Home » Blog, सडेतोड : अरुण रामतीर्थकर, स्थंभलेखक » सोशल मीडियाचा समाजविघातक वापर

सोशल मीडियाचा समाजविघातक वापर

•पंचनामा : भाऊ तोरसेकर•
Social-Network2ज्या दिवशी अवघी मुंबई रस्त्यावर लोटली होती, आणि कलानगर वांद्रे ते शिवाजीपार्क सेनाभवनच्या तीन चार किलोमिटर्स रस्त्यासह आसपासच्या इमारतीवर जनसागराची त्सुनामी आली होती, तेव्हा मुंबईपासून ७०-८० किलोमिटर्स दूर असलेल्या पालघर या छोटेखानी शहरामध्ये एका विशीतल्या मुलीने फ़ेसबुकवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. ‘जगात रोज कित्येक माणसे मरत असतात, पण जग चालूच असते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या मृत्यूनंतर दोन मिनिटांची शांतता पाळली गेली, त्यांच्याच बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मग सक्तीने बंद पाळावा का?’ काहीशी तशीच पण अस्पष्ट प्रतिक्रिया आयबीएन वाहिनीचे संपादक राजदीप सरदेसाई यांनीही ट्विटर माध्यमातून व्यक्त केली होती. पण त्यांच्याकडे कोणी गंभीरपणे लक्ष दिले नाही. मात्र पालघरच्या त्या मुलीच्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकार्‍याने तक्रार नोंदवली आणि तिच्यासह तिच्याशी जाहीर सहमती व्यक्त करणार्‍या दुसर्‍या एका मुलीला पोलिसानी अटक केली. नंतर त्या मुलीच्या काकांच्या पालघरमधल्या इस्पितळावर जमावाने हल्ला केला व मोडतोड केली. त्या मुलीने आपली प्रतिक्रिया पुसून टाकली होती. मग सोमवारी वाहिन्यांवर त्या मुलीच्या अविष्कार स्वातंत्र्यावर मोठमोठे विद्वान चर्चा करत होते. पोलिस, शिवसैनिकांचा धुडगुस व त्या मुलीचे स्वातंत्र्य अशा विषयावर आपापले शहाणपण मिरवण्याची अहमहमिका चालू होती. मात्र आपण काय बोलतो त्याचे भान त्या चर्चेमध्ये सहभागी होणार्‍या किती लोकांना होते; याचीच शंका आहे. फ़ेसबुकला सोशल मीडिया म्हणतात, अविष्कार स्वातंत्र्य हे दुसर्‍याला बाधा आणण्यासाठी नसते, प्रसंग काय होता. भगतसिंग वगैरे स्वातंत्रासाठी बलिदान करणारे होते. इत्यादी गोष्टी या शहाण्यांना माहिती तरी आहेत काय, याचीच शंका आली. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मुलीने ती प्रतिक्रिया लिहिली, ती प्रतिक्रिया तरी यातल्या कोणी वाचली होती काय याचीही शंका आहे. शिवाय स्वातंत्र्य देताना वा घेताना तो आगीशी खेळ असतो याचीही जाणिव कुठे दिसली नाही.   एक मुद्दा पहिला घेऊ. फ़ेसबुक वा अन्य इंटरनेटचे जे माध्यम आहे, त्याला सोशल मीडिया म्हणतात. त्यात सोशल याचा अर्थ सामाजिक असा होतो; याबद्दल तरी वाद होण्याचे कारण नाही. आणि म्हणूनच जे काही सामाजिक असते; त्याचा वैयक्तीक हेतूने व सामाजिक स्वास्थ्याला बाधा आणण्यासाठी वापरणे सामाजिक म्हणता येणार नाही, हेसुद्धा मान्य करावेच लागेल. ज्यामुळे सामाजिक शांतता व सौहार्दाला बाधा येऊ शकते वा आणली जाते; अशा कुठल्याही कृतीला असामाजिक म्हणतात, याबद्दलही वाद होण्याचे कारण नाही. इथे समाज म्हणजे मोठी लोकसंख्या असा अर्थ होतो. संपुर्ण समाज वा देशाची संपुर्ण लोकसंख्या, असाच त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे त्याच लोकसंख्येतील एखादी व्यक्ती, मोठ्या लोकसंख्येला विचलित करणारे कुठलेही कृत्य करणार असेल वा करत असेल; तर त्याची ती कृती असमाजिक ठरते. मग तो बॉम्बस्फ़ोट असो, हिंसाचार असो किंवा हिंसाचाराला प्रवृत्त करणारे शब्द वा आवाहन असो. या मुलीने जे माध्यम वापरले ते फ़ेसबुक म्हणजे सोशल माध्यम आहे, त्याचा वापर तिने कोणत्या सामाजिक हितासाठी केला आहे काय? ज्या घटनेमुळे मुंबईच्या रस्त्यावर पंचविस लाख लोक उतरले आहेत व त्यांच्या भावना कमालीच्या हळव्या आहेत, त्यांचे मन विचलित करणारी प्रतिक्रिया त्या वेळी व्यक्त करणे समाजहिताचे कृत्य होते काय? आणि असे लिहिण्यासाठी सामाजिक माध्यम वापरणे, हीच मुळात समाजविघातक कृती नाही काय? आपल्या प्रतिक्रिया व मते आपल्यासाठी माह्त्वाची आहेत, पण त्याचा जाहिर उच्चार केल्याने, कुणाच्या भावना दुखावणार असतील व त्याचे प्रक्षुब्ध प्रतिसाद उमटू शकतात, हे माहिती असेल, तर ते बोलण्या व व्यक्त करण्याचा हेतू शुद्ध रहात नाही. मग ती व्यक्तीगत प्रतिक्रिया रहात नाही तर डिवचण्याचा मामला होऊन जातो.एक उदाहरण घेऊ. ती मुलगी बंदच्या विरोधात लिहिते आहे काय? ती सक्तीच्या बंदच्या विरोधात बोलते आहे काय? एकूणच वाहिन्यांच्या व माध्यमांच्या चर्चेतला सूर असा होता, की तिच्या बंदविषयक मताची गळचे्पी करण्यात आली व त्यासाठीच पोलिसांनी तिला विनातपास अटक करून गजाआड ढकलले, असे भासवले जात होते. पण ती माध्यमांची शुद्ध बदमाशी होती. त्या मुलीने जे काही लिहिले ते संपुर्ण सांगितले जात नव्हते. तिच्या प्रतिक्रियेतून लोकभावना दुखावण्याचा मुद्दाम केलेला प्रयास व हेतू लपवला जात होता. तिने सक्तीच्या बंद विरोधात भूमिका मांडली असती वा प्रतिक्रिया दिली असती, तर नक्कीच इतके तीव्र पडसाद उमटले नसते. पण त्या मुलीची प्रतिक्रिया अत्यंत स्पष्ट आहे. बंदमुळे आपल्या अडचणी वाढल्या वा त्रास झाला; याबद्दल तिची तक्रार अजिबात नाही. तिला त्याबद्दल तक्रारच करायची नाही. तिला कोणाच्या तरी भावना दुखावण्यातच रस होता आणि तेच तिच्या संपु्र्ण प्रतिक्रियेतून स्पष्टपणे दिसून येते. जे काही तिने लिहिले आहे, त्या शब्दाचे अर्थ तिला कळत नसावेत किंवा जाणीवपुर्वक तिने जा गुन्हा केलेला आहे. आपण जे शब्द लिहितो आहे, त्यातून समाजात प्रक्षोभ निर्माण होईल, हे तिला कळत नसले तर ती मुलगी सोशल मीडियाचा वापर करण्यास अपात्र आहे आणि म्हणुनच ते माध्यम वापरण्याचा मर्यादाभंग तिने केलेला आहे. म्हणूनच चर्चा करताना तिचे सर्व शब्द वा फ़ेसबुकवरील पोस्ट; माध्यमे लपवित होती. त्यातला प्रक्षोभक भाग लपवून सगळी चर्चा चालली होती.

ती आरंभी काय म्हणते? ‘जगात रोजच माणसे मरत असतात, पण जग चालूच असते.’ याचा अर्थ काय होतो? जगात जी सात आठशे कोटी लोकसंख्या आहे, त्यापैकी एक कोणीतरी आज मेला असेल. तिच्या लेखी बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला काहीही मोल नाही. अब्जावधी मानव प्राणीमात्राप्रमाणे तोही एक आहे. त्या दिवशी जगात हजारो मृत्यू झाले असतील. मग याचे कौतुक कशाला? असे तिला त्या आरंभीच्या विधानातून सुचवायचे आहे. ते समाजातील एका मोठ्या नव्हेतर प्रचंड लोकसंख्येच्या भावना दुखावणारे नाही काय? त्या मुलीचा बाप किंवा कोणी कुटुंबातला कोणी अगदी नैसर्गिक मृत्य़ुने मरण पावला असताना, कोणी तिला असे बोलले तर काय होईल? म्हणजे तिच्या घरात शोकाकुल वातावरण असताना शेजारी उभा राहुन वा तिला ऐकू येईल, अशा आवाजात कोणी असेच मत व्यक्त केले; मग तिची प्रतिक्रिया काय असेल? समजा कोणी तिथे जाऊन म्हणाला, ‘त्यात काय मोठे जगात रोजच माणसे मरतात, तुम्ही कशाला रडत बसला आहात, चला उठा कामाला लागा, जग चालुच असते ना?’ ही जी कोणी मुलगी आज अविष्कार स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा झालेली आहे, ती असे तिला ऐकू येईल अशा सुरात बोलणार्‍याला हारतुरे देईल काय? की असे जो कोणी बोलेल त्याच्या अंगावर धावून जाईल? त्याच्यावर शिव्यांचा वर्षाव करील, की स्तुतीसुमनांचा वर्षाव करील? तिला असे बोलणार्‍याचे अविष्कार स्वातंत्र्य मान्य होईल काय? बाकी सगळ्या गोष्टी व मुद्दे बाजूला ठेवून केवळ तिच्याच बाबतीत असा भावनिक प्रसंग आला; तर तिची प्रतिक्रिया काय असेल, त्याचा चर्चेत पाल्हाळ लावणार्‍यापैकी एकाने तरी विचार केला काय?

शनिवार रविवारी मुंबईची जी परिस्थिती होती, त्यात किमान पंचविस तीस लाख लोकांना आपल्याच घरातील, कुटुंबातील कोणी आप्तस्वकीय प्रियजनाचा मृत्यू झाल्याची भावना होती. मुंबई बाहेर अनेक गावात शहरात वस्त्यांमध्ये तीच शोकाकूल भावना होती. हे त्या मुलीला कळत नसेल, तर तिला फ़ेसबुक वगैरे माध्यम वापरण्याची मुभाच असता कामा नये. कारण ज्यातून लोकांच्या संपर्कात रहावे, अशी सुविधा देण्यात आली आहे, त्याचाच वापर त्या मुलीने इतरांच्या भावना दुखावण्यासाठी व त्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी हेतूपुरस्सर केला आहे. तिची प्रतिक्रिया एकाच मैत्रीणीला आवडली आणि तिच्या प्रोफ़ाईलवर फ़ारसे मित्र नाहीत असा दावा दिशाभूल करणारा आहे. कारण फ़ेसबुकवर तुम्ही जे लिहिता, ते अब्जावधी लोकांपर्यंत विनाविलंब पोहोचते करण्याची क्षमता आहे. म्हणूनच विनाविलंब त्याबद्दल पोलिसात तक्रार होऊ शकली. ज्यांनी तक्रार केली ते तिच्या मित्रयादीमध्ये नव्हते, तरीही त्यांच्यापर्यंत ती प्रतिक्रिया पोहोचली व त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. म्हणजेच एकालाच आवडले हा बचाव फ़सवा आहे. मुद्दा आहे, तो अविष्कार स्वातंत्र्याचा नसून दुसर्‍याच्या भावना दुखावण्यासाठी वा त्यातून समाज स्वास्थ्य विघडवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करायची मुभा असावी काय, असा मुद्दा आहे. ज्यांना साधन वापरण्याची अक्कल वा भान नाही त्यांच्या हाती अशी साधने द्यावीत काय, हा मुद्दा आहे. म्हणूनच अविष्कार स्वातंत्र्याचे ढोल वाजवून सत्य लपवण्याचे कारण नाही. कुठल्याही गुन्ह्याचा तपास व दोषपात्र ठरवण्याची प्रक्रिया हेतू तपासून होत असते. या मुलीचा हेतू गुन्हा करण्याचा होता काय? २१/११/१२

Posted by : | on : 22 November 2012
Filed under : Blog, सडेतोड : अरुण रामतीर्थकर, स्थंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *