉर्मवर व्हावा, युती करावी की अजून काही करावं, ते आज नाही सांगता येत, पण आमचा तसा प्रयत्न सुरू असणार असल्याचे आ. फडणवीस यांनी स्पष्ट केले. याचं कारण सांगताना फडणवीस म्हणाले की, हे जे सरकार सत्तेवर आहे ते सरकारविरोधी मतांमध्ये फुट पडल्यामुळे आले आहे. या सरकारला ३०, ३३ टक्के मतं आहेत आणि जवळजवळ ६७ टक्के मतं ही त्यांच्या विरोधात आहेत. तर या मतांमध्ये विभागणी झाली आहे. सरकारविरोधी मतांच्या विभागणीचा फायदा मिळून हे निष्क्रीय सरकार पुन्हा येऊ, नये असा आमचा प्रयत्न असेल आणि त्याकरिता केवळ आमचीच जबाबदारी नाही, तर जे लोक म्हणतात की, हे सरकार जनविरोधी आहे; त्यासर्वांनीच विरोधी मतांची फुट टाळली पाहिजे, असे आवाहन आ. देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज हा आमचा पहिला प्रयोग असणार नाही. या देशात असे अनेक प्रयोग झाले, ७७ साली हा प्रयोग झाला, ८९ साली असा प्रयोग पाहिला, ९१ साली पाहिला, ९६ साली पाहिला. अनेक वेळा असे प्रयोग झालेला आहे आणि त्याच्यामुळे कुठल्या न कुठल्या पायावर विरोधकांना आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी आमची युती मात्र भाजपा, सेना आणि रिपाइं युती राहणार आहे.
भाजपा राजनिती खेळण्यात कमी पडते का? या प्रश्‍नावर बोलताना फडणवीस  म्हणाले, ‘नाही मुळात आमच्या पक्षाचा पायाच सामाजिक आहे. समाजकारणावर आधारित आहे, ते राजकीय नाहीच आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनाही शिकवत असतो की, राजकारण हे सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचं साधन आहे आणि राजकारण किंवा सत्ता हे आपलं साध्य नाही ते साधन आहे, ज्या माध्यमातून जनतेचा, समाजाचा विकास साध्य करायचा आहे. आम्हाला मिळालेलंं बाळकडूच राजकीय नाहीय, तर आमची पठडी सामाजिक आहे. ही गोष्ट खरी आहे की प्रचलित घसरलेल्या हीन राजकारणात आम्ही कमी पडतो, पण प्रचलित राजकारण हे समाजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्ताकारणाचं राजकारण झालं आहे’, अशी खंत व्यक्त करून फडणवीस म्हणाले की, आम्ही सत्ताकारण फारसे शिकलेलो नाही, पण आता त्याही परिस्थितीत आम्ही जगायला शिकायला लागलोय.
आज भाजपा ही लोकांची गरज आहे. कॉंग्रेसने ५० वर्षांच्या सत्ता काळात जे केले नाहीत त्याहून अनेक पट अधिक काम भाजपाने ५ वर्षांच्या सत्ता काळात करून दाखवले आहेत. अभ्यासक, पत्रकार, तज्ज्ञ सोडून सर्वसामान्य माणूसही भाजपा सत्ताकाळातील ८,१० मोठे प्रोजेक्ट धाडाधड सांगतो. असा विद्वान आणि समाजाचे हित साधणारा पक्ष राजकारण खेळल्याशिवाय सत्तेत येत नसेल, तर मग त्यालाही राजकारण खेळावेच लागेल असे वाटत नाही का?
या बद्दल बोलताना फडणवीसांनी सांगितले की, नाही तसं नाही भाजपाचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर मध्यप्रदेशात पहिल्यांदा सत्तेत आलो नंतर काही अडचणी झाल्या, सत्तेतून गेलो, नंतर पुन्हा सत्तेत आलो आणि आजपर्यंत गेलो नाही. गुजरातमध्ये सत्ता मिळाली, नंतर सत्ता गेली आणि नंतर पुन्हा सत्ता आली, तर आजपर्यंत तेथेही कायम सत्ता भाजपाचीच आहे. राजस्थानमध्ये आता तीच स्थिती येणार आहे. छत्तीसगडमध्ये तीच स्थिती आहे. त्यामुळे असे दिसून येते की, पहिल्यांदा आम्हाला सत्ताकारणाचा अनुभव कमी पडतो. आम्ही विकास हा खूप करतो. केंद्रात आणि राज्यातही चांगला विकास केला, पण ज्याप्रकारे कॉंग्रेसला सत्ताकारणाचा अनुभव आहे, ते कशा प्रकारे लोकांना खोटं सांगतात, सत्तेचा दुरूपयोग करतात. आम्हाला ते करायच नाहीये, पण आम्हाला आता त्यांची खेळी समजायला लागली आहे. त्यामुळे आता आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो. मला असं वाटतं की, यापुढे हा भाजपाचा बदललेला चेहरा दिसेल. त्यात आम्ही त्यांच्यासारखा कपटीपणा करणार नाही, पण आम्ही त्यांच्या हीन राजकारणाला योग्य उत्तऱ नक्की देऊ.
सिंचन समस्या आणि दुष्काळावर बोलताना आ. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुळात काय आहे की राज्याच्या निर्मितीनंतर पाण्याचं नियोजन हा प्रायोरिटीचा विषयच राहिला नाही. योग्य नियोजन योग्यवेळी केलं असत, तर हा प्रश्‍न आला नसता. समजा आपण विदर्भाकडून निघालो तर पूर्व विदर्भात उत्तम पर्जन्य आहे. पश्‍चिम विदर्भ हा त्यापेक्षा थोडा कमी आहे. त्यानंतर मराठवाड्याकडे सरकल्यानंतर पाऊस अजून कमी होतो. मराठवाडा आणि प. महाराष्ट्रातील काही भाग हा रेन शॅडो झोन मधला आहे. पर्जन्यछायेतला आहे. तेथे पाणी अजून कमी आहे. सांगली, कोल्हापूर, सातार्‍याकडून पलीकडे कोकणात गेलो तर अतिशय पावसाचा भाग आहे. तर हे जे पर्जन्याच्या प्रमाणाचे विशिष्ट प्रकार आहेत, त्यांचा विचार करून पाण्याचे आणि पिकांचे नियोजन झाले पाहिजे होते. त्यासोबतच हा जो पर्जन्यछायेचा भाग आहे, त्या भागात ज्याला आपण ग्राऊंड वॉटर म्हणतो. भूजल पातळी ही अत्यंत खाली गेली आहे. कारण आपण भूजलाचा अनिर्बंध वापर केला आहे. आता जवळजवळ ७६ पाणलोट क्षेत्रं आता डार्क झोनमध्ये गेली आहेत. म्हणजे आता आपण कीतीही खोदलं तर पाणी लागणार नाही अशा स्थितीत जातोय आणि सरकारचा सगळा भर हे जर आपण पाहिलं तर उसाचे क्षेत्र हे पर्जन्यछायेत आहे. येथे उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात, ऊस हे कॅश क्रॉप असल्यामुळे शेतकरी ते घेणे स्वभाविक आहे. त्यावर उसाचे कारखाने चालतात अशा परिस्थितीत पाण्याचं रिचार्जिंग हे देखील होणं गरजेचं होतं. ते आपण घेतलं नाही. किमान उसाला कमी पाणी लागेल अशा उपाययोजना करायला हव्या होत्या. उसाला पर्यांयी असे पैसा देणारे क्रॉप घेणे आवश्यक होते. हे आपण करायला हवे होते. ते केले नाही. ज्या भागात ऍश्यूअर्ड वॉटर आहे, बारमाही नद्या आहेत आणि सर्वात जास्त सिंचन क्षमता जेथे आपण तयार करू शकतो अशा भागात आपण धरणं तयार केली नाहीत. उदा. विदर्भ त्याठिकाणी पाणी आहे, पण तेथे धरणं केली नाहीत, असे मत आ. फडणवीस यांनी मांडले. यापाठीमागची कारणं सांगताना ते म्हणाले की, मोठी धरणं आवश्यक आहेत. पण हळूहळू आपण मोठी धरणं करत असताना त्या धरणांचं स्कॅममध्ये रूपांतर झालं. म्हणजे मोठी धरणं करायची, अनावश्यक कामं त्यातून करायची आणि पैसा कमवायचा त्याचा किती पोटेन्शिअल तयार होतोय, किती कॅनॉल होतात, किती पारसर्‍या जातात याचा विचार न करता धडधडीत पैसा खर्च करायचा. आता आपण म्हणतो की, मराठवाड्याला २१ टीएमसी पाणी कृष्णा खोर्‍याचे मिळाले पाहिजे  आणि त्याकरिता योजना तयार केली, त्यात ७०० कोटी खर्च करून टाकले, पण ते पाणी कुठून येणार आहे, तर ते कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेतून आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना ४ हजार कोटींची आहे. तेथे मात्र केवळ २० कोटी खर्च केले. म्हणजे ‘‘आडात नाही तर पोहर्‍यात कोठून पाणी येणार’’ असं आपण म्हणतो तशी स्थिती आहेे. हे नियोजन पूर्णपणे कॉंट्रॅक्टर ड्रिव्हन झाले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत पाण्यासारखा पैसा खर्च झाला, पण पाणी काही मिळू शकले नाही आणि महाराष्ट्रात एकीकडे भूजलाची पातळी घसरली. जलसंधारणाची कामे झाली नाहीत. प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे या अडचणी निर्माण झाल्या.
महाराष्ट्राच्या विकासाबद्दल ऊहापोह करताना आ. फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राचा जो ग्रोथ रेट आहे तो निगेटीव्ह ग्रोथ रेट आहे. गेली दोन वर्षे पाऊस नसतानाही मध्यप्रदेशमध्ये १८ टक्के, गुजरातमध्ये ११ टक्के ग्रोथ रेट असताना आपल्या महाराष्ट्राचा मात्र वजा दोन (-२) ग्रोथ रेट आहे. यासंदर्भांत जसं अस्मानी संकट आहे  तसंच सुल्तानी संकटही आहे. हे या सरकारच्या भ्रष्टाचारातूनच तयार झालेलं संकट आहे.
सामान्य माणसाला भ्रष्टाचाराविरुद्ध चीड आहे, पण तो व्यक्त करू शकत नाही. ती व्यक्त करण्याची हिंमत आणि प्रोत्साहन या दोन्हीही गोष्टी नाहीत. त्या सामान्य माणसाला ती हिंमत आणि प्रोत्साहनही द्यावे लागेल. त्याला वाटतं की, आपण हे बोलून फायदा काय? त्यापेक्षा सिस्टीमचा भाग होऊ, त्यासाठी त्यात हिंमत द्यावी लागेल. आज जी सर्वांत मोठी अडचण आहे ती म्हणजे निवडणुकांवर पैशाचा जो प्रभाव आहे. तो प्रचंड झाला आहे. राष्ट्रवादीच्या उदयानंतर तर निवडणुका या इतक्या खर्ची झाल्या आहेत.  कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने पैशे टाकतं ती फारच चिंताजनक बाब आहे. भ्रष्टाचारातून सरकारची तिजोरी लुटतात, पैसे कमवतात आणि निवडणुकीत वाटतात. हे थांबलं पाहिजे.  जनतेत प्रबोधन, कायद्यात सुधारणा, अशातून व्यवस्था सुधारेल अन्यथा लोकांनी अशी भ्रष्ट व्यवस्था स्वीकारली तर ते लोकशाहीकरिता अत्यंंत घातक आहे.
भाजपाला सत्ता मिळवून देण्याबाबत आ. देवेंद्र फडणवीस यांच्यात कमालीचा आत्मविश्‍वास आहे, याचे कारण सांगताना ते म्हणतात, भाजपात २१ व्या वर्षापासून काम करतोय किंबहूना त्याही आधी तीन वर्षे. पहिल्यांदा वॉर्डाचा अध्यक्ष झालो मग मंडल भाजपाध्यक्ष झालो. नंतर शहर युवा मोर्चात गेलो, प्रदेश युवा मोर्चा, नंंतर राष्ट्रीय युवा मोर्चात गेलो. प्रदेश भाजपात आलो आणि आता प्रदेशाध्यक्ष झालो. त्यामुळे वॉर्डस्थर किंवा गावस्थरापासून काम केलेला मी कार्यकर्ता आहे. संघटनेत काम करताना अडचणी काय आहेत. त्या मला माहिती आहेत. कार्यकर्त्यांत निराशा कशामुळे येते, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित कसे करता येते, हे मी पाहिलेले आहे, स्वत: अनुभवलेेले आहे. या दोन्ही गोष्टींचा फायदा मला होर्ईल. माझं तर मत असं आहे की, भाजपाची जी परंपरागत पद्धत आहे, प्रशिक्षण आणि प्रबोधनातून कार्यकर्ता निर्माण करणे आणि आंदोलनातून नेतृत्व निर्माण करायचे याच पद्धतीने भाजपा चालते. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाच्या खूप चांगल्या जागा वाढतील. तसा आमचा प्रयत्न आहे. रिपाइंच्या युतीमुळे दलित समाजात विश्‍वास तयार झाला आहे आणि कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसने राजकीय अस्पृश्यतेचा जो खेळ मांडला होता तो खेळ आता रिपाइं आमच्या सोबत आल्याने पूर्णपणे संपलेला आहे.
मनसेबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज ठाकरेही सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रंणकंदन करताहेत. त्यामुळे महाराष्ट्राला सक्षम पर्यांय देणं आणि हे सरकार घालवणं असा भाजपा-सेना आणि मनसेचा कॉमन अजेंडा आहे. त्यामुळे मनसे युतीत येईल की नाही याचा निर्णय राज ठाकरेंना करायचा आहे किंवा आमच्या पार्लमेंटरी बोर्डाला करायचा आहे. म्हणूनच हे सरकार घालवायचं असेल तर विरोधीमतांतील फुट टाळायला हवी. कमी षटकांमध्ये जास्त धावा काढण्याचं आमच्यासमोर आव्हान आहे आणि ते आम्ही साध्य करू, असा विश्‍वास आ. फडणवीस यांनी बोलून दाखवला.
भाजपाने हिंदूत्वाचा मुद्दा सोडलेला नाही, आपला अजेंडा कायम आहे. आणि आमची जी आयडीयॉलॉजीकल भूमिका आहे ती महत्वाची आहे. भाजपाने इतर राज्यात दमदार कामगीरी केली आहे. उदा. मोदींनी विकासाचे मॉडेल तयार केले, एकीकडे धोरणांचा लकवा झालेलं सरकार कोणताही निर्णय घेऊ शकत नाही न कोठले काम करु शकत नाही असे देशाचे संपुआ सरकार आणि आणि दुसरीकडे झपाट्‌याने विकास करणारे मोदींच सरकार यात लोकांना मोदींच सरकार उजवं वाटतं. त्यामुळे ज्यावेळी आम्ही मोदींना किंवा त्यांचे काम प्रोजेक्ट करतो.त्याच प्रमाणे शिवराजसिंह चौहान यांचेही उत्तम मॉडेल आहे, रमण सिंहांतचे ही उत्तम मॉडेल आहे. हे सर्व भाजपाचे आयकॉनिक नेते आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र राज्यात आणि केंद्रात ही भाजपाची सत्ता येईलच येईल असे ठाम मत मांडून आ. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘तरुण भारतच्या वाचकांना माझं एवढच सांगण आहे, माझ्याकडून वचन आहे की, राष्ट्रवाद आणि विकास या द्विसुत्रीवर जो भाजपा उभा राहीला त्या आधारावरच भाजपा पुढच्या काळात मार्गक्रमण करताना दिसेल. आणि आपल्या ज्या अपेक्षा भाजपाकडून आहेत त्या आम्ही निश्‍चतपणे पुर्ण करण्याचा प्रयत्न करु.’’ 
दै. तरुण भारत, आसमंत, दि. ५ मे २०१३.
Posted by : | on : 5 May 2013
Filed under : Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *