राज्याला स्वावलंबी आणि आर्थिकदृष्टया सक्षम बनविणे हे या सरकारने आपले लक्ष्य ठेवले. भाजपा सरकारने केलेली हीच विकासकामे निवडणूक अजेंडयावर घेऊन भाजपा नेते आणि कार्यकर्ते प्रचाराच्या रणभूमीत उतरले आहेत. ‘मिशन रिपीट’चा नारा देत भाजपाने जनतेच्या मनात स्वतःचे स्थान पक्के करण्याचा प्रयत्न केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये नवरात्रीचे ढोल वाजण्याच्याही आधी निवडणुकांचे ढोल वाजू लागले. पितृपंधरवडा संपताच सर्वच उत्सुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी रांगा लावल्या. जागोजागी लागलेल्या बॅनर्स व स्वागत फलकांवरून, सणासुदीच्या दिवसात उत्साहाने व चैतन्याने भारलेल्या या वातावरणाचा निवडणूक प्रचारासाठी फायदा करून घेण्याची चढाओढ दिसू लागली आहे. नवरात्र संपल्यानंतर आणि दिवाळीच्या तोंडावर 4 नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 68 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. शुभ्र, उत्तुंग हिमालयाला जवळचे असणारे हे राज्य निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. लोकसंख्या तशी विरळ, म्हणजे 76 लाख इतकी. येथील नागरिक हे विशेषतः शेतकरी, मजूर, बागायतदार अशा वर्गातील. राज्यात भाजपा आणि काँग्रेस हेच प्रमुख पक्ष. त्याशिवाय अनेक छोटे, तसेच प्रादेशिक पक्षही निवडणुकीत आपला कौल अजमावतील. त्यात हिम लोकतांत्रिक पक्ष, हिमाचल विकास काँग्रेस, हिमाचल प्रदेश लोकराज पक्ष, ऑल इंडिया ट्राईब्ज ऍण्ड मायनॉरिटी फ्रंट, जनहित मोर्चा आणि लोकतांत्रिक मोर्चा हिमाचल प्रदेश, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, समाजवादी पक्ष, बसपा व डावे पक्ष यांचा सहभाग असेल. अर्थात येथील जनतेवर आतापर्यंत केवळ भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांचाच प्रभाव आहे. या दोन पक्षांनाच तिने आलटून पालटून सत्ता दिली आहे. 2007 च्या निवडणुकीत काँग्रेसला 68 पैकी 23, तर भाजपाला 41 जागा मिळाल्या होत्या. 4 जागा मिळवणाऱ्या हिमाचल विकास काँग्रेसशी युती करत भाजपा सत्तास्थानी आली होती. भाजपा सरकारचे मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल यांनी गेल्या 5 वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे ते चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी वर्ग हाच या सरकारच्या केंद्रस्थानी होता. धुमल सरकारने या वर्गाच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या. केवळ निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्यापर्यंतच आपल्या कामाच्या मर्यादा न ठेवता या सरकारने त्याही पुढे जाऊन सर्वसामान्य माणसाचा विकास जलदगतीने करण्यासाठी पावले उचलली. दुर्गम क्षेत्रातही दळणवळणाची साधने सहज उपलब्ध व्हावीत यासाठी त्यांनी राज्यभर ज्याप्रकारे रस्त्यांचे जाळे उभारले आहे, त्यामुळे ‘सडकवाला मुख्यमंत्री’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्याशिवाय सर्व स्तरातील मुलांना शालेय शिक्षण उपलब्ध करून देण्यातही सरकारने यश मिळवले. राज्याला स्वावलंबी आणि आर्थिकदृष्टया सक्षम बनविणे हे या सरकारने आपले लक्ष्य ठेवले. भाजपा सरकारने केलेली हीच विकासकामे निवडणूक अजेंडयावर घेऊन भाजपा नेते आणि कार्यकर्ते प्रचाराच्या रणभूमीत उतरले आहेत. ‘मिशन रिपीट’चा नारा देत भाजपाने जनतेच्या मनात स्वतःचे स्थान पक्के करण्याचा प्रयत्न केला आहे. याउलट काँग्रेसच्या आमदारांनी मात्र गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत आपल्या तिजोरीत भर घालण्यावरच लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी करणाऱ्या 445 पैकी 33 टक्के उमेदवार कोटयधीश असल्याचे निरीक्षण येथील एका सर्वेक्षण संस्थेने नोंदवले आहे. त्यापैकी पहिल्या क्रमांकावर काँग्रेसचेच नेता बृज बिहारी पटेल असून त्यांची संपत्ती 169 कोटी इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह हे असून त्यांची संपत्ती 33 कोटी इतकी आहे. काँग्रेसच्या बहुतांश आमदारांचा या यादीत समावेश असून 2007मध्ये त्यांची जी संपत्ती होती, त्यात गेल्या 5 वर्षांत मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे या संस्थेने निदर्शनास आणले आहे. त्याशिवाय राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी कोटयवधी रुपयांचे गैरव्यवहार केल्याचे आरोप भाजपा नेते अरुण जेटली यांनी केले. वीरभद्र यांनी प्राप्तिकर विभागाला चुकीचे विवरण देऊन कोटयवधी रुपयांचा कर चुकवला असल्याचे, तसेच विमा पॉलिसीच्या माध्यमातून पैशांची हेराफेरी केल्याचे जेटली यांनी निदर्शनास आणले. इस्पात नामक स्टील कंपनीने व्हीबीएस या नावावर पैसे जमा केल्याचेही पुरावे त्यांनी लोकांसमोर आणले आहेत. ही एकूण रक्कम सुमारे 2.28 कोटी इतकी असून व्हीबीएस ही वीरभद्र सिंह यांच्या नावाची अद्याक्षरे आहेत, असे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. त्याशिवाय डीएलएफ कंपनीद्वारे जमिनीचे घोटाळे केल्याचे आरोपही त्यांच्यावर केले गेले होते. या सर्व आरोपांनी वीरभद्र सिंह हे खूपच बिथरले असावेत. सुरुवातीला तर त्यांनी अरुण जेटली यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकण्याची धमकी दिली. आणि नुकतेच एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांनी जेव्हा त्यांना भ्रष्टाचाराविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, तेव्हा ते अधिकच चिडले. तुमचे कॅमेरे फोडून टाकीन, असे म्हणत ते पत्रकारांच्याच अंगावर धावून गेले. आधीच त्यांच्या गैरव्यवहार प्रकारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस गोत्यात आली होती. त्यात वीरभद्र यांच्या या पवित्र्याने काँग्रेस नेते अधिकच चिंताग्रस्त झाले. त्यांनी वीरभद्र यांच्या कृतीबद्दल प्रसारमाध्यमांकडे परस्परच क्षमा मागितली. त्यामुळे वीरभद्र यांनाही नंतर क्षमायाचना करावी लागली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी निवडणूक रणधुमाळीचा रंग अधिकच गडद करत आहेत. नुकतेच सोनिया गांधी यांनीही निवडणूक प्रचारासाठी हिमाचल प्रदेशला भेट दिली आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणारा विकास हा केंद्र सरकारचीच कृपा असल्याचा दावा केला. तसेच भाजपा सरकारविरुध्द येथील ओबीसी समाजाचे मन कलुषित करणारी वक्तव्येही त्यांनी केली. मात्र येथील जनतेने धुमल यांच्या सुशासनाचा अनुभव घेतलेला असल्याने त्यांच्या या आरोपांनी फार काही साध्य होणे कठीणच आहे. दुसरे म्हणजे, संपूर्ण देशच काँग्रेसी नेत्यांच्या भ्रष्टाचारी कारनाम्यांनी आणि संपुआ सरकारच्या महागाई वाढविणाऱ्या आर्थिक धोरणांनी काँग्रेसवर रुष्ट आहे. या निवडणुकीत त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. भाजपा आणि काँग्रेस यांच्याबरोबरच अन्य पक्षही निवडणुकीच्या प्रचारात कसून उतरले आहेत. किमान आपल्या सोयीच्या मतदारसंघात तरी आपले अस्तित्व सिध्द करण्याची धडपड सर्वच पक्ष करत आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये नव्याने सुरुवात करणाऱ्या राष्ट्रवादीने या निवडणुकीत काँग्रेसची साथ नाकारली आहे. नाही म्हणायला हिम लोकतांत्रिक पार्टीने व जनता दलाने समाजवादी पक्ष आणि डावे पक्ष यांच्या बरोबरीने तिसरी आघाडी निर्माण करून हिमाचलच्या जनतेसमोर नवा पर्याय ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण या आघाडीवर लोकांनी विश्वास ठेवावा इतके तिचे कर्तृत्व नाही. त्यामुळे हा पर्याय फुसकाच ठरणार आहे. मात्र मते फोडण्यासाठी हे पक्ष कितपत प्रभावी ठरताहेत, हे निकालानंतरच कळेल. सध्या तरी भाजपा सरकारच्या सुशासनाला कौल देण्याच्या मनःस्थितीत हिमाचलची जनता दिसत आहे. त्यामुळे ‘मिशन रिपीट’ यशस्वी होण्याचीच शक्यता अधिक दिसत आहे
Posted by : AMAR PURANIK | on : 16 Nov 2012 Filed under : Blog Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper.. You can follow any responses to this entry through the RSS 2.0 You can leave a response or trackback to this entry