Home » Blog » …मौत भी मै शायराना चाहता हूँ|

…मौत भी मै शायराना चाहता हूँ|

…मौत भी मै शायराना चाहता हूँ|
अमर पुराणिक

धीर गंभीर मंद्र खर्जातला आवाज, त्याला कारुण्यात चिंब भिजलेल्या भावनांचा गाभा,  दर्दील्या आणि मखमली आवाजाची दैवी देणगी आणि त्याला कठोर परिश्रमांची जोड लाभलेले गजल गायक जगजित सिंग यांच्या जाण्याने दर्दी रसिकांच्या भावनांवर फुंकर घालणारा जीवाभावाचा सखा आपल्या अनंताच्या प्रवासाला निघून गेला. त्यांच्या जाण्याने त्यांची चाहते मंडळी, संगीतप्रेमी शोकाकूल झाले आहेत.
जगजित सिंग यांच्या ‘इन सर्च’ या गजलेच्या अल्बममधील ही एक गजल आहे.
अपने होठों पर सजाना चाहता हूँ|
आ तुझे मै गुनगुनाना चाहता हूँं॥
 आखरी हिचकी तेरे जानो पे आये|
 मौत भी मै शायराना चाहता हूँ॥
या गजलेतील भावार्थाप्रमाणेच जगजित सिंग जगले. जे जन्मले ते गाण्यासाठी. कवी-शायरांच्या रचनांना आपल्या ओठांवर सुरेल स्वरांनी सजवत या गजला त्यांनी गायल्या आणि सर्व संगीतप्रेमींना गुणगुणायला लावल्या. शायराच्या म्हणण्याप्रमाणे जगजित सिंगानी मृत्यूची कल्पना देखील अतिशय भावपूर्ण आणि मृत्यूला मित्राला कवटाळल्याप्रमाणे कवटाळण्याची भावना  या गजलेतून व्यक्त केली. जगजित सिंगांच्या गजलेतील प्रत्येक ओळ हे सांगून जाते की, या माणसांना खरं जीवन काय आहे हे उमगलं होतं.
राजस्थानातील श्रीगंगानगर येथे १९४१ मध्ये जन्म झालेल्या या गुणी कलावंताला उपजतच सुरेल गोड गळा लाभला. थेट हृदयाला भिडणार्‍या त्यांच्या आवाजातल्या जादूने कित्येक वर्षे रसिकमनावर राज्य केले आणि यापुढेही करतच राहील. त्यांचे वडील देखील संगीतप्रेमी आणि अभ्यासक होते. त्यामुळे सोने पे सुहागा असाच प्रकार घडला. कुमारावस्थेत जगजित सिंग यांनी पं. छगनलाल शर्मा यांच्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. यात त्यांनी धृपद-धमार, ख्याल, ठुमरी, दादरे, पंजाबी होरी, पंजाबी हिर आदी प्रकार आत्मसात केले. हा त्यांचा गानशिक्षणप्रवास पुढे गझलांपर्यंत पोहोचला आणि तिथे अनेक दशकं स्थिरावला.
जगजित सिंग यांची गानकारकीर्द पाच दशकांची असली तरी त्यांनी खरी भरारी घेतली ती ७० आणि ८०च्या दशकात अनेक दिग्गज गजल गायकांच्या स्पर्धेत उतरून. त्याआधी व त्याकाळात बेगम अख्तर, तलत मेहमूद, मेहंदी हसन, मलिका पुखराज, अबीदा परविन आदी बडी मंडळी गजलच्या क्षेत्रात आपली रियासत चालवीत होते. उपशास्त्रीय संगीताची बैठक असलेली त्यांची गजल ‘खास’ लोकांसाठी होती. धनदांगडे किंवा गजल व शायरीचा अभ्यास असणारेच लोक गजल ऐकत होते. आशा पार्श्‍वभूमीवर जगजित सिंग जेव्हा गजल गायकीत उतरले आणि त्यांनी एक मोठे धाडस केले. फारसीमध्ये ‘दुहाई’ नावाचा एक काव्य प्रकार असतो. त्या पद्धतीने त्यांनी गजल पेश केली. शिवाय त्यांनी गजलेला आजच्या काळातील संगीत व तंत्रज्ञानाचा साज चढवला. बोजड उर्दू सोपी करून त्यांनी गजलेचे रूप पालटून टाकले आणि जगजित सिंगानी बदलेले हे रूप तरुण वर्ग व गजल न कळणार्‍यांना भावले. थोडक्यात त्यांनी उपशास्त्रीय संगीतात सुगम संगीतचा ढंग मिसळला आणि ती सोपी केली.  सर्वसामान्य माणसांना कळणारा. हृदयाला चटकन भिडणारा. कला जेव्हा अशी खास लोकांमधून सर्वसामान्य लोकांत येते तेव्हा तिचे रूप आगळे आणि दाद देखील दर्दीच मिळते. एका अर्थाने  जगजितसिंग यांना मॉडर्न गजलेचे प्रणेते म्हणायला हरकत नसावी.
सुरुवातीचा संघर्षाचा काळ सोडला तर नंतर मात्र जगजितसिंगांनी मागे वळून पाहिले नाही. कारण नंतर त्यांची प्रत्येक मैफल रंगत गेली. या मैफलीबरोबरच त्यांनी जवळजवळ ५० तरी अल्बम प्रकाशित केले. अनफरगेटेबल, समवन समवेअर, इन सर्च, इन कोर, लव्ह इज ब्लाईंड, फेस टू फेस, मिर्झा गालिब, कहेकशॉ, आईना, मरासिम, संवेदना असे कित्येक अल्बम्‌स प्रसिद्ध झाले. शब्दप्रधान गजला त्यांच्या सुरप्रधान गायकीतून थेट रसिकांच्या मनात कायम घर करून राहिल्या. याशिवाय अर्थ, साथसाथ, प्रेमगीत आदी चित्रपटांमधील ‘होटो से छू लो तुम’, ‘तुमको देखा तो ये खयाल आया’, सरफरोश मधील ‘होश वालो को खबर क्या जिंदगी क्या चीज है’ आदी गीतेही अजरामर झाली.
‘है और भी दुनिया में सुखनवर बहुताच्छे, दिल ही तो है न संगो किश्त, आह को चाहिये एक उम्र असर होने तक, प्यार का पहला खत लिखनेमे वक्त तो लगता है, कभी यु भी तो हो, कोई ये कैसे बताये के वो तनहा क्यू है, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी, कभी खामोश बैठोगे, हजारो ख्वाहीशे ऐसी के हर ख्वाहीशपे दम निकले, वो कौन है दुनिया मे जिसे गम नही होता, चाक जिगर के सि लेते है, अशा एकाहून एक सरस गजला जगजितसिंग यांच्या धीरगंभीर आवाजातील स्वरांनी रसिकांना अक्षरश: मोहिनी घातली होती. पत्नी चित्रासिहांसोबतच लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यापर्यंत अनेकांच्या सोबतीने त्यांनी गायिलेली गीते लोकप्रिय ठरली आहेत.
जगजित सिंग यांच्या गजलांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गजल साकी आणि शराब या भोवतीच रुंजी घालणारी नव्हती. अनेक भाव रंग, जीवनरंग त्यांनी गजलेत उतरवले. जगजित सिंग यांनी गजलेत प्रणय आणला, ती आर्तता, व्याकुळता, हुरहूर, निराशा, उद्वेग, सफलता, दर्द, शांती असे सर्व भाव गजलेतून समर्थपणे मांडले आणि तिला खूप मोठे केले.
जगजित सिंग यांच्या कारकीर्दीतील कळस म्हणजे ‘मिर्झा गालीब’ ही मालिका. प्रसिद्ध कवी गुलजार यांच्या काव्यांना मिर्झा गालिब यांच्या ढंगात पेश करत अक्षरश: तेव्हाच्या पिढीला वेड लावले. गजल आणि शायरीचा जनक मिर्झा गालिब सर्वसामान्यांच्या घराघरात मनामनात पोहोचवला. दुसरा महत्त्वपूर्ण अल्बम म्हणजे ‘संवेदना’ माजी पंतप्रधान अटलजींच्या शब्दांना स्वरसाज. शब्दांनाही मंत्राचे सामर्थ्य बहाल करण्याची ताकद लाभलेले कवि अटलबिहारी वाजपेयी यांच्या लेखणीतून साकारलेल्या शब्दांना जगजित सिंग यांनी गेय रूप दिले. मुळात अटलजींच्या कविता गेय रूपात आणणे अवघड काम, पण ते जगजित सिंग यांनी लिलया पेलले. अटलजींचे शब्द, जगजित सिंग यांचा आवाज अमिताभ आणि गुलजार यांच्या दमदार प्रस्तावना अशा सुरेल संगमातून एक अजरामर काव्य रसिकांना अस्वादता आले. ‘क्या खोया क्या पाया’ हे त्यातील गीत रसिकांना खूपच भावले.
गजलेतील आर्त भावांप्रमाणेच त्यांनी स्वत:चे आयुष्य देखील काढले. बर्‍याचदा असे होते की, काव्य आणि गाणे हे व्यवसाय होऊन जातात आणि वैयक्तिक जीवन मात्र एक रुक्ष व्यवहार होऊ जातो. जगजित सिंग मात्र याला अपवाद आहेत. चित्रा सिंग यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला, पण चित्रा या घटस्फोटीत होत्या. शिवाय एक मुलगी देखील होती. अशा सापत्य घटस्फोटीतेशी विवाह केला. मुलीलाही आपल्या मुलीप्रमाणे स्वीकारले. पत्नी, मुलगी, मुलावर भरभरून प्रेम केले, पण दुर्दैवाने प्रथम त्यांच्या मुलाचा विवेकचा अपघातात मृत्यू झाला आणि मुलगी मोनिकाने आत्महत्या केली. या आघाताने चित्रासिंग पार कोलमडून गेल्या आणि त्यांनी गाणेच कायमचे बंद केले, पण हे आघात सोसून जगजित सिंग पुन्हा उभे राहिले. पुन्हा गात राहिले. चित्रासिंग यांच्या बाबत आशा भोसले म्हणतात की, मला जगजित सिंग यांच्या पत्नी चित्रा यांच्याविषयी जास्त दु:ख होत आहे. त्यांनी यापूर्वीच आपला मुलगा गमावला होता आणि पतीलाही गमावले आहे. आता त्या अतिशय एकट्या पडल्या आहेत.अपत्यं गेल्याचे दु:ख काय असते, हे एखादी माताच समजू शकते.
याही स्थितीत जगजित आणि चित्रा एकमेकांचा आधार बनून जगत होते, पण नियतीला हेही मान्य नव्हते आणि जगजित सिंग या जीवन रंगमंचावरील भरी महफिलीतून निघून गेले. पण गायक कलावंत कधीही मरत नसतो तो कायम जिवंत असतो. तो आपल्या गाण्यामधून, काव्यामधून. जगजित सिंग गेले तरी ते गाण्यातून आपल्यात कायम राहणार आहेत, पण जर ते जीवित असते तर आणखी खूप काही नवे नवे रसिकांना ऐकायला मिळाले असते ही हुरहुर मात्र कायमच लागून राहील. जगजित सिंग यांच्या आत्म्यास शांती लाभो!

तरुण भारत, सोलापूर, दि. १६ ऑक्टोबर २०११.

Posted by : | on : 6 November 2011
Filed under : Blog.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *